08 February, 2016

पैल तो गे उडून गेला (एकदाचा) काऊ

काल बाबांची रोजची ड्युटी माझ्यावर सोपवलेली होती, ती पार पाडून घरी यायला निघत होते. उन्हात वाळत ठेवलेले आंबा पोळी, म्हणजेच साठांचे ट्रे आत आणून झाले, झाक-पाक झाली, दारं लावून झाली, आणि निघण्यापूर्वी काही बाहेर राहिलं नाही ना, म्हणून मयादादाने पुन्हा साठं वाळत घालायच्या मोकळ्या जागेत नजर टाकली, तर तिथे एक कावळा दिसला.

वाळत घातलेले पदार्थ सुरक्षित राहावेत म्हणून चारी बाजुंनी जे जाळं लावलेलं आहे ते दिसलं नाही त्याला, आणि आंबा पोळी खाण्याच्या हेतूने उडत उडत येताना त्या जाळ्यात तो अडकला असा आमचा प्राथमिक अंदाज.
समोरच आमचा मामा कातकरी आणि कुटुंबीय, त्याचे सत्राशेसाठ पाहुणे, त्यांची चौतीसशेसाठ पोरं असे सगळे होते. त्या पोरांना सणकन उत्साह संचारला. हातातले उद्योग सोडून सगळी पोरं (वयवर्षं 2 ते 10च्या मधली)त्या कावळ्याभोवती जमली. एक काळाकुट्ट गलेलठ्ठ बोका- नुकतेच मासे फस्त करून लोळत होता- तो पण ताडकन उठून तिथे आला.
पोरांपैकी संजय नावाचा हिरो उडी मारून रिकाम्या हौदात उतरला, आणि त्याने कावळ्याला हातात घेतलं. मग त्या सगळ्या पोरांची एक गोलमेज परिषद सदृश्य गंभीर चर्चा झाली. त्यात विविध पर्याय, त्यातली शक्याशक्यता, व्यवहार्यता अश्या विविध पैलूंवर कावळा हातात धरून विचार विनिमय झाला. सगळं बोलणं कातकऱ्यांच्या बोलीभाषेत सुरु होतं. मराठीचीच बोली आहे ती, पण नीट लक्षपूर्वक ऐकलं तरच, मतीतार्थच फक्त कळेल इतकी वेगळी आहे.

बहुमत असं होतं कि त्या कावळ्याला अडकलेल्या स्थितीत तिथे तसाच सोडून आपण लांब जावं. म्हणजे जाड्या बोक्याला कावळा खायला मिळेल.
काही मुलांचं म्हणणं होतं कि पाय जाळ्यात अडकल्यामुळे आता बहुतेक त्याला उडता नाहीच येणार तर आपण त्याला पाळूया.
संजयचं म्हणणं होतं, काई नको, जहुंदे उडून बिचाऱ्याला.
अर्थात कातकरी समाजात कावळा हा 'अभक्षभक्षण' मानलेला आहे म्हणून हे प्रश्न उदभवले होते. तिथे कावळ्याच्या ऐवजी चिमणी, बुलबुल, कवडा वगैरे असते तर एव्हाना फोडणीत पडले असते.
तर "शेवटी ज्याच्या हातात कावळा त्याचा निर्णय फायनल" ह्या न्यायाने गोलमेज परिषदेचे अध्यक्ष माननीय संजय यांच्या शुभहस्ते कावळ्याची जाळ्यातून सुटका करण्यात आली.
दोन्ही हातात कावळा धरून तो हौदातून बाहेर आला, क्रिकेटमधील बॉलर जसा बॉल घेऊन धावत येतो तसा संजय कावळा घेऊन धावला.. आणि पतंग उडवतात तसा दोन्ही हातांना लयदार झोका देत त्याने त्या कावळ्याला हवेत उडवला!!
आणि मी इतका वेळ तोंडाचा आ उघडलेला तो मिटला!

 हि सगळी खरोखरच निसर्गाची लेकरं असतात. रानडुकरांचा पाठलाग करत अनवाणी पायांनी सुसाट वेगाने रात्रीच्या काळोखात धावण्याची क्षमता निसर्गाने त्यांना दिली आहे, आपले डाएटचे नितीनियम त्यांच्या कामाचे नाहीत!!

