08 November, 2019

कोण आवडे अधिक तुला

सध्या आमच्याकडे कथाकथन व गायन हे दोन प्रकार सतत सुरू असतात. त्यात आता अबीरला शिंगं फुटायला लागल्यामुळे हे गाणं नको ते म्हण किंवा ही गोष्ट नको ती सांग असल्या फर्माईशी पण चालतात. 

हल्ली तर त्याने काढलेली नवीन थीम म्हणजे- मामाचं गाणं म्हण, दादाचं गाणं म्हण, हम्माचं गाणं म्हण... वगैरे

तर मग जरा डोक्याला ताण देऊन व गुगलची मदत घेऊन त्याला हव्या त्या थीमवर आधारित गाणी आठवली जातात. त्यामुळे परवाच त्याने "बाबाचं गाणं म्हण" अशी फर्माईश केल्यावर "आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला" हे गाणं आठवलं. ते पूर्ण येत नव्हतं म्हणून गुगल करून शोधून काढलं.

लहानपणी आईने म्हटलेलं हे गाणं ऐकलेलं आहे, पण तेव्हा त्यातले संदर्भ नीट कळत नव्हते. आताही ह्या गाण्याची चाल, शब्द, गोडवा हे सगळं खासच आहे, ज्या काळात ग दि माडगूळकरांनी हे गाणं लिहिलं त्या काळाचा विचार करता त्यातील वर्णन सुद्धा कमालीचे चपखल आहे. पण तरीही आता स्वतःच्या मुलाला हे गाणं म्हणून दाखवताना वाटतं की आजच्या काळात किती बदललेत सगळे संदर्भ. 

आणि नेमका ह्याच मुद्द्याला धरून एक लेख फेसबुकवर नुकताच वाचनात आला की, घटस्फोटाच्या वाटेवर असलेल्या आईवडिलांच्या मुलाला वकील विचारतायत की तुला आई आवडते का बाबा... हे अगदीच गलबलवून टाकणारं चित्र!

तरीही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कुटुंबात- जिथे आईवडील नीट एकत्र राहातायत, अश्या कुटुंबात चित्र किती आमूलाग्र बदललंय! 

आणि विचार करता करता झटकन लक्षात आलं की चित्रातले आई बाबा दोघेही बदललेत हे खरं, पण बाबा लोकांना अजून बराच वाव आहे बदलायला..

म्हणजे गंमत बघा- ह्या गाण्यात बाबांचे जे प्लस पॉइंट्स सांगितलेत ते आता उरलेच नाहीयेत. कारण ते सगळं आयासुद्धा करू लागल्यात. आता आई भित्री भागूबाई नाही, आता आई सुद्धा मुलांना खाऊ विकत घेऊन देऊ शकते. रिबिनीलाच काय ऍडमिशनला सुद्धा पुरतील इतके पैसे आईही कमावते, आणि घरात बसल्या आईला पैसा दिडकी कुणी देत नाही असं राहिलेलं नाही..  वयाने जरा मोठा असला तरी बाबाला काही आई नमस्कार करत नाही, आणि बाबा घरात आल्यावर भिऊन पदर(?) सावरायला आधी पदर नसतोच उलट, "आलास का? ह्याला घे आता जरा.. मस्ती करून पाय आणि बोलून तोंड दुखतंय माझं." असं म्हणून आया जरा रिलॅक्स होऊ शकतात!!

बाबा लोक सुद्धा पूर्वीपेक्षा खूपच खूप बदलत चाललेत ह्यात वाद नाही. पण सुंदर गाणी गाणारे बाबा घरोघरी असायला लागले तरी बाबा लोकांना तऱ्हेतऱ्हेचे खाऊ सहज बनवता येणं जरा दुर्मिळ आहे अजून.. सुंदर कपडे अमेझॉनवरून मागवताना बाबा लोक साईजच्या अंदाजात तरबेज झालेत हे नक्की.. पण पावडर तिट्टी आणि रिबीन बांधून वेण्या घालणे बाबांना जमते का हा संशोधनाचा विषय आहे😁😁😁 

बाकी "आईचे मऊ साईचे हात" आणि "बाबाच्या मिश्या चिमुकल्या करती गुदगुल्या" ह्यातल्या भूमिकांची अदलाबदल अशक्य आहे🤣 त्यासाठी काहीतरी उत्क्रांती वगैरे झाली तरच, ते जाऊंदे!

तर पॉईंटाचा मुद्दा काये- 
धडा शिक रे तू बैलोबा-- आई जसं मल्टीटास्किंग करून सगळंच जमवते तसंच भविष्यात बाबालोकांना पण जमायला हवंय.. तरच आया तयार होतील बाबासंगे लग्नाला!!!

म्हणजे थोडक्यात काय तर आत्ता ज्यांना लहान मुलगे आहेत त्यांनी आपापल्या मुलांना घरकाम, स्वयंपाक, वगैरे निगुतीने करायच्या गोष्टींमध्ये तरबेज करून ठेवायला हवंय.. म्हणजे ही मुलं बाबा होतील तेव्हा पुढच्या पिढीत तरी आई व बाबा दोघांनाही गाण्यातील प्रत्येक कडवं अवगत झालेलं बघायला मिळेल.. आणि आपण म्हातारपणी जमेल तितकी मदत करूच नातवंड सांभाळायला🤣🤣🤣

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

सांग मला रे सांग मला (ग दि माडगुुुळकर)

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !