21 November, 2017

जगी या खास वेड्यांचा..

आम्ही कोकणस्थ ब्राह्मण लोक नीटनेटकेपणासाठी प्रसिद्ध आहोत खरं म्हणजे.. पण नीटनेटकेपणा ह्याचा अर्थ असा पण नसतो आमच्यात, कि एखाद्या हायफाय हॉटेलात बसल्यासारखं स्वतःच्या घरात आदबशीरपणे पुतळ्यासारखं बसावं😏

त्यामुळे घर हे घर वाटावं आणि हॉटेल वाटू नये इतपत पसारा घालायची जबाबदारी मी कळायला लागल्यापासून घेत आले आहे.("कळायला" लागलंय का अजूनही हा अनेकांना प्रश्न असेलच,, पण तो असुदे बापडा😜)

त्यातून जे लोक घराबाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करतात त्यांची घरं जरा तरी आवरलेली राहू शकत असावीत बहुतेक, पण आमच्या घरातच व्यवसाय असल्यामुळे अगदी टापटीप घर असणं शक्यच नाही..

आजोबांच्या काळात घरात सुपारीचे गोण, नंतर मग फळप्रक्रिया सुरु झाल्यावर माजघरात पॅकिंग, अर्जंट ऑर्डरी आल्या की तिथेच पार्सले पॅक करणे, पूर्वी घरातच कॅनिंग असायचं तेव्हा घरभर पसरलेले आंबे, असं सगळं बघतच आम्ही मोठे झालो.. नंतर आंबे आणि कॅनिंग हा विषय स्वतंत्र जागेत शिफ्ट झाला, तरी आजी आणि आईचे आंबा वडी, सरबतं, मुरांबे, लोणची ह्यांचे व्यवसाय घरातच चालल्यामुळे तिच परंपरा अजूनही चालूच राहिली..

आणखी एक पसारा आमच्या घरात प्रचंड असतो तो पुस्तकांचा.. आठवणीतल्या कवितांपासून ते मुघल रियासती पर्यँत, आणि दासबोधापासून ते चेतन भगत पर्यँत कोणतीही पुस्तके कुठेही पडलेली सापडतात.. प्रत्येकाच्या आवडी आणि मूडनुसार.. त्यात इंटरनेट असूनसुद्धा, पेपरवाल्याला वाईट वाटू नये म्हणून पेपर घेण्याची आमच्या बाबांना कोण हौस!! म्हणून तो एक पसारा घरातले दोन्ही झोपाळे व्यापून बसलेला असतो.. पण तो कागदी पसारा इतका स्पेशल आहे कि आमच्या मातोश्रीनी तेव्हा आमच्या पिताश्रीच्या स्थळाला खेडेगावात असून सुद्धा होकार देताना- "एवढी पुस्तकं घरात आहेत म्हणजे लोक बरे असावेत विचारांनी" असा विचार केला होता😍

पण तरीही तेव्हा सुद्धा घरी कुणी येणार असेल तर आई आवर्जून पसारा आवरायची खबरदारी घेणार म्हणजे घेणार! अस्मादिक ह्या बाबतीत जरा मागे पडल्यामुळे मग ह्या चिंटूसारखे प्रेमळ सुखसंवाद आमच्याकडेही सुरु झाले!

मुळात वस्तू आवरून ठेवल्या कि त्या झटकन हाताशी येत नाहीत, उलट पसरलेल्या असल्या कि एका दृष्टीक्षेपात पटकन सापडतात- हा एक माझ्या आवडीचा सिद्धांत! भरीला कॉलेजनिमित्त हॉस्टेलवर सात वर्षे राहून राहून मी पसारा घालणे ह्या विषयात सुद्धा एक डिग्री मिळवून आणली😜😜😜

घरी परत आल्यावर घरातच अजून एक व्यवसाय- एम्ब्रॉयडरी, पेंटिंग, बॅगा बनवणे- सुरु केला आणि मग रंगीबेरंगी कापडे, चिंध्या, दोरे, रंग, ब्रश, अश्या पसाऱ्याने घर भरून गेलं! बरं आमचे कामाचे तास हे 24 तासातले कोणतेही असल्यामुळे- काम बंद केल्यावर पसारा आवरणे हा विषयच नाही.. मुडवर आधारित- म्हणजे रात्री 3 वाजेस्तो सुद्धा काम केल्यावर मग आवराआवर करायची तरी केव्हा??

एकेकदा तर घरातल्या सगळ्या खुर्च्यांवर निळ्या रंगाचा अगडबंब थैल्या विराजमान झालेल्या असत.. एकदा बाबा चिडून म्हणाले- "आता कुणी आलं आपल्याकडे तर तुझ्या त्या निळ्या थैल्यांवर बसायला सांगतो! तिथेच चहापाणी द्या लोकांना!"

आणि एकदा खरोखरच एक काका आला तेव्हा बसायला सुद्धा जागा नव्हती. शिवणमशीनच्या जवळ असलेलं माझं बसायचं स्टूल रिकामं होतं चक्क.. त्याच्यावर तो कसाबसा बसला आणि मशीनवरून खाली घरंगळलेला बेल्ट(बॅगांना लावायचा बेल्ट) गुंडाळत गुंडाळत गप्पा मारायला लागला..

हे चित्र बघून हताशपणे का कौतुकाने कुणास ठाऊक.. आई म्हणाली-"माझे उपाय थकले हो आता पसारा आवरायचे.. माझ्या आवाक्यात होतं तोपर्यंत मी घर आवरायचा प्रयत्न करत होते.. आता ही मुलं कर्तबगार झाल्यावर सगळं हाताबाहेर गेलंय माझ्या!"

ह्याच्यावर मात्र त्या काकासकट सगळे गडगडाटी हसत सुटले..

आता माझ्याबरोबरच सगळा पसारा पण मशीनसकट सासरी आलाय😂 पण बहुतेक पसारा कमी झाल्यावर करमत नाही घरी कुणाला..(कुणी कबूल नाही करणार कदाचित😜) कारण आईचा मधूनच मेसेज येतो, "स्क्रॅप कापडं साठली असतील, तर येशील तेव्हा घेऊन ये.. माझ्या पॅचवर्कची (त्याला आम्ही 'चिंध्याजोड प्रकल्प' असं नाव दिलंय. त्यातून आई एकाहून एक डिझाईनं बनवून काय काय मस्त मस्त गोष्टी बनवते) कापडं संपत आलीयत😍😍😍

©ऐश्वर्या पेंडसे-जोशी

17 September, 2017

तुझा साबण स्लो आहे का

काही ठराविक वेळी ठराविक प्रसंग आपोआप आठवतातच.. जसे फेसबुकवर काही वर्षांपूर्वी आजच्या तारखेला आपण काय काय पोस्ट केलं हे मेमरी मध्ये दाखवतात, तश्या आपल्या काही मेमऱ्या कुठल्याही अँपशिवाय आपोआप त्या त्या दिवशी आठवतात.. अशीच एक मेमरी, बहुतेक 5-6 वर्षांपूर्वी---

मी घरात निवांत काहीतरी करत, कॉम्प्युटरच्या समोर बसून टाईमपास करत होते.. दुपारच्या जेवायची वेळ होत आली होती.. आईची पण सगळी कामं आटपून ती पण वाचन वगैरे करत असणार.. आता बाबा आले की जेवायला बसायचं.. म्हणून आम्ही बाबांची वाट बघत होतो..

नेहेमीप्रमाणे बारा वाजायच्या दरम्यान बाबा काम संपवून जेवायला घरी आले, त्यांच्या बरोबर त्यांचा एक मित्र होता.. म्हणजे आंजर्ल्याचाच एक मनुष्य.. बाबांच्याच वयाचा असेल, अगदी रोजच्या भेटण्यातला, पिढ्यानपिढ्या ओळखीच्या असलेल्या कुटुंबातला माणूस..

बाबा आणि तो काका दोघे आले, जरा इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा, किंवा वाटेत येताना त्यांचा जो काय विषय सुरु असेल ते बोलणं वगैरे झालं, मग तो म्हणाला की,"चल, निघतो मी"

त्यावर बाबा: "बस रे, चहा घेऊ घोटभर" (आमच्याकडे दिवसाच्या कुठल्याही वेळेला लोक चहा पितात, ते एक जाऊदेच😂)

तो काका: छे रे बाबा!! जेवायची वेळ झाली,, आता काही नको, वेळेवर जेवायला घरी पोचायला हवं.. आजी आजोबा वाट बघत असतील"

बाबा: हो हो, बरोबर आहे, बराय मग!

तो काका बाहेर पडून गेला, आम्ही जेवायला बसलो, आणि माझ्या डोक्यात भयंकर वेगाने विचारचक्र फिरायला लागली..

हा माणूस पन्नाशी उलटून गेलेला आहे, त्याचे आईवडील ऐशीच्या पुढे वयाचे आहेत, आणि ह्याचे आजी आजोबा जेवायला वाट बघतायत म्हणतो हा.. हे कोण आजी आजोबा आहेत ते आपल्याला इतक्या दिवसात कधीच कसे दिसले नाहीत??? आणि दुसरीकडे कुठे असतील तर मग त्यांचं वय तरी किती असेल😥😲🙆

विचार करून करून डोस्कं दमलं.. न राहवून बाबांना विचारलं की, "बाबा ह्या काकाच्या आजीआजोबांचं वय तरी काय असेल? नक्कीच 110 वर्षाच्या वर असणार"

बाबा तर माझ्याकडे असे विचित्रपणे बघायला लागले की मी अजूनच बुचकळ्यात...

मग एकदाचं शिरलं डोक्यात.. कि त्यादिवशी सर्वपित्री अमावस्या होती..साधारण कोणत्याही विशेष दिवशी, सणाला(हा सण नव्हे म्हणा!) सगळ्यांनी वेळेवर आणि एकत्र जेवावं हा साधारण संकेत..

ह्या दिवशी पूर्वज जेवायला येतात, असं म्हटलं जातं म्हणून तो गृहस्थ म्हणत होता की, "आजी आजोबा वाट बघत असतील!"

"आवरा!!" म्हणत अक्षरशः डोक्याला हात लावला मी फक्त😂😂😂

आणि ,"तुझा साबण स्लो आहे का?" अश्या नजरेनी घरातले सगळे माझ्याकडे बघायला लागले!

©ऐश्वर्या पेंडसे जोशी @मुर्डी/ @पंचनदी

28 August, 2017

जसे लोक तसे त्यांचे देव!

सालाबादप्रमाणे गणपती आले आणि परतले सुद्धा! तयारी करतानाचा, आगमनाचा उत्साह आनंद आणि उत्तरपूजेपासून जाणवणारी हुरहूर, वाईट वाटणे, घश्यात दुखणे- हा माझ्याप्रमाणेच बऱ्याच जणांचा- बहुतेक सगळ्यांचाच अनुभव असणार..

सगळे देव सारखेच हे खरं असलं तरी गणपती हा जास्त आवडता, जास्त लोकप्रिय जास्त जवळचा, जास्त फ़्रेंडली वाटतो.. माय फ्रेंड गणेशा😃..

प्रत्येक घरच्या पद्धती थोड्याफार वेगवेगळ्या असतात, त्यात कडकपणा आणि लवचिकपणा हाही घरसापेक्ष बदलतो, पण गणपती ह्या देवाची भीती वाटल्याचे कधीच कुणाकडून ऐकलेलं नाही! आपण करू ते आदरातिथ्य तो गोड मानून घेणारच अशी ठाम खात्री आपल्या मनात असते.. आवर्तने 21 सलग नाही जमली,  11च केली, तर "इट्स ओक्के!" असंच म्हणत असणार तो!

