13 October, 2015

गेले ते दिन गेले..

भसाभस बऱ्याच ऑर्डरी एकत्र आल्या आणि  आता रात्रीचा दिवस करायला लागेल असं रम्य चित्र डोळ्यांना दिसलं,, मन मात्र कॉलेज च्या दिवसात जाऊन पोचलं..
तेव्हा भावंडं आणि मित्रमैत्रिणी यांच्यातले भावी इंजिनियर लोक जे होते त्यांची ती सबमिशन, त्यांचे ते कष्ट आणि त्यांचे ते "नाइट मारणे" हे म्हणजे अगदी "प्रतिष्ठेची प्रतिके" असायची. आमची त्यामानाने सुमार डिग्री असाच सुर आजुबाजुला असायचा.. अर्थात ते खरंही असेल.. बोलूनचालून ढ आणि अभ्यास सोडून सर्व काही आवडणारी मी.. पहिलीत गेल्यापासून पुढे 17 वर्ष शिकत राहिले हेच आश्चर्य!! असो.
तर कॉलेजमध्ये अमृता आणि मी भेटलो मात्र.. आणि आमच्या ढ पणाला आणि अभ्यास सोडून सर्व काही आवडण्याला आमचा आम्हीच एक आनंददायी रंग मिळवून दिला..
डिग्रीसाठी टेक्सटाइल हा विषय आम्ही कसा काय निवडला कोण जाणे. पण आमच्या आनंदयात्रेला तिथून सुरुवात झाली. तांत्रिक विषयांचा अभ्यास, परीक्षा ह्यात ती अभ्यासाची नावड़ उफाळून यायची. पण क्रीएटिव्ह विषयांची प्रॅक्टिकल, असाइनमेंट ह्यात खरोखर रमून जातानाच् हा "नाइट मारणे" प्रकार सुरु झाला.
अमृताच्या शुक्रवार पेठेतल्या जुन्या घरी रात्री 9 वाजत आले की आमची पहाट सुरु व्हायची. आखणे,कापणे,चिकटवणे,कोरणे, रंगवणे,शिवणे..असे उद्योग सुरु झाले की आम्ही बुडालोच त्यात. फॅब्रिक ग्लू संपलाय म्हणताच 'सम्राट' बंद व्हायच्या आधी घरातल्या टी शर्टवर तिथे धावण्यात काहीच फिकिर वाटत नव्हती तेव्हा.. पूर्ण रात्रभर हे उद्योग करताना संदीप खरेची गाणी आणि आमच्या गप्पा..

नंतर अमृताकडचे लोक प्रभात रोडला राहायला गेल्यावर,, कॉलेज मध्ये शिकवायच्या आधीच पुस्तकात वाचून त्यांच्या नव्या कोऱ्या घरात केलेले डाइंगचे, बाटिक, बांधणीचे प्रयोग.. मेण आणि रंगाचे राडे.. कॉलेजमध्ये शिकवायच्या आधीच आपले ड्रेस आपण शिवायचा खटाटोप.. ते जमायला लागल्यावर ओळखीच्या लोकांचे ड्रेस शिवून, पैसे मिळवून त्या स्वतःच्या पैश्याने घेतलेल्या एकसारख्या जीन्स..

