04 September, 2016

स्वागत मंगलमूर्तीचे !!

गेले 15 दिवस ज्याचे वेध लागलेले होते तो गणपती आज घरी आला. मी अजिबातच धार्मिक प्राणी नाही. देवदेव करणे, उपास, व्रते ह्या भानगडीत पडणे नाही, पण तरीही सगळ्या सणांमध्ये गणपती हा सगळ्यात उच्च जागेवर आहेसा वाटतो.

गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, शिमगा हे सगळे सण येतात आणि बराचसा वेळ अंगणातच असतात. किंवा दिवसातला ठराविक वेळच त्यांचं अस्तित्व आहेसं वाटतं. गणपतीचं तसं नाही. येतो तो थेट घरात, आणि तो घरात असेपर्यंत सतत काहीनाकाही सुरु असतं घरात.. हॅपनिंग अगदी!!

म्हणूनच बाकीच्या सणांना घर स्वच्छतेची एवढी जंगी मोहीम काढवीशी वाटत नाही. पण गणपती म्हणजे घराची अक्षरशः नखशिखांत स्वच्छता. तेवढाच घराच्या प्रत्येक कणाकणाला आपला स्पर्श होतो. वासे,रिफा,कौलं,भालं पुसण्यापासून ते भिंती सारवणे, लाकडी कडीपाट ओल्या फडक्याने पुसणे, सर्वात शेवटी जमिनीवर घट्ट आणि डिझायनर सारवण झालं कि कसं मस्त स्वच्छ वाटतं..

सांदीकोपऱ्यातील कचरा, धूळ, कोळीष्टके निघून जातात त्यांच्याबरोबर जशी काय घरातली आणि मनातली निगेटिव्हीटी निघून जाते बाहेर, एकदम मस्त-स्वच्छ-प्रसन्न-गारगार-मऊमऊ काहीतरी वाटायला लागतं. सहज झोपाळ्यावर बसल्याबसल्या जमिनीचा पावलांना होणारा स्पर्श पण एकदम स्वच्छ शुचिर्भूत वाटतो. सारवलेल्या भिंतीवरून अलगद हात फिरवताना पण नवीन कपड्याना हात लावल्यासारखं फेस्टिव्ह वाटतं... आणि लक्षात येतं, आलेच कि गणपती जवळ!!

आमच्याकडे गणपती बसवायची जागा पक्की ठरलेली- तीच आणि तेवढीच. त्यात फरक नाही. एका बाजूला दार आणि एका बाजूला देवांचा कोनाडा. त्यामुळे जास्त डेकोरेशन करायला वाव नाही. मग आहे त्यात काहीतरी करायचं, पण स्वतः करायचं.. आणि कमीतकमी गोष्टी विकत आणून करायचं..

आमचे दीपक दादा, संजय दादा नेहेमी म्हणतात.. " आमच्या घरून आणू काय लायटीचा तोरण?"
त्यांच्या घराच्या आराशीपुढे आमची अगदीच साधी दिसते, पण आम्हाला तसंच आवडतं! झगझगीत माळा, जिलेटीन पेपरची थर्माकोलची मखरं, भरपूर लायटिंग-- नकोच वाटतं.

अगदी आदल्या दिवशी "आवरणं"- म्हणजे बहुतेक आवराआवरी, स्वछता ह्याचा फिनिशिंग टच म्हणून आवरणं.. असंच असेल!

चला, मोदकांचं पुरण झालं, छत ताणून झालं, कंगण्या-कौंडल आणून झालं, प्रसादाचे वड्या-पेढे करून झाले,कापसाळी झाल्या, नारळ निसून झाले..

प्रभावळ दादुकडे नेऊन ठेव, माजघर सारवून घ्या, ते कापडी वॉल हँगिंग भिंतीवर लावायचाय, मोदकपात्र घासून ठेवायचंय, खोपटीतून लाकडं आणून चुलीजवळ ठेवायच्येत..

अशी झालेल्या आणि करायच्या एकामागून एक कामांची यादी एकेक टिकमार्क करत संपवली जाते..

गणपतीचा आदला दिवस उगवतो आणि इतका भरभर पुढे सरकतो कि संध्याकाळ केव्हा होते तेच कळत नाही. दुपारी 1000 दुर्वा, सगळी पत्री जमवून होते; चहाचा अजून एक राऊंड होतो.. मग सजावटीचा पसारा आवरून लख्ख केर काढून होतो. मग हळदीची पेस्ट करून त्याने पिवळी- सोन्याची बारकी बारकी पावलं- दारापासून घरात उमटवून झाली, दरवाज्यात थोडीशी रांगोळी काढून झाली कि तोपर्यंत येतातच वरच्या आळीतून सगळेजण..

नवीन कपडे घालून चपला न घालता दादुकडे जाऊन पोचलो, कि तिथे नुसता माहोल!! गावातले, आजूबाजूच्या गावातले अनेकजण आपापला गणपती न्यायला जमलेले असतात. ढोलांच्या आणि सनईच्या आवजांची नुसती धांदल उडालेली असते. सगळ्यांचे गणपती प्रभावळीवर बसवून, मातीने फिक्स करून होतात.. श्रद्धापूर्वक पैसे आणि नारळाची देवघेव होते.. प्रत्येकजण आपापला गणपती उचलून हातात घेतात आणि एकच गजर होतो- "मंssगलमूर्ती मोssरया!!"
वाटेने घरी येताना दुसऱ्या कोणत्या वाडीवरचे गणपती नेताना भेटले कि एकमेकांना, "मंगलमूर्ती मोरया" अश्या गजराने साद-प्रतिसाद होतात..
वाजतगाजत मंगलमूर्ती घरी येते. पायावर दूध पाणी घालून, ओवाळून, सोन्याच्या पावलांनी गणपतीबाप्पा घरात येतात... त्याच्या बरोबरच भरपूर एनर्जी, उत्साह, पवित्रपणा, आणि चांगलं म्हणून काय मनाला वाटतं ते घरात येतं..
उत्सव सुरु झालेला असतो!!
"मंगलमूर्ती मोरया!!"

No comments:

Post a Comment