27 September, 2019

वाघ

कधी कधी आपल्या हातून इतक्या विनोदी घटना घडतात की स्वतःच्या फजितीवर राहून राहून हसू येत राहतं! आणि ह्या घडामोडीला कुणी साक्षीदार असेल तर बघायलाच नको🤦

इकडे आमच्या परिसरात वर्षातल्या ठराविक काळात बिबट्याचा संचार असतो.  हा पट्टेरी वाघ नसतोच, पण त्याला इमानदारीत त्याच्या "बिबट्या" ह्या खऱ्या नावाने न संबोधता बहुतेक लोक त्याला वाघ म्हणतात😁 तर गोष्टींच्या सोयीसाठी आपण पण त्याला वाघ म्हणू!

मुर्डी-आंजर्ले-सुकोंडी परिसरात देवदिवाळीच्या दरम्यान कुणी ना कुणी सांगतोच की- अमुक ठिकाणी वाघ बघितला. इथे पंचनदी परिसरात पितृपक्ष- नवरात्र ह्या दरम्यान वाघ फिरतो. कुणाला त्याचा वास येतो तर कुणाला त्याच्या पावलांचे ठसे दिसतात. कुणाचा कुत्रा नेलन म्हणून बातमी येते तर कुणाला याची देही याची डोळा दर्शन घडते.

तर सालाबादप्रमाणे यंदाही वाघ फिरायला लागल्याची चर्चा असमंतात सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी अशीच चर्चा सुरू होती, तेव्हा नुकतेच लग्न झाल्यामुळे मी नवीन होते पंचनदी गावात. घरात वाघाबद्दल गप्पा रंगात आलेल्या- सगळे पडवीत बसून.

अजयचे काका सांगायला लागले- "असाच मी नुकताच कसलीशी मिटिंग संपून रात्री घरात येऊन इथे आडवा झालेला! एकदम कुत्र्यांचा आरडाओरडा ऐकायला आला, म्हणून दार उघडून तुळशी अंगणात आलो तर असा तुळशीच्या समोरून वाघ धावता बागेत गेला!"

मुर्डीला साप, विंचू, काळमांजर, मुंगूस, कोल्हा वगैरे घराच्या आजूबाजूला वावरण्याची सवय असली तरी वाघ नक्कीच आवाक्याबाहेरचा वाटला. कारण मुर्डीला घराला घर खेटून असल्यामुळे तशी काहीच भीती नसते.   माझी तर मनातल्या मनात घाबरघाबर झाली ही ष्टोरी ऐकून, एकतर इथे संडास-बाथरूम घराच्या बाहेर, म्हणून ठरवून टाकलं की एकदा रात्री नऊच्या दरम्यान बाथरूमला जाऊन यायचं ते परत पहाटेशिवाय बाहेर पडायचं नाही घराच्या🤦पण हा निश्चय फार काही टिकला नाही. लेकरू झाल्यावर त्याला रात्री बेरात्री शी-शु होणं किंवा उत्सवाच्या काळात खूप उशिरा देवळातून घरी येणं ह्या निमित्ताने वाघ प्रकरण जरा मनातून मागे पडलं.

यंदा लेकरू थोडं मोठं झालं, आजीजवळ राहू शकण्याइतकं- त्यामुळे मी व अजयने थोडे थोडे शेतीचे प्रयोग, आंबा काजू लागवड वगैरे सुरू केली. पहाटे लवकर उठून तासभर शेतात काम करून यायचं असं रुटीन सुरू केलं. पाऊस उताराला लागला तसं सड्यावर भरभर गवत वाढायला लागलं नि गवताने सुंदर पिवळा रंग धारण केला. नवरात्र व पाठोपाठ दिवाळीच्या आगमनाची चाहुलच ती!  बघता बघता आमच्या डोक्याच्या वर उंच गवत वाढलं. प्रत्येकवेळी शेतात निघालो की काका बजावायला लागले- "दोघांच्याही हातात प्रत्येकी एक काठी नि एक कोयती घेऊन जा! एवढाल्या गवतात बसलेला असला तर अगदी जवळ पोचेपर्यंत वाघ दिसायचाही नाही!"

त्यातच इथे गावात राहून रोज दापोली येऊन जाऊन करणाऱ्या एका काकांना परवाच रात्री दापोलीहून परत येताना अगदी डांबरी रस्त्यावर वाघ दिसला असं ऐकलं. आणि मनातून पुसलं गेलेलं वाघ प्रकरण परत थोडंस जागृत झालं कदाचित.

झालं असं की मी आणि अजय प्लेजरवरून जात असताना एका पुलावरून जात होतो. पूल म्हणजे काय, पर्ह्यावर साकव असावा तसाच! त्या पर्ह्यावर पाणी अडवण्यासाठी एक बंधारा आहे, सध्या त्या बंधाऱ्यावरून ओसंडून पाणी वाहत आहे. त्याचा सभोवार गर्द हिरवी झाडी. गाडीवरून जाताना सहज लक्ष गेलं तर तिथे बंधाऱ्यात पाणी अडून झालेल्या जलाशयात काठावर काहीतरी पिवळं पिवळं दिसलं!

"अजय थांबव गाडी, तो बघ वाघ पाणी पितोय!" आता वाघ दिसतोय म्हटल्यावर तर्राट गाडी मारून लांब जावं की नाही? पण अस्मादिकांची हायपर होऊन दिलेली सूचना वजा ऑर्डर शिरसावंद्य मानून नवऱ्याने तात्काळ गाडी उभी केली आणि गाडीवरून उतरून आम्ही भरभर चालत पुलावर आलो- वाघ बघायला😁 एवढे जिम कॉर्बेटच्या जंगलातही वाघ दिसणं नशिबात नव्हतं , तो आता इथे दिसतोय की काय!! आणि बघतो तर काय🤦 पिवळ्या रंगाचा चिवटाबावटा टीशर्ट घातलेले एक सद्गृहस्थ तिथे ढोपरभर खोल पाण्यात उभे राहून - ओणवे होऊन मासे पकडायचा खटाटोप करत होते! चेहेरा जवळपास पाण्याच्या पृष्ठभागाला टेकलेलाच🤣🤣🤣

स्वतःच्याच फजितीवर खोखो हसत आम्ही परत गाडीकडे गेलो आणि ही सगळी गंमत बघत उभे असलेले दुसरे एक सद्गृहस्थ आम्हाला सांगायला लागले, "आरं, तो गरवायला(मासे पकडायला) गेलाय तिथे पाण्यात"

"अजय ते रस्त्यात भेटलेले आजोबा हसत असतील आपल्याला, कायतरी चर्चा पण होईल त्यांची" असं मी म्हणत होते तितक्यात अजय म्हणला, "श्या, पण वाघ दिसायला हवा होता आपल्याला, म्हणजे जंगलात वाघांच्या गावात पण चर्चा झाली असती की ,"आज आम्हाला माणसं दिसली!"

©ऐश्वर्या पेंडसे जोशी