07 February, 2016

जावे त्या वंशा, आणि तरीही गावे!!😂

एकदा माझी आई बोलता बोलता म्हणाली कि माझा आवाज चांगला असता तर मी गायिका झाले असते. त्यावर बाबा म्हणाले "व्वा! मोठंच सांगत्येस.. हे म्हणजे तहान लागलेली असती तर आत्ता पाणी प्यायले असते असं म्हणण्यासारखं आहे!"
पण मला आईच्या म्हणण्याचा नीट अर्थ कळला. आमचे घरात सगळ्यांचे आवाज वाईट म्हणावे इतके भसाडे आहेत, पण आईचा अपवाद. एकतर तिला ऐकलेली चाल तशीच म्हणता येते आणि कुणाच्या बारश्यात पाळणा, मंगळागौरीत झिम्याची गाणी, लग्ना-मुंजीचे पापड करताना ओव्या इतपत ती गाऊ शकते, आणि बायका तिला आग्रहाने म्हणायला सांगतातही. म्हणून तिचं विधान खरंच खरं आहे, कि आवाज अजून खूप चांगला असता, तर ती व्यवस्थित शिकून गाऊ शकली असती.
पण मी आणि आदित म्हणजे कुठे गुणगुण करायला लागलो कि लोक एकतर स्वतः पळून जातील नाहीतर आम्हाला हाकलून लावतील, इतका आनंदीआनंद आहे. बाबा पण आमच्यासारखे नॉन गायक गटातच आहेत.
बरं गाण्याबद्दलच नॉलेज म्हणाल तर तेही अगाध! म्हणजे उदाहरणार्थ. समजा, आमच्या मिलिंद मामाच्या गाडीतून जाताना संगीताचा एखादा तुकडा वाजतो आहे, आणि मामा आम्हाला त्याबद्दल माहिती देतो आहे, तर, " 'किराणा' घराण्याचे 'तोडणकर'बुवा यांनी गायलेला 'जोग' राग " अश्या माहितीच्या ऐवजी, " 'भुसार' घराण्याचे 'खेडेकर' बुवा यांनी गायलेला 'केतकर' राग"  अशी माहिती पुरवली तरी आम्हाला खरं वाटू शकेल!

शाळा कॉलेजच्या ट्रीपा, किंवा विविध गुणदर्शन हा जो प्रकार असतो, त्यात किंचित जरी गायक असलं किंवा बासरी, माऊथ ऑर्गन, गेलाबाजार शिट्टी असं काहीतरी वाजवता येत असेल त्यांना वेळ मारून न्यायला बरं पडतं. आम्हाला म्हणजे, अश्या ठिकाणी कुठल्या गुणाचं दर्शन घडवावं हा यक्षप्रश्न कॉम्प्लेक्समध्ये नेऊन टाकतो..
त्यामुळे अगदी गोड नको, पण थोडा ऍव्हरेज आवाज देवाने मला द्यायला हवा होता असं मला फार वाटतं.
गाणी ऐकायला खूप आवडतात, आणि ऐकलेलं गाणं गुणगुणायची भयंकर सुरसुरी येते. त्यावर मी काय काय उपाय शोधून काढले.
एकतर शेतावर किंवा कलमात गेल्यावर किती हव्या तेवढ्या मोठ्या आवाजात मनसोक्त गाणी म्हणायची,कारण तिथे दूरदूर पर्यंत ऐकायला कोणी नसतं.
दुसरा मार्ग म्हणजे गाडी चालवताना, तोंडाला कडेकोट स्कार्फ बांधून जोरात गाणी म्हणायची! ह्यात एक मोठा धोका असतो. गावातले जे लोक चेहेरा दिसला नाही तरी, गाडीवरून किंवा कपड्यांवरून मला ओळखू शकतील, त्यापैकी कुणीतरी नंतर विचारतात. "आज बायपासला क्रॉस झालीस तेव्हा मला काही म्हणालीस का तू?"

