30 August, 2016

नाव आणि आडनाव!

माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाला आपापल्या आडनावाचा अभिमान वाटतोच, मग ते काहीही असो. शाळेत असताना तर सगळे जण एकमेकांना संपूर्ण नावाने ओळखायचे. ऐश्वर्या अनिल पेंडसे, अश्याच प्रकारे आमच्या दहावीच्या वर्गातल्या बहुतेक सगळ्या मुलामुलींची संपूर्ण नावं अजूनही माझ्या लक्षात आहेत. पण नंतर कॉलेज पासून बघितलं तर बहुतेक लोक फक्त पहिल्या नावाने स्वतःची किंवा दुसऱ्याची ओळख करून देतात. हे अगदीच विचित्र वाटतं. आपल्याला जर आपल्या आडनावाचा अभिमान वाटत असेल तर ते लपवावं असं का वाटत असेल? ह्याला फॅशन म्हणायचं का जात लपवायचा आटापिटा म्हणायचं कोण जाणे?

काही काही लोक तर ह्या बाबतीत अर्क असतात. ऑर्डर द्यायला किंवा तत्सम व्यावसाईक कारणाने फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटीत पहिल्यांदाच बोलत असताना पण फक्त पहिल नाव सांगतात. आडनाव विचारलं तरी म्हणतात कि
"नको, फक्त पूजा एवढच सेव्ह करा."

आता पूजा हे काय अगदी एकमेवाद्वितीय नाव आहे का काय? अश्या नावांचे तर डझनावारी लोक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असतात, मग आडनाव असल कि नक्की कोणती पूजा ते लगेच लक्षात येत नाही का? पण ते नाही. अश्या कॉमन नावाच्या लोकांच्या आडनावाचे उल्लेख केले नाहीत तर साहजिकच एकसारखे गोंधळ निर्माण होतात.

होस्टेलवर असताना आम्ही चार मैत्रिणी एका रूमवर राहत होतो आणि चार वेगळ्या कॉलेजमध्ये शिकत होतो, प्रत्येकीचे क्लास, मित्रपरिवार वेगवेगळा होता, आणि सगळ्यांच्या वर्तुळात प्रत्येकी ३-४ राहुल नावाचे मित्र होते. त्यामुळे रूमवर गप्पा मारताना आणि एकमेकींच्या अनुपस्थितीत निरोपांची देवघेव करताना आडनावाच्या अभावामुळे भयंकर घोटाळे व्हायचे.

घरात आदितचे सत्राशेसाठ मित्र फोन करतात, "आदित्य आहे? वैभव बोलतोय."
मग मातोश्री विचारतात- "कोण वैभव? त्याला वैभव नावाचे खंडीभर मित्र आहेत, तू कुठला?"

तश्या मैत्रिणी, कष्टमर, ओळखीतल्या मिळून माझ्या ओळखीत मणभर अमृता आहेत. पण माझी बेस्ट फ्रेंड अमृता आहे, तिच्या फोनला मात्र आमच्या घरात आडनाव सांगितले नाही तरी सहज प्रवेश देण्यात आलाय..

आमच्या घरात आता अर्चना आणि आदित्य ह्या नावाचे प्राणी एवढे साठलेत कि ह्यापुढे पाचपन्नास वर्ष तरी ह्या दोन नावांवर बंदी आणायला हवी असं वाटायला लागलाय.

तर ह्या सगळ्यामुळे आम्हाला सगळ्यांना बहुतेक ठिकाणी नाव सांगताना संपूर्ण नाव किंवा निदान नाव-आडनाव असच सांगायची सवय लागल्ये. आमचे बाबा तर ह्या बाबतीत कधीकधी इतके काटेकोर, कि  आम्हाला फोन केल्यावर (खरं तर मोबाईलवर फोन केल्यावर हेही सांगायची गरज नाही, पण तरी...) "मी बाबा बोलतोय" असं म्हणावं कि नाही?? पण नाही!!
"हां, अनिल पेंडसे बोलतोय. जेवायचे थांबलोय, वेळेवर घरी या"- आता काय बोलणार! एकदा तर बाबांनी कहरच केलेला.

गावच्या उत्सवासाठी सगळे काका, आत्या सहकुटुंब घरी आलेले त्यामुळे तीन चार दिवसांसाठी घरात ३५ -४० लोक होते. एवढ्या सगळ्यांच्या आंघोळी सकाळी वेळच्यावेळी व्हायच्या तर बंबात सतत विस्तव पेटता राहायला हवा होता, आणि ही जबाबदारी माझ्याकडे होती.

आगरातून जळवण गोळा करून आणलं ते बंबात घालून आता विस्तव परत धगधगवायचा... पण बाथरूममध्ये कोणी असेल तर धूर कोंडायला नको, म्हणून मी विचारलं कि बाथरुममध्ये कुणी आहे का? तर आंघोळ करता करता बाबांनी जोरदार उत्तर दिलं, "हो मी आहे अनिल पेंडसे!"

आजूबाजूला वावरत असलेल्या लोकांची हे उत्तर ऐकून अक्षरशः हसून हसून मुरकुंडी वळली. अजून पण हि आठवण निघाली कि आम्ही बाबांना विचारतो काय मग अनिल पेंडसे? आंघोळ झाली का?

3 comments:

  1. बरेचदा आडनाव न सांगण्याचं कारण म्हणजे त्यातून तुमची 'जात' कळते.
    त्यातून एखाद्या व्यक्तीला न भेटता त्याबद्दल मते बनवली जातात. हे टाळण्यासाठी बरेच लोक आडनाव सांगत नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. शक्यता आहे!! पण आजच्या काळात लोक जात बघून मत बनवतात खरच???

      Delete
  2. पुर्ण नाव सांगावे या मताचा मीही आहे पण "ऐश्वर्या अनिल पेंडसे मुर्डी दापोली " असे म्हंटले कि मग जिल्हा आणि राज्य का नाही लावले अजुन असा प्रश्न पडतो मला नेहमी

    ReplyDelete