परीक्षेत अभ्यास करताना हातात नोट्स धरून मारलेल्या अखंड गप्पा.. हा थिअरी प्रकार किती निरर्थक आहे ह्यावर शिक्कामोर्तब.. हातातोंडाशी आलेली मास्टर्स डिग्री थोडक्यात सोडून देण्याचा जवळ जवळ फायनल केलेला विचार.. उद्याची परीक्षा न देता कोणता व्यवसाय करावा ह्यावर रात्रभर चर्चा करून सकाळी जाऊन गपचुप दिलेला पेपर..
डेडलाइनच्या गाळात आम्ही रुतलेलो असताना, खिड़कीत बसून कविता लिहिणाऱ्या अपूर्वाचा आम्ही केलेला हेवा.. आमच्या अचाट,आचरट आणि अव्यवहार्य कल्पनाना तिने दिलेलं प्रोत्साहन.. वरदने मध्यरात्री प्रेमाने करून दिलेली कोल्ड कॉफी..
गणपतीत रात्री केलेली भटकंती.. सायकलने केलेल्या खड़कवासल्याच्या ट्रिपा.. सुजाता आइस्क्रीम.. कपड़यांची, बॅगांची डिझाइन बघत रस्त्याने तासंतास फिरणे,
शेवटची परीक्षा संपत आलेली असताना "कॉलेजमध्ये शिकवायला याल का दोघीहि" असं आमच्या मॅडम विचारत असताना नाही म्हणायचा निर्णय,
सारेगमप, अग्निहोत्र बघताना हसून आणि गोंधळ घालून डोक्यावर घेतलेलं घर.. वरद आणि त्याच्या मित्राचं ट्रुथ अँड डेअर.. आम्हाला सहन करणारे काका काकू आणि आजी..कोणालाही न कळू देण्याची, फ़क्त एकमेकींनाच सांगण्याची, तेव्हा अति महत्वाची असलेली सीक्रेट्स.. ऑरकुट..आणि खुप काही..

एक दिवस अचानक आम्ही m.sc झालो आणि हे सगळं संपल.. त्या वेड्या दिवसांमध्ये ठरवलं होतं तसे दोघीनी आपापले व्यवसाय सुरु केले..आपापल्या व्यापात बुडालो. बॅक गेटची भेळ दिवसेंदिवस महाग होत चाललेली तेव्हा आम्ही ठरवलं होतं की ही भेळ जेव्हा 200 रुपये प्लेट होईल तेव्हा पण ती आपल्याला परवडायला हवी.. आता ती भेळ केवढ़याला आहे कोण जाणें,, पण ह्या निश्चयाला जागण्यासाठी का होईना ती परवडवता येईल इथपत आलो आम्ही..

 सुरुवातीला "आज केस कापले किंवा नविन चपला घेतल्या" इथपर्यंत सगळं सांगायला रोज होणारे फोन आणि चॅटींग कमी होत गेलं.. तरी मैत्री तशीच राहिली..
तेव्हा महत्वाची असणारी माणसं विस्मरणात गेली, नविन माणसं महत्वाची झाली.. पण सगळ्या महत्वाच्या घडामोडी आणि निर्णय एकमेकीना सांगण्याची प्रथा कायम सुरु राहिली..

ही पोस्ट लिहून झाली की मी ऑर्डरी पूर्ण करायच्या मागे लागेन..च्याप्टुगोडू सावनीला झोपवण्याच्या मोहिमेवर अमृता असेल..कवितेच्या जगात अपूर्वा हरवलेली असेल.. वरद खरोखरच असाइनमेंटला घेऊन नाइट मारत असेल...

