08 June, 2023

घाल घाल पिंगा

महाशिवरात्रीचा उत्सव संपला, आणि आंबा काजूच्या मोहोराच्या वासाने आसमंत भरून जायला लागला. शिमगा झाला, आणि पाडव्यापासून कोकणचा निसर्ग हळूहळू रंग बदलायला लागला. चैत्रपालवी गुलाबी-पोपटी-हिरवी... असं करत करत रंगांची आणि बरोबरीने सुगंधाची उधळण सुरू झाली.

पोरांच्या परीक्षा, बायकांच्या चैत्रगौरी आटोपल्या आणि जो तो कोकणी entrepreneur आपापल्या घरातील उद्योगात बुडून गेला. दिवस मोठे आणि रात्री लहान झाल्या, तरीही कामाला दिवस पुरा पडेनासा झाला. काजूच्या बिया जमवायला कातकऱ्यांची लगबग उडाली. सुटीत रिकामी उंडारणारी पोरंपोरी जमेल झेपेल ते काम मिळवून कमावायला लागली.

कच्ची करवंद मिठात पडली, आमसुलं वाळत पडली. चकचकीत गुलाबी रंगाचा पाक पाघळवत कोकमसिरपची पिंप सजली. एकसारखे चिरलेले गरे चुर्रर्र आवाज करत तेलात उतरले. स्वयंपाकसुद्धा करायच्या आधी फणसरसाचे मिक्सर घरघरु लागले आणि उन्हाच्या पहिल्या कवडश्याबरोबर साठांचे ट्रे मांडवभर पसरले. स्वच्छ दादरे बांधलेली छुनद्याची पातेली उन्हात जाऊन बसली. आंबोशीच्या तुकड्यांची रांगोळी पसरली.

ह्या प्रॉडक्टिव्ह गडबडीत सवड काढून , वेळेचं भान राखत राब, पातेरी, माती लावणे, भाजवणी,  तसेच अक्षय्यतृतीयेला भाजीपाल्याच्या बिया रुजत घालणे ही क्रिएटिव्ह कर्मकांडे पार पडली..

भविष्याची तरतूद म्हणतात तशी पावसाळ्यासाठी फाटी, चौडं, गोवरी भरून झाली. डाळी कडधान्य वाळवून भरून झाली. मीठ- मिरच्या- मसाले- कांडण नुसती धूम उसळली.

एकीकडे माहेरवासिनी आणि पोराबाळांनी घरे गजबजली, पर्यटकांनी हॉटेल्स गजबजली. माणसांच्या उत्साहाबरोबर निसर्गाचा उत्सवही चढत्या भाजणीत बहरू लागला. 

आणि अचानक एकदिवस चकचकत्या सोनेरी आभाळात एक काळपट किनार दिसली. सरड्याची तोंडं लाल झाली, कावळे काड्या शोधत फिरू लागले, मुंग्यांना पंख फुटले, तिन्हीसांजेला पडवीतल्या पिवळ्या बल्ब
भोवती वाळवीची पाखरं पिंगा घालू लागली, पाणकोंबड्या तुरुतुरु धावायला लागल्या, बेडूक मंत्र म्हणायला लागले... रानहळदीला फुलं आली, संध्याकाळच्या वेळी गार वाऱ्याबरोबर कुठेतरी पाऊस पडला की काय अशी शंका यायला लागली आणि कामधंद्यात गर्क झालेल्या माणसांना जून महिना उजाडल्याचा साक्षात्कार झाला!

दिवस रात्रीच्या मधला असो किंवा दोन ऋतूंच्या मधला असो.. संधिकाल कायमच भावनिक करून टाकतो आपल्याला, तसंच झालं. इतकेदिवस कामाच्या व्यापात पार्श्वसंगीतासारख्या मनात वाजत असलेल्या माहेरच्या आठवणी एकदम जोरात यायला लागल्या. 

आजूबाजूच्या झाडांवर पूर्ण तयार असलेले आंबे, आता हलकेच लागलेल्या धक्क्यानेही पटापट गळून पडतात आणि सत्तरी गाठलेली एखादी माहेरवाशीण वय विसरून लगबग करत ते गोळा करायला धावते, तश्या आठवणी धावत सुटतात..

