20 December, 2016

जे (सध्या) असाध्य जे सुदूर तेथे मन धावे

कधीकधी आपल्या कल्पनेच्या आसपास सुद्धा नसलेल्या गोष्टी प्रत्यक्षात येतात.. काही वर्षांपूर्वी कुणी सांगितलं असतं कि "असं असं होईल" तर खरं वाटलं नसतं पण आता त्या गोष्टी अगदीच स्वाभाविक वाटायला लागलेल्या असतात... सवयीच्या सुद्धा बनून जातात.. आपण त्या सवयीचे गुलाम बनतो..

वीज हि गोष्ट आपल्या गावात कधी काळी येईल अशी पुसटशी सुद्धा शक्यता, त्यांच्या लहानपणी गृहीत न धरलेले माझे आजोबा- त्यांच्या म्हातारपणी झोपाळ्यावर बसल्या बसल्या,, इंटरनेटवर रमलेल्या आम्हा नातवंडांना, "काय मग?? कोण कोण आहे ऑनलाइन?" असं विचारायला लागले होते...

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आज घडलेली एक गंमत! एक संवाद-

मामा कातकरी: ताई! मी काय बोलतो, तुझी जुनी सायकल तू घेऊन जानार का तिकडे?

मी: कुठली? गियरवाली??

मामा: नाय ती नाय, जुनी लाल कलरची.

मी: हां, ती का?? नाही ती नाही, का पण? कुणाला हव्येय?

मामा: मलाच हवी होती वापरायला.

बाबा: मामा! तुला सायकल चालवायला येते?? कमाल आहे तुझी..

मी: त्यात काय कमाल? आपल्या देशात सायकल हि वस्तू अवतरली त्याला अनेक दशके उलटली आहेत.. आता कुणाला सायकल चालवायला येत नसेल तरच कमाल आहे..

(एव्हाना माझं भाषण सुरु झालेलं बघून मामा कल्टी मारता झालेला होता)

बाबा: हो पण हा कातकरी मनुष्य, सायकल चालवतो म्हणजे बघ..

मी: ह्या!! त्यात काय, मोबाईल नाही का वापरतो तो..
काही वर्षांपूर्वी आपल्याला हे तरी कुठे खरं वाटलं असतं कि, मोबाईल इतके सर्वत्र बोकाळतील, आगराच्या तळात असलेला माणूस घरात फोन करून आईला सांगेल कि, "वैनीनु, पाण्याचा पंप बंद करा"
पण ही गोष्ट आता प्रत्यक्षात अवतरून झालीच कि नाही सवयीची..

बाबा: म्हणत्येस ते बरोबर आहे हो!! आता ह्या नोटांची भानगड झाल्यापासून लोकं कावरेबावरे झालेत किंवा करवादलेत खरे...  हे खरं.. पण हे कॅशलेस कॅशलेस म्हणतात ते असंच होईल हो सर्वदूरवर..
एकतर आत्ताआत्तापर्यंत "नारलावर गवताच्या वरंडी" दिल्या घेतल्या जात होत्या ते जोरात सुरु होईल पुन्हा..

मी: ह्या एवढंच नाही काही, असं सुद्धा चित्र दिसेल लवकरच---

मामी, बाया वगैरे कातकरणी बिया(काजूच्या) घेऊन आंजर्ल्यात विकायला येतात, त्या डोक्यावरची टोपली बामणाच्या अंगणात ठेऊन, बियांचे सौदे- घासाघीस वगैरे साग्रसंगीत करून झालं की मग ठरलेला बियांचा वाटा ताब्यात देतील.. "आठशे रुपये झालेत" असं सांगून लुगड्याच्या ओच्यातून स्मार्टफोन काढून काचेवर बोटं फिरवत पेटीएमवॉलेट किंवा तत्सम अँप उघडतील..

हवं तरी बिया विकत घेणाऱ्या एखाद्या सुशिक्षित पांढरपेशाकडे स्मार्टफोन नसेल (आमचं काहीतरी वेगळंच ह्या प्रकारचा फॅडिस्टपणा😉) आणि कुणी रोख रक्कम देऊ लागेल, तर ह्या स्मार्ट कातकरणी म्हणतील..
"खोतानु नुको त्या नोटा.. मागनं नाईती भानगड.. तुमि ट्रान्सफर करा पैशे"

"अगो माझ्याकडे नाही हो तो काचेचा फोन"

"म् आना त्या बिया द्या..मी दुसऱ्याला देतो!"😂

खरोखर "काहीही घडू शकतं" हीच खरी जगातली सर्वात मोठी गंमत असावी!! आपण फक्त तर्क करायचे...

©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे, मुर्डी.