30 December, 2015

"अग्निहोत्र"च्या आठवणी!

(दोन वर्षांपूर्वी, 2013 संपताना- स्टार प्रवाहवर अग्निहोत्र सिरीयल दुसऱ्यांदा दाखवायला लागले होते,,दुपारची 2ची वेळ गैरसोयीची होती पण तरी वेळात वेळ काढून बघितल्याशिवाय राहवत नव्हतं! त्यावेळी पहिल्यांदा अग्निहोत्र लागायचं तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या आणि फेसबुकवर पोस्ट लिहिली होती, त्या rerun ला पण आता दोन वर्ष झाली, तरी अजून अग्निहोत्र आठवणीत आहे! दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या आठवणींची हि आठवण!)

30-12-2013
स्टार प्रवाह वर पुन्हा एकदा अग्निहोत्र सिरीयल सुरु झाली आहे. ‘कुठे तुझा जन्म झाला, कुठे तुझे मूळ..’ असे टायटल सॉंग परत एकदा दिसले आणि मन झर्रकन ४-५ वर्षापूर्वीच्या काळात जाऊन पोचले. रटाळ टी व्ही सिरीयलच्या जंजाळात आवर्जून बघावी अशी हि एकमेव होती.
तेव्हा होस्टेलमध्ये राहत असल्यामुळे सगळे एपिसोड बघता आले नाहीत, पण अमृताकडे राहायला गेल्यावर हमखास बघणं व्हायचं. त्यात परीक्षा सुरु असेल तर आम्ही दिवसभर हातात वही घेऊन चिक्कार गप्पा मारलेल्या असायच्या, आणि मग मात्र अधिकृतपणे अभ्यास बाजूला ठेऊन सिरीयल बघायची म्हणजे अपराधी वाटायचं. मग नेमका त्या वेळेत अभ्यास आणि दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आल्यावर जेवता जेवता बघायचो. तेही जमल नसेल, तर अपूर्वा म्हणायची “काल अग्निहोत्र कसल भारी होत माहित्येय,,(रोजच भारीच होतं म्हणा!) तुम्ही उगाच मिस केलत..” आणि मग स्टोरी सांगायची.. (त्यात अगदी डायलॉग,बॅकग्राउंड म्युझिक आणि सगळ्या पात्रांच्या हावभाव आणि कपड्यांपर्यंत तपशील आम्हाला कळायला हवे असायचे!😉)

रोजच्या जगण्यात एखादा माणूस अत्यंत पाताळयंत्री आहे असं म्हणायचं असेल तर “तनाने काळा मनाने काळा” असं म्हणणे, कुणाला फोन न वाजताच वाजल्यासारखा वाटला तर “भासेस” होतायत तुला असं म्हणणे असल्या सवयी लागल्या होत्या. एवढच कशाला, गावोगावी असलेल्या नातेवाईकांना आवर्जून शोधायची, भेटायची जुनी सवय असल्यामुळे माझ्या बाबांना ‘आमच्या कुटुंबातला हा निळ्या आहे’ असा किताब घरातल्या आज्यांकडून मिळायला लागला!

नील, वैदू, सई, मंदिरा, अभिमन्यू, मंजुळा, उमा बंड, सगळे लोक जाम भारी वाटायचे. महादेव काका तर सगळ्यात बेस्ट. त्याच्या त्या भाडेकरू बाई आणि त्यांचा पोरगा, ‘तनाने काळा, मनाने काळा’ कृष्णा, बाप्पा आणि त्याची बायको, सगळे एकाहून एक नग होते.
रोज काय घडतंय ह्याची उत्सुकता असायची. फक्त चित्रपटात घडू शकतात अश्याच घटना, पण संवाद आणि वातावरण ह्यामुळे सगळ काही अगदी तुमच्या आमच्या घरातलं वाटायचं.

खर तर, दोन मैत्रिणींची नातवंड ओळख देख नसताना भेटणं आणि त्यांच्या दोघांच्या बाबांचं आपसात हाडवैर, परागंदा होऊन सिनेमात काम करायला गेलेला काका, नाचणाऱ्या बायकांच्यात लहानाची मोठी झालेली चुलत बहिण, नक्षलवाद्याबरोबर राहणारी आत्या हे असलं काहीही तुमच्या आमच्या घरात घडत नसत.

पण वर्षानुवर्ष वाड्यात राहून सगळ्या इतिहासाचा सक्षिदार झालेला महादेव काका, सगळ्या कुटुंबियांना एकत्र आणण्यासाठी आणि गणपतींचा शोध लावण्यासाठी धडपड करणारा निळ्या, शून्यातून विश्व उभं केलेले चिंतामणी आणि सदानंदराव, तुमच्या आमच्या आयांसारख्या सोज्वळ मृणाल आणि रोहिणी सगळे एकदम वास्तवातले वाटायचे. प्रभा आणि लक्ष्मीची मैत्री पण सॉलिड आणि त्या काळात त्यांना सपोर्ट करणारे आप्पा तर ग्रेट!