हॉस्टेलवर असताना एक मैत्रीण अशीच भसाड्या आवाजात गायची तेव्हा आम्ही तिला म्हणायचो, "अगं ए,, कुणी गुळखोबरं दिलाय?"
त्याच्यावर तीच म्हणणं असायचं कि,"गायक लोक दुसऱ्यांच्या आनंदासाठी गातात, आपण स्वतःच्या आनंदासाठी गायलं तर प्रॉब्लेम काय आहे!!"
हे तत्व अंगी बाणवून हि भसाडेगिरी आम्ही अंमलात आणतोच तरी!
******************************************

संध्याकाळी लाईट गेलेले असताना, फक्त देवांसमोर लावलेल्या निरांजनाचा उजेड माजघरात पसरलेला, बाकी सगळीकडे मिट्ट काळोख, आणि आम्ही चौघेजण झोपाळ्यावर बसलो असू, तर म्हणजे गाणी आणि कवितांची आमची आम्हालाच मेजवानी!!
ह्याची सुरुवात झाली ती आम्ही बहीणभाऊ लहान होतो तेव्हा आई बाबा आम्हाला खांद्यावर झोपवताना झोपाळ्यावर गाणी म्हणायचे तिथून. आदित खांद्यावर झोपयचा तेव्हा कितीही कंटाळून किरकिर करत असला तरी रडत रडतच म्हणायचा, "शिवरायांचं गाणं कर ना!!" आणि मग गोविंदाग्रज लिखित "शिवरायांचा पाळणा- गुणी बाळ असा जागसी का रे वाया" हे आई म्हणायची..

बाबा नॉन गायक गटातलेच, पण आम्ही लहान असताना आम्हाला खांद्यावर झोपवताना बाबा गाणी म्हणायचे ती जामच मनःपूर्वक!!
"ताई गुणाची माझी छकुली" आणि सोपानदेव चौधरींचे "सभोवती संतजन सुपुत्रांचा मेळा' हे त्यातले खास!!
ऐकून ऐकून अशी खूप गाणी कविता पाठ होत गेल्या, आणि मोठे होता होता आम्ही संध्याकाळी झोपाळ्यावर बसून म्हणू लागलो.

एरवी एखादं गाणं आवडण्यासाठी अर्थ, क्लासिकपणा ह्या कशाशी फार देणंघेणं असावं लागत नाही,(अर्थात एक किमान लेव्हल धरून हो!! म्हणजे साजूक तुपातल्या 'पोली'ची, रिक्षावाल्याची वगैरे गाणी आणि तत्सम प्रकार कधीच नाही आवडू शकत, पण कधीकधी "लडकी क्यूं न जाने क्यूं" सारखी गद्य धड्याला चाल लावलेली गाणी पण आवडून जातात)पण ह्या आमच्या खास मैफलीत जुन्या वृत्तबद्ध कविताना अग्रमानांकन!!

"सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण" हि अवाढव्य कविता पाठ झाली ती ह्या झोपाळ्यावरच्या गायनातूनच! गोदावरी नदीचं स्तोत्र म्हणजे "तुज हृदयंगम रवे विहंगम- अर्थात गोदागौरव" - म्हणता म्हणता कधीही न बघितलेल्या गोदावरी नदीशी काय नातं जुळलं कोण जाणे.. त्यातल्या
"तल्लिलेमधी तल्लीन न हो कल्लोलिनी कवी कवण तरी" हे म्हणताना जी काय बोबडी वळायची, कि हे म्हणतोय ते मराठी आहे का संस्कृत तेही कळत नसे! तीच गत महाराष्ट्र गीतातल्या "यन्नामा परीसुनि रिपु शमीतबल अहा!" ची!!
"आजीच्या जवळी घड्याळ कसले" म्हणता म्हणता, आम्ही आईबाबांच्या बालपणीचा काळ स्पष्ट अनुभवतो, तर "पडू आजारी मौज हीच वाटे भारी" म्हणताना ते आजारपणातले लाड सुखावून जायचे..
वर्षं पुढे पुढे सरकली, आणि आम्ही आजोबांना गाणी म्हणून दाखवू लागलो, त्यांचा कंटाळा जावा म्हणून.. त्यांना पुसटशी आठवत असलेली "येथे काय असे गडावर.." हि रायगडबद्दलची कविता शोधून काढून त्यांच्या बरोबर म्हटत त्यांच्या लहानपणात गेलो.
आमच्या आजोळच्या आजीकडून शिकलेलं "शिवरायांचा सिंह सिंहगडी पडला समरांगणी" हे तानाजींचं काव्यमय चरित्रच संपूर्ण म्हणताना एकदम शूरवीर वाटायला लागतं, तसं वसईच्या किल्ल्याची लढाई, "बेलाग दुर्ग जंजिरा" म्हणताना पण!
दरम्यान आम्ही शिबिरांना जाऊन वेगवेगळी गाणी(पद्य) शिकून आलो कि तीही सगळे मिळून मोठ्या आवाजात म्हणू लागलो. आई बाबाही आमच्यात अजूनही सामील होतात, आणि ह्या मैफलीची सुरुवात "आक्रमकांशी झुंजत झुंजत समरी विजयी होऊ" ने करायची हा अलिखित कायदा झाला,  चला निघूया सरसावोनी म्हणताना बिनदिक्कत आवाज टिपेला पोचवू लागलो, तर 'वसुंधरा हि कुटुंब अवघे" ह्या अतिकठिण चालीच्या गाण्याला पण सोडलं नाही. "रणी फडकती लाखो झेंडे" चा ठेका, एकदिलाची सिंहगर्जना, हि अनादी भरतभू, आम्ही डोंगरचे राहणार अशी कितीतरी..

