11 March, 2016

लळित

कशाचेही शेवटचे क्षण अगदी चुटपुट लावतात, आज महाशिवरात्र उत्सवाचे लळित झाले. रात्रीचे 9 वाजले कि देवळात लाऊड स्पीकरवर भजने, भक्तिगीते, नाट्यगीते सुरु झाली कि पटापट जेवणे उरकून देवळात जायची लगबग सुरु होते. तबला ठाकठीक केल्याचे आवाज आणि ऑर्गन चे वर्षानुवर्षे ऐकत आलेले ठराविक सूर म्हणजे अगदी ह्या वातावरणाचा अविभाज्य भाग!
10 ला कीर्तन 'उभे राहिले' कि उत्सवाचा शेवटचा कार्यक्रम सुरु झाला. आधीच्या 3-4 दिवसांच्या किर्तनांपेक्षा लळित जरा वेगळे.

"ऐश्या दात्या विसरावे, तोंड कवणा पसरावे,
तुका म्हणे सारी राहे, नुरोनिया पाहे.."

हळूहळू आसमंतात ते एक ठराविक वातावरण भरून जायला लागतं, लहानपणापासून आज पर्यंत अगदी सारखंच! पूर्वरंगातला पद्य भाग, उत्तररंगातली कथा, साकी,दिंडी,आर्या,अभंग... मध्यंतरातली भक्तिगीते... हे सगळं मनापासून एन्जॉय करणारे वादक आणि त्यांचं एक्मेकांच्यात ट्युनिंग.

हे लिहिताना खूप खंत वाटत्येय कि संगीत विषयक अज्ञान असल्यामुळे योग्य परिभाषा वापरून मी त्या माहोलाच वर्णन नाही करू शकत! पण विमलेश्वराच्या कृपेने हा आनंद अनुभवण्याची संधी लहानपणापासून मिळत आली, ह्याबद्दल खूप बरं वाटतं.
दान,दाता,दातृत्व ह्याचे विविध पैलू उलगडत उलगडत कीर्तन पुढे सरकत राहातं, आणि विमलेश्वर(कोणताही देव) एवढा मागू ते देणारा असताना इतर कुणाकडे काही मागायची वेळ कशाला येईल? तोच एक सगळ्यांना देऊन देऊन पुरून उरेल..ह्या मुद्याकडे पोहोचतं.

कथानकाच्या शेवटी देवाच्या दरबारात, रत्नजडित सिंहसनावरचा देव प्रसाद देतो आहे, तिथे कोण कोण आले- बाळसंतोष, भजन म्हणणारे, प्रवचन करणारे, कीर्तनकार, भाट,वासुदेव आणि असे कोण कोण आले. त्यांनी देवाकडे जे जे मागितलं ते ते देवाने दिलं, शेवटी देव दमून झोपला तर भूपाळी म्हणून त्याला ह्या सगळ्यांनी उठवलं.. कारण तूच झोपलास देवा तर आमचं काय!

हे लळित, म्हणजे उत्सवाचा एक्सट्रॅक्ट जणू काही. जसा उत्सव पार पडायला सर्व प्रकारच्या लोकांचा हातभार लागला! तसेच कथानकात विविध लोक येतात, ते प्रसाद मागतात तसाच आम्ही मागतो! उद्यापासून रुटीनचं रहाटगाडगं सुरु होईल तेव्हा देवा तू जागा राहा, आणि आमच्या अडीअडचणीत  पाठीशी अस!

खरंच, एरवी देवदेव आणि कर्मकांड करण्यात अभाव असूनही मला विमलेश्वर आणि त्याचा उत्सव म्हणजे ऊर्जेचा आणि आशीर्वादाचा कायमचा स्रोत वाटतो. उत्सवाने चार्ज झालेली आमची बॅटरी वर्षभर टिकते. गावापासून लांब असताना कसोटीच्या क्षणी विमलेश्वर आठवतो. उत्सव संपताना लळिताच्या वेळेला मागणं मागितल्याप्रमाणे तोच काय काय ते देत असणार आम्हाला. मग वेळोवेळी भेटणारी दुःख 'फॉर अ चेंज' म्हणावीशी वाटावीत असे!

