18 June, 2016

नर्मदेची हाक

शुक्रवार सकाळ- "चल, मी निघते, पिलू उठल्यावर त्याचं आवरून घे, होमवर्क आम्ही कालच केलाय, वेळेवर शाळेत पोचा म्हणजे झालं.. स्वयंपाक ठेवलाय तयार.सगळ्यांनी वेळेवर खाऊन घ्या. आई-बाबांची औषधं दे वेळेवर आणि हो आज कदाचित अहमदाबादला जावं लागेल मीटिंगसाठी, खूपच उशीर होणार असेल तर कळवीन तसं, तुम्ही पापांकडे येऊन थांबा"
लॅपटॉप उचलून तेजल घरातून बाहेर पडतापडता म्हणाली.

सगळ्याच शहरांसारखं भरुच पण वाढता वाढता वाढे झालंय.. तिचं घर नर्मदेच्या दक्षिण बाजूला तसं नदीच्या अगदी जवळच. घराच्या गच्चीतून सगळं पात्र लांबवर नजरेसमोर दिसायचं..  आज खूपच लवकर NH 7 ला लागली तिची कार. नेहेमीप्रमाणे रोजच्या विक्रेत्याकडून शेंगदाणे विकत घेऊन, नर्मदेवरच्या सरदार ब्रिजवरून खारे शेंगदाणे खात खात विचारांच्या तंद्रीत हरवून तेजल सुसाट बडोद्याकडे सुटली.

तिच्या लहानपणी हा पूल जरासा छोटा होता, तर गाडीतून नदी दिसायची, आता अगदी मधल्या लेनमधून तर नदी दिसतही नाही.. पण तिला तेव्हा आणि आताही ह्या नर्मदा नदीचं खूप आकर्षण.. लहानपणी बडोद्याला रहात असताना भरुचला मावशीकडे आलं कि नदी हेच भटकायचं ठिकाण, आणि नंतर सासरचे घर पण तिथेच.... मन भूतकाळाच्या सफरीवर निघालं सुद्धा..

बडोद्याची तेजल शाह, एकदम हुशार आणि कर्तबगार. सटासट शिकत उत्तम प्रकारे आर्किटेक्ट झाली. घरची परिस्थिती अतिउत्तम, त्यामुळे ऑस्ट्रेलियाहून सहज मास्टर्स करून परत आली, आणि घरी वडिलांच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात लक्ष घालू लागली. पाठोपाठ तिचा भाऊ सीए होऊन त्याच व्यवसायात आला, सगळ्या व्यावसायिक गुजराती कुटुंबात असत तसंच.. फरक इतकाच कि इथे तेजल मुलगी असूनही बहीणभाऊ मिळून वडिलांचा व्यवसाय जोरात पुढे नेत होते, वडिलांचा अनुभवी आधारहि मजबूत..

ह्या सगळ्यात विसंगत काय असेल तर तेजलच्या सासरचे. त्यांच्यासारखाच व्यावसायिक गुजराती जावईच बघायचे तिचे वडील खरं तर, पण भरुचला मावशीच्या शेजारी राहणाऱ्या जोश्यांच्या मुलाशी हिने परस्पर लग्न ठरवलं. मग मोकळ्या वातावरणात वाढलेल्या तेजलला घरून कोणी विरोध केला नाही. बाकी 'सतेज सुरेश जोशी' हा मराठी आहे आणि नोकरदार आहे हे सोडलं तर काय प्रॉब्लेम नव्हता. बीई, एमबीए झालेला, नोकरीच्या मानाने व्यवस्थित कमवता, लोक चांगले होते, मावशीचे सख्खे शेजारी म्हणून खूप जास्त ओळखीचे होते. सर्वानुमते लग्न झालं, सतेज त्याच्या नोकरीत आणि तेजल तिच्या व्यवसायात गढले. भरुच-बडोदा हा 80 किमीचा दीड तासाचा प्रवास तिच्यासाठी रोजचाच झाला.

तिने कधीही स्वतःच्या मजबूत कमाईचा टेंभा मिरवला नाही, आणि साधेपणाने मध्यमवर्गीय जोशी लोकांच्यात मिसळून गेली, तसेच तिला तिच्या विचित्र वेळापत्रकासाठी सर्वांचे सहकार्यहि मिळालं.
सगळं जे घडत गेलं ते अगदी अद्भुत म्हणावं असंच होतं खरं तर..

