25 June, 2016

पाऊस आणि रामरक्षा

अगदी सेम अशीच, आजच्या सारखीच, जून महिन्यातली एक पावसाळी-ओलीचिंब संध्याकाळ होती. सुट्टी संपली होती आणि आमची शाळा नुकतीच सुरु झाली होती. पण मुंबईच्या शाळा सुरु व्हायला अजून आठवडा शिल्लक होता. म्हणून बनी आणि काका अजून मुर्डीलाच होते.

संध्याकाळी 5 वाजता मी शाळेतून आले, चरायला गेलेली गुरं घरी आली. आंबोणं, दूध काढणं वगैरे कामं संपवून मोठी माणसं घरात आली. दिवसभर पाऊस होताच, त्यामुळे काळोखी आलेली, त्यात दिवस मावळत आला होता. अर्थात लाईट नव्हतेच..

थोडं थोडं दिसताय तेवढ्यात आईने भराभर गॅसजवळची कामं उरकायच्या मागे, दुधं तापवणे, विरजण, रात्रीचा स्वयंपाक, एकीकडे सगळ्यांसाठी निरश्या दुधाचा चहा अशी तिची लगबग सुरु होती.

लाईट आता कधी येतील ह्याचा काहीही अंदाज नसल्यामुळे संध्याकाळी कंदिलात रॉकेल भरून,त्याच्या काचा राखुंडीने स्वच्छ पुसून चमकवून ठेवलेल्या होत्या. शांत तेवणारे 3 कंदील -एक ओटीवर, एक माजघरात, एक स्वयंपाकघरात ठेवले होते.

आगोटीच्या वेळी कौलं चाळून झाली असली तरी प्रत्यक्ष कुठे कुठे गळती आहे ते कळायला टोम पाऊस पडायचीच वेळ येते. तसंच झालं. एक दणकी सर धोंधोंधोंधों करत कोसळायला लागली त्यांत मागच्या पडवीत, कौलातून खालच्या वरल्याच्या (वरला=पोटमाळा) कडीपाटावर आणि तिथून मेचकी झोपळ्यावरच धार पडायला लागली. एव्हाना काळोख मिट्ट झालेला.

तिथेच झोपाळ्यावर बसून चहाची वाट बघत असलेले बाबा, आजोबा आणि काका उठले, आणि त्या गळत्याचा बंदोबस्त करायच्या मागे लागले. आजोबा हातात बॅटरी घेऊन झोत पाडत होते, बाबा फळीवर चढून कितपत गळती आहे ते बघत होते, काका काय लागेल ती वस्तू देत होता. काठीने कौल ढोसळलं कि काम भागेल का रात्रभर तिथे घमेलं ठेवून द्यावं, असं चाललेलं..

मी, बिट्टू आणि बनी पुढच्या पडवीत झोपाळ्यावर बसलो होतो ते तातडीने उठून मध्ये लुडबुडायला गेलो.
"तुमचं काये इथे? जा तिकडे, पुढीलदारी झोपाळ्यावर बसून शुभंकरोती म्हणायला लागा!"
असा हग्यादम मिळाल्यावर आम्ही सुमडीत पुढीलदारी येऊन झोपाळ्यावर बसलो.
बिट्टू आणि बनी दोघे दोन टोकांना, कड्याना धरून आणि मी मध्यावर. शुभंकरोती आणि सगळी स्तोत्र एकामागून एक सुरु झाली.

बाहेर पावसाचा वेग आणि आमच्या झोपळ्याच्या वेग दोन्ही वाढत वाढत चाललेले. पागोळ्यांमधून धबधबा पडत होता. आषाढात विमलेश्वराच्या देवळात रुद्रानुष्ठान असतं, तेव्हा जशी मंत्रोच्चारांच्या आवजांची लय वातावरणात भरते ना, तशीच लय पावसाच्या आवाजाने कौलांवर धरलेली.. त्या लयीला धरायला आमचे चिमुकले पाय जमिनीला जोरजोरात रेटवत होते. अंगणातली झाडं ओलेचिंब होऊन निथळत होती त्यांच्याकडे बघत बघत आमची सॉल्लिड तंद्री लागलेली.

स्तोत्र पुढे पुढे सरकत गाडी रामरक्षेवर आली. सर्वात मोठं स्तोत्र म्हणून रामरक्षा म्हणजे कठीण परिस्थिती. त्यात कधी एकदा रामोराज्यमणी ह्या ओळीची आम्ही वाट बघायचो, म्हणजे आता संपत आली😜 पण आज हि ओळ येतच नव्हती.

कधी एकदा संपते रामरक्षा असा विचार मधूनच येत होता, पण रामरक्षा काही संपतच नव्हती. मगाशीच ओरडा खाल्यामुळे आता टंगळमंगळ करायची टाप होत नव्हती.

एव्हाना तिकडे मागच्या पडवीत गळतं काढून झालं, आणि हि मोठी माणसं ओटीवर आली, त्याचाही आम्हाला पत्ता नव्हता.

"अरे गधडयांनो, काय चाललाय काय?? पाऊण तास झाला, मी ऐकताय, तुमची रामरक्षा चालल्ये अजून! काय माणसं आहा का कोण?"
आजोबांच्या आवाजाने आम्ही तिघे खाडकन तंद्रीतून शुद्धीवर आलो.

झालं काय होतं, सुरुवात तर बरोबर झाली, - जानकी लक्ष्मणोपेतम् जटा मुकुट मंडीतम्- वरून गाडी पुढे सरकली, मग पुन्हा जानकी शब्द येतो तेव्हा "जानकी वल्लभ: श्रीमान्" म्हणायचं कि नाही, तर ते सोडून आमचं आपलं पुन्हा जानकी लक्ष्मणोपेतम्-- आणि इथेच चकवा लागल्यागत आमची रामरक्षा गोल गोल फिरत्येय.
भुताच्या एरियात चकवा लागतो तेव्हा त्या तावडीतून सुटण्यासाठी रामरक्षा म्हणतात, तर इथे आम्हाला रामरक्षेचाच चकवा लागलेला. तेव्हा स्वतःच्याच फजितीवर मनसोक्त हसलो, आजोबा पण चिक्कार हसले आणि रामरक्षेतलं पाठांतराचं कन्फ्युजन कायमचं सुटलं.

आज अगदी तसाच मनसोक्त पाऊस पडतोय. आता त्या लयीशी झोपळ्याच्या वेगाची स्पर्धा करायला तेवढा जीव खाऊन जोर लावावा लागत नाही . पण ओरडायला आणि नंतर हसायला आजोबा नाहीयेत.

7 comments:

  1. खुपच छान !👌

    ReplyDelete
  2. खुपच छान !👌

    ReplyDelete
  3. छान लिहिलंय!

    ReplyDelete
  4. क्या बात है! खूब. कोकण डोळ्यांसमोर उभं राहिलं.

    ReplyDelete
  5. अत्यंत सुंदर

    ReplyDelete
  6. अतिशय ह्रद्य, सुरेख !

    ReplyDelete