काळोखात, वही हातात न घेता, तोंडपाठ- दोन अडीच तास नॉनस्टॉप म्हणत राहिलो तरी संपणार नाहीत एवढी आमची "माय फेव्हरिट" फोल्डरवाली प्ले लिस्ट आहे!! -  जुन्या कविता आणि संघगीते- गायक आमचे आम्हीच! ह्या नादात बऱ्यापैकी पाठांतर झालं!

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे,शेजारी पाजारी ऐकतील, रस्त्याने येणारे जाणारे हसतील हि धास्ती मनात असतेच! एरवी "अरे जरा गप्प बसा" हे सांगून आई दमते, पण आमची गाणी रंगात आलेली असताना जर विनोददादा, प्रणव किंवा अन्य सगळेच गायक लोक अश्या कुणाची रस्त्यावर चाहूल जरी लागली तरी आम्ही झटकन म्युट होतो!! (आता हि पोस्ट त्यांनी वाचली कि पितळ उघडं पडणारच आहे तरी!!)

 बलसागर भारत होवो हे फार पूर्वी केव्हातरी तळजाईच्या शिबिरातून पसरत आलेले, आणि ह्या चालीला भैरवी म्हणतात (त्या शिबिरात सुधीर फडके यांनी ते पद्य ह्या चालीत म्हटलेलं), हे माहिती झालेल आहे, त्यामुळे लाईट आले, आता उठून कामाला लागावे असं झालं कि आम्ही 'बलसागर भारत होवो..' ने कार्यक्रम संपवतो! ते सगळं ऐकायला अगदी बेसूर असणार, माझी खात्री आहे, पण ते शब्द, त्यांचा अर्थ, आणि त्या चालीतली आर्तता- जी आम्ही म्हणत असताना सुद्धा फक्त आमच्या का होईना मनाला भिडते..बास, अजून काय हवाय? झालीच कि गायनाची हौस वसूल!!

06 February, 2016

तो चहा आणि ती कॉफी

चहा हा 'तो'आणि कॉफी हि 'ती' म्हणून का काय कोण जाणे, पण चहा म्हणजे पुरुषी आणि कॉफी म्हणजे  बायकी अस समीकरणच झालेलं आहे. अर्थात व्यक्तिपरत्वे आणि त्या वेळेच्या मूडपरत्वे चहा कि कॉफी याचा निर्णय होतो. भयंकर कष्ट उपसून दमल्यावर आम्हा मुलींनासुद्धा चहाच लागतो, आणि रात्री बेरात्री सिनेमे बघताना मुलगेही कॉफी पितातच, पण तरी एकंदरीत चहा म्हणजे डॅशिंग, शूरवीर, मर्दानी, कष्टाळू (अर्थात मुलीसुद्धा हे असं सगळं असतातच) आणि कॉफी म्हणजे हळवी, भावनिक, कातर, खुशालचेंडू (मुलं हे सगळे प्रकार लोकांना दिसून न देता अमलात आणतात) अस आपलं उगीच ठरून गेलंय..

टीव्हीच्या मालिका आणि व्हॉट्स अँपचे मेसेज म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तेच.. कोणतीही सुरु असलेली बघा किंवा कोणताही ग्रुप उघडून वाचा.. सगळीकडे तेच तेच!! पण तरीही काही वेगळ्या सिरीयल आणि काही ठराविक मेसेज कायम लक्षात राहतात, वारंवार आठवण होते, आणि हळूच हसायला येतं..
"असंभव" हि सिरीयल - त्यातही, मुख्य कथानकापेक्षाही सगळ्यांच्या फारच आवडीचे झालेले आणि पटलेले ते प्रिया आणि विक्रांत,, यांचं उपकथानक असच कायमच स्मरणात राहिलेलं आहे

तसाच हा चहा-कॉफीचा व्हॉटसअँप मेसेज, अगदी पटलेला आणि लक्षात राहिलेला आहे!!