तेजलने जन्मात कधी महाराष्ट्र बघितला नव्हता पण कसली तरी अगम्य ओढ वाटायची तिला महाराष्ट्राबद्दल, मराठी भाषा, रितीरिवाज, सण, खाद्यसंस्कृती, सगळंच. खरं तर सतेज शिवाय कोणीही मराठी मित्रमैत्रिणी पण नव्हते तिला. त्यांचा मराठी आणि महाराष्ट्र ह्याच्याशी काहीही संबंध नव्हता.  पण पाचवीत असताना ती पहिल्यांदा आईला सोडून एकटीच भरुचला मावशीकडे सुट्टीभर राहायला आली आणि सतेजबरोबर खेळायला सगळी भावंडांची फलटण जोश्यांकडे गेली तेव्हाच तिला जाणवलं होतं, हे लोक आपल्या खूप जास्त ओळखीचे आहेत आणि हे असं कायम होत आलं होत, आजपर्यंत.. हे सगळे लोक, ते घर, तो परिसर, ती नर्मदा नदी सगळं तिला हाक मारतायत, बोलवतायत असा फिल कायम यायचा तिला. प्रचंड अस्वस्थता यायची..

पुढे तिचं आणि सतेजच लग्न होणं जसं काही अगदी अपरिहार्य होतं, पूर्वनियोजित होतं, इतक्या सहज ती त्या घरात रुळली, अस्खलित मराठी बोलायला शिकली.. एक रक्तात भिनलेली व्यावसायिक वृत्ती सोडता ती अंतर्बाह्य मराठी मुलगी बनली!

लग्नानंतरच्या पहिल्या गणपतीतली गोष्ट, तेजल मोदक करायला शिकत होती. आयुष्यात पहिल्यांदा बघत असलेला तो प्रकार तिने दुसऱ्या प्रयत्नात सफाईदारपणे केला, तेव्हा आश्चर्यचकित होऊन सगळे म्हणाले होते, "कुठे ग शिकलीस इतके सुंदर मोदक करायला? तुला नक्की सवय असणार आधी!"
तेव्हा तेजल मात्र कुठल्यातरी अज्ञात जगात हरवलेली होती, तीनदा तोच प्रश्न विचारल्यावर तिने पोक्त, सानुनासिक आवाजात उत्तर दिलं होतं, "काय बाई तरीss मोदक कुठे करायला येत होते मला माहेरी असताना, पार्वती वन्संनी शिकवले हो इथे आल्यावर!!"
क्षणभर प्रचंड शांतता आणि मग हास्याचा कल्लोळ उठला हे ऐकून.. कोण पार्वती वन्सं? आणि हा शब्द तरी कुठून शिकली तेजल??
पण तिचे सासरे एकदम गंभीर झाले. तोपर्यंत गप्पांच्या ओघात ते तेजलला कधीकधी जुन्या आठवणी सांगत, ते भावंडांत सर्वात धाकटे, त्यांना मोठी सख्खी एकवीस भावंड, सगळी सुदृढ, निरोगी आणि ह्या बावीस मुलांना जन्म देऊन त्यांची आई सणसणीत तब्येतीची होती. ह्या सर्वात धाकट्या 10वर्षाच्या सुरेशला सोबत घेऊन त्यांचे वडील तीर्थयात्रेला निघाले इतकं तेजलला माहिती होतं, पण त्या पार्वती वन्सं प्रकरणानंतर तिचे सासरे काहीही जुन्या गोष्टींबद्दल बोलेनासे झाले.

सतेजला तर त्यांच्या घरण्याबद्दल शून्य माहिती होती. आणि तो त्याबद्दल अगदी उत्सुकहि नव्हता, पण तेजल सतत अस्वस्थ व्हायची, त्यांचं मूळ गाव, त्या सर्व 21 भावंडांची कुटुंबं तिला जाणून घ्यायचं असायचं. ती कितीदा सतेजच्या मागे भुणभुण करायची, "तू विचारत का नाहीस बाबांना? त्यांचं जन्मगाव कुठे आहे? आपण जाऊ ना महाराष्ट्र बघायला.."
पण तो एकच म्हणत राहायचा, " बाबांना त्रास होतो जुन्या गोष्टी काढल्यावर.. आणि आता आपलं गाव भरुच आहे, नको ना जुन्या गोष्टी उकरायला आता."
मग तेजलचा नाईलाज व्हायचा, पण उत्सुकता अजूनच वाढायची, त्रास का होतो बाबांना??

फावल्या वेळात विचार करकरून ती अर्थ लावत राही, पण खूप प्रयत्न करूनही हाती काहीच लागत नसे.
आताही तेच झालं, विचारांच्या तंद्रीत ड्रायव्हिंग करत ती बडोद्यात पोचली कधी, ऑफिसच्या पार्किंगला गाडी लावली कधी ते तिलाही कळलं नाही.
डोळ्यावरचा गॉगल डोक्यावर चढवत तिने केसांबरोबर विचार पण मागे सरकवले आणि ती ऑफिसात जाऊन कामाला लागली. अहमदाबादची मीटिंग संपवून ती रात्री बडोद्याला परत आली तर सतेज त्याचं ऑफिस संपवून पिल्लूला घेऊन सासुरवाडीला येऊन थांबला होता आता 2 दिवसाचा निवांत विकेन्ड.