कॅनिंग अंतिम टप्प्यात आलं असेल, आंबा खरेदी बंद केली, म्हणजे आता आंब्याच्या आढ्या पूर्ण क्षमतेने लावल्या असतील, संध्याकाळी सगळेजण दमून भागून चहा-कॉफी घेत गप्पा मारत असतील.. आंबेकाढणीच्या दिवसातलं चित्र डोळ्यासमोर तरळून जातं.. आता पावशी उतरवला असेल, सरव्यातील रायवळखाली खच पडला असेल.. एका अव्वल प्रकारच्या रायवळला बाबांनी कौतुकाने दिलेलं आपलंच नाव.. गोवई, पायरी, फर्नांडिस सगळे घरी दाखल झाले असतील. रोज संध्याकाळी काम संपल्यावर कामगारांच्या हातात खायला दिलेले आंबे, दिवसभर रसात काम करूनही परत रात्री जेवणानंतर घरी गोलाकार बसून घेतलेला आंब्यांचा आस्वाद...

मुलांना झोपाळ्यावर घेऊन रामरक्षा म्हणता म्हणता मन मात्र नुसतं सैरावैरा धावत सुटतं..
"अगं!! प्रत्येक काढणीनंतर क्रेट भरून प्रत्येक प्रकारचे आंबे आले की माहेरचे.. आणि एकदा डोळे मिटून ते खायला लागलीस की तुला हाक सुद्धा मारलेली ऐकू येत होती का?" 

"तुला नाही ते कळणार!! मंगलकार्याच्या मांडवाला कितीही भारी सजावट केली तरी दारावर आंब्याचा टाळाच लागतो की नाही, तसंच आहे हे.. कितीही काहीही झालं तरी आंबा तो आंबाच! त्यातही हापूस हा सर्वांचा बापूस! आणि त्यातून तो माहेरचा म्हणजे काय विचारतोस! एकदा तरी कपड्यांवर ते तेजस्वी केशरी डाग पडल्याशिवाय काही अर्थ नाही कशालाच!"

"चला मग, उद्या लवकरच निघू! सासूबाईंना फोन करून ठेवा, की मऊभात वाढवा सकाळचा."

पावसाची पूर्वसूचना द्यायला आलेला वारा फोनच्याही आधी निरोप सांगायला पुढे जातो😊

©ऐश्वर्या पेंडसे जोशी


12 February, 2023

विद्यारंभ संस्कार

मुलं शाळेत जायला लागल्यावर, प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे आम्ही सतत ज्या प्रश्नाला सामोरे जात असतो ते म्हणजे- मराठी माध्यमच आहे, ssc बोर्डच आहे तरी एवढा मोठा प्रवास करून दापोलीच्या शाळेत नेऊन हाल का करताय मुलांचे. हाल वगैरे तर नाहीच, पण हा निर्णय घेतल्याबद्दल पावलोपावली समाधान मात्र वाटत राहते, त्यापैकीच एक अतिशय महत्वाचा दिवस नुकताच आमच्या मुलांच्या विद्याभारती शाळेत पार पडला- तो म्हणजे विद्यारंभ संस्कार. 

अगदी लहान वयात कोवळ्या बोटांना लिहायला द्यायचे नाही हा आमच्या शाळेचा विचार. तोपर्यंत, निरीक्षण, पाठांतर, गाणी गोष्टी खेळ यांची लयलूट! मुलांना पाच वर्षे पूर्ण झाली की शाळेत विद्यारंभ संस्कार होईल, आणि मग लेखन शिकायला सुरुवात होईल, असं सांगितलं गेलं होतं. (पाच वर्षे पूर्ण झाल्यावर??? मग लेखनाला सुरुवात???- असं वाचून दचकले असतील खुपजण)

प्रत्यक्षात तो सोहोळा 26 जानेवारीला ठरला. साधारण 15 दिवस आधी शाळेच्या ग्रुपवर बाईंकडून तशी सूचना आली. ह्या कार्यक्रमासाठी 'माता पालकांची' उपस्थिती आवश्यक आहे. आई येऊ शकत नसेलच, तर मग आजी, मावशी, काकू, आत्या, मामी असं कोणीही चालेल! असाही निरोप आला. पालकांनी पांढरे किंवा फिक्क्या रंगाचे कपडे आणि मुलांनी गणवेश घालायचा आहे, असं सांगितलं गेलं तरीही एखादा फिकट रंगाचा ड्रेस अडकवून जाऊ अश्याच विचारात मी होते. 

मग एक दिवस अबीर व अर्णव सांगू लागले, "सगळ्या आयांनी साडी नेसून यायचंय शाळेत. लक्षात आहे ना? आणि मुळात तुझ्याकडे आहे तरी का पांढरी साडी, किंवा फिक्कट रंगाची? नाहीतर आजीची मागून घे एखादी!😁" इथपर्यंत पोरांची डोकी धावली. 

शिवाय अगदी पळी-पंचपात्रीपासून सगळं पूजेचे साहित्य, पाटी पेन्सिल, आणि जपमाळ घरून आणायला सांगितली होती, तरीही शाळेतल्या एखाद्या नेहेमीच्या कार्यक्रमापेक्षा जास्तीचं महत्व ह्या कार्यक्रमाला असणार आहे ह्याची आम्हाला कल्पना नव्हती.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी, प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजवंदनानंतर सुटी असते तरीही सर्व शिक्षक मंडळी उत्साहाने कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होती. एका चिमुकल्या पालखीत मोठमोठे ग्रंथ ठेवून ती पालखी खांद्यावर घेऊन मुलांनी शाळेच्या आवारातच दिंडी काढली.

नंतर मग प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या आईबरोबर वर्गात बोलावलं गेलं. त्या वर्गातील तयारी बघून आम्ही थक्कच झालो. घरी शुभकार्य असलं की कसे मातीच्या विटांचे चौकोनी यज्ञकुंड करतात, तसे 7-8 यज्ञकुंड तयार केले होते. एका कुंडाभोवती चार मुलं व त्यांच्या आया अश्या आठ जणांच्या बसण्याची व्यवस्था. बाकी सर्व तयारी- धूप, कापूर, गोवऱ्या, समिधा, तीळ, जव, तूप, निरांजन- अशी जय्यत मांडलेली होती. 

आमच्या मुलांची विद्याभ्यासात उत्तम प्रगती व्हावी अश्या संकल्पाने विधीची सुरुवात झाली. यज्ञात अग्नी प्रज्वलित करून त्यात पंचमहाभुतांसाठी आहुत्या दिल्या गेल्या. सुस्पष्ट व सुश्राव्य मंत्रांचा घोष शिक्षकवृंदाकडून केला गेला. शिक्षणाचा उपयोग राष्ट्राच्या कल्याणासाठी करण्याची बुद्धी मुलांना मिळावी अश्यासाठी- "राष्ट्राय स्वाहा, इदं न मम" अशी आहुती घातली गेली.

आहुती देणे, नैवैद्य दाखवणे, ह्या कृती कश्या करायच्या,  कुठल्या बोटांनी करायच्या हे सर्व शिक्षकांनी नीट समजावून सांगितलं.

नंतर सर्व मातांना जपमाळ घेऊन सरस्वती देवीचा जप करायला सांगीतला. आईने आपल्यासाठी जप केला, आता मुलांनी आईच्या पायावर डोकं टेकवून नमस्कार करायचा, असं सांगितलं गेलं.

आता विद्याभ्यासाला सुरुवात करायची, आई म्हणजे पहिला गुरू, म्हणून आईने मुलांकडून पाटीवर श्री अक्षर गिरवून घेतले. सर्वात शेवटी प्रसाद देण्यात आला- तो म्हणजे खारीक, खोबरं, खडीसाखर, वंशलोचन अश्या पदार्थांची एकत्र केलेली पूड- कारण हे सर्व पदार्थ बुद्धिवर्धक सांगितले आहेत! 

पवित्र सुगंधी धुराने भरून आणि मंत्रोच्चाराने भारून गेलेलं ते वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं, की चपखल वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. अतिशय विचारपूर्वक आखणी केलेला हा कार्यक्रम इतका हृद्य झाला की निघताना सर्व शिक्षिका, गुरुजी व ताई यांना नमस्कार करायला मुलांना सांगावं लागलेच नाही.

बाहेर सर्वत्र पाश्चात्य संस्कृतीचं अतिशय जास्त आक्रमण आपल्या प्रत्येक गोष्टीवर होत असताना, शाळांमधून सुद्धा कितीतरी गोष्टी अश्या घडताना आढळतात. त्यावेळी विद्याभारतीचे वेगळेपण डोळ्यात भरल्याशिवाय राहत नाही.

 आम्हाला तर अगदी जणू मुलांची मुंज झाल्यावर वाटावे तितके समाधान वाटले. आता मुलं मोठी होतायत ह्याची एक न सांगता येणारी हुरहूर, आणि नवीन नवीन अनुभव त्यांच्या भावविश्वाला समृद्ध करतील ह्यासाठी शाळा प्रयत्न करत आहे ह्याचं मन भरून समाधान घेऊन घरी निघालो!