गणपतीच्या म्हणून गोष्टी कहाण्या वगैरे ऐकून वाचून माहिती असतात, त्या शब्दशः अर्थाने घ्यायच्या नसतात, लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात, तरीपण त्यात चांगलं काही करणाऱ्याला तो आशीर्वाद देतो, कुणाच्या तरी रुपात येऊन सहकार्य करतो, यथाशक्ती यथामती केलेली सेवा गोड मानून घेतो- असंच दाखवलं गेलंय. कधी कुणाला शाप वगैरे देताना ऐकलेला नाही मी तरी...

गणपती कुठल्याही लूकमध्ये असला तरी आपल्याला मान्य होतो, आता आमच्या इथल्या पाजेत डिस्को नाचणारा, जीप चालवणारा वगैरे अवतारात गणपती दिसतो, ते जरासं खटकतं मनाला एखादवेळेस, पण तबला वाजवताना, बोरू घेऊन लिहिताना, कॉम्प्युटर वापरताना असा गणपती आपल्याला आवडतोच!

त्याचे डोळे-- कधीच रागावलेले, कोपिष्ट वाटत नाहीत. कायम हसरे, प्रसन्न, आश्वासक भाव ओसंडत असलेले दिसतात.. खऱ्या अर्थाने तो आपला मित्र, जवळचा कुणी नातेवाईक वाटतो!!!

**********************************

हे सगळं लिहिलं ते बहुतेक सगळ्यांना पटावं.. पण पुढे माझ्या मनात येणारे प्रश्न कुणाला खटकणारे वाटू शकतील..

सहसा सगळ्या देव्या- महिला देवता रागीट कोपिष्ट का? त्यांना आपण आई, माता अशी संबोधने देतो, पण आई जशी मैत्रीण असते तश्या देवता मैत्रीण वाटत नाहीत.

काहींचे रागावलेले डोळे तर काहींचे कमालीचे कडक प्रोटोकॉल..जमेल तसं करावं हि सवलत अभावानेच.. उलट झेपत असेल तरच जबाबदारी घ्यावी हा दृष्टिकोन जास्त.. विशेषतः नवरात्रातली महालक्ष्मी, बोडण ह्या कार्यक्रमात तर भयंकर दहशत पसरलेली दिसते. त्यात निखळ आनंद कमीच दिसतो..

सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या देवता माणसांच्या(बहुतेक वेळा बायकांच्याच- त्यांना झाड म्हणतात.. का ते कोण जाणे!) "अंगात येतात..(?) व्यक्तिशः माझा ह्या कल्पनेवर विश्वास नाही.. पण तरी ज्यांचा असेल त्यांच्या मतानुसार जरी काही अज्ञात शक्ती त्या व्यक्तीच्या अंगात शिरत असेल तरी त्याचा सामान्य उपस्थित लोकांना धसका वाटेल असा तिथला माहोल कशासाठी??

काही ठिकाणी तर हे प्रकार इतके जास्त चाललेले दिसतात कि तिथे प्रसन्न वगैरे वाटण्याऐवजी कधी एकदा तिथून बाहेर पडतो आणि आपल्या घरी जातो असं होऊन जातं.

उदा. 5-6 बायकांच्या अंगात महालक्ष्मी आली आणि एखादीच्या अंगात दुसरा कुणी देव आला तर त्या बायका चक्क भांडतात! कि आमच्या टेरीटरीमध्ये वेगळा देव आलाच कसा!! मग सगळे देव एकच हि संकल्पना काय झाली आता???

काही वेळेला एरव्ही ज्या बायका(झाड) त्यांना खटकणाऱ्या गोष्टी उघड बोलू शकत नाहीत त्या गोष्टी ह्या निमित्ताने बोलून घेताना दिसतात.. पण मग ह्या प्रकारात सामान्य(माझ्यासारख्या अतिसामान्य म्हणा हवं तर) लोकांना ते वातावरण प्रसन्न वाटत नाही.