चहा…? की कॉफी…??
चहा म्हणजे उत्साह..,कॉफी म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..,कॉफी म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..,कॉफी अक्षरशः निवांत...!
चहा म्हणजे झकास..,कॉफी म्हणजे वाह मस्त...!!
चहा म्हणजे कथासंग्रह...,कॉफी म्हणजे कादंबरी...!
चहा नेहमी मंद दुपार नंतर...,कॉफी एक धुंद संध्याकाळी...!!
चहा चिंब भिजल्यावर...,कॉफी ढग दाटुन आल्यावर...!
चहा = discussion.., कॉफी = conversation...!!
चहा म्हणजे उस्फूर्तता...,कॉफी म्हणजे उत्कटता...!!
चहा = धडपडीचे दिवस...,कॉफी = धडधडीचे दिवस!...!
चहा वर्तमानात दमल्यावर...,कॉफी भविष्यात रमल्यावर...!!

असंभव सिरीयल हल्ली पुन्हा युट्युबवर बघत असताना त्यातल्या काही प्रसंगाचे तुकडे आणि हा चहा कॉफीचा व्हॉट्सअँप मेसेज ह्यांची माझ्या मनात एकत्र सांगड घातली गेली... ह्या प्रसंगांमध्ये चहा आणि कॉफीचा अगदी ओझरता उल्लेख झालाय, पण ते बघताना तिथे  हा फॉर्वर्डेड मेसेज घिसापिटा असला तरी तंतोतंत फिट होतोय!

प्रिया शास्त्री, मोठ्या कुटुंबातली सगळ्यात लहान मुलगी, दोन मोठे भाऊ-वहिन्या, आईबाबा, आत्या, काकाकाकू, आजोबा, भरपूर मित्रमैत्रिणी..असं आपुलकीचं घनदाट कव्हर..

विक्रांत भोसले, अगदीच एकटा, नावापुरती लाजिरवाणी बहीण, दोनमेव मित्र, पालनकर्ता सरंजामे.

प्रियासाठी, सुलेखा म्हणजे मोठ्या भावाची माजी काळातली भावी बायको, उर्फ काकूची लहान बहीण
विक्रांतसाठी सुलेखा म्हणजे जिवलग मित्राची- पालनकर्त्याचा मुलगा अभिमान सरंजामेची होणारी बायको


ह्या गुन्हेगार सुलेखाचा पर्दाफाश करणे हीच विक्रांत भोसले आणि प्रिया शास्त्री यांच्यातली एकमेव कॉमन गोष्ट..
त्यात प्रियाच्या घरच्यांचा तिच्यावर अजिबात विश्वास नाही, तिने सुलेखावर केलेले आरोप ऐकून ते प्रियालाच वेड्यात काढत राहतात.
पोलिसात असल्यामुळे नजरेतच एक्सरे मशीन फिट झालेल्या इन्सपेक्टर विक्रांतला पहिल्या भेटीपासूनच सुलेखावर संशय आहे! आणि असा संशय घेतल्याबद्दल त्याने जिवलग मित्राचा- अभिमानचा रोष ओढवून घेतलाय.. अर्थात हा सगळा रहस्यभेद त्यांना अगदी सावधपणे आणि कोणालाच कळून न देता करायचाय.
प्रियाला, तिच्या चुलतभावाला- ज्याला सुलेखाने मारून टाकला- त्याला न्याय मिळवून द्यायचाय, आणि विक्रांत अभिमानला सुलेखाच्या तावडीतून सोडवण्यासाठी जीवाचं रान करतोय...

भरीसभर म्हणजे सरंजामे आणि शास्त्री यांचे घनघोर हाडवैर आहे!