शेजारी तेजलची बालमैत्रिण ममता माहेरपणाला आली होती. जुन्या गप्पा,शाळेच्या आठवणी, ग्रुपमधल्या बाकीच्यांना फोनाफोनी करताकरता ट्रीपचा प्लॅन आकार घेऊ लागला, नयनाच्या नवऱ्याचा ट्रॅव्हल&टुरिझम चा व्यवसाय, त्यामुळे तिनेच गाडी, ड्रायव्हर , लोकेशन , बुकिंग सगळं करायचं ठरलं. सगळ्यांच्या घरच्या आणि कामाच्या जबाबदाऱ्या बघून पुढच्या महिन्यात ट्रिपच्या तारखा ठरल्या. ट्रिप होती महाराष्ट्रात- कोकणात.

पावसाळा सुरु होऊन स्थिरावला होता. ह्या मैत्रिणींची टोळी कोकणात पाणदरी नावाच्या एका लहानश्या गावात, mtdc च्या एका पर्यटक निवासात उतरली होती. इतकं भारी, शांत, सुंदर, हिरवंगार आणि मुख्य म्हणजे कधी न ऐकलेलं गाव ट्रीपसाठी निवडलं म्हणून सगळ्या खुश होत्या. घर, जबाबदाऱ्या सगळं शेकडो किलोमीटर लांब पडलं होतं. इथे फक्त मजा, मस्ती, रिलॅक्स होणे, बास!

काहीही झालं तरी पाणी कधी आटत नाही हि इथली खासियत, डोंगराच्या पायथ्याशी म्हणून पाणदरी.. टुमदार, उद्योगी, समृद्ध गाव. कौलारू जुन्या घरांचा जेमतेम पन्नास पाऊणशे उंबरठा, पण प्रत्येक दाराशी चारचाकी गाडी होती. घरोघर गृहोद्योग चाललेले दिसत होते. प्रत्येक घरामागे माडपोफळींची वाडी, गुरांचा गोठा, विहीर.

तेजलला आर्किटेक्ट म्हणून ह्या घरांमध्ये अगदीच इंटरेस्ट वाटत होता. दुपारी भरपेट जेऊन मैत्रिणी गुडूप झोपल्या, आणि हि बाहेर पडली. गावात फेरफटका मारताना ती सगळी घरं म्हणजे अगदी हेरिटेज वाटली तिला. एखादं तरी घर आतून बघायला मिळावं अस तिला फार वाटत होतं.
तिच्या व्यावसायिक वारश्याला साजेशा गोड बोलण्याच्या कौशल्याने तिने कुणाशीतरी ओळख करून घेऊन, एका घरात प्रवेश मिळवलाच. गम्मत म्हणजे त्या घरातली मुलगी- पल्लवी मुंबईत रचना संसदमधून नुकतीच B.Arch पूर्ण करून जॉब शोधत होती, आत्ता चार दिवस घरी आली होती. मग काय, दोघींच्या गप्पा-चर्चा खूपच  रंगल्या.

गावातल्या घरांच्या रचनेबद्दल बोलताना तेजलला गावातल्या सगळ्यात मोठ्या घराबद्दल कळलं. पण ते घर बंद असतं, वापर नसल्यामुळे आता पडायला सुरुवात झाली आहे हे कळल्यावर तर तेजल तिथे जायला अगदीच उतावीळ झाली, पण पल्लवीने तिला सांगितलं कि तिथे आपल्याला कोणीही जाऊ देणार नाही, कारण तिथे भूत आहे.

तरीही तेजलला तिथे जायचंच होत, शेवटी कोणालाही न सांगता त्यांनी तिथे जायचं ठरवलंच. दुपारी चहा घेता घेता, तेजलने पल्लवीच्या आजोबांशी गप्पा सुरु केल्या, आणि त्या घराबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न केला. आजोबा पण तसे त्या घराबद्दल काहीच बोलायला तयार नव्हते. पण ते गावातील सर्वात गडगंज श्रीमंताच, जमीनदाराचं घर, गावात शेकडो एकर जमीन त्यांच्या मालकीची आहे, पण घरात राहायला कोणी नाही, तिथे एका बाईचं भूत वावरत असतं इतकी माहिती त्यांनी दिली!

पल्लवीने ते घर बाहेरून, लांबून दाखवलं तेव्हापासून तेजल भयंकर बेचैन होती, तिला त्या घरात जायचंच होतं. रूमवर आल्यावर ती मैत्रिणींना पण काहीच बोलली नाही. तब्येत बरी नाही सांगून रात्री लवकर झोपून गेली.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे, गुपचूप उठून जर्किन अडकवून तेजल त्या घराजवळ आलीच. टॉर्च आणि काठी घेऊन, बेढं ओलांडून तिने उंच दगडी गडग्याच्या पलीकडे असलेल्या विस्तीर्ण अंगणात पाऊल टाकलं. रिमझिम पावसाच्या आवजाशिवाय कसलीच चाहूल नव्हती. अंगणाचा किती वर्षात केर निघाला नव्हता. काटेरी झुडपं, रान माजलं होतं. तेजल ओढल्यासारखी अंगण ओलांडून दाराजवळ पोचली.

