05 May, 2018

जीन्स

लहान बाळाला बघितलं की बघणारे नातेवाईक लग्गेच तर्क सुरू करतात.. बाबाकडच्या व आईकडच्या दोघाही बाजूंच्या नातेवाईकांना वाटत असतं की बाळ त्यांच्या त्यांच्या कुटुंबातल्या कुणासारखं तरी दिसतं😂 आजोळच्या लोकांना बाळाचे मामा किंवा मावशी लहानपणी तस्सेच दिसायचे असं वाटतं, तर बाबाकडच्या नातेवाईकांना बाळाला बघून बाळाच्या आत्या किंवा काकाचं बालपण आठवायला लागतं..

प्रत्यक्षात आपण सगळेच आपल्या इतक्या पिढ्यांचे गुणधर्म घेऊन आलेलो असतो की असं एका वाक्यात निष्कर्ष काढणं अगदीच विनोदी आहे..

हे बालपणीचे निष्कर्ष फक्त दिसण्यावरून झाले.. मोठेपणी वागण्यातले गुण दिसायला लागतात, तेव्हापण अशीच लेबले लावली जातात.. की अगदी अमक्याच्या वळणावर गेलाय... वगैरे!

अस्मादिकांच्या बारश्यात आई-बाबा दोघांच्या बाजूचे नातेवाईक जमले असताना.. बाबांकडची एक वयस्कर आजी वारंवार उद्गारू लागली, "अगदी अस्साच गोरा होता आमचा अनिल लहानपणी!!" चारपाच वेळा हे ऐकून घेतल्यावर आईच्या बाजूच्या नातेवाईकांपैकी अशीच एक खमकी आजी म्हणाली, "आग्गोबाई! खरं म्हणता की काय? म्हणजे मग आता मला नातीच्या रंगाची काळजीच वाटायला लागल्ये हो! कारण जावईबापूंच्यात आता कुठे त्या गोरेपणाचा मागमूसही दिसेना! म्हणून म्हणत्ये हो!"😂😂😂 अर्थात गोऱ्या कातडीचं कौतुक तितपतच असल्यामुळे, उन्हात फिरून कामं करून मीही माझ्या बाबांसारखी रापलेल्या रंगाची झाले ह्याचाच मला आता आनंद वाटतो तो भाग वेगळा!

मला जेव्हा सगळेजण म्हणतात की "तू अगदी मालघरच्या(आजोळच्या) आजीसारखी दिसतेस आता.." तेव्हा मला खूप छान वाटतं.. पण त्याचवेळी हे पण जाणवतं की तिच्यासारखं सतत कार्यमग्न राहणं, सहनशील बनणं मला कधीच शक्य नाही होणार कितीही प्रयत्न केले तरीही... गंमत म्हणजे माझा स्वभाव बऱ्यापैकी दांडगट, उर्मट असूनही अत्यन्त सोशिक, सात्विक, सोज्वळ स्वभावाच्या आजीच्या व माझ्या दिसण्यात काहीतरी साम्य नक्की आहे!
असे कित्येक पिढ्यांचे गुणधर्म आपल्यात येत असणार.. फक्त जर दोन्ही व्यक्तींना आपण वारंवार बघितलेले असते त्यांच्यातली साम्यस्थळे आपल्या लक्षात येतात.

जोशी आडनावाचा माझा मुलगा- हा मी आणि अजय, आमचे दोघांचे आई-बाबा, आमचे दोघांचेही दोन्हीकडचे आजी-आजोबा, दोघांचे दोन्हीकडचे पणजी-पणजोबा असे मिळून पेंडसे, साठे,आगाशे, करंदीकर, देवधर, जोशी........ आणि जोशी, वैद्य, पेंडसे, सोमण, घांगुर्डे, दांडेकर... इतक्या आडनावाच्या लोकांचे गुणधर्म घेऊन आला असणार!!! त्यात पुन्हा माझी एक पणजी माहेरची जोशी, आणि अजयची एक पणजी माहेरची पेंडसे! म्हणजे अजूनच गुंतागुंत! आणि ही फक्त ज्ञात आडनावे! ह्यापुर्वीच्या पिढ्यांची आडनावे काय होती कुणास ठाऊक.. तर त्या माणसांना बघण्याचा-ओळखण्याचा प्रश्नच येत नाही..

परवा सहजच माझ्या लक्षात आलं- जन्मल्या क्षणापासून सर्वानुमते सेम माझ्यासारखा दिसणारा माझा मुलगा एका मूडमध्ये माझ्या आत्तेबहिणीच्या मुलासारखा- अजिंक्य गोखलेसारखा दिसला! ह्या दोघांचे पणजी-पणजोबा कॉमन. त्यामुळे एखाद्या लूकमध्ये त्या दोघांच्यात साम्य असू शकते. अर्थात ह्या दोघांना जवळून ओळखणाऱ्यांनाच ते जाणवणार. असेच एखादे साम्य जोश्यांच्या मागच्या पिढीतल्या कुणा व्यक्तिमध्येही आढळेल ते मला माहिती नसणार.

थोडक्यात काय तर आडनाव ही एक सामाजिक सोय आहे फक्त! कधी बऱ्या वाईट दिसण्या-वागण्यावरून अमुक आडनावावर गेलाय/गेलीय हे लेबल अगदी निरर्थकच म्हणायचं.
©ऐश्वर्या पेंडसे-जोशी.