ह्या विमलेश्वराने किती काय काय दिलं?? आयुष्यभर पुरतील असे आनंद अनुभवायला दिले..

*आपल्याही पिढीला इंटरेस्टिंग वाटावा असा कीर्तन हा प्रकार असू शकतो हे जाणवून दिलं...
*'कीर्तन जुगलबंदी' ह्या शब्दाच्या नाविन्यामुळे कीर्तनाला खचाखच गर्दी कशी होते हे दाखवलं...
*राणा प्रतापच्या घराण्याच्या इतिहासाचं आख्यान कीर्तनातून ऐकताना डोळे भरून आले तो अनुभव दिला...
*भगतसिंग-राजगुरू-सुखदेव आख्यानाचं कीर्तन 3 तास चाललं, तेव्हा तुडुंब भरलेल्या सभामंडपातून बारीक पोर सुद्धा, बाथरूमला जायला सुद्धा जागचं हललं नव्हतं ..
*भजनात तल्लीन झालेले दादा- काका लोक आणि काकू लोक, मोठ्यांच्या तालमीत तयार होणारे छोटे गायक,वादक..
*कित्येक वर्षांच्या -दशकांच्या अंतरानंतर, बालपणीच्या मैत्रिणींची स्नेहभेट घडवणारे माहेरवासिनी मेळावे आणि तो नॉस्टॅल्जीया!!
*महाशिवरात्रीला मध्यरात्री होणारी 'निशिथकाल पूजा' , सामुदायिक जप- ओमनमःशिवाय- नंतर जोरदार आरत्या,
*गावातल्याच लोकांनी बसवलेली नाटकं, संगीत नाटकं..
*रथाची सजावट आणि मिरवणूक.. शंखांचा घोष,
*कुठलंही काम न लाजता करायचं शिक्षण, न बोलता कृतीतून देणाऱ्या - महाप्रसादाच्या पंक्तीत खरकटी उचलून शेण लावणाऱ्या- आईच्या पिढीच्या काकवा.... शेवटच्या पंक्तीत त्यांना आग्रहाने वाढणारे सगळे दादा आणि काका
*लळिताच्या कीर्तनाच्या मध्यंतरात झालेल्या 'क्षणभर उघड नयन देवा' ह्या गाण्यातली कमाल आर्तता डोळ्यातून खळ्ळकन बाहेर आलेली...

खरोखर जगण्याची ऊर्जा हा उत्सव देत आला. आणखी एक उत्सव पार पडला,
प्रत्येकाने आपापल्या परीने उत्सवाला हातभार लावला, विमलेश्वराची सेवा केली, त्याचा प्रसाद लळिताच्या वेळी.. समाप्तीची हुरहुर दाटून आली..
लळीत ऐकलं तरच पुण्य मिळतं हा धाक ह्यासाठीच असावा, कि गर्दी जास्त असेल तर हि हुरहुर जरा सुसह्य होईल!!
सालाबादप्रमाणे विमलेश्वराची प्रार्थना करून, सुरुवातीचाच अभंग भैरवीच्या चालीत सुरु झाला, तेव्हाच पोटात कालवाकालव सुरु झाली.. सालाबादप्रमाणे! हेचि दान देगा देवा म्हणताना घशात काहीतरी टोचायला लागलं..सालाबादप्रमाणे!
अजून एक वर्षांनी परत येण्यासाठी उत्सव संपला, आणि "भलाक्को भाई" म्हणत बालगोपाल रथयात्रेच्या तयारीला लागले.
लुटुपुटूचा छोटासा रथ, त्यात छोटासा विमलेश्वर!! त्याची रथयात्रा मिरवणारे लिंबूटींबू- काही वर्षानंतरच्या उत्सवाचे आधारस्तंभ..
त्यांना तुझा विसर पडू नको देऊ!! हेचि दान देगा देवा!

No comments:

Post a Comment