त्या राजेशाही घराला न शोभेसं एक मामुली गंजकं कुलूप होतं, दारालगतची भिंत पडली होती, आणि वरून काही कौलं पण खाली पडून फुटली होती. तिथूनच तिने आत प्रवेश केला. कधीकाळी मंगलकार्यात दाराला टांगलेला बेगड लावलेला नारळ खराब झाला तरी तिथेच होता. धुळीचा जाड थर अंगावर घेऊन पडवीतला सागवानी झोपाळा मात्र मजबूत तुळईला टांगून अविचल होता, अगदी त्याच्यावरचा चांदीचा पानाचा डबा सुद्धा तिथेच होता. बाकीचं घर सुद्धा अजून तरी बरंच बऱ्या अवस्थेत होतं होतं. पण ह्या पावसाळयात काय होणार कोण जाणे..

तेजल थक्क झाली! त्याच नादात ती पायरी चढून ओटीवर जाणार, तोच आतून एक बायकी आवाज आला,"चपला बरीक तिथेच काढून ठेव हो पोरी!"
तेजल तिनताड उडाली, यंत्रवत चपला काढून त्या धुळीत पाय टाकत तिने आवाजाच्या रोखाने वेध घेतला तर कोणीही दिसेना!!
पण का कोण जाणे, तिला आश्चर्य वाटलं तरी भीती मात्र वाटत नव्हती.
"कोण आहात तुम्ही? मी आत येऊ का? हे घर बघायचंय मला!" तेजल
"अगो ये हो, ये!" तोच बायकी आवाज हसऱ्या प्रेमळ स्वरात बोलला.

तेजल ऍबनॉर्मली बिनधास्तपणे आत गेली, आणि ते प्रचंड दोन मजली घर- तळघर, देवघर, अवाढव्य कोठीची खोली, भव्य माजघर, पाचपन्नास माणसांचा स्वयंपाक करणारं स्वयंपाकघर, त्यात फक्त स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी चक्क एक विहीर, अजस्त्र भांडीकुंडी, मजबूत तिजोरी, असंख्य अँटिक वस्तू, कित्येक राहायच्या खोल्या, देखण्या गॅलऱ्या, चक्रव्यूह वाटावे असे जिने, पाचपन्नास गुरं बांधता येतील असा गोठा, तेवढीच दाणा-वैरणीची व्यवस्था ... ह्या सगळ्या जंजाळात अक्षरशः गुरफटत गेली.

कहर म्हणजे तोच तो प्रेमळ आवाज तिच्याबरोबर सर्वत्र फिरत होता, आणि तिला सगळी माहिती पुरवत होता. सगळं बघून ऐकून तेजलला अक्षरशः गरगरायला लागलं!

इकडे तेजल दिसत नाही म्हणून मैत्रिणींनी गावभर शोधाशोध केली, प्रचंड चिंतेत आता सतेजला फोन करावा का आणि काय सांगावं ह्या कोड्यात पडून 'त्या' घराबाहेर मैत्रिणी आणि गावकऱ्यांची हि गर्दी जमली.

ती घराबाहेर पडताना, "पोरी, थांब हळदीकुंकू लावते, लवकर ये हो परत" असा आवाज आला आणि कपाळावर कसलातरी स्पर्श जाणवल्याचाही भास झाला तेजलला.. अस्फुट आवाजात हो हो अस काहीतरी पुटपुटत ती बाहेर पडली, आणि धूळ, माती, कोळीष्टके ह्यांनी माखलेली, केसांचं भुस्कट झालेलं, अंगातले थ्री-फोर्थ आणि टीशर्ट धुळीत बरबटलेले .. आणि कपाळावर हळदीकुंकू.. अशी तेजल बघून बाहेर जमलेले लोक हवालदिल झाले. तिला आता भुताने पछाडली, वगैरे चर्चाना उधाण आलं, पण स्वतः तेजल अगदी नॉर्मल होती, फक्त तिला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला होता.

सगळे कलकलाट आणि प्रश्नोत्तरे टाळून ती कशीबशी रूमवर आली, मैत्रिणी हबकून गेल्या होत्या, आंघोळ करता करता तिने शांतपणे खूप खूप विचार केला.. आणि आंघोळ झाल्यावर पुन्हा मैत्रिणींना टाळून ती तडक बाहेर पडली आणि थेट तलाठ्याच ऑफिस गाठलं.

