28 August, 2017

जसे लोक तसे त्यांचे देव!

सालाबादप्रमाणे गणपती आले आणि परतले सुद्धा! तयारी करतानाचा, आगमनाचा उत्साह आनंद आणि उत्तरपूजेपासून जाणवणारी हुरहूर, वाईट वाटणे, घश्यात दुखणे- हा माझ्याप्रमाणेच बऱ्याच जणांचा- बहुतेक सगळ्यांचाच अनुभव असणार..

सगळे देव सारखेच हे खरं असलं तरी गणपती हा जास्त आवडता, जास्त लोकप्रिय जास्त जवळचा, जास्त फ़्रेंडली वाटतो.. माय फ्रेंड गणेशा😃..

प्रत्येक घरच्या पद्धती थोड्याफार वेगवेगळ्या असतात, त्यात कडकपणा आणि लवचिकपणा हाही घरसापेक्ष बदलतो, पण गणपती ह्या देवाची भीती वाटल्याचे कधीच कुणाकडून ऐकलेलं नाही! आपण करू ते आदरातिथ्य तो गोड मानून घेणारच अशी ठाम खात्री आपल्या मनात असते.. आवर्तने 21 सलग नाही जमली,  11च केली, तर "इट्स ओक्के!" असंच म्हणत असणार तो!

गणपतीच्या म्हणून गोष्टी कहाण्या वगैरे ऐकून वाचून माहिती असतात, त्या शब्दशः अर्थाने घ्यायच्या नसतात, लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात, तरीपण त्यात चांगलं काही करणाऱ्याला तो आशीर्वाद देतो, कुणाच्या तरी रुपात येऊन सहकार्य करतो, यथाशक्ती यथामती केलेली सेवा गोड मानून घेतो- असंच दाखवलं गेलंय. कधी कुणाला शाप वगैरे देताना ऐकलेला नाही मी तरी...

गणपती कुठल्याही लूकमध्ये असला तरी आपल्याला मान्य होतो, आता आमच्या इथल्या पाजेत डिस्को नाचणारा, जीप चालवणारा वगैरे अवतारात गणपती दिसतो, ते जरासं खटकतं मनाला एखादवेळेस, पण तबला वाजवताना, बोरू घेऊन लिहिताना, कॉम्प्युटर वापरताना असा गणपती आपल्याला आवडतोच!

त्याचे डोळे-- कधीच रागावलेले, कोपिष्ट वाटत नाहीत. कायम हसरे, प्रसन्न, आश्वासक भाव ओसंडत असलेले दिसतात.. खऱ्या अर्थाने तो आपला मित्र, जवळचा कुणी नातेवाईक वाटतो!!!

**********************************

हे सगळं लिहिलं ते बहुतेक सगळ्यांना पटावं.. पण पुढे माझ्या मनात येणारे प्रश्न कुणाला खटकणारे वाटू शकतील..

सहसा सगळ्या देव्या- महिला देवता रागीट कोपिष्ट का? त्यांना आपण आई, माता अशी संबोधने देतो, पण आई जशी मैत्रीण असते तश्या देवता मैत्रीण वाटत नाहीत.

काहींचे रागावलेले डोळे तर काहींचे कमालीचे कडक प्रोटोकॉल..जमेल तसं करावं हि सवलत अभावानेच.. उलट झेपत असेल तरच जबाबदारी घ्यावी हा दृष्टिकोन जास्त.. विशेषतः नवरात्रातली महालक्ष्मी, बोडण ह्या कार्यक्रमात तर भयंकर दहशत पसरलेली दिसते. त्यात निखळ आनंद कमीच दिसतो..

सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या देवता माणसांच्या(बहुतेक वेळा बायकांच्याच- त्यांना झाड म्हणतात.. का ते कोण जाणे!) "अंगात येतात..(?) व्यक्तिशः माझा ह्या कल्पनेवर विश्वास नाही.. पण तरी ज्यांचा असेल त्यांच्या मतानुसार जरी काही अज्ञात शक्ती त्या व्यक्तीच्या अंगात शिरत असेल तरी त्याचा सामान्य उपस्थित लोकांना धसका वाटेल असा तिथला माहोल कशासाठी??

काही ठिकाणी तर हे प्रकार इतके जास्त चाललेले दिसतात कि तिथे प्रसन्न वगैरे वाटण्याऐवजी कधी एकदा तिथून बाहेर पडतो आणि आपल्या घरी जातो असं होऊन जातं.

उदा. 5-6 बायकांच्या अंगात महालक्ष्मी आली आणि एखादीच्या अंगात दुसरा कुणी देव आला तर त्या बायका चक्क भांडतात! कि आमच्या टेरीटरीमध्ये वेगळा देव आलाच कसा!! मग सगळे देव एकच हि संकल्पना काय झाली आता???

