21 November, 2017

जगी या खास वेड्यांचा..

आम्ही कोकणस्थ ब्राह्मण लोक नीटनेटकेपणासाठी प्रसिद्ध आहोत खरं म्हणजे.. पण नीटनेटकेपणा ह्याचा अर्थ असा पण नसतो आमच्यात, कि एखाद्या हायफाय हॉटेलात बसल्यासारखं स्वतःच्या घरात आदबशीरपणे पुतळ्यासारखं बसावं😏

त्यामुळे घर हे घर वाटावं आणि हॉटेल वाटू नये इतपत पसारा घालायची जबाबदारी मी कळायला लागल्यापासून घेत आले आहे.("कळायला" लागलंय का अजूनही हा अनेकांना प्रश्न असेलच,, पण तो असुदे बापडा😜)

त्यातून जे लोक घराबाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करतात त्यांची घरं जरा तरी आवरलेली राहू शकत असावीत बहुतेक, पण आमच्या घरातच व्यवसाय असल्यामुळे अगदी टापटीप घर असणं शक्यच नाही..

आजोबांच्या काळात घरात सुपारीचे गोण, नंतर मग फळप्रक्रिया सुरु झाल्यावर माजघरात पॅकिंग, अर्जंट ऑर्डरी आल्या की तिथेच पार्सले पॅक करणे, पूर्वी घरातच कॅनिंग असायचं तेव्हा घरभर पसरलेले आंबे, असं सगळं बघतच आम्ही मोठे झालो.. नंतर आंबे आणि कॅनिंग हा विषय स्वतंत्र जागेत शिफ्ट झाला, तरी आजी आणि आईचे आंबा वडी, सरबतं, मुरांबे, लोणची ह्यांचे व्यवसाय घरातच चालल्यामुळे तिच परंपरा अजूनही चालूच राहिली..

आणखी एक पसारा आमच्या घरात प्रचंड असतो तो पुस्तकांचा.. आठवणीतल्या कवितांपासून ते मुघल रियासती पर्यँत, आणि दासबोधापासून ते चेतन भगत पर्यँत कोणतीही पुस्तके कुठेही पडलेली सापडतात.. प्रत्येकाच्या आवडी आणि मूडनुसार.. त्यात इंटरनेट असूनसुद्धा, पेपरवाल्याला वाईट वाटू नये म्हणून पेपर घेण्याची आमच्या बाबांना कोण हौस!! म्हणून तो एक पसारा घरातले दोन्ही झोपाळे व्यापून बसलेला असतो.. पण तो कागदी पसारा इतका स्पेशल आहे कि आमच्या मातोश्रीनी तेव्हा आमच्या पिताश्रीच्या स्थळाला खेडेगावात असून सुद्धा होकार देताना- "एवढी पुस्तकं घरात आहेत म्हणजे लोक बरे असावेत विचारांनी" असा विचार केला होता😍

पण तरीही तेव्हा सुद्धा घरी कुणी येणार असेल तर आई आवर्जून पसारा आवरायची खबरदारी घेणार म्हणजे घेणार! अस्मादिक ह्या बाबतीत जरा मागे पडल्यामुळे मग ह्या चिंटूसारखे प्रेमळ सुखसंवाद आमच्याकडेही सुरु झाले!

मुळात वस्तू आवरून ठेवल्या कि त्या झटकन हाताशी येत नाहीत, उलट पसरलेल्या असल्या कि एका दृष्टीक्षेपात पटकन सापडतात- हा एक माझ्या आवडीचा सिद्धांत! भरीला कॉलेजनिमित्त हॉस्टेलवर सात वर्षे राहून राहून मी पसारा घालणे ह्या विषयात सुद्धा एक डिग्री मिळवून आणली😜😜😜

घरी परत आल्यावर घरातच अजून एक व्यवसाय- एम्ब्रॉयडरी, पेंटिंग, बॅगा बनवणे- सुरु केला आणि मग रंगीबेरंगी कापडे, चिंध्या, दोरे, रंग, ब्रश, अश्या पसाऱ्याने घर भरून गेलं! बरं आमचे कामाचे तास हे 24 तासातले कोणतेही असल्यामुळे- काम बंद केल्यावर पसारा आवरणे हा विषयच नाही.. मुडवर आधारित- म्हणजे रात्री 3 वाजेस्तो सुद्धा काम केल्यावर मग आवराआवर करायची तरी केव्हा??

एकेकदा तर घरातल्या सगळ्या खुर्च्यांवर निळ्या रंगाचा अगडबंब थैल्या विराजमान झालेल्या असत.. एकदा बाबा चिडून म्हणाले- "आता कुणी आलं आपल्याकडे तर तुझ्या त्या निळ्या थैल्यांवर बसायला सांगतो! तिथेच चहापाणी द्या लोकांना!"

आणि एकदा खरोखरच एक काका आला तेव्हा बसायला सुद्धा जागा नव्हती. शिवणमशीनच्या जवळ असलेलं माझं बसायचं स्टूल रिकामं होतं चक्क.. त्याच्यावर तो कसाबसा बसला आणि मशीनवरून खाली घरंगळलेला बेल्ट(बॅगांना लावायचा बेल्ट) गुंडाळत गुंडाळत गप्पा मारायला लागला..

हे चित्र बघून हताशपणे का कौतुकाने कुणास ठाऊक.. आई म्हणाली-"माझे उपाय थकले हो आता पसारा आवरायचे.. माझ्या आवाक्यात होतं तोपर्यंत मी घर आवरायचा प्रयत्न करत होते.. आता ही मुलं कर्तबगार झाल्यावर सगळं हाताबाहेर गेलंय माझ्या!"

ह्याच्यावर मात्र त्या काकासकट सगळे गडगडाटी हसत सुटले..

आता माझ्याबरोबरच सगळा पसारा पण मशीनसकट सासरी आलाय😂 पण बहुतेक पसारा कमी झाल्यावर करमत नाही घरी कुणाला..(कुणी कबूल नाही करणार कदाचित😜) कारण आईचा मधूनच मेसेज येतो, "स्क्रॅप कापडं साठली असतील, तर येशील तेव्हा घेऊन ये.. माझ्या पॅचवर्कची (त्याला आम्ही 'चिंध्याजोड प्रकल्प' असं नाव दिलंय. त्यातून आई एकाहून एक डिझाईनं बनवून काय काय मस्त मस्त गोष्टी बनवते) कापडं संपत आलीयत😍😍😍

©ऐश्वर्या पेंडसे-जोशी