पूर्वजांच्या इतिहासाच्या मुळापर्यंत जाण्याची कोकणस्थी हौस(खाज खरं तर😉) आणि त्याच वेळी काळाच्या पुढचे विचार, बंडखोरपणा, व्यवहारी- काटकोनी- सणकीपणा आणि कोकण सोडून कितीही पिढ्या गेल्या तरी जीन्समधून वहात आलेली ध्येयवेडी वृत्ती हे सगळे गुणविशेष सर्वदूर आहेच पण ते मालिकेत बघणं खूपच मोहक, भुरळ घालणारं होतं! आप्पांसारखे द्रष्टे, धीरोदात्त कुटुंबप्रमुख, मोरूकाकासारखा आधारवड आणि धर्मा गुरवांसारखा हितचिंतक प्रत्येकाच्या घराला असावा...

शेवट गोड झाला- सगळ्या भावंडांचा शोध लागला, सगळ्यांची गोडी झाली, दिनेशचा राग निवळल्यामुळे नील-सई, अभि-मंदिराचं मार्गी लागलं हे एक खूप छान झालं.

डे1 पासून अदृश्य असूनही, प्रत्येक एपिसोडमध्ये सतत दिसत राहिलेले दिग्दर्शक सतीश राजवाडे इन्सपेक्टर दुष्यंत बनून दिसले तेव्हा म्हणजे... विक्रांत भोसलेच्या अचानक एक्झिटमुळे झालेल्या आमच्या निराशेवर उतारा झाला होता...  फक्त,, फक्त शेवटी मोरू काकाचा आशीर्वाद घ्यायला, उमा बंडबरोबर अग्निहोत्रींचा भाचेजावई म्हणून दुष्यंत वाड्यावर असला असता तर खूपच जास्त आवडलं असतं!

12 December, 2015

किती टाकू?

एक जुनीपुराणी वयस्कर एक्टिवा, काळ्या रंगाची की जेणेकरून मळलेली पटकन कळायची नाही.. घर वापराचे सामान, भाजी अश्या बऱ्याच पिशव्या अड़कवलेली.गॉगल डायरी वॉलेट पेन मोबाईल फायली कागदपत्रे ह्या आणि अश्या असंख्य प्रकारच्या उपयुक्त आणि कामाच्या वस्तुनी ठासुन भरलेली एक सॅक अंगावर वागवणारी.

एक ब्रॅन्डन्यू करकरीत शाइन. कसकसले असंख्य भडक रंगीत स्टिकर चिकटवुन अजुनच लक्षवेधी करायचा प्रयत्न केलेली. नंबर प्लेटीवर नंबरातुन काहीतरी दादागिरी टाइप अक्षरे चितारलेली. फॅन्सी सिटकव्हर, फॅशनेबल आरसे, असा सगळा थाट केलेली.

दोन्ही गाड्या एकाच रस्त्याने एकाच दिशेला निघालेल्या.. काम संपवून आपापल्या घरी जायची संध्याकाळची वेळ. करकरीत तिन्हीसांजा.. कामाच्या शहरापासून राहायच्या गावाकडे जाणारा रस्ता,,अक्टिवाच्या डोक्यात घाई लवकर घरी पोचायची. शाइनच्या डोक्यात गती धूम सारखी शायनिंग मारायची.

शाइन एक्टिवाच्या खुप पुढे जाते. आणि शाइनच्या लक्ष्यात येतं एक्टिवा मागे राहिल्याचं. एक्टिवाच्या मात्र वशिवर्गी सुद्धा नाही त्या शाइनचं अस्तित्व. मग शाइनचा वेग कमी होतो. तिला एक्टिवा गाठते. शाइन एक्टिवाला पुढे जाऊन देते. काही वेळाने सुसाट वेगाने येऊन शाइन एक्टिवाला ओव्हरटेक करुन पुढे जाते. पुन्हा  एक्टिवा मागे पड़ते. पुन्हा शाइनचा वेग कमी होतो. पुन्हा एक्टिवा शाइनला ओव्हरटेक करते.

आता शाइनचं अस्तित्व एक्टिवाने मनात नोंद केलं आहे. पण एक्टिवा आपल्या ठरलेल्या वेगाने पुढे जात राहिली आहे. आणि शाइनचा हाच उद्योग सुरु -पुढे जाण्याचा.. मागे पडण्याचा..