"त्या" जमिनीचा सातबारा म्हणताच तलाठी गारठला. पण बाबा-पुता करून का होईना दिलान एकदाचा सातबारा..

कालपासून तेजलच्या वागण्याने सगळेजण थक्क होत होते, आता थक्क व्हायची वेळ तेजलची होती.
त्या घरात फिरताना, तिला एका तांब्याचा घंगाळावर नाव दिसलं होतं- सदाशिव नारायण जोशी. तेव्हाच तिला काहीतरी क्लिक झालं होत, पण नावासारखी नावं असतात. म्हणून हा तलाठ्याकडे येण्याचा खटाटोप.. तर त्या सातबारावर तिला तेच नाव दिसत होतं- सदाशिव नारायण जोशी, जगन्नाथ नारायण जोशी, आणि अजून असंख्य जोशी.. त्यातच एक होते सुरेश सदाशिव जोशी!!!

तलाठ्याकडून निघून तेजल धावतच पल्लवीच्या घरी गेली. पल्लवीचे आजोबा त्या गावातले सर्वात वयोवृद्ध गृहस्थ होते. 90 वर्षाचा फिट म्हातारा.
"आजोबा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. मी तुमचं न ऐकता त्या घरात गेले, त्यासाठी मी माफी मागते तुमची, पण मला तिथे काहीच त्रास झाला नाही, उलट एक प्रेमळ बाई माझ्याबरोबर वावरतायत अस वाटत होतं मला.. त्यांनी मला सगळं घर फिरून दाखवलं, बरीच माहिती सांगितली, ती माहिती मला क्रॉसचेक करायची आहे, आजोबा आणि तुम्हीच हे करू शकता, प्लिज आजोबा, मला तुमची मदत हवी आहे.."

तेजल एका दमात बोलत होती, आणि आजोबांच्या डोळ्यात पाणी तरारल होतं.
"पोरी ती बाई, म्हणजे साक्षात देवता.. खोतीण वहिनी! 10 वर्ष झाली त्यांना जाऊन,  गेल्या तेव्हा 95 वर्षाच्या होत्या, खारकेसारखी खुटखुटीत तब्येत. शेवटच्या क्षणी एकट्या होत्या एवढ्या मोठ्या घरात पण त्या असतानाही आणि गेल्यावरही त्यांनी त्या घरात वाईट हेतूने शिरू दिलं नाही कधी कोणाला.. घरचं सोनं नाणं चीजवस्तू चोरपोरी जायला वेळ का लागला असता? पण वाईट हेतूने आत पाऊल घालील, त्याला खोतीण वहिनी हिसका दाखवत, मग जी भीती बसली कोणी धाडस केलं नाही परत.. तूच पहिली.."
"माझा हेतू तसा नव्हता ना आजोबा, म्हणून असेल" तेजल हसत म्हणाली, तिला पुढच्या हकिगतीत इंटरेस्ट होता.
आजोबा सांगू लागले-

"खोतांचं घर म्हणजे मोठं प्रस्थ! गावचे राजेच म्हणेनास! महसूल गोळा करून इंग्रज सरकारला भरायचा हे त्यांचं काम.. मोठा मानमरातब.  मग गावचे भांडण तंटे सोडवणं, लोकांच्या अडीअडचणीला पाठीशी राहणं, अशी जबाबदारी असे, आणि मुख्य म्हणजे हे खोत ते निभावत..नाहीतर अधिकाराचा गैरवापर करून लोकांना छळणारे खोत हि असत गावोगावी, हे त्यातले नव्हते..
ह्या तुला भेटल्या त्या धाकट्या वहिनी.. सगळ्या गावाची आई त्या..
मोठे खोत लवकर गेले, मग मोठ्या वहिनी कशात लक्ष घालेनाश्या झाल्या, तेव्हा धाकट्या वहिनीच सगळं बघत. दोघी जावांचं अगदी मेतकूट. बालपणीच नवरा वारल्यामुळे मागे आलेली पार्वती ताई होती घरात, तीही अगदी सुगरण आणि कष्टाळू. पण शेवटी सगळी मुलं नोकरीसाठी बाहेर पुण्यामुंबई कडे पांगली, घर हळूहळू रिकामं होत गेलं..

पुढे इंग्रज गेले, तशी खोती पण गेली. तेव्हाच धाकटे खोत त्यांच्या धाकट्या लेकराला-सुरेशला- घेऊन कुठे यात्रेला म्हणून गेले. आता यात्रेला गेलेला माणुस केव्हा येईल ह्याचा नेम नसे त्या काळी.. पण धाकट्या वहिनी फार हुशार आणि धिराच्या, त्यांनी शिताफीने सगळी इस्टेट थोरल्या जाऊबाईंच्या नावावर केली.. कुळकायदा आला होता, पण विधवेच्या इस्टेटीला कुळ लागत नव्हते. म्हणून सगळी जमीन शेवट्पर्यंत खोतांच्याच घराण्यात राहिली.
पण दुर्दैव बघ कसे, एवढं गोकुळासारखं घर, पण हि इस्टेट बघायला एकही पोर इथे फिरकला नाही पुढे. धाकटे खोत यात्रेला गेले ते आलेच नाही परत. मोठ्या वहिनी गेल्यापासून ह्या एकट्याच असत घरात."