इयत्ता तिसरीत असताना हे प्रकार बघून जी घाबरगुंडी उडाली कि मी अश्या ठिकाणी जाणं जे बंद केलं ते केलं.. पुढे कित्येक वर्षांनी आमच्या गावात भिड्यांच्या घरी हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा एकदा भीतभीत तिथे हजेरी लावली तेव्हा इतक्या वर्षात वातावरण बरंच निवळल्याचं लक्षात आलं, आणि भीतीही वाटली नाही त्या 'झाडांची'.. पण अजूनही अनेक ठिकाणी हे भयचकित प्रकार चालतात मात्र..

गोष्टी आणि कहाण्यांमधून पण देवता ह्या रागीट कोपिष्टच दाखवल्या गेल्यायत. जे जमेल ते करा आणि तुमचं सगळं चांगलंच होईल असं कधी दिसत नाही त्यात.. अमुक अमुक असं असं करावं-- म्हणून हे एवढे प्रोटोकॉल.. आणि ते अर्धवट सोडलंत तर काय होईल म्हणून एखादा शाप सदृश्य परिच्छेद असतोच त्या कहाणीत.

हरताळीकांची ती कहाणी तर ऐकवत नाही अक्षरशः ... म्हणजे गोष्ट आहे ती ओके आहे, पण मग बायकांनी ह्या दिवशी जर काही खाल्ले तर-- असं म्हणून जी शापांची यादी आहे-- ती काय म्हणावी... आजच्या काळात नव्हे कोणत्याच काळात हे वाईट होईल म्हणून धमकी हे कसं बरोबर ठरेल??

कहर म्हणजे हे हरताळीका कहाणी भक्तिभावाने वाचणारेच लोक.. हल्लीच्या मुली कश्या अति अपेक्षा ठेवतात म्हणून शंख करत असतात.. ते असोच.. तो एक वेगळाच मुद्दा😂

बाकी राक्षस नष्ट करणाऱ्या देवतांबद्दल सवालच नाही, त्या आजच्या काळातसुद्धा आदर्शच आहेत आपल्यासाठी, आणि त्यांचे रागीट डोळे आणि उग्र मुद्रा ह्या त्यांच्या कार्यक्षेत्राला अगदी साजेश्या आहेत.. आजच्या काळात राक्षस भेटले कधी, तर आपण तसे वागायला शिकायलाच पाहिजे!!
--^--

त्यामानाने गणपतीनंतर येणाऱ्या गौरी अगदी मैत्रिणी वाटतात.. अर्थात त्याही आमच्याकडे खड्यांच्या असतात आणि त्यांचे प्रोटोकॉल चुकले, लवचिक झाले तरी त्या चिडतील अशी भीती घातली जात नाही म्हणून!!आणि त्याही कुणाच्या अंगात शिरून आपल्याला घाबरवत नाहीत म्हणून!!

मजेमजेत त्याना विहिरीवरून आणायचं, सगळं घर फिरवून दाखवायचं- हे आमचं स्वयंपाकघर बघा, हि पडवी बघा, माजघर बघा, अगदी हि कॅनिंगची बिल्डिंग बघा- असं पण!! मज्जा अगदी!! खरोखर दोन दिवस कुणी बहिणी मैत्रिणी राहायला याव्या तसा सहजभाव!! भीती वगैरे तर नाहीच नाही..

गंमत म्हणजे गौरींना मुलींचं माहेरी महत्व, आणि बाकी त्या महालक्ष्मी, हरताळीका, मंगळागौरी(हि सुद्धा कुणाकुणाच्या अंगात शिरते म्हणे!) ह्या लग्नानंतरच्या गोष्टी.. म्हणून त्या गौरी फ्रेंडली आणि बाकीच्या कडक कि काय???

नाहीतरी
अस्स सासर द्वाड बाई कोंडुनी मारीतं
अस्स माहेर गोड बाई खायाला मिळतं
असली काहीतरी चमत्कारिक गाणी बनवून आणि म्हणून पिढ्यानपिढ्या पूर्वग्रहाने ग्रासल्या गेल्याच कित्येक वर्षं, आणि तेच पूर्वग्रह खरे करून वागल्या सुद्धा....