एका वळणावर शाइन सुसाट पुढे जाते. आणि मग एक्टिवा मागून येईल म्हणून स्लो होते. कितीतरी वेळ झाला तरी एक्टिवा मागून येत नाही म्हणून शाइन यू टर्न घेऊन वळून मागे येते. थोड्याच् अंतरावर समोरून ती एक्टिवा येते. तिच्या मागच्या सिटवर आता दोन दप्तरे आणि त्या दप्तरांचे दोन मालक बसलेत. शाइन पुन्हा यू टर्न घेते आणि पुन्हा पकडापकडीचा मुर्खपणाचा खेळ सुरु होतो.

आता एक्टिवा पुढे आहे. चिंचोळया रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घनदाट वस्तीत वहानं खोळंबलेली. वस्तीतले लोक उत्साहाने कसलीतरी मिरवणूक नाचवतायत. मागून आलेली शाइन नेमकी अक्टिवाच्या शेजारी उभी रहाते. एक्टिवाची चिड़चिड उशीर होतोय म्हणून.. शाइनचं शायनिंग मारणं त्या वहातुक कोंडीत पण सुरूच. इंच इंच लढवत एकेक वाहन रस्ता मिळवत मार्गस्थ होताय.

तेवढ्यात एक्टिवाने कुणालातरी फोनवरून "प्लीज कुकर लावायची" सूचना केली आहे. शाइनची कुणालातरी फोन लावून रात्री अमुकअमुक बिच रिसॉर्टला "बसुया का?" म्हणून चौकशी चालल्ये.

तेवढ्यात गर्दी मोकळी होते. एक्टिवा पुढे जाते. शाइन भूम भूम आवाज करत अक्टिवाला गाठते. दोन्ही गाड्या पेट्रोल पंपात येतात.
एक्टिवाला पंपावरचा माणूस विचारतो "किती टाकू?" उत्तर मिळतं-"फुल्ल करा दादा."
पेट्रोल भरून, पैसे देऊन, होइस्तो शाइनच्या टाकीचं झाकण उघडून झालय. पंपवाला विचारतोय "किती टाकू?"
उत्तर मिळताय-"50 चं टाक रे!"