"पोलीस तपास" ह्याव्यतिरिक्त पण ते दोघे बाहेर भेटायला लागतात, ओळख वाढते, मैत्री होते.. विक्रांतबद्दल अभिमानला काहीतरी कुणकुण लागते, कि हल्ली तू एका मुलीबरोबर फिरत असतोस, आणि तो विक्रांतला चिडवायला लागतो.
एकदा विक्रांत आणि प्रिया रस्त्यात बोलत उभे असताना, अचानक योगायोगाने अभिमान तिथे येतो, आणि त्या दोघांचं "काहीतरी आहे" अश्या अर्थी चेष्टामस्करी करतो.
खरं तर "तसं" काहीच नसतं.. निदान तेव्हा तरी!! त्याचं ते सगळं बोलणं प्रियाला अगदीच अनाठायी आणि असभ्य वाटतं, आणि दुसऱ्या दिवशी ती विक्रांतला सांगते कि आपण नको भेटत जाऊया.

हा प्रसंग दाखवलाय चहाच्या टपरीवर!! टपरीभोवतीच ते विशिष्ट वातावरण, चहावाला ढवळून ढवळून चहा करतोय, लोक चहा पितायत, तिथे हे दोघेजण बसलेत,चहावाला काचेच्या ग्लासांतून चहा आणतो, प्रिया नको म्हणते, विक्रांत हातात चहाचा ग्लास धरून तिचं बोलणं ऐकून घेत असतो,
"तुमचा तो मित्र, काय तो बोलत होता? आपण आपल्या कामासाठी भेटतो, राईट?"
"हो, पण अभिमान थोडा मूडी आहे, त्याचं बोलणं तुला आवडलं नसेल तर त्याच्या वतीने आय अँम सॉरी! परत नाही होणार असं!"- अगदी "उत्स्फूर्त" माफी..
"पण तरीही मला आता विचार करावा लागेल, आपण भेटावं कि नाही ते ठरवायला आणि विचार करून झाला कि मी स्वतः तुम्हाला फोन करीन"
आणि त्याचं पुढे काहीही ऐकून न घेता उठून तरातरा निघूनही जाते.
चहाचा घोट घेत विक्रांत ती गेलेल्या दिशेकडे बघत राहतो..
"डिस्कशन" समाप्त.. "वर्तमानातली मानसिक दमणुक".. हा सगळा गुंता सोडवण्याच्या.. "धडपडीचे दिवस.."

***********************************
तिकडे प्रिया 'भेटूया नको' म्हणून निघून जाते,आणि "तुला भेटली नाही का दुसरी कोणी? माझ्या बापाच्या शत्रूच्या मुलीशिवाय?" असं म्हणून अभिमान उखडतो.
असेच काही दिवस मध्ये संपतात, आणि प्रिया आपणहून विक्रांतला फोन करून "ह्या प्रकरणात मदत कराल ना?" विचारते. भेटल्यावर केसबद्दल सविस्तर बोलणं होऊन, नक्की काहीतरी मार्ग निघेल ह्या मुद्द्यावर चर्चा समारोपाकडे वळते.. "निघूया?" प्रिया विचारते..
"या,शुअर!" म्हणून निघणार तेवढ्यात पटकन विक्रांत विचारतो "कॉफी??.. .. इफ यू डोन्ट माईंड..!!" समोरच्याला नाही म्हणताच येऊ नये इतक्या खोलवर, "उत्कटपणे" केलेली रिक्वेस्ट!!
प्रिया ओके म्हणेपर्यंत प्रेक्षकांची पण विक्रांतइतकीच घालमेल होते! आणि ती ओके म्हणते, ते दोघे कॉफीशॉपकडे वळतात, तेव्हा त्या दोघांइतकंच हसू प्रेक्षकांच्या चेहेऱ्यावर असतं, प्रेक्षक पण कथानकाच्या रम्य "भविष्यात रमतात".. 'कॉनव्हर्सेशन' सुरु. "धडधडीचे दिवस!!"

01 February, 2016

देखणे ते हात

परवा सहज व्हाट्सऍप चाळताना संदीपचा डीपी आणि स्टेटस बघून, थबकायला झालं. त्याचा स्वतःचा तळहात, त्याच्यावर प्राजक्ताचा त्याहून किंचित लहान तळहात, आणि त्याच्यावर 'स्पृ'चा अगदीच छोटुकला तळहात.. असा डीपी, आणि 'कट्यार' मधले "तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कोणी" हे स्टेटस!!
मस्तच वाटलं..
हि सगळी फॅमिली म्हणजे रोजच्या व्यावहारिक कामांमध्ये एकदम आर्टिस्ट आणि परफेक्शनिस्ट लोक- चित्र काढण्यापासून ते केरसुणी बांधण्यापर्यंत, आणि डिझेल इंजिन खोलून जोडण्यापासून ते भजनात टाळ वाजवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या लांबसडक बोटांनी कमाल निटनेटक्या करणे... अगदी स्पृ सुद्धा  5 महिने वयात चिमुकल्या हातांच्या लांबसडक बोटांनी पायातले मोजे हुसकून काढायचा उद्योग शिताफीने करुन टाकते! त्यामुळे हे स्टेट्स आणि डीपी अगदीच समर्पक!

