26 March, 2017

नॉस्टॅल्जीया

बारावीची परीक्षा संपून घरात एकदम सुटीचा आणि आंबा सिझनचा माहोल पसरला होता, शिबिरात जायचा कंटाळा आलेला.. पण येईन असं कबुल केलं म्हणून जायलाच हवं होतं..(मी शिकवायला गेले होते त्या शिबिरात) जास्तीत जास्त टाळाटाळ करून उशिरात उशिराची एस्टी पकडण्यात आलेली..

क्षणोक्षणी वाढत जाणारा काळोख, करकरीत तिन्हीसांजेची वेळ.. रिकाम्या रस्त्यावरून एस्टी सुसाट धावत होती.. कधीच न बघितलेला रस्ता, कधीच न बघितलेल्या गावाला घेऊन जाणारा...

आपल्यापेक्षा आपली लोकांनाच काळजी,, म्हणून बाबा, आजोबांनी हजार ठिकाणी फोन करून ठेवले असणार मी घराबाहेर पडल्यावर.. त्यामुळे एका ओळखीच्या काकाने स्टँडवर येऊन मला ठळक खुणांसकट एक पत्ता देऊन ठेवलेला, तसेच तिथे सुद्धा सांगून ठेवलं होतं फोनवर कुणालातरी कि-- अशी अशी एक मुलगी येईल तिला शिबिराच्या जागेपर्यंत सोडा.

पोचेपर्यंत मिट्ट काळोख झाला.. गाडीतून उतरून जवळपास तासभर काळोखातून चालून झाल्यावर वस्तीच्या खुणा दिसायला लागल्या.  "पत्र्याचा मांडव असलेलं रस्त्याच्या उजव्या बाजूचं घर"...  सांगितलेली खूण पटल्यावर त्या घरात जाऊन चौकशी केली- शिबीर कुठे आहे? त्या घरातल्या काकानी शिबिरात नेऊन सोडलं..

पुढचे आठ दिवस एकदम अफाट मजेचे होते.. मध्येच शिबिरात काडेपेटीपासून सुतळीच्या तुकड्यापर्यंत बारीकसारीक हजार गोष्टी लागल्या कि त्याच- पत्र्याचा मांडव असलेल्या घरात जाऊन आणल्या जात होत्या.. 

ते गाव, तिथली शाळा, ग्राउंड, मैत्रिणी, ताया- कायमसाठी मनात ठेऊन शिबीर संपलं.

पुढे शिक्षण, चार पैसे मिळवण्याची धडपड, छंद, उनाडक्या ह्या सगळ्यात  शिबिरं वगैरे उलाढाली जरा मागे पडल्या. शिबिरातल्या मैत्रिणी कधी ऑनलाइन भेटल्यास हाय हॅलो पुरत्या संपर्कात राहिल्या. जुन्या आठवणी थोड्या पुसट झाल्या.

नंतर अचानक परत इतक्या वर्षांनंतर तेच पंचनदी गाव परत चर्चेत आलं.. 'स्थळं शोधणे' ह्या चमत्कारिक प्रकाराचा अत्यंत वैताग आलेला. माझ्या दृष्टीने बेसिक गृहितकांना "अवास्तव अपेक्षा" असं म्हटलं जात होतं. "हल्लीच्या माजोरड्या मुली😉" ह्या जमातीचा अर्क म्हणजे मी जणू काय!😂😂😂 अर्थात आपल्याला काय पडलेली नव्हती म्हणा😉😉😉

आणि अचानक एक मुलगा सुचवला गेला, ज्याला भेटल्यावर 'आपण चांगले मित्र होऊ शकतो' असं दोघांनाही वाटलं म्हणून गोष्टी पुढे सरकल्या.. तो मुलगा- अजय जोशी- हा त्याच "रस्त्याच्या उजव्या बाजूच्या पत्र्याचा मांडव असलेल्या" घरातला😂 सगळेच गमतीशीर योगायोग.

त्या शिबिराच्या वेळेला बारावीच्या सुट्टीत इथे डोक्यात एवढी चित्रविचित्र व्यवधानं (पुस्तकं, सायकली, उनाडक्या, मोठेपणी कसलेकसले व्यवसाय करायचे ह्याची दिवास्वप्ने, मैत्रिणी) असायची,, कि आजूबाजूला मुलांकडे वगैरे बघायला अक्कल आणि फुरसत दोन्ही नव्हतं😃 नाहीतर तेव्हाच भेटलो असतो कदाचित...😉

आता मुक्काम पोस्ट पंचनदी- परवा लायब्ररी बघायला म्हणून गेले, तेव्हा परत तीच शाळा दिसली. आमचं शिबीर झालेलं ते हॉस्टेल, ग्राउंड, वर्ग, आवारातली आंब्याची झाडं आणि त्याभोवतीचे पार,... सगळं बघून जुन्या आठवणी जोरात जाग्या झाल्या..

जोरजोरात म्हटलेली गाणी, मैदानी खेळ, शिक्षर्थी झोपल्यावर आम्ही केलेली दंगामस्ती, धागडधिंगा आणि हसाहशी.. रात्रीबेरात्री जागून केलेली दंडाची प्रॅक्टिस.. सगळ्या ताया, मावश्या, त्यांची भाषणं- बौद्धिकं ऐकताना काढलेल्या डुलक्या....

सकाळी ग्राउंडला फेऱ्या मारत सगळ्या मुलींच्या पुढे धावणे.. मंजिरीताई चांगली आहे - जास्त धावडवत नाही.. ऐश्वर्याताई खूप धावायला लावते😆 असं म्हणणाऱ्या मुली.. शिवानीच्या आवाजातील "राष्ट्र कि चिरचेतना का गान वंदे मातरम"

संहिताताई आणि तिच्याबरोबर आलेली छोटीशी वेदा.. नंतर मोठी होऊन अगदी बरोबरीची झालेली आणि आम्ही दोघी एकत्र पण शिबिरं केली..
सगळं एकामागून एक आठवत गेलं..

"इथे आमचा वर्ग होता.. आणि आमची दहावीची प्रयोगाची परीक्षा इथे झाली होती"-- अजय त्याच्या शाळेच्या आठवणीत रमलेला.. आणि त्याच वास्तूतल्या एका आठवड्याच्या वास्तव्याच्या आठवणीत मी!!!

©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे @मुर्डी /@पंचनदी