"पण आजोबा, त्यांच्या पुढच्या पिढ्या कोणीच नाही आल्या का इकडे? निदान ह्या खोतीण आजी गेल्यावर तरी?"

"कुणाचा पत्ता कुणाला माहिती असेल तर कळेल ना म्हातारी गेल्याच? अगो ह्या घरातले मुलगे भारी विचित्र स्वभावाचे, अलिप्त, आतल्या गाठीचे. कधी मनमोकळं बोलायचे नाहीत कुणाशी.. कि शाळूसोबत्यांशी संपर्क ठेवला नाही कधी.. पूर्वापार बघतोय ना मी. सगळ्यांचे चमत्कारिक स्वभाव.. गावकऱ्यानीच म्हातारीला बंदरावर पोचवली शेवटचे संस्कार करायला.."

तेजलला काहीतरी उलडत जातंय अस वाटत होत.. "आजोबा, ह्या खोतीण वहिनींना मुलं किती होती हो टोटल?"
"बावीस. धाकटा सुरेश वडिलांबरोबर यात्रेला गेला होता, ते बापलेक कधी परत आलेच नाहीत..."
आता पुढच्या स्टोरीत तेजलच लक्ष लागेना.

"आजोबा त्या बावीस भावंडांपैकी शक्य तितक्यांची नावं सांगा मला..तुमच्या आठवणीप्रमाणे ते कोणत्या गावी ,, कोणत्या नोकरीसाठी गेले होते ते सांगा.. बहिणी कोणत्या गावी गेल्या, त्यांची आडनावं काय होती, जे काय आठवेल ते सांगा.. तेजल भराभर याद्या करू लागली. सातबारावरची माहिती क्रॉसचेक करू लागली.
लिंक लागली होती, बरीच उत्तरं मिळत होती. वर्तुळ पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं.

पल्लवीच्या आजोबांकडून माहिती घेऊन तेजल बाहेर पडली तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिने गावातल्या दुकानातून ताडपत्री विकत घेऊन आजोबांच्या ओळखीने दोन गडी बघून त्यांच्या मदतीने ती पडक्या भिंतीच्या जागी ताणून बसवून टाकली. आता खोतीण वहिनींनी ह्या पोरीला हळदीकुंकू लावलंय, आणि काही हिसका दाखवला नाही म्हटल्यावर गडी भीती सोडून पुढे आले. तेजलने तूप- वात, उदबत्ती आणून "त्या" घरातल्या देवापुढे सांजवात केली.

मैत्रिणी चक्रावल्या होत्या, पण तेजलला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत चालली होती. दुसऱ्या दिवशी सगळया परत निघाल्या.
प्रवासात पण तेजल वेगळ्याच जगात वावरत होती. पल्लवीच्या आजोबांकडून यादी करून घेतलेल्या नावांचा फेसबुकवर शोध लागतो का बघत होती.. पण ते कठीणच होतं. सुरेश जोशींच सत्तरीच्या घरात, मोठी भावंड कुठून फेसबुक वापरणार? मुळात हयात आहेत का इथून शंका.

भरूचला पोचल्यावर सगळी चित्तरकथा ऐकून, पाणदरी हे नाव, घराचं वर्णन सगळं ऐकून, तेजलने काढलेले फोटो बघून तेजलचे सासरे आवकच झाले.

"पोरी मी तुला काहीही सांगितलं नाही पण माझ्या आईने -नर्मदा तिचं नाव- तुला बोलवून नेलंन हो मुळापर्यंत.. तुला सगळं कळलंच असेल आता,
खोती गेल्यावर तिथे काही भागायचं नाही ह्या भयाने वडलांनी मला घेऊन घर सोडलं तेव्हा मी 10 वर्षाचा होतो. मोठे भाऊ नोकरीसाठी, बहिणी लग्न करून केव्हाच घराच्या बाहेर पडलेल्या, मोठी काकू- ताईकाकू,  आई-नर्मदामाई, आणि मागे आलेली पार्वती आत्या ह्या तिघी बायका घरात राहिल्या.

वडील मला घेऊन इथे आले आणि मला एकटा सोडून नर्मदेच्या काठाकाठाने चालत जे निघून गेले ते परत कधी दिसले नाहीत..
इथे एका भल्या माणसाने दया येऊन मला एका आश्रमात सोडला, तिथून शिकून मी पोष्टात चिकटलो तो शेवटपर्यंत. हि तुझी सासू पण गरीब घरचीच, तीची भेट आश्रमवाल्यांनीच घालून दिली. काडीकाडी करून हे घर बांधलं, आणि इथलेच झालो."