काही वेळेला एरव्ही ज्या बायका(झाड) त्यांना खटकणाऱ्या गोष्टी उघड बोलू शकत नाहीत त्या गोष्टी ह्या निमित्ताने बोलून घेताना दिसतात.. पण मग ह्या प्रकारात सामान्य(माझ्यासारख्या अतिसामान्य म्हणा हवं तर) लोकांना ते वातावरण प्रसन्न वाटत नाही.

इयत्ता तिसरीत असताना हे प्रकार बघून जी घाबरगुंडी उडाली कि मी अश्या ठिकाणी जाणं जे बंद केलं ते केलं.. पुढे कित्येक वर्षांनी आमच्या गावात भिड्यांच्या घरी हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा एकदा भीतभीत तिथे हजेरी लावली तेव्हा इतक्या वर्षात वातावरण बरंच निवळल्याचं लक्षात आलं, आणि भीतीही वाटली नाही त्या 'झाडांची'.. पण अजूनही अनेक ठिकाणी हे भयचकित प्रकार चालतात मात्र..

गोष्टी आणि कहाण्यांमधून पण देवता ह्या रागीट कोपिष्टच दाखवल्या गेल्यायत. जे जमेल ते करा आणि तुमचं सगळं चांगलंच होईल असं कधी दिसत नाही त्यात.. अमुक अमुक असं असं करावं-- म्हणून हे एवढे प्रोटोकॉल.. आणि ते अर्धवट सोडलंत तर काय होईल म्हणून एखादा शाप सदृश्य परिच्छेद असतोच त्या कहाणीत.

हरताळीकांची ती कहाणी तर ऐकवत नाही अक्षरशः ... म्हणजे गोष्ट आहे ती ओके आहे, पण मग बायकांनी ह्या दिवशी जर काही खाल्ले तर-- असं म्हणून जी शापांची यादी आहे-- ती काय म्हणावी... आजच्या काळात नव्हे कोणत्याच काळात हे वाईट होईल म्हणून धमकी हे कसं बरोबर ठरेल??

कहर म्हणजे हे हरताळीका कहाणी भक्तिभावाने वाचणारेच लोक.. हल्लीच्या मुली कश्या अति अपेक्षा ठेवतात म्हणून शंख करत असतात.. ते असोच.. तो एक वेगळाच मुद्दा😂

बाकी राक्षस नष्ट करणाऱ्या देवतांबद्दल सवालच नाही, त्या आजच्या काळातसुद्धा आदर्शच आहेत आपल्यासाठी, आणि त्यांचे रागीट डोळे आणि उग्र मुद्रा ह्या त्यांच्या कार्यक्षेत्राला अगदी साजेश्या आहेत.. आजच्या काळात राक्षस भेटले कधी, तर आपण तसे वागायला शिकायलाच पाहिजे!!
--^--

त्यामानाने गणपतीनंतर येणाऱ्या गौरी अगदी मैत्रिणी वाटतात.. अर्थात त्याही आमच्याकडे खड्यांच्या असतात आणि त्यांचे प्रोटोकॉल चुकले, लवचिक झाले तरी त्या चिडतील अशी भीती घातली जात नाही म्हणून!!आणि त्याही कुणाच्या अंगात शिरून आपल्याला घाबरवत नाहीत म्हणून!!

मजेमजेत त्याना विहिरीवरून आणायचं, सगळं घर फिरवून दाखवायचं- हे आमचं स्वयंपाकघर बघा, हि पडवी बघा, माजघर बघा, अगदी हि कॅनिंगची बिल्डिंग बघा- असं पण!! मज्जा अगदी!! खरोखर दोन दिवस कुणी बहिणी मैत्रिणी राहायला याव्या तसा सहजभाव!! भीती वगैरे तर नाहीच नाही..

गंमत म्हणजे गौरींना मुलींचं माहेरी महत्व, आणि बाकी त्या महालक्ष्मी, हरताळीका, मंगळागौरी(हि सुद्धा कुणाकुणाच्या अंगात शिरते म्हणे!) ह्या लग्नानंतरच्या गोष्टी.. म्हणून त्या गौरी फ्रेंडली आणि बाकीच्या कडक कि काय???

नाहीतरी
अस्स सासर द्वाड बाई कोंडुनी मारीतं
अस्स माहेर गोड बाई खायाला मिळतं
असली काहीतरी चमत्कारिक गाणी बनवून आणि म्हणून पिढ्यानपिढ्या पूर्वग्रहाने ग्रासल्या गेल्याच कित्येक वर्षं, आणि तेच पूर्वग्रह खरे करून वागल्या सुद्धा....

आता तसा काळ राहिलेला नाही तेव्हा सगळ्याच देव्या मैत्रिणी वाटाव्या म्हणून काहीतरी हलकेफुलके प्रोटोकॉल बनवायला हवे आणि धमकीवाल्या काहाण्यांना रद्द करून काहीतरी काळाबरोबर चालणाऱ्या बोधप्रद कहाण्या रचायला हव्या.. नाहीतर मग ह्यातलं काहीच नको असं म्हणायची वेळ येईल लवकरच..

©ऐश्वर्या पेंडसे जोशी. @मुर्डी/ @पंचनदी