 (विशेष टीप- 'हा कार्यक्रम म्हणजे मुंजीला पर्याय' असं कुठेही मी म्हटलेलं नाही- याची संस्कृती रक्षकांनी नोंद घ्यावी)

आणि शेवटी अतिमहत्वाचे- आता आमच्या मुलांचा हा कार्यक्रम शाळेने केला- म्हणजे अगदी सगळीच मुलं डॉक्टर इंजिनियर होणार नाहीयेत. हे आम्हालाही माहिती आहे. मुलं आमच्याइतपत जेमतेम शिकून आमच्या इतपत साधे उद्योजक किंवा शेतकरीसुद्धा होतील, त्यामुळे, "हंss इतके सोहोळे करून हेच का दिवे लावले, असे अजून 25 वर्षांनी तारे तोडणाऱ्यांना आधीच नमस्कार!😁 
(कारण-  10 महिन्याच्या लेकराला एका जागी बसवून जेवण भरवायला सोपं जावं म्हणून चित्रांची पुस्तकं दाखवायला घेतली असताना- "अग काय हे, आत्तापासून अभ्यासाची कटकट करतेस!!!" हे ऐकलेलं आहे मी)

24 July, 2022

हल्ली इतिहास बदलून मनाला वाटेल तसा लिहिला जातो म्हणतात ना.. पण हे आपल्या घरापर्यंत येईल असं नव्हतं वाटलं.

झालं असं, नुकत्याच अनुभवलेल्या- उपभोगलेल्या आजोळच्या रहिवासाचा अंमल अबीरच्या मनावर अजून कायम आहे.मुर्डीला- अर्णव आणि अबीरने "आबा! एक काम होतं! एक गोष्ट सांगता?" असं विचारून शिवचरित्राचा रतीब रात्रंदिवस लावून घेतलेला. त्यात भर म्हणजे एक दिवस मामाने "शेरशिवराज" सिनेमा बघायला लावून दिला. इतके दिवस आबांच्या कथाकथनातून आणि "दुन्दूभी निनादल्या" ह्या पद्यातून ऐकलेला अफजलखान प्रत्यक्षात बघायला मिळाला😃

एरवी बेडक्या, चिचुंद्रया, पाली ह्यांना मारू नका असे म्हणणारी मोठी माणसं अफजलखानाच्या बाबतीत एवढं दयाळू धोरण ठेवून नाहीत हे पोरांनी ओळखलं. मग जसं शाळा शाळा खेळूया, दुकानदुकान खेळूया असं चालतं, त्यात युद्ध युद्ध खेळूया अशी भर पडली🤦🏼‍♀️  पण शाळा शाळा खेळताना कसं- एकजण गुरुजी, बाकीचे विद्यार्थी, तसं युद्ध युद्ध खेळात अफजलखान व्हायला कुणी तयार नाही😃

मग मुंबईची प्राचीआजी आलेली, तर स्पंदनबरोबरच तिलापण खेळायला घेतलं गेलं, मग प्राची आजी अफजलखान.. आणि पोरांनी - महाराज, जिवा महाला, आणि सय्यद बंडा अश्या भूमिका वाटून घेतल्या.. कोथळा काढला जाऊन "दगा दगा" ओरडत मरण्याचं नाटक वगैरे तिच्याकडून व्यवस्थित करून घेतलीन पोरांनी🤣

मग आम्ही पंचनदीला आलो. आता एकट्याने युद्ध युद्ध खेळायचा कार्यक्रम सुरू झाला. पडवीतून वर चढण्याच्या तीन पायऱ्या हा प्रतापगड, त्याच्या पायथ्याशी युद्ध😃 त्यात घरातील अर्धीअधिक उश्या- पांघरुणे गनीम म्हणून धारातीर्थी पाडून झाली. हातात लाकडी पट्टी घेऊन तलवारीसारखी फिरवत उड्या मारणं सुरू होतं.

इकडे मी माझ्याच व्यापात- संध्याकाळी डास येतात म्हणून धुरी करायला जमिनीवर बसले होते, तर तलवार फिरवत येऊन हा मावळा पाठीत धडकला.

"अरेss.. काय चाललंय? मी विस्तवाशी काम करत्येय ना? मला भाजायला व्हावं असं वाटतंय का तुला?" असा आरडाओरडा मी केला. 

