25 August, 2016

आज आहे दहीकालाsss

थरांची संख्या किती, हंडीची उंची किती, वर टांगलेली रक्कम किती, पाठीशी असलेल्या नेत्याचे वजन किती, नाच करायला आलेले सेलिब्रिटी उथळ किती...
ह्या आणि आणि अश्या अनेक प्रश्नांशी काडीचंही देणंघेणं नसलेला आमच्या मुर्डीचा गोकुळाष्टमी उत्सव म्हणजे आबालवृद्धांना आनंदाची पर्वणी..
आदल्या रात्री देवळात भजन आणि खावटी झाली कि वेध लागलेच सगळ्यांना..

कितीही पाण्यात भिजा, चिखलात लोळा पण मोठी माणसं ओरडणं तर दूरच उलट स्वतःच किती भिजतायत, आणि नाचतायत चिखलात.. ह्या आनंदात दीड दोन वर्षाचे चिमुकले..

चला आज अभ्यासाची कटकट नाही, दिवसभर हुंदडायला मिळणारे.. मज्जा!! (शाळकरी)

***त गेलं कॉलेज.. आजच्या दिवशी गावाच्या बाहेर राहूच शकत नाही आपण(कॉलेजवाले)

एरवी असतातच जळ्ळ्या त्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि पोक्तपणाच्या झूली, आज आपला हक्काचा दिवस, धमाल करण्याचा...(नवव्यावसायिक)

आता काय नाचायचं का वय आहे आमचं, पण तिथे जबाबदार म्हणून कुणीतरी हवंच.. आणि एकदा गेल्यावर नाचल्याशिवाय कसं राहावेल..(मध्यमवयीन)

जुने दिवस आठवतात हो अगदी, अशीच मजा आम्ही करत असू.. आता बरोबरीचे काहीकाही मित्र राहिले नाहीत, पण देवळाशी तरी जायलाच हवं हंडी फोडतील ती बघायला..(वृद्ध)

असं असतं सगळं!! आपापली वयं, बिरुदं, क्वालिफिकेशन्स, स्टेटस सगळं बाजूला ठेवून सगळे एकाच चिखलात माखलेले!!

अगदी अपरिहार्य कारणाने कुणी गावात नसेलच तरी मनाने इथे असणार म्हणजे असणारच.. 12 वाजले.. देवळाशी जमले असतील सगळे.. आता हंडी फोडून झाली असेल रस्त्याने नाचत निघाले असतील...
काही वर्षांपूर्वीपर्यंत परगावी असणाऱ्यांचे फोन यायचे, ढोलाचा आवाज तरी ऐकावा रे!!
तसाच आज प्रणवचा मेसेज आला कुणीतरी व्हिडिओ टाका रे!!
******************************

ठरलेल्या एका घरी महिलावर्ग फराळाच्या तयाऱ्या करत असतात आणि घरोघरी अंगण स्वच्छ करणे, भरपूर पाणी भरून ठेवणे, गरम पाण्याची व्यवस्था, वाटायला प्रसाद, चहाची सामुग्री, अश्या तयाऱ्या..

दुपारी बरोबर बाराला देवळात हजेरी होते, पोरं धपाधप तळ्यात उड्या मारतात.. मग  देवळासमोरच्या अंगणात हातात हात अडकवून मोठा फेर धरला जातो, दोघेजण कुणीतरी तळ्याच्या पायठणीवर उभे राहून बादल्यानी पाणी उडवायचा सपाटा लावतात, आणि ढोल सनईच्या तालावर, पायांनी ठेका धरून नाच सुरु होतो, सगळे एकसुरात गायला लागतात
आ-नं-दा-चा दिवस आला,
आ-ज  आ-हे दहीकाला!!

कुठेही लिहून न ठेवता चालत आलेली हि कवने कुणी रचली आहेत कोण जाणे!! पण त्यात मुर्डी गावातली पोरं किती हुशार आहेत इथपासून ते आपण सगळे असेच एकत्र राहीलो तर ह्या देशाचा शत्रू चटणीलाही पुरायचा नाही इथपर्यंत विषय कव्हर केलेत! "कृष्णासारखा शासनकर्ता आज 'हवा' देशाला"
ह्या कवनात गेली दोन वर्षं बदल करून, "कृष्णासारखा शासनकर्ता आज 'आहे' देशाला" असं एकमुखाने म्हणायला मिळतंय!!

मनसोक्त नाचून झालं कि आरती करून मग  हंडी फोडायचा कार्यक्रम. जेमतेम अडीच थरांची हंडी. त्यात सराव वगैरे भानगड नाहीच! ऑन द स्पॉट- काय ती रचना करून टाकायची.. फुटलेल्या हंडीच्या खापराचे तुकडे पटकन जाऊन उचलून आणायचे! त्यातला एक तुकडा दुभत्याच्या कपाटात ठेवला कि वर्षभर दूधदुभत्याची कमी नाही पडणार म्हणतात..
******************************

देवळाजवळची हंडी फोडून झाली कि रस्त्याने नाचत प्रत्येक घरी जाऊन हाच कार्यक्रम.. कवनातूनच चहा, कॉफी, काकड्या अश्या फर्माईशी.. अंगावर ताक शिंपडणे, क्वचित ओंजळीनेच ताक पिणे, मनसोक्त पाणी उडवून घेणे..
सुरेशकाकाकडे तर आख्खा भरलेला हौद संपवून- परत पंप लाऊन पुन्हा हौद संपवून, वर "यांच्या घरात नाही पाणी घागर उताणी रे.." म्हणायला मोकळे! मग गरम पाणी उडवणे, हंडी बांधली असेल तर फोडणे(घरोघर हंडीची पद्धत असतेच अस नाही) शेवटी त्याच चिखलात फतकल मारून चहा/प्रसाद जे काय असेल ते... कि चालला गोइंदा पुढच्या घरी..

अगदीच चिखलाने, ताकाने अंगाला खाज सुटली तर कुणाच्याही विहिरीत उडया मारून स्वच्छ होयला लायसन असतं आज त्यांना!

अशी सगळी घरं नाचून संपली कि संध्याकाळी सहाच्या सुमारास सगळे आपापल्या घरी.. गरमागरम पाणी तयारच असतं ठेवलेलं. आंघोळया झाल्या कि सगळा गाव एकत्र फराळाला जमतो. खाऊन झाल्याक्षणी सगळेजण आपापल्या घरी पळतात तेव्हा भयंकर दमलेल्या अवस्थेत पण वर्षभर पुरेल एवढी मनाची एनर्जी साठलेली असणार नक्कीच!

2 comments:

  1. सुंदर वर्णन ऐश्वर्या !!!!!!!!!

    ReplyDelete
  2. अगदी जिवंत चित्र डोळ्यासमोर उभे राहीले. लहानपणी आंजर्ल्याला आजोळी नेहेमी यायचो म्हणून सगळं पटकन आपलं वाटलं.
    धन्यवाद ऐश्वर्या !

    ReplyDelete