"बाबा, तुम्हाला कधी पाणदरीला जावंसं नाही वाटलं?"

"छे रे! इथे माझं जग तयार झालं, आता कशाला तिकडे जायचं, तेव्हा इतक्या लांबच्या प्रवासाला पैसेही नव्हते नि वेळही नव्हता. पुन्हा तिकडे आम्ही 22 नि काकूची 5 असे 27 वाटेकरी त्या इस्टेटीत, त्यात का डोकी आपटाच्येत..आता आम्ही इथेच नर्मदातीरी शेवट्पर्यंत राहणार! "

बाबांनी चर्चाच संपवली, म्हणून तेजल नाईलाजाने गप्प झाली. सतेज तर हादरून गेला होता, त्याला एकावर एक धक्के बसत होते, पण तेजलने घरातल्या सर्वाना सावरायला वेळ दिला तरी, ती मुळीच स्वस्थ बसली नव्हती.

तिने तिच्या व्यवसायात मुरलेल्या वडिलांशी, सीए भावाशी चर्चा  केल्या, हजार खटपटी-सोशल नेटवर्क, वर्तमानपत्र, शाळा-कॉलेजं जिथून मिळेल तिथून माहिती काढली. 27 भावंडांचे पत्ते मिळवले, त्यांच्याशी संपर्क करून त्या जमिनीच्या एकूण 88 वारसदारांना शोधून काढलं. त्यांना आकर्षक वाटेल असा एक प्लॅन बनवला. सगळी योजना आधी घरच्या लोकांना पटवली. मग सगळ्या 88 लोकांना संपर्क करून सर्वाना सोईचे होईल म्हणून मुंबईत एक गेटटूगेदर कम मीटिंग ठरवली.

27 भावंडांपैकी 4भाऊ 2 बहिणी हयात आढळले!! इतक्या वर्षांनी भावंडांची भेट झाली..
सगळ्यांचा आश्चर्याचा भर ओसरल्यावर तेजलने मुद्द्याला हात घातला
"आपलं" घर पडझड होऊन किंवा चोरापोरी जाऊ नये ह्यासाठी आपण ते डागडुजीला काढू...

तेजलला पूर्ण कल्पना होती, तेव्हा पोटासाठी घराकडे पाठ फिरवली, तेव्हा इथे जमिनी विकणं पाप समजत होते, आणि विकल्या तरी विकत घ्यायला काळं कुत्रं फिरकत नव्हतं..
आता जमिनीला सोन्याचा भाव आलाय, पाप-पुण्य बाजूला पडलंय. त्यांची नातवंड-ज्यांना कालपर्यंत माहीतही नव्हतं कि आपलं कुठेतरी घर आहे.. आता बरोबर हिस्सा सांगायला येतील..

अर्थात व्यावहारिक दृष्ट्या तेजलचा आणि इतरांचा त्या घराशी संबंध सारखाच होता.फरक इतकाच, कि तेजलची काहीतरी अगम्य भावनिक गुंतवणूक होती, तिने तो अद्भुत अनुभव त्या घरात जाऊन घेतला होता.. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे इतरांकडे नसलेली एक दृष्टी तेजलकडे होती- ती म्हणजे, आता भले घर विकून कोट्यांमध्ये पैसे मिळतील, पण ते 88 वाटे झाले कि प्रत्येकाला जे मिळतील त्यातून काय दिवे लागणार आहेत? ते घर आहे तसच हेरिटेज सारखं सांभाळायला हवं, मग तिथे जमलंच तर पर्यटनावर पैसे कमावले, नाहीच जमलं, तर एक ऍसेट होईल, इकडे आपलं आत्ता उत्तम चाललं आहेच.. पण ते घर विकलं जाता कामा नाही.

मुद्देसूद, धूर्त, मांडणी करून तेजलने सगळ्यांसमोर आपलं म्हणणं मांडलं. कोणाला पैसे मिळाले तर हवेच होते बाकी कशात इंटरेस्ट नव्हताच. इतक्या वर्षांत नाळ तुटली होती. व्यवस्थित व्यवहार करून तेजलने सगळ्या वाटेकऱ्यांना समाधान वाटेल अश्या रकमा देऊन टायटल क्लियर करून घेतलं. त्यानिमित्त पाणदरीला सगळ्यांचे पाय लागले. तेजलच्या तर अनेक खेपा सुरु झाल्या.
कागदपत्र व्यवहार पूर्ण होऊन, जेव्हा ते घर फक्त सुरेश सदाशिव जोशी इतक्याच नावावर झाले त्यानंतरच्या वर्षात प्रत्येक विकेन्ड सतेज आणि तेजल मुलासह पाणदरीला घालवू लागले.
शुक्रवारी रात्री निघून मुंबई, शनिवारी जनशताब्दीने सकाळी 9ला खेड, पाणदरीचा गाडीवला स्टेशनवर घेऊन त्यांना घेऊन दीड तासात घरी. रविवारी संध्याकाळी जनशताब्दीने मुंबई, सोमवारी सकाळी घरी. भयंकर हेक्टिक होतं,