कुणाच्याही हाताची लांब बोटं मला भारी आवडतात, कुणी म्हणेल त्यात काय आवडायचाय. पण अस प्रत्येकालाच काहीतरी आवडत असतं, कुणाला डोळ्यांचा/त्वचेचा विशिष्ठ रंग, कुणाला सडसडीतपणा, कुरळे किंवा सरळ केस, असं काही ना काही..
कबूल आहे, हे सगळं कोणाच्याच हातात नसतं, देव प्रत्येकाला काही गोष्टी देतो तर काही देत नाही, आणि हे आवडणं / नावडणं सापेक्ष सुद्धा आहे,,  पण तरी 'आपल्या मनाचं वाटणं' काही थांबत नाही ना!
कौशल्याचं कोणतंहि काम लांब बोटांच्या लोकांना छान जमतं असं मला वाटत. माझी बोटं अगदीच बुटकी नाहीत ह्याबद्दल देवाला थँक्यू म्हणतानाच, "अजून किंचित लांब चालली असती" असं मनात आल्याशिवाय राहत नाही!

तळहाताच्या रेषांचा-नशिबाचा- भाग आपल्या उत्कर्ष होण्यात, न होण्यात खूप मोठा असतो. लांबसडक बोटं मिळणं देवाच्या हातात असतं, तसंच!  पण आपली हुन्नर किती तेही महत्वाचं आहेच ना.. नुसतंच त्या हातांना वापराशिवाय राहून दिलं, तर त्या रेषा बिचाऱ्या काय करतील? "तुला दिली रं देवानं दोन हात दहा बोटं.." अशी जाणीव बहिणाबाईंनी करून दिली आहे ती सतत जागी तर राहायलाच हवी..

मागे मोदींजींच्या भाषणात गोष्ट ऐकलेली, एक डबल ग्रॅज्युएट माणूस एका ठिकाणी काम मागायला जातो, तिथे त्याला विचारलं जातं, कि तुला काय येतं?
त्यावर त्याचं उत्तर असतं, "मी एम ए झालोय"
"हो, पण तुला येतं काय?"
"म्हणालो ना, मी एम ए झालोय."
"अरे हो पण तुला काय करता येतं?"
पुढे ती गोष्ट मेक इन इंडिया कडे वळली!
किती खरं आहे हे.. कसल्याही निर्मितीत व्यग्र असलेले हात..
बा.भ.बोरकरांच्या
"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळॆ ॥"
ह्या कवितेसारखे...
मग भले त्या हातांवर तव्याचा चटका लागून डाग पडला असेल, सुरीचा घाव लागून चरे पडले असतील, शेतातला चिखल बरबटला असेल, काळंकुट्ट ग्रीस लागलं असेल, घामाने- धुळीने राप बसला असेल, कष्ट करून घट्टे पडले असतील, सतत काही ना काही घडवण्यात, बनवण्यात, जोडण्यात, निर्माण करण्यात धडपडत असतील... थोडक्यात लौकिकार्थाने त्या हातांचे सौंदर्य बिघडून गेले असेल, पण तरीही स्वच्छ नितळ, कोरीव, रंगवलेल्या नखांच्या, दागिने घातलेल्या हातांइतकेच, किंबहुना काही वेळेला कणभर जास्तच हे असे हात सुंदर दिसतात!
दिवसभर हात असे धडपड करत राहिले कि संध्याकाळी जसं समाधानाने मन भरून जातं- आपल्यापुरतं का असेना ते समाधान- तसं आयुष्यभर कार्यमग्न राहता यावं, आणि शेवटच्या क्षणाला आपल्याचबद्दल आपल्याच मनात यावं कि,
"देखणी ती जीवने जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणॆ ज्यातुन वाहे शुभ्र पार्‍यासारखे ॥"
... हे एवढं म्हणणं मात्र ऐकच हो देवा!