02 December, 2015

सोमनाथाचं मंदीर आणि सड्यावरची रहाटी

सोमनाथाच मंदिर. अत्यंत ऐश्वर्यसंपन्न श्रीमंत देवस्थान. किती संपन्न? गझनीच्या महंमदाने १७ वेळा लुटून नेलं तरीही रिकामं न झालेलं. एक तर त्यात मुळचा खजिनाच तितका प्रचंड असणार, किंवा दोन लुटीच्या मधल्या काळात तो खजिना परत नव्याने भरत असणार. शब्दशः सुवर्णभूमी होता आपला देश त्या काळातली ती गोष्ट, पण महत्वाचा मुद्दा हा, कि १७ वेळा लुटलं जाऊन पण तो खजिना पुन्हा पुन्हा भरायची क्षमता असणाऱ्या त्या भक्तांना, त्या महंमदाला धडा शिकवायची इच्छा का नाही झाली?
हि गोष्ट आत्ता आठवायचं कारण म्हणजे सड्यावरची रहाटी.. रहाटी म्हणजे ना ना तऱ्हेची झाडं झुडूप वृक्ष वेली ह्याचं एकत्र नांदणार साम्राज्य. सोमनाथाच्या मंदिरा सारखंच ऐश्वर्यसंपन्न आणि श्रीमंत. अर्थात निसर्ग-संपन्न!
ह्या सड्यावरच्या रहाटीशी तसा आमचा काडीचाही संबंध नव्हता- नाही, अगदी आत्ता काही वर्षापूर्वी ह्या राहाटी मध्ये पाउल टाकायला दिवसा ढवळ्या भीती वाटावी इतकं घनदाट रान होतं. गीतरामायणातले भिल्लातक फलभारे लवले,, ना कधी त्यांना मानव शिवले,, ना कुठे लतांची सैल मिठी.. ह्या काव्याचे प्रत्यक्षातले दर्शन.. पावसाळ्यात त्यात भर म्हणून पाण्याचा घोंगावणारा प्रवाह. वर उभं राहून बघितलं तर खाली खोलवर पसरलेलं निसर्गच रौद्र-भीषण पण नितांत सुंदर रूप डोळ्यात न मावणारं. धो धो पावसात.. म्हातारा पाऊस पडतो त्यावेळेला त्या पर्ह्याचा आवाज आणि पाण्याच्या धारांनी तुषारांनी धुरकट झालेला आसमंत बघून सगळेजण म्हणायचे, “म्हातारा चिलीम ओढतोय खाली, त्याचा हा धूर..”
ह्या राहाटीचे मालक कित्येक वर्षापूर्वी गाव सोडून मुंबईला स्थायिक झालेले. त्यांना ना त्या राहाटीबद्दल जिव्हाळा, ना त्यात लक्ष घालून ते राखण्याचा उरक. साहजिकच, राहाटीतले आंबे, कोकम, सुखलेल्या फांद्या,कुटक्या ह्या चोरापोरीच जाण्यासाठी जन्माला येत होत्या. पण अनंतहस्ते देण्याचं निसर्गाचं काम सुरूच होत. त्याच्या आधाराने वांदर,कोल्हे,ससे,रानडुक्कर,बाउळ,मोर, आणि कित्येक प्रकारचे पक्षी सुखेनैव राहत होते.
आणि मध्येच कधीतरी ते परचक्र आलं. जमिनींना सोन्याचे भाव आलेले बघून भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. राहटी च्या मालकांनी रहाटी विकायचा निर्णय घेतला, पण पहिल्यांदा काय केल तर जमीन विकण्यापूर्वी त्याच्यावरची सगळी झाडं एका लाकूडतोड्याला विकली. त्याने इमाने इतबारे आपलं काम सुरु केलं, तेव्हा लौकिकार्थाने काहीही संबंध नसलेल्या आमच्या सारख्या स्थानिकांच्या मनाचा एक कोपरा दुखावला, पण उपयोग काय?
रहाटी साफ भुंडी करून झाल्यावर जमीन मालकांनी जमिनीसाठी गिऱ्हाईक शोधायला सुरुवात केली. ते काही लवकर मिळालं नाही, आणि त्यात पावसाचे चार महिने निघून गेले. नवरात्राचे दिवस संपले, तोपर्यंत निसर्गाने हे सोमनाथाच मंदिर पुन्हा भरून टाकलेलं होतं. रहाटी पुनश्च हिरवीगार झाली, तरी तिचा पहिला रुबाब परत यायला अजून काही पावसाळे जायला हवेत.
पण ह्या वर्षीचा पावसाळा बघायचं काही रहाटीच्या नशिबात नव्हतच. आता बारीकसारीक लुटपाट नाही, हा गझनीचा महम्मद. ल्यांड डेव्हलपर, इस्टेट एजंट, अश्या नावाने वावरणारा गझनीचा महम्मद. आता झाडं तोडली नाहीत,तर जेसीबीने उपटून टाकली. जिथे जेसीबी जाऊ शकत नव्हता तिथे उभ्या जिवंत जंगलाला आग लाऊन टाकली. पर्ह्या पर्यंत उतरत गेलेल्या उताराचे सपाटीकरण करून झाले. आता ४-५ गुंठे आकाराचे लंगोटी एवढाले प्लॉट पडून त्यात बंगले बांधायला घेतायत. त्यात हाय फाय लोक राहणार त्यान एसी तर हवेच. त्यांच्या आलिशान गाड्यांना डांबराचे रस्ते हवेत. आणि तोंड वरती करून ह्याला डेव्हलपमेंट म्हणायला मोकळे. आता सोमनाथाच हे मंदिर परत भरेल का? आणि कधी? का त्याच्या आधीच निसर्ग आपला हिसका दाखवणार?
जुनी लोकं म्हणतात, तुमच्याकडे नीट नेटक आवरलेल घर आहे, त्यात टीव्ही, फ्रीज, एसी, गाडी, किंवा तत्सम सगळं काही आहे, तर ती झाली संपत्ती.
पण तुमच्याकडे गुरं आहेत, पडवीत सुपारीची पोती आहेत, अंगण भरून कडधान्यांच्या राशी वाळत आहेत, मळणी काढून झाल्यावर लावलेली पेंढ्याची उडवी आहे. निसलेल्या नारळांच्या चोडांचा ढीग झालाय, आमसूल,साठ वाळतायत, आंबे फणसाचा तैगार आहे, आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्यात प्रत्येक पिढीचे लोक दोन्ही हातानी राबतायत. तर हे ऐश्वर्य आहे.
ह्यात फरक असा कि तुमच्याकडे पैसे असतील तर, किंवा नसल्यास कर्ज काढून- संपत्ती एका दिवसात निर्माण होऊ शकते. ऐश्वर्य हे फक्त पैशांनी बनत नाही, आणि पैसे असतील तरी एका दिवसात बनत नाही. त्यासाठी वर्षानुवर्ष काही वेळेला पिढ्यांपिढ्या खर्ची पडलेल्या असतात.

सड्यावरच्या रहाटीचं ऐश्वर्य, संपत्तीमध्ये रुपांतरीत होतं आहे.. चहुबाजूला सुरु झालेले संपदेचे थेर बघून सड्यावरच्या रहाटीचे माहेर जळत आहे.