01 February, 2020

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच एका देवळात जाऊन आलो. देऊळ म्हटलं की चकचकीत किंवा बकाल आवार, भाविकांची गर्दी, पूजा साहित्याची दुकाने, प्रसाद-अभिषेक वगैरेंच्या पावत्या, तासन्तास रांगेत उभे राहिलेले भाविक(?) हा असा सगळा माहोल उभा राहतो- तो मला आणि सुदैवाने अजयला सुद्धा नको वाटतो.

पंचनदीच्या जवळच असलेल्या दुमदेव नावाच्या गावात एक गणपतीचं देऊळ आहे. माघातील पहिल्या चतुर्थीला तिथला छोटासा उत्सव. आमचं लग्न झालं त्यानंतर तीनच दिवसांनी हा उत्सव होता, पण तेव्हा घरात पाहुणे पूजा वगैरे असल्यामुळे गेलो नव्हतो. नंतर मग दरवर्षी अजय तिथे आवर्तने करायला जातो. पण माझी वेळ आली नव्हती देवळात जाण्याची. म्हणून मग यंदा लग्नाच्या वाढदिवशी दुमदेव गणपतीला जाण्याचं ठरवलं. तसंही दोघांचीही व्यवसायिक कामं आणि तोंडावर आलेलं दिराचं लग्न यामुळे फिरायला जाण्यासाठी जेमतेम 2-3 तासांचा वेळ हातात होता मोकळा.

मुळात गावच मुख्य रस्ता सोडून आड बाजूला. गावात काही बंद असलेली किंवा काही मोजकी माणसे राहत असलेली घरं आहेत. घरं संपली की गर्द रानातून उतरत जाणारी पाखाडी आणि पाखाडी संपली की छोटंसं कौलारू देऊळ. देवळाच्या गाभाऱ्यात मिट्ट काळोखच होता त्यामुळे गणपती काही दिसला नाही स्पष्ट, पण तिथे असलेली गर्द झाडी, खालच्या बाजूला नदीपर्यंत पसरलेले आगर आणि निरव शांतता ह्यातच खरा देव भेटल्यासारखा वाटला.

परतीच्या वाटेवर एका भग्न घराकडे लक्ष वेधलं गेलं. ऐकीव माहितीनुसार हे त्या गावातील एकमेव ब्राह्मणाचे घर असावे. भिंती, दरवाजे पडझडीला लागलेल्या अवस्थेत, पण त्यामुळे घराच्या आतील रचना स्पष्ट दिसू शकत होती. लाकडी गज, माजघरातून वर जाणारा जिना, मागच्या-पुढच्या पडव्या, कौलारू छप्पर...
अशी घरं बघितलं की नेहेमीच पोटात काहीतरी ढवळून निघतं. कोणे एके काळी हेच घर कदाचित नांदतं जागतं असेल, झोपाळ्यावर ओव्या, अंगाई, पाढे म्हटले जात असतील.. गणपतीत आरत्यानी माजघर दुमदुमत असेल, दारात शिमग्याची पालखी बसत असेल. लग्नकार्ये, बाळंतपणे झाली असतील... 
जर शाळेतल्या निबंधासारखं निर्जीव वास्तूंना मन असेल, तर आपल्याला बघून त्या घराला त्यांच्या मुला-लेकरांची आठवण येत असेल...असा विचार नेहेमी मनात चमकून जातो..परंतु आपण गलबलतोय तेवढे त्या घराचे मालक घराबद्दल विचार तरी करत असतील की नाही कोण जाणे... 
त्यामुळे हे विचार झटकून टाकायचे आणि आपण आपल्या पूर्वजांनी जुनी घरं जतन करता येतील इतकंच बघायचं, बास! 

परतीच्या प्रवासात तिथे भेटलेला देव तेवढा मनात धरून मुख्य रस्त्याला लागलो!
©ऐश्वर्या पेंडसे जोशी