पण तेजलने सगळं ज्ञान आणि कौशल्य पणाला लाऊन, अफाट कष्ट करून घराची डागडुजी, दुरुस्ती करून  घर गतवैभवाला नेऊन ठेवलं. त्या कामासाठी पल्लवीला तिथेच हवा तसा चॅलेंजिंग जॉब मिळाला!

पल्लवीच्या आजोबांच्या मदतीने तेजल आणि सतेजने गावात अनेक जणांशी ओळखी करून घेतल्या. उत्सव, परंपरा जाणून घेतल्या. चार घरी येणीजाणी सुरु केली.
उपयोगाच्या सगळ्या वस्तू जमवून राहण्यासाठी घर तयार केलं, वीज पुन्हा आणली, फोन, इंटरनेट, स्वयंपाकघराचा अँटिकपणा तसाच ठेवूनही आधुनिक उपकरणं.. सगळं केलं.
वाडीतील माजलेलं रान काढून नवीन लागवडीची तयारी केली. दोन एकर वाडी, त्यात 3 विहिरी, त्या स्वच्छ करून घेतल्या, पंप बसवले. आवारात, आणि घरात पाईपलाईन फिरवून पाणी आणले. गोठयात चार गावठी गायी विकत घेऊन बांधल्या.

आणि एका गुढीपाडव्याला त्या घरात जोरदार लगबग उडाली. सगळे 88 वारसदार आणि त्यांची मुलं-बाळं त्या वास्तूत जमले. सुरेश सदाशिव जोशी आणि त्यांची हयात असलेली अन्य 5 भावंड हे घर बघून गहिवरले. उंच उंच गुढी उभारली गेली. हृद्य कौटुंबिक सोहळा.. रात्री सगळे जण अंगणात गप्पा मारत बसले. तेजलने सगळ्यांना सांगितलं-"सर्वांनी टायटल क्लियर व्हायला सहकार्य केलं म्हणून हे सगळं शक्य झालं.. ह्या घराच्या अडीअडचणी जरी आम्ही निभावणार आहोत, तरी बाबांप्रमाणेच, काका, आत्या तुमचेही बालपण ह्या वास्तूत गेलंय, तेव्हा तुम्ही केव्हाही कधीही इथे राहायला यायचं आहे. आणि आपण सगळ्यांनीच एका तरी सुट्टीत इथे एक गेटटुगेदर करायचं आहे. आपल्या पिढीला जशी मूळ घराबद्दल काहीच माहिती नव्हती, तसं पुढच्या पिढीत व्हायला नको.."
तेजलच्या सासऱ्यांनी तिचं खूप कौतुक केलं, "तुझ्यामुळे आज हा दिवस दिसला, तेव्हा आमच्या वडिलांना नर्मदा बोलावून घेऊन गेली, ते परत कधी आलेच नाहीत, तुला नर्मदेच बोलावून आणल्यासारखी तू बडोद्याहून भरुचला आमच्या घरी आलीस, तिथे तुझे अस्वस्थ प्रश्न मी टाळत आलो, पण शेवटी आमच्या आईने तुला इथे पाणदरीत बोलावून आणलंन, आणि तुही तिची हाक ऐकून धावलीस..
गतवैभव नष्ट झालेलं घर बघायला भीत होतो, पण तू ते घर पूर्वीच्याच दिमाखात आम्हाला दाखवलंस्.. पूर्वीपेक्षा जास्त दिमाखात, कारण आता इथे बाळगोपाळांचे, तुमचे तरुण मंडळींचे वावर आहेत, ते पूर्वी नव्हते.. तुच खरी शान आहेस ह्या घराची, म्हणून ह्या नर्मदामाईने तुला बोलावलं"
स्वतःच कौतुक ऐकून अवघडून तेजल उठून आत गेली, तर तिला तोच चिरपरिचित आवाज ऐकू आला," येते गं पोरी! सुखी रहा, यशस्वी व्हा!"
"नर्मदा आजी!!" चमकून तेजल आवाजाच्या मागून धावली तर रात्रीच्या गडद काळोखात एक धूसर आकृती लांब लांब जाताना तिला दिसली.. बाहेर गप्पा मारत बसलेल्या सगळ्यांमधून फक्त तेजललाच ती नर्मदा आत बोलावत होती, निरोप देण्यासाठी!

No comments:

Post a Comment