01 February, 2016

देखणे ते हात

परवा सहज व्हाट्सऍप चाळताना संदीपचा डीपी आणि स्टेटस बघून, थबकायला झालं. त्याचा स्वतःचा तळहात, त्याच्यावर प्राजक्ताचा त्याहून किंचित लहान तळहात, आणि त्याच्यावर 'स्पृ'चा अगदीच छोटुकला तळहात.. असा डीपी, आणि 'कट्यार' मधले "तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कोणी" हे स्टेटस!!
मस्तच वाटलं..
हि सगळी फॅमिली म्हणजे रोजच्या व्यावहारिक कामांमध्ये एकदम आर्टिस्ट आणि परफेक्शनिस्ट लोक- चित्र काढण्यापासून ते केरसुणी बांधण्यापर्यंत, आणि डिझेल इंजिन खोलून जोडण्यापासून ते भजनात टाळ वाजवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या लांबसडक बोटांनी कमाल निटनेटक्या करणे... अगदी स्पृ सुद्धा  5 महिने वयात चिमुकल्या हातांच्या लांबसडक बोटांनी पायातले मोजे हुसकून काढायचा उद्योग शिताफीने करुन टाकते! त्यामुळे हे स्टेट्स आणि डीपी अगदीच समर्पक!

कुणाच्याही हाताची लांब बोटं मला भारी आवडतात, कुणी म्हणेल त्यात काय आवडायचाय. पण अस प्रत्येकालाच काहीतरी आवडत असतं, कुणाला डोळ्यांचा/त्वचेचा विशिष्ठ रंग, कुणाला सडसडीतपणा, कुरळे किंवा सरळ केस, असं काही ना काही..
कबूल आहे, हे सगळं कोणाच्याच हातात नसतं, देव प्रत्येकाला काही गोष्टी देतो तर काही देत नाही, आणि हे आवडणं / नावडणं सापेक्ष सुद्धा आहे,,  पण तरी 'आपल्या मनाचं वाटणं' काही थांबत नाही ना!
कौशल्याचं कोणतंहि काम लांब बोटांच्या लोकांना छान जमतं असं मला वाटत. माझी बोटं अगदीच बुटकी नाहीत ह्याबद्दल देवाला थँक्यू म्हणतानाच, "अजून किंचित लांब चालली असती" असं मनात आल्याशिवाय राहत नाही!

तळहाताच्या रेषांचा-नशिबाचा- भाग आपल्या उत्कर्ष होण्यात, न होण्यात खूप मोठा असतो. लांबसडक बोटं मिळणं देवाच्या हातात असतं, तसंच!  पण आपली हुन्नर किती तेही महत्वाचं आहेच ना.. नुसतंच त्या हातांना वापराशिवाय राहून दिलं, तर त्या रेषा बिचाऱ्या काय करतील? "तुला दिली रं देवानं दोन हात दहा बोटं.." अशी जाणीव बहिणाबाईंनी करून दिली आहे ती सतत जागी तर राहायलाच हवी..

मागे मोदींजींच्या भाषणात गोष्ट ऐकलेली, एक डबल ग्रॅज्युएट माणूस एका ठिकाणी काम मागायला जातो, तिथे त्याला विचारलं जातं, कि तुला काय येतं?
त्यावर त्याचं उत्तर असतं, "मी एम ए झालोय"
"हो, पण तुला येतं काय?"
"म्हणालो ना, मी एम ए झालोय."
"अरे हो पण तुला काय करता येतं?"
पुढे ती गोष्ट मेक इन इंडिया कडे वळली!
किती खरं आहे हे.. कसल्याही निर्मितीत व्यग्र असलेले हात..
बा.भ.बोरकरांच्या
"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळॆ ॥"
ह्या कवितेसारखे...
मग भले त्या हातांवर तव्याचा चटका लागून डाग पडला असेल, सुरीचा घाव लागून चरे पडले असतील, शेतातला चिखल बरबटला असेल, काळंकुट्ट ग्रीस लागलं असेल, घामाने- धुळीने राप बसला असेल, कष्ट करून घट्टे पडले असतील, सतत काही ना काही घडवण्यात, बनवण्यात, जोडण्यात, निर्माण करण्यात धडपडत असतील... थोडक्यात लौकिकार्थाने त्या हातांचे सौंदर्य बिघडून गेले असेल, पण तरीही स्वच्छ नितळ, कोरीव, रंगवलेल्या नखांच्या, दागिने घातलेल्या हातांइतकेच, किंबहुना काही वेळेला कणभर जास्तच हे असे हात सुंदर दिसतात!
दिवसभर हात असे धडपड करत राहिले कि संध्याकाळी जसं समाधानाने मन भरून जातं- आपल्यापुरतं का असेना ते समाधान- तसं आयुष्यभर कार्यमग्न राहता यावं, आणि शेवटच्या क्षणाला आपल्याचबद्दल आपल्याच मनात यावं कि,
"देखणी ती जीवने जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणॆ ज्यातुन वाहे शुभ्र पार्‍यासारखे ॥"
... हे एवढं म्हणणं मात्र ऐकच हो देवा!

No comments:

Post a Comment