12 May, 2019

नेमेची येतो मग उन्हाळा

"प्रत्येकाला प्यायला फ्रिजमधलं पाणी हवाय, पण रिकाम्या बाटल्या परत भरून फ्रीजमध्ये ठेवायची तसदी कुणी घेईल तर, जणू कुळाला बट्टा लागेल जसा काही!!!"

उन्हाळा सुरू झाला की घरोघरीच्या माताभगिनींच्या तोंडून ही घोषणा हमखास ऐकायला येते! खरं तर इतकी माफक अपेक्षा पूर्ण करणं कितीसे अवघड आहे? पण घरोघरी ही बोंब असतेच असते.

अमृतकोकमच्या कॅनमधून सिरप घेऊन त्याचे सरबत करणे ही पाककृती नुकतीच शिकलेली आमची दोन चिमुकली भाचरे- एका उन्हाळ्यात नादावल्यागत सारखेच फ्रीज उघडून कोकम सरबत करून पीत सुटलेली बघितल्यावर, त्यांच्या पिताश्रीनी खास कोकणस्पेशल विशेषणांनी युक्त अश्या ओव्या गायलेल्या आठवतात- "*****नोss प्या सरबत, नि मग बसा खोकत!"

तर ह्या सगळ्या वादसंवादात अजून एक मोठा घटक असतो तो म्हणजे पंखा😷🤕🤦 मला खरं तर पंख्याशिवाय उन्हाळा सुखाचा असतो खरं तर. किंवा अगदीच घामाच्या धारा लागल्या तर एकवर पंखा- हलकी झुळूक येईल इतपतच! पण काही लोक अगदी पाचावर पंखा लावलेला असतानाही गरम्याने हायहुय करत त्रासलेले असतात.

"देवा देवा, काय पंखा फिरतोय का नाही तेही जळ्ळ कळत नाहीये"- सतत कामात व्यग्र असलेल्या व घामाने निथळत असलेल्या मातोश्री

"आई, तुझ्यासाठी ना आपण दहा खटके असलेला रेग्युलेटर बसवायचा का पंख्याला?"- चुलतभाऊ काकूला

"दीदी! नाटकं नको तुझी, फुल्ल स्पीडवर पंखा लाव आणि तू पडवीत जाऊन बस झोपाळ्यावर"- बंधुराज

"एक खटका वाढवू का गं पंख्याचा प्लिज?" नवरा

"अरेss गरमा काय प्रचंड, आणि पंखा न लावता कसे काय जेवायला बसलेले तुम्ही मला समजत नाही"- धाकटा दीर

असे सगळे जण गरम्याने पछाडलेले पंखाग्रस्त लोक अवतीभवती असताना तुमचं फारसं काही चालत नाही.

"एss इथे पंखा नको हो आत्ता, गॅस फडफडतो आणि धग म्हणून लागत नाहीये"- सासूबाई. हे वाक्य बरेचदा माझा जीव भांड्यात पाडवतं.

"पांडोबा, आत्ता पंख्याची गरज नाही, अगदी प्लेजंट वाटताय इथे. आणि तो खोगीरासारखा जाडा शर्ट घातलायस तो काढून आधी उघडा बस, म्हणजे गरमा व्हायचा नाही"- असं भावाला सांगणारे पिताश्री पण ह्या बाबतीत कधी कधी माझ्या बाजूचे असतात.

"पंख्याचा वाऱ्याने अंगात वात शिरतो, चरबी वाढते- असं आम्हाला वाडवडील सांगत आलेत"- असं म्हणणारी मंगलताई- म्हणजे चुलतसासू ही माझ्या पार्टीतली बाई😄 पण तिच्या ह्या विधानाची चेष्टा करून पंखाग्रस्त वादळी व्यक्तिमत्वे पंख्याचं चक्रीवादळ सोडणार म्हणजे सोडणार! मग आमचे संवाद अगदी ऐकण्यासारखे-

पंखा पार्टी बाहेर पडून गेल्यावर तातडीने मी पंखा बंद केला की, "बरं झालं बाई, अगदी उत्तम काम केलंस" काय तो भणभणाट, काय तो आवाज, देवा रामा!
माझं तर बाई डोकंचं सुन्न होतं रात्रभर, पण ह्यांचं मुळी पंख्याशिवाय जर्रा चालत नाही"- मंगलताई

"अजय पण तसलाच आहे, एकदा माणूस मुंबईकर झाला ना, -तात्पुरता किंवा कायमचा- की गरमा असो वा थंडी- पंख्याचा आवाजच त्यांना झोप लागण्यासाठी मानसिक आधार देतो बहुतेक😓 आणि ह्याला तर सिलिंग फॅन पाचावर असला तरी कमीच वाटतो म्हणून आता तीन खटक्यांचा स्टँड फॅन लावतो.. म्हणजे पाच अधिक तीन असा आठवर पंखा" - मी

कुणी जिवाच्या आकांतानी हाका मारल्या बाहेरून तरी ऐकू यायचं नाही इतका आवाज ह्या पंख्याचा"- मंगलताई

"खरं म्हणजे ना, पुढच्या येणाऱ्या काळात कोणतंही लग्न ठरवताना बाकी सगळ्या माहित्या बोलून घेतानाच 'पंखा कितीवर लागतो' हे विचारून घ्यायला हवं मुलामुलींनी एकमेकांना!" - मी

असे आमचे संवाद ऐकणाऱ्यांचं फक्त मनोरंजन करतात, परिस्थिती बदलत अजिबात नाही.
तरी बरं, जुन्या पारंपरिक कोकणी घरांना एसी बसवायची शक्यता शून्य आहे, नाहीतर माझं काही खरं नव्हतं.

नुकत्याच जन्मलेल्या अबीरला नर्सने ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणला आणि माझ्या आईच्या हातात दिला. पुढचे दोन दिवस हॉस्पिटलच्या ज्या खोलीत आम्ही राहणार होतो त्या खोलीत आई, सासूबाई, अजय, अबीर यांनी प्रवेश केला. पाठोपाठ डॉक्टर आले, त्यांनी खोलीभर सगळे दिवे सूरु केले आणि पाचावर पंखा सोडला. कोंदट वातावरण करू नका असं बजावून ठेवलं. बाळ पण दमून जातं वाटतं जन्माला येण्याचं काम करून🤣

मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात बाळंतपण एन्जॉय करत असताना मला पंख्याची सवय लागली होती- हार्मोनल बदलांमुळे ज्या अनेक गोष्टी बदलतात त्यात हे पण असतं की काय माहिती नाही, कुठल्या पुस्तकात वाचलेलं तरी नाही. पण माझं रुटीन पूर्वपदावर आलं तशी पुन्हा पंखा नको हीच प्रकृती परत आली🤣 तेव्हा कदाचित पोरगं रडायला लागलं की घाम फुटायचा का काय कोण जाणे🤔

आणि आता सगळ्यात कहर हा झालाय- "चला जो जो कलायला" असं म्हणून अबीरला झोपवायला खांद्याशी घेतलं की तो पंख्याकडे बोट दाखवत उंच उचललेला हात गोलाकार फिरवून दाखवायला लागलाय🤦❤️ अजून बोलायला शिकायचा पत्ता नाही तर आत्ताच पोरगं बाबाच्या पार्टीत जाऊन बसलंय🤣

©ऐश्वर्या पेंडसे जोशी