मग मावळा माझ्या बडबडीकडे सपशेल दुर्लक्ष करून जरा पुढे सरकून लढण्यात मग्न झाला. एकीकडे अफजलखान, फाजलखान, नेताजी, पंताजीकाका अश्या हाकाट्या सुरूच होत्या.

थोड्या वेळाने बाबा घरी आल्यावर बाबाला इतिहासातील नवीन ज्ञान देण्यात आलं- "तुला सांगतो, अफजलखान आंघोळीचं पाणी तापवायला विस्तव पेटवत होता, तिथे जाऊन आमच्या महाराजांनी त्याचा कोथळा काढला"
🤣🤣🤣🤦🏼‍♀️🤦🏼‍♀️🤦🏼‍♀️

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

08 July, 2022

तोतोछान

"तोतोछान- एक स्वच्छ प्रेमळ सोहोळा" 

प्रणव आणि अवनीच्या नवीन आस्थापनाचा पहिला वाढदिवस. बरेच आप्तेष्ट जमलेले. कुतूहल, हेटाळणी,कौतुक, अश्या विविध भावना होत्या लोकांच्या मनात. 
"हे कसलं नवीन खूळ! हाss मेल्यानो, आजवर कधी कुणाला पोरं झाली नाही होय? गो बाय माझे! हा प्रणव का तान्ह्या पोरांना आंघोळी घालाचाय.. काय तरी एकेक.."
"एकटा प्रणव नव्हे हो, अशी आणखीही पोरं आहेत त्याच्याकडे कामाला. बायकात पुरुष लांबोडे हवेत कश्याला मी म्हणते!"
"नवीन काहीतरी धडपड करतायत ही मुलं, कौतुक आहे! काम जबाबदारीचं आहे खरं, पण नीट निगुतीने करायला मात्र हवं!"

अश्या विविध प्रतिक्रिया येत होत्या. प्रणव आणि अवनी हे सगळं ऐकून घेऊन कार्यक्रम नीट होईल इकडे लक्ष देत होते. तालुक्याच्या ठिकाणी असणारे प्रथितयश बालरोगतज्ज्ञ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यायचे होते. सगळी तयारी पूर्ण झाल्याची खात्री करून घेऊन दोघे जरा शांत बसले. कार्यक्रम सुरू व्हायला थोडा अवकाश होता. अवनीची विचारचक्र सर्रकन 10 वर्ष मागे धावली.

"आई ग, सुलूताई पण नाही जमणार म्हणाली. आजकाल तिला झेपत नाही म्हणते ती." - 
बाहेरून घरात आलेला प्रणव हताशपणे सांगू लागला.
"अरे देवा! होय का? असूंदे, मी अजून चंगली खमकी आहे म्हणावं.. अवनी, तू काही काळजी करू नको हो, मी तुझी सासू अजून एवढी म्हातारी नाही झाल्ये. अगो माझी दोन, वन्संची दोन, भाऊजींची दोन इतक्या मुलांना तेल मालिश,आंघोळ, शेकशेगडी सगळं केलेलं हो मीच! आता नातवंडाच कराला का मला जड व्हयचाय!" सुनीताकाकूने- अवनीच्या सासूने कंबर कसली.

अवनीच्या प्रसूतीची वेळ जवळ येत होती. हॉस्पिटलमध्ये न्यायची बॅग, बाळंतिणीचा खुराक, बाळासाठीच्या गोष्टी सगळं नियोजन झालं, पण बाळाच्या आंघोळीला आणि अवनीच्या तेल लावण्याला  मावशी मिळेना. गावात हे काम करणाऱ्या पूर्वापार जुन्याजाणत्या बायका आता भारीच थकलेल्या. आणि त्यांच्या लेकीसुनांनी मुंबईची वाट धरलेली. बरं, पांढरपेशा सुखवस्तू घरातील पोक्त स्त्रियांना हे काम दुसऱ्याच्या घरी जाऊन करणे तेव्हढेसे रूढीसंमत नाही. 

शेवटी सुनीताकाकूनी स्वतःच ते काम अंगावर घेतले.
हाहा म्हणता तो दिवस आला. अवनीचे सिझेरियन झाले आणि प्रयागचा जन्म झाला. 3-4 दिवसांनी घरी आल्यावर लगेचच सुनीताआजीला जाणवलं-  लेकरे-