आता तसा काळ राहिलेला नाही तेव्हा सगळ्याच देव्या मैत्रिणी वाटाव्या म्हणून काहीतरी हलकेफुलके प्रोटोकॉल बनवायला हवे आणि धमकीवाल्या काहाण्यांना रद्द करून काहीतरी काळाबरोबर चालणाऱ्या बोधप्रद कहाण्या रचायला हव्या.. नाहीतर मग ह्यातलं काहीच नको असं म्हणायची वेळ येईल लवकरच..

©ऐश्वर्या पेंडसे जोशी. @मुर्डी/ @पंचनदी

25 July, 2017

कासव

अण्णा गोगटे नावाचा माणूस निवडणुकीला उभा राहून वारंवार 'पडतो'--- म्हणून पोहोरा विहिरीत 'पडला' तरी "पोहोऱ्याचा अण्णु झाला काय रे" असं म्हणणाऱ्या अंतू बरव्याच्या जिल्ह्यातले असल्यामुळे, असले शब्दप्रयोग तयार करणे आणि वापरणे हे आमचे कर्तव्य आहेच आहे!!!

नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागत होती, कुयरीची भाजी खुपवेळा खाऊन झाली पण पिक्क्या फणसाना अजून अवकाश होता. अश्या वेळी मिळालेल्या एकुलत्या एका पहिल्या फणसाची पण अपूर्वाई असते. बरं एकच फणस- तो सगळ्या दुनियेला वाटण्याइतका नव्हता. एका काकूने लाडक्या पुतण्याला आवडतात म्हणून थोडे गरे केळीच्या पानात गुंडाळून त्याला घरी न्यायला दिले.
"अरे व्वा! फणस! झाला पण एवढ्यात?? वा वा वा! पण आता एक कापडी पिशवी पण दे, कारण रस्त्याने येणारे जाणारे उगीच विचारत बसतील कि ह्यात काय आहे म्हणून"

(आपल्याकडे दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसायची हौस अतोनात) असो!

ती काकू पिशवी आणायला घरात वळते, तोच पुतण्या म्हणतो- "नको नाहीतर, नेतो असेच.. कुणी विचारलंच कि " काय आहे रे ते हातात तुझ्या?"  तर मग मी "कासव" असं उत्तर देईन.
बुचकळ्यात पडलेला समोरचा माणूस त्यातून बाहेर येईस्तो मी पुढे सरकलेलो असेन"

थोडक्यात काय तर जेव्हा भोचक प्रश्नावर उत्तर शोधत बसायच्या ऐवजी "तुला काय करायचंय??" हा प्रतिप्रश्न विचारायचा मोह होतो पण तसं करता येत नसल्याने असंबद्ध किंवा थातुरमातुर उत्तर देणे- ह्या प्रकाराला "कासव" असं नाव पाडून आम्ही मोकळे झालेलो आहोत.

असेच काही मजेशीर कासव प्रश्न आणि उत्तरे! प्रत्येक उत्तराच्या पुढे "तुला काय करायचंय" हे ध्रुवपद😉
"घरात तीन तीन बायका तुम्ही, तुळशीला पाणी कोण घालता मग?"
"ड्रीप बसवलंय"🌱

"एवढी जोरात मशीन चालवतेस्, मग ब्लाउजं तरी शिवायची ना?"
"शहरातल्या सारखे ₹450 + शिलाई देणार का, लगेच सुरु करते"

"तुला गाडी येते तरी सायकल का घेतली?"
"पेट्रोल परवडत नाही म्हणून!"

"शिकलेली असून जॉब का नाही करत?"
"माझ्या मदतीला एक मुलगी जॉब(😂) करते ना, तिचा जॉब जाऊ नये म्हणून"

"चालत कुठे फिरवतोस बायकोला? गाडी तरी काढायची?
(मुळात व्यायाम म्हणून चालण्यासाठी/धावण्यासाठी बाहेर पडल्यावर हा प्रश्न! त्यातून 'फिरवतोस' म्हणजे अगदी कुत्रा फिरवल्याचाच फील येतो😏)
"तिचा विश्वास नाही माझ्या ड्रायव्हिंगवर😂"

"नाव काय ठेवलस बायकोचं?"
(😠🙆 1857 साली लग्न झालेल्या बालिकावधूच्या काळातच अजून)
"नाही, तिनेच नाव बदललंय माझं"

"भावंड किती तुम्ही?"
"मी आणि एक भाऊ"
"बास? दोघेच?"
"नाही, अजून आहेत 8-10, जत्रेत हरवलेत लहानपणीच"

"सासूबाईंना काकू कसलं म्हणायचं ते?"
"काका कसं म्हणणार ना बाईमाणसाला?"

"एवढी शिकलेली मुलं तुम्ही, वेळ कसा जातो तुमचा खेडेगावात?
"गोट्या खेळतो रस्त्यावर!"

हि पोस्ट वाचून माझे बाबा नक्कीच म्हणणार नहेमीप्रमाणे-
"तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेता? त्यांना हेच प्रश्न पडतात. नवीन राष्ट्रपती कोण झाले ह्यापेक्षा तुम्ही घरात काय करता ह्यातच त्यांना इंटरेस्ट आहे!!"

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

29 June, 2017

वाघ्या

आत्तापर्यंत मला माहिती होता तो शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा. पण इथे जोश्यांच्या कुत्र्याचे नाव पण वाघ्याच आहे.

मुळात मला कुत्रे मांजरे आणि सगळ्याच फरयुक्त प्राण्यांची, वस्तूंची किळस येते. त्यातुन कुत्र्यांबद्दल मला विशेष भीतीयुक्त तिरस्कार आहे, कारण आमच्या लक्ष्मीआजीला कुत्र्याने हल्ला करून अक्षरशः पाय फाडून रक्तबंबाळ केलेले मी डोळ्यासमोर बघितले आहे.

लग्नासाठी स्थळे शोधण्याच्या मोहिमेत काही ठिकाणी - "घरात सर्वत्र वावरणारा व फाजील लाडावलेला कुत्रा असणे" हे माझ्यासाठी नकाराचे सबळ आणि एकमेव कारण ठरू शकलेले होते. "तो काही करत नाही" हे एक हास्यास्पद विधान कुत्राप्रेमी लोक करत असतात. मुळात माझ्या दृष्टीने फक्त गाय, म्हैस, बैल, रेडा हेच प्राणी पाळायच्या योग्यतेचे आहेत, असो!

तर, इथे लग्नाच्या वाटाघाटी प्रगतीपथावर असताना, एक पुढचा टप्पा म्हणून आम्ही अजयचे घर बघायला आलो, तेव्हाच घरातल्या लोकांच्या बोलण्यातून मला ह्या वाघ्याचा उल्लेख ऐकायला आला होता. बहुतेक माझं तोंड अगदीच प्रेक्षणीय झालं असणार तेव्हा😜.. कारण घराच्या आवारात त्या वाघ्याची टेरीटरी कुठून कुठपर्यंत आहे ते लगेचच सगळ्यांनी समजावून सांगितलं मला😃 त्यात तो घरातल्या खोल्यांमध्ये तर नाहीच पण समोर अंगणात सुद्धा येत नाही, फक्त रस्त्यावर आणि बाकी आवारात म्हणजे आगरात, कलमांच्या बागेत वगैरे फिरत असतो अशी माहिती मिळाली. म्हणून मग 'हो' म्हणायचा विचार पुढे सरकू शकला😅 पुढे लग्न ठरून जाहीर झाल्यावर अमृताने अजयला सावध करून ठेवलं- "कुत्र्याची काळजी घे रे! हि घरच्या कुत्र्याला पण दगड मारू शकते"

लग्न झाल्यावर प्रत्यक्ष इथे राहायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की ह्या वाघ्याचा आपल्या दैनंदिन जगण्यात फारसा हस्तक्षेप नाही. किंवा त्याला पण कळलं असेल- की ही नवीन आलेली पोरगी आता इथेच राहणार बहुतेक कायम- म्हणून तो पण माझ्याकडे दुर्लक्ष करायला शिकला.. नाही म्हणायला संध्याकाळी आम्ही चालायला निघालो कि हा वाघ्या मागून चालत यायचा, आणि मग माझं सगळं लक्ष तो आपल्याला काही करणार नाही ना इकडेच.. पण आम्ही जसे चालण्याचे अंतर वाढवत खूपच लांबवर जायला लागलो तसा तो हळूहळू बरोबर यायचा बंद झाला.

परवा सकाळची गोष्ट- तुळशीअंगणाच्या पलीकडे शेजाऱ्यांच्या आवारात विचित्र असे धापा टाकल्यासारखे आवाज येऊ लागले म्हणून बघितलं, तर प्रचंड आकाराचं काळ्या तोंडाचं वांदर जिवाच्या आकांताने धावत धावत वेगाने आगराच्या दिशेने पळून गेलं,, आणि पाठोपाठ वाघ्याचं धूड इथे दाखल झालं. काय चाललंय ते मेंदूत शिरेपर्यंत काही सेकंद गेले आणि मग लक्षात आलं, कि तिथे अजून एक तसाच वांदर आहे, त्याला वाघ्याने धरलाय!

पूर्ण ताकदीनिशी वाघ्या त्या वांदराचा जीव घ्यायचा प्रयत्न करत होता , वांदर सुटकेसाठी धडपडत आणि आम्ही श्वास रोखून बघत राहिलेलो फक्त.. सुमारे अर्धा ते पाऊण मिनिट हि झटपट चालली. मग वांदर सटाक्कन निसटून सुसाट वेगाने धावत जाऊन पत्र्यावर उडी मारून पसार झाला.

वाघ्याच्या जबड्याला वांदराने जोरदार जखम करून ठेवलेली.. आता काय? ह्या विचाराने आम्ही भानावर यायच्या आत थरारनाट्याचा पुढचा अंक सुरु झाला-

ह्या वाघ्याच्या दोघी मैत्रिणी आहेत. त्या आशाळभूत हावभाव करत धावत धावत शेपटी हलवत तिथे आल्या. त्यांना वाटलं होतं की एव्हाना शिकार यशस्वी झाली असेल, आता मस्त ताव मारू... वेळेवर मदतीला तर आल्या नाहीत टवळया, जर तिघे मिळून तुटून पडले असते तर वांदर नक्कीच पळत नव्हता, पण तेव्हा ह्या आल्या नाहीत दोघी!!

वाघ्या भयंकर हताश होऊन उभा, अगदी परवाच तो हार्दिक पांड्या कसा फुक्कट रनौट झाला तर जाडेजाकडे बघून दात विचकत होता सेम तसंच झालेलं वाघ्याचं.. असा काय संतापला कि त्या दोघींवर हल्ला करत त्याने थेट रस्त्यापर्यंत धाव घेतली.. सगळं लाचांड रस्त्यावर पोचलं आणि केकटत केकटत केवढा तरी किचाट झाला..

काका म्हणाले- आता वय झालंय त्याचं, आणला तेव्हा 4 महिन्याचं पिल्लू होतं, आता तो 10 वर्षाचा झालाय.. नाहीतर हातात गावलेला वांदर कधी सुटत नसे त्याच्या. पण अजून हिंमत कायम आहे.. पूर्वी त्याचा अधूनमधून हा कार्यक्रम असायचाच.. वांदर मारून खायचा, मग नदीत डुबक्या मारून यायचं आणि स्वस्थ पडून राहायचं..नो जेवणखाण.. कडक लंघन, फक्त ताक प्यायचा 3-4 दिवस बास!!

"ऐकावं ते नवल" असे बावळट हावभाव घेऊन घालवला मी अख्खा दिवस😂😂😂

©ऐश्वर्या पेंडसे जोशी