04 October, 2016

एका अमावास्येची आठवण..

अमावस्या ह्या शब्दाभोवती भीतीच गूढ आवरण कायम असतच असतं. त्यातून पावसाळ्यात एकंदरच काळोखी वातावरण जास्त, त्यात अमावास्या असेल तर बघायलाच नको. “डोळ्यात बोट घातलं (म्हणजे समोरून येऊन कुणी दुसर्याने आपल्या डोळ्यात) तरी दिसायचं नाही” हा शब्दप्रयोग प्रत्यक्षात अनुभवायची वेळ आत्तापर्यंत जेव्हाजेव्हा आली, त्यापैकी एक गोष्ट.

घटस्थापनेचा दिवस. अजून पावसाळा संपलेला नव्हता. मी काही कामानिमित्त मुंबईला गेलेले, आणि परत येताना माझी आत्या आणि आप्पाकाका (म्हणजे मिस्टरआत्या) आणि मी असे एकत्र मुर्डीला येणार असा बेत होता. आत्याचं नुकतच एक मेजर ऑपरेशन झालेलं, ती विश्रांतीसाठी काही दिवस मुर्डीला येणार होती. दुपारी जेवून वगेरे दोन वाजता आम्ही मुंबईहून निघालो. काकांची काळ्या रंगाची पॅलिओ गाडी, (मॉडेल बंद झाल्यामुळे पार्ट मिळेनासे झालेत असं सगळेजण म्हणायला लागलेले तेव्हा). त्यांच्या ओळखीचा तो चक्रधर म्हणजे एक वस्तूच होती.

गप्पा टप्पा हास्यविनोद असा नेहेमीप्रमाणे मजेत वेळ चालला होता. मुंबई सोडून १७ नंबर हायवे (आता ६६) सुरु झाल्यावरच सगळीकडे हिरवळ (येथे अर्थ शब्दशः गवत) दिसायला लागल्यावर घरी आल्याचा फील यायला सुरुवात होत होती.

संध्याकाळ होता होता लोणेरे फाट्याला वळल्यावर चक्रधर साहेब बराच वेळ गायब झाले, गोरेगाव त्याच गाव असल्यामुळे तो कुणाला तरी भेटायला गेलेला. काळोख पडायला सुरुवात झाली आणि आजोबांचे काळजीग्रस्त होऊन होऊन एकसारखे फोन यायला लागले, आता हायवे सोडून आत वळल्यावर फोन पण नेटवर्कच्या बाहेर जाणार, म्हणून साडेनऊ पर्यंत घरी पोचतो, काळजी नसावी असं त्यांना सांगून ठेवलं, पण असा एका जागी थांबून जाणारा वेळ त्यात गृहीत धरलेला नव्हता. तेव्हा आडगावांमध्ये आत्तासारखा चांगलं नेटवर्क नव्हत. (तेव्हा म्हणजे 5 वर्षापूर्वी)

शेवटी एकदाचे चक्रधर परत आले. तो तेवढयात पिऊन बिऊन नसेल ना आला हि आमच्या आत्याबाईना शंका, आणि तो कोणत्या बाबतीत नग आहे कोणत्या बाबतीत नाही हे पक्कं माहिती असल्याने काका तसे निवांत. मुंबईहून निघाल्यापासुनच काका म्हणत होते, कि कसलातरी आवाज येतोय. पण “काही नाही हो,, चला” असं म्हणून तो विषय सोडून देत होता. आता रहदारी संपल्यावर तो आवाज सगळ्यांनाच जाणवू लागला. “काही काम नाही ना रे निघालाय गाडीच? आता मंडणगड शिवाय काही सोय नाही हो मध्ये.’  असं आत्या त्याला परत परत विचारत्येय आणि तो नाही म्हणतोय हा प्रयोग सारखा चालू.

पाऊस तसा थांबून थांबून पडत होता, पण मध्येच जोरदार सर दणकावून देत होता. नेहेमीचा रस्ता,, आंबेतचा पूल ओलांडून रायगड जिल्हा संपवून रत्नागिरी जिल्ह्यात शिरलो. सामसूम रस्त्यावर आमची गाडी सोडली तर मानवनिर्मित आवाज काहीच नव्हता. वाऱ्याचा, पावसाचा, नद्या पर्ह्ये यांच्या पाण्याचा, आणि परतीचा पाऊस असल्यामुळे मधूनच गडगडण्याचाच काय तो आवाज.

घनदाट झाडी आणि मंडणगडचा घाट संपला तेव्हा साडेआठ वाजत होते, म्हणजे आजोबांना सांगितल्याप्रमाणे साडेनऊला घरी पोचायला काहीच अडचण नव्हती. गाडीचं काम निघालेलं नाही हे १७६० व्यांदा वदवून घेऊन मंडणगड सोडून निघालो आणि कादिवली मार्गे जुन्या वाकडा आंजर्ले रस्त्याला लागलो.
शांत रिकाम्या रस्त्यावरून गाडी चाललेली, गप्पा बंद होऊन गाणी ऐकणे, डुलकी काढणे, इत्यादी आपापली कामे आम्ही तिघे करायला लागलेलो. आता आलोच जवळपास घरी अश्या विचारात रीलॅक्स होत आलेलो, तेवढयात धाब्बक्कन आवाज करून गाडी जागच्या जागी ठप्प आणि तिरकी.

खडबडून काय झाल काय झाल? असं म्हणतोय तेवढयात कळलं कि गाडीचं पुढचं डावीकडच चाक गळून गेलेलं आहे. गळून म्हणजे गडगडत कुठेतरी जाऊन काळोखात नाहीसं झालेलं आहे. एवढा वेळ आम्ही हातीपायी धड जिवंत कसे काय इथपर्यंत आलो ह्याचं आश्चर्य वाटायची वेळ होती. हा प्रकार हायवेला स्पीड मध्ये किंवा घाटात झाला असता तर?

पण सध्या हे सगळे विचार बाजूला ठेऊन आता पुढे काय ते ठरवायला हवं होतं. मिट्ट काळोख आणि पावसामुळे किरर्र झालेलं रान. नेहेमीच्या रस्त्यावर सुद्धा आपण नेमके कुठे आहोत हे कळणार नाही इतका मिट्ट काळोख. कोणाकडेही बॅटरी नाही. त्या काळचे मोबाईल म्हणजे पिवळा किंवा केशरी उजेड पडणारे पेपरवेट. धाब्बक्कन आपटल्यामुळे का काय कोण जाणे गाडीचे दिवे पण लागेनासे झालेले. गाडी रस्त्याच्या मध्यभागी. घड्याळ दाखवत होतं कि अजून मुंबईला जाणारी रातराणी (एष्टी) ह्या रस्त्यांनी जायची आहे. ह्या बंद पडलेल्या गाडीच्या कडेनी एसटी जाणं केवळ अशक्य. त्यातल्या त्यात नशीब एवढच कि पाऊस पडत नव्हता-निदान त्या क्षणी तरी.

शेवटी असं ठरवलं कि आत्या आणि काकानी गाडी जवळच थांबायचं. आत्याच ऑपरेशन झाल्यामुळे आणि काकांना गुडघेदुखी असल्यानी काळोखातून चालणं जमणारं नव्हतं. त्यामुळे मी त्या मनुष्याबरोबर जाऊन कुणाची तरी मदत मिळेपर्यंत चालत राहणे हाच एक पर्याय होता. तोही आत्याला(आणि थोडासा मलापण) रीस्कीच वाटत होता, पण इलाज नव्हता, कारण ह्या रस्त्यावर माझ्या ओळखीची लोकं भेटायची काहीतरी शक्यता होती. तो मनुष्य अशा बाबतीत फालतू नाही असं काकांनी सूचित केल्यामुळे किंचित निर्धास्त होऊन आम्ही चालायला सुरुवात केली.

मोबाईलचा केशरी उजेड अश्या वेळी मिसगाईड कसा करतो त्याचं प्रत्यय आला. त्या उजेडाने डोळे विस्फारून जातात.. आणि आपण रस्ता सोडून भरकटत चालायला लागलो तरी कळेना, झाडांच्या काळपट आकृत्या सुद्धा त्या काळोखात बेमालूम मिसळून गेलेल्या. वातावरण निर्मितीसाठी कोल्ह्यांनी कोल्हेकुई सुरु केलेली. शेवटी तो मोबाईल खिशात टाकला, आणि अंदाजाने चाचपडत चालत राहिलो.

“कोकणातली भुते” जगप्रसिध्द आहेत खरी पण अजून तरी त्यांनी मला दर्शन नाही दिलेले. (टच वूड) त्यामुळे ती एक भीती अजिबातच वाटत नव्हती. कोल्हा किंवा डुक्कर आले तर लांबून दिसेल- म्हणजे चाहूल लागेल.. आणि भ्यायला थोडा तरी वेळ मिळेल, पण जनजनावर पायातच वळवळत आलं तर मात्र ते चावल्यावर मगच कळेल... अशी सगळी बिन उपयोगी मुत्सद्देगिरी मनातल्या मनात करून थोडा जीव रमवला चालता चालता!!

इकडे आत्या आणि काकांची परिस्थिती अशी झालेली, कि गाडीत बसून राहावं तर मागून/पुढून कुणी गाडीवाला सुसाट आला, आणि ती बिनदिव्यांची वळणावर उभी असलेली काळी गाडी दिसली नाही त्याला तर? आणि बाहेर येऊन उभं राहावं, तर काळोख,कोल्हे,रानडुक्कर ह्यांचा धोका, आणि शिवाय आत्या आणि काकांच्या तब्येती.

अर्धा तास चालून झाल्यावर पहिल्यांदा एका पिवळ्या बल्बचा उजेड दिसल्यावर तो (उजेड) माझ्या डोक्यात पण पडला आणि लक्षात आल कि देहेण आलं. मग झपाझप पाय उचलत गावातल्या पहिल्या घरच दार वाजवलं. देहेंण मध्ये राहणारा आमचा एक फॅमिली फ्रेंड संतोषदादा नशिबाने तेव्हा तिथे होता, त्याला सगळा प्रकार सांगितला, मग तो त्याच्या मित्रांना बोलवायला म्हणून गावात गेला, तोपर्यंत ११ वाजत आलेले. तेवढयात रस्त्यावर प्रखर हेडलाईट चा झोत दिसला, म्हटलं आली वाटतं मुंबई गाडी.. आता बसा.. पण बघितलं तर ती गाडी आंजर्ल्याची दरीपपकरांची झायलो होती. तिला हात करून थांबवलं, आणि म्हटलं, “काका कुठे जाताय?”

“तू आत्ता हिते काय करत्येस ते सांग अगोदर”- मग सगळी गोष्ट त्यांना सांगितली, तेवढयात देहेण मित्रमंडळ ब्याटऱ्या काठ्या दोऱ्या घेऊन आलेच, मग सगळेजण गाडीत बसून आत्या आणि काका अडकलेले होते तिथे आलो.  ते दोघं ह्या गाडीतून त्या गाडीत आले. ब्याटरीच्या उजेडात गडगडत गेलेलं चाक शोधून झालं. मग ती पॅलिओ ह्या गाडीला मागून अडकवून कशीबशी देहेण गावात आणून ठेऊन, देहेणकरांना घरी सोडून, त्यांचे पुनःपुन्हा आभार मानले. नेमकी त्यादिवशी मुंबईची रातराणी अगोदरच  पंक्चर झालेली असल्याने तिचा खोळंबा करायचं पाप आमच्या डोस्क्यावर आलं नाही!

रात्री साडे बाराच्या दरम्यान झायलोवाल्या दरीपकरकाकांनी आम्हाला घरी सोडलं तेव्हा आजोबांनी देव पाण्यात बुडवायचेच बाकी ठेवलेले आणि बाबा बाईक काढून आम्हाला शोधायला निघायच्या तयारीतच होते. त्याकाळी ह्या रानातल्या रस्त्यावर मोबाईलवरून संपर्क होण्याचा प्रश्नच नव्हता.

“म्हणून मी नेहेमी सांगतो, वेळीअवेळी प्रवास करू नये. दासबोधात ते मूर्ख लक्षणात सांगितलेलंच आहे ”.. आजोबा

“किती आव आणलास तरी तेव्हा फाटलेली ना पण.. खरं सांग..?”.. बंधुराज

“घर सापडलं वाटत तुला संतोषच?.”.. बाबा.

“हि पोरगी म्हणजे तुझा मोठा पोरगाच हो खरा अनिल.”.. आत्या.

“गप्प बसा आता सगळे. केवढा प्रसंग होता, देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ते असं, देवाला गूळ ठेवा आणि जेवायला बसा आता सगळे!”.. आई.

©ऐश्वर्या विद्या अनिल पेंडसे, @मुर्डी .

No comments:

Post a Comment