आठवणीतला एक प्रवास


एखादा दिवस काही चांगल घडल्यामुळे लक्षात राहतो, पण हा दिवस आमच्या लक्षात राहिला त्याच कारण काही लौकिकार्थाने चांगल नव्हतं, तरी अनुभवांची श्रीमंती देणारा तो दिवस होता.
गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत एक वेगळ्या प्रकारच्या कामाची संधी मिळाली. मी आणि आमच्या गावातली श्रुती काकू अश्या दोघींना एका ngo ने बोलावलं होत, लहान मुलांना क्राफ्ट, आकाशकंदील, ग्रीटिंग कार्ड वगेरे शिकवायला.
तसा तर शिकवणे हा आमच्या दोघींचाही प्रांत नव्हे, पण ह्या सगळ्या गोष्टींची हौस, आमचा दोघींचा व्यवसाय एकाच प्रकारचा, आणि चित्रकला, क्राफ्ट, भटकंती, सायकलिंग, पोहोणे, अश्या आमच्या कितीतरी आवडी सारख्या.. एवढाच नव्हे तर आमच्या दोघींची उंची, वजन, रास, ब्लड ग्रुप, गाडीचं मॉडेल सुद्धा सारखं! एकंदरीत आमच जाम पटतं. १२ – १४ वर्षांनी ती मोठी आहे माझ्याहून म्हणून फक्त काकू, नाहीतर मैत्रीणच ती! त्यामुळे हि कल्पना पण आम्हाला खूप आवडली. काहीतरी नवीन काम करायला मिळेल असा विचार केला. आमची मैत्रीण डॉ ललिता गोंधळेकरच्या एक  नातेवाईक त्या ngo चे काम करतात असे समजले, म्हणजे “चला आता नक्की जायला हरकत नाही, हे लोक ख्रिश्चनीकरण वाले नक्कीच नाहीत” अश्या विचाराने बेत पक्का केला.
हि संस्था दाभोळ गावात आहे. आम्हाला सलग ५ दिवस दाभोळ पंचक्रोशीतील वेगवेगळ्या गावात जाऊन शिकवायचं होत. गरीब किंवा पालक नसलेली अशी ती मुलं होती. दाभोळ आमच्या मुर्डी पासून ५० किमी वर आहे. दोघींनी एक आड एक दिवस एकेकीची गाडी घेऊन जायचं ठरवलं. आम्ही जय्यत तयारी करून निघालो, हो.. शिकवणे हा प्रकार कधीही केलेला नाही, आणि शिक्षक मंडळीना काय सहन कराव लागत ते मात्र नीटच माहिती..त्यामुळे कोणी काय शिकवायच, जर त्या मुलांनी पटापट सगळ शिकून टाकल, आणि वेळ उरला तर अजून काय काय शिकवायचं ह्याचा भरपूर अभ्यास करून, शिवाय त्यांना दाखवायला आणखी काही कलाकृती बरोबर घेऊन आम्ही निघालो. पहिला दिवस तर मस्त गेला, तिथल्या सगळ्या लोकांशी ओळख झाली, आम्ही जे काय शिकवलं ते त्या लोकांना आणि मुलांना पण आवडलं ह्या आनंदात संध्याकाळी परत आलो. दुसऱ्या दिवशी आमचा आत्मविश्वास वाढला होता, आणि तिसऱ्या दिवशी तर आम्ही सगळ टेन्शन सोडून ट्रीपच्या मूड मध्येच पोचलो होतो.
त्या दिवशी श्रुतीकाकूची गाडी घेतली होती, आणि दाभोळ जवळच्या ओणनवसे ह्या गावात आम्हाला जायचा होत. तिथे ९ वाजता शिकवायला सुरुवात करायची असल्याने आम्ही सकाळी ७ च्या आधीच निघालो. आपल्याच तालुक्यातलं गाव असलं तरी आम्ही तिकडे पहिल्यांदाच जाणार होतो, आणि रस्ता अतिदिव्य असल्याचे आम्हाला कालच सांगण्यात आलं होत. बरोब्बर ३५ मिनिटात दापोली सोडून आम्ही दाभोळ रस्ता धरला, वारेबुवा तीठ्ठा आल्यावर डावीकडे वळलो आणि त्या अतिदिव्य रस्त्याची प्रतीची यायला लागली. आदल्या दिवशी संस्थेतल्या लोकांनी सांगितलेल्या खाणखुणा बघत आम्ही आगरवायंगणी गावावरून पुढे गेलो, आणि मग रस्त्यात कुठेही पाट्या, फलक दिसेनासे झाले. जाडे जाडे दगड सर्वत्र सारखे पसरून ठेवलेल्या त्या रस्त्यावरून अक्षरशः रांगत होती आमची गाडी. मग एका ठिकाणे दोन रस्ते फुटले तेव्हा आता कुठे वळाव ह्या विचारात आम्ही थांबलो. आगरवायंगणी सोडल्यापासून आम्हाला कुठेही मनुष्यप्राणी दिसला नव्हता, मोबाईल बघितला तर नेटवर्क होतं मग ngo मधल्या लोकांना फोन करून सांगितल कि आम्ही अश्या अश्या ठिकाणी आलो आहोत आता कुठे वळायच? त्यांनी सांगितला कि उजवीकडे वळां. तेवढयात ४-५ शाळकरी मुलं.. हातात बेचकी आणि मारलेला पक्षी अश्या अवतारात एका दाट जाळीतून बाहेर येताना दिसली. “ए बाबू.. ओणनवसे?” अस विचारल्यावर त्यांनी डाव्या बाजूच्या रस्त्याकडे मान उडवली. दोन जणांनी दोन रस्ते सांगितल्यावर जरा गोंधळ झाला, पण आम्ही त्या मुलाचं ऐकायचं ठरवलं, कारण प्रत्यक्ष कुठे वळायच ते बघून त्यांनी सांगितला होत, फोन वर बोलताना गैरसमज होऊ शकतो.
आम्ही गाडी काढून निघणार तेवढ्यात लक्षात आल कि मागचा टायर झकासपैकी पंक्चर झालेला दिसतोय. गाडी श्रुतीकाकुची असल्यामुळे तिच्या डिकीत सगळी आयुध तयार होती, हेच काल घडल असत तर माझी गाडी कुठली एवढी टकाटक असणार.. डिकीतून पंप बाहेर काढून हवा भरली आणि आता निदान पंक्चर वाल्यापर्यंत तरी जाऊया असा विचार करून निघालो खरे, पण काही फुटावरच टायर महाराज पुन्हा बसले. आता चाक काढून घेणे आणि मग पंक्चरवाला शोधणे आले. पण मग वाटल चाक काढून घेतलं तरी गाडी इथेच कशी ठेवायची? अनोळखी गावात?  आणि शिवाय किती अंतर अजून बाकी आहे त्याची काहीच कल्पना येत नव्हती. नकोच ते. मग गाडी ढकलत चालायची मोहीम सुरु झाली. अतिशय वाईट रस्ता, ज्याच्यावर कोणे एके काळी डांबर असावं असं वाटत होत. वेडीवाकडी वळणे आणि तीव्र चढ उतार ह्यातून सर्कस करत निघालो. उन वाढायला लागल, दगड आणि लाल माती तुडवत गाडी ढकलताना सकाळी ऐटीत चढवलेल्या स्वेटर आणि स्कार्फची आता अडगळ व्हायला लागली. एका वळणावर वळून समोर बघितला तर खोलवर दाभोळ खाडी, बंदरातल्या बोटी, उसगाव, खाडीच्या पुढे समुद्र असं सगळ दिसायला लागल! तिसरीच्या भूगोलाच्या पुस्तकात वाचून तालासुरात केलेलं पाठांतर.. वासिष्ठी नदीsssss.. दाभोळची खाडीsssss असं अचानकपणे समोर आल. त्या पाठांतराच्या चाली इतकच सुंदर! पण ते सगळ बघत बसायची हि वेळ नव्हती. आता सारख घड्याळाकडे लक्ष जायला लागल, कारण दिलेली वेळ पाळण्याची वाईट खोड! ते ओणनवसे गाव अजून कुठे नजरेच्या टप्प्यात पण नव्हत आणि पावणे नऊ वाजत आले होते. मग आम्ही चालता चालताच त्या लोकांना फोन करून सगळा प्रकार सांगितला. दिलगिरी व्यक्त करून उशीर होत असल्याच सांगितलं आणि आम्ही येई पर्यंत सगळ्या मुलांना कागद वाटून चौरसाकार तुकडे करून ठेवायला सांगा म्हणजे आल्या आल्या लगेच ओरिगामी सुरु होईल असं सुचवलं. जास्तीत जास्त वेगाने गाडी ढकलत आम्ही अजून अर्धा तास चाललो असू. तिथे एका गुर चरवत बसलेल्या आजीला बघून गाव जवळ आल्याच लक्षात आल. तिच्याकडून दोन बहुमूल्य बातम्या मिळाल्या. एक म्हणजे ओणनवसे शाळा जिथे आम्हाला जायचं होत ती आता अगदी जवळ आली आहे. आणि दुसर म्हणजे इथून सगळ्यात जवळचा पंक्चरवाला दाभोळला आहे. म्हणजे ८ किमी! हरे राम म्हणत आम्ही शाळेत पोचलो, आणि बघितलं तर कुलुपबंद शाळेभोवती हुंदडत असलेली मुलं सोडली तर तिथे कुणीच नव्हत. मग मात्र आम्ही ठरवलं कि आता चाक काढून एकीने  मिळेल ते वाहन पकडून दाभोळला जायचं आणि पंक्चर काढून परत यायचं तोपर्यंत शिकवण्याच काम आज एकटीनेच करायचं. त्या निर्मनुष्य रस्त्यावर वाहन मिळेल कि नाही शंकाच होती. नाहीतर ८ किमी चालायची मानसिक तयारी झालीच होती. आता एवढ गाडी ढकलत आल्यावर नुसतंच चालणं किती सोपं वाटायला लागल होत!
प्लेजरच चाक काढण काही अतिकठीण नाही, पण श्रुतीकाकुच्या गाडीची हि पंक्चर व्हायची आणि चाक काढायची पहिलीच वेळ होती, त्यात आमचे हात घामाने आणि धुळीने ओलेचिंब झालेले. काही केल्या नट हलेनात. आमचा हा खटाटोप सुरु असताना युनिकोर्न किंवा तत्सम भली मोठी बाईक घेऊन तिकडे एक हिरो साहेब दाखल झाले. सगळ्या हत्यारांची तपासणी करून त्याने जेव्हा चाकाच्या मध्याबिंदुवर असणारा जाडा नट काढायला घेतला तेव्हा अक्षरशः घाबरून आम्ही त्याच्या हातातून हत्यार काढून घेतली. आता चाक निघालेलं असत तर ह्या मनुष्याच्या गाडीवरून दाभोळ गाठता आल असतं. पण तस काही व्हायचं नव्हत.
तेवढयात एका सिक्स सीटर मधून एक मध्यमवयीन काका डोकावत विचारायला लागले कि काय झालाय? सगळा प्रकार कळल्यावर त्यांनी तातडीने खाली उतरून चाक काढाल! त्याचबरोबर कळल कि ते जातिवंत मेकानिक आहेत. मग त्यांनी सगळी चौकशी केली, आम्ही कुठून कुठे कशासाठी चाललो आहोत त्याची. डॉ गोंधळेकरांच नाव ऐकल्यावर तर त्यांच्या दृष्टीने विषय संपला होता “अरे वा. ते तर आमच्या भाजपचे, म्हणजे तुम्ही आमच्या घरचीच माणस काळजी सोडा तुम्ही  ४ वाजता संपणार ना तुमचा क्लास, त्याच्या आत चाक पाठवतो” असं म्हणून त्यांच्या गाडीत बसून चाक घेऊन गेले पण.
सगळेच प्रश्न एकदम निकालात निघाल्यामुळे आम्ही दोघींनी एकमेकींकडे बघितलं आणि हे ngo वाले अजून आले कसे नाहीत असा प्रश्न आत्ता आम्हाला पडला. त्यांना फोन केला तेव्हा कळल कि त्यांची पण गाडी पंक्चर झाली आहे! चला म्हणजे आम्हाला उशीर झाल्याच गिल्ट पण संपल.
आत्ता कुठे आम्ही शांतपणे एकमेकींच्या अवताराकडे बघितलं, तर सकाळच्या इस्त्रीच्या कपडयांची अवस्था आता अशी झाली होती कि किती वर्ष कपडे धुतले नसावेत. टाचेखाली अडकून अडकून फाटलेली माझी सलवार तिथेच दगडावर बसल्या बसल्या हातशिलाईने शिवायला मी सुरुवात केली (सुईदोरा हि श्रुतीकाकुच्या पर्सची कृपा) आणि आम्ही दोघीही प्रचंड हसत सुटलो! तेवढयात बोलेरो मधून ngo वाली मंडळी उतरली ती चिंतातूर चेहेऱ्याने. घाईघाईने शिवणकाम आटपून आम्ही उठलो तेव्हा आम्हाला हसताना बघून ते सगळे अवाकच झाले. मग रोजच्याप्रमाणे आमचा क्लास पार पडला.
आमचं शिकवण झाल कि त्या मुलांना जादूचे प्रयोग दाखवले जाणार होते. जादुगार दाभोळ हून आले ते आमच्या गाडीच चाक घेऊनच. आम्ही शिकवणी संपवून बाहेर आलो तेव्हा गाडी चाक जोडून तयार होती! आमच्यासाठी एवढे कष्ट घेतल्याबद्दल सगळ्या मंडळींचे परत परत आभार मानले. मगाचच्या मेकानिक काकांना द्यायला पैसे देऊन आम्ही गाडीजवळ आलो. “ चल बायो.. निघायचं ना?” गाडीच्या सीट वर थाप मारून श्रुतीकाकू लाडाने गाडीला म्हणाली. गाडी सुद्धा मनातल्या मनात माय प्लेजर असं म्हणाली असेल! मग त्याच दिव्य रस्त्याने ५० किमी अंतर कापून आम्ही घरी पोचलो, संध्याकाळचा निरश्या दुधाच्या चहाचा कप हातात देत आईने विचारलंन “कसा गेला आजचा दिवस?” मी आणि श्रुतीकाकू एकमेकीना टाळी देत एका सुरात ओरडलो,, “मस्त!”

08 October, 2015

गणपती उत्सव 2015

गावभर हिंडून फिरून झाड़ून सगळे गणपती बघुन घरी परत आल्यावरची संध्याकाळ.. मित्रमंडळी.. गणगोतांची वर्दळ.. चहा कॉफी चे एकावरएक राउंड...
धुपाचे खड़े घालून सुगंधित झालेली धुरी..माजघरभरून पसरलेली सतरंजी. संध्याकाळची पूजा. पेटीतबले टाळ घेऊन यंगष्टर्सचे आगमन. पेटीचे सुरेल सूर आणि पाठोपाठ उंच आवाजात सुरु झालेलं "सुखकर्ता..."
1..2..3..करत एकामागुन एक आरत्या.. सगळ्या देवांबरोबर भगवद्गीता,शिवजीमहाराज यांच्या आरत्या.. तालासूरात घुमवलेलं येई हो विठ्ठले..वाढत जाणाऱ्या आरत्यांच्या संख्येबरोबर चढत जाणारे आवाज.. खणखणीत वाजणाऱ्या टाळांच्या लयीबरोबर तल्लीन होऊन डुलणारी पोरं आणि दादा लोक्स... 5वर पंखा असताना पण कपाळावर चमकलेले घामाचे थेंब.. अच्युतम केशवम् झाल्यावर मोरया हो बाप्पा मोरया हो चा गजर...
एकीकडे आईने केलेल्या चहाचा दरवळ.. धिरगंभीर आवजातले देवे.. सुरु असतानाच मनात दाटून येणारं गांभीर्य.. आपोआप जोडले गेलेले हात.. सुखकर्त्या विघ्नहर्त्याची मनात केलेली आर्त प्रार्थना.... मंत्रपुष्पांजली झाल्यावर चहा आणि प्रसाद... गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला हा क्षण..1894 च्या सुमारास सुरु झालेली ही परंपरा.. पूर्वजांनी दिलेला ठेवा...

पटापट सगळी वाद्य घेऊन मूलं पुढच्या घरी पोचली सुद्धा.. चहाचे कप विसळताना मनात साठलेले विचार.. शेजारच्या घरात चाललेलं भजन आमच्या पडवीत बसून ऐकताऐकता टाइप केलेत. तिथल्या वाद्यांचा ठेका इथे कीपॅडवर आपटणाऱ्या बोटांना पण जाणवतोय... "पावन झाली चंद्रभागा झाला कृतार्थ पांडुरंग" सुरु झालं आणि पाठीमागून म्हणणारे बाल तरुण आवाज ऐकताना खरोखर असंच मनात येताय .. कळसावरती नवी पताका..तेज नवे आले..

ह्या परंपरा चिरंतन ठेवण्याची शक्ति-बुद्धि दे आम्हाला रे बाप्पा.,,  मोरया...

05 October, 2015

शांतता

सकाळी 11 च्या सुमारास मुंबईचे काका काकू घरी येऊन पोचतात. या या वगेरे होतं, पाणी बिणी पिउन काकू मागच्या पडवीतल्या झोपाळ्यावर ऐसपैस बसते आणि म्हणते "अहाहा किती शांतता आहे ना इथे! व्वा!"
आणि मी विचित्र नजरेनी तिच्याकडे बघते. हा नेहेमीचा कार्यक्रम. कारण मला त्या वेळी कुठल्याही प्रकारे शांतता वाटत नसते. झोपाळ्याची कुरकुर, एखादा ओरडणारा पक्षी, आई ताक करत असेल तर तो घुसळण्याचा आवाज, वॉशिंग मशीन सुरु असेल तर त्याचा घुर्रर्र आवाज, कुत्री मांजरं वासरं असले आवाज ह्यात हिला काय शांतता वाटत्ये असा मला कायम प्रश्न पडतो. तसं बोलून दाखवल्यावर काकूच म्हणणं असं की मुंबईच्या तुलनेत तिला इथे शांतता वाटते.
असेल ब्वॉ..
मध्यंतरी आजोळी "निवांतपणे" जाण्याचा खुप वर्षानी योग आला. पूर्वी 9वी पर्यन्त नेहमीच निवांत राहायला जायचो तेव्हा आयुष्यात कसलाच स्ट्रेस नसयचा. ते काय असतं तेहि माहिती नसण्याचे रम्य दिवस होते ते. तेव्हा त्याची किंमत कळायचा प्रश्नच नव्हता. ह्यावेळी दोन दिवस तिथे मजेत घालवून झाले. गप्पा टप्पा आणि भावंडांशी दंगा मस्ती करुन झाली. रामाच्या देवळात दर्शन घेऊन तिथल्या कट्टयावर बसल्यावर अचानक मला पण साक्षात्कार झाला "आहाहा किती शांत वाटतंय.." वास्तविक तिथे पण आमच्या घरासारखेच विविध आवाज येत होते मग ही शांतता कुठली?
तिथे काही आवाज पूर्ण बंद झालेले होते काही काळासाठी तरी.. आज किती काम झाल, त्याचे किती पैसे मिळतील, ह्या बॅगला किती कापड लागताय, कुणाची ऑर्डर कधी संपवायची आहे, कुणाला कुठलं डिझाइन हवं आहे, आणि एवढं करून ह्या स्ट्रगलमधून काहीतरी चांगली पोझिशन आपली कधीतरी येणार आहे का..हे सगळ कशासाठी करतोय आपण... हे  सगळे मनातले आवाज.. पूर्ण थांबलेले..
मग कळलं शांतता ही कधीकधी आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असते.. काकूला पण मुंबईहुन मुर्डीला आल्यावर असंच होत असणार.
रारंगढांगात त्या विश्वनाथला जसा हिमालयात "शांततेचा आवाज" ऐकायला आला तसंच काहीतरी. मुंबई-पुणे-मुंबई मध्ये सिंहगडावर मुक्ता बर्वे म्हणते "अश्या ठिकाणी आपण स्वतःविषयी जरा निवांत विचार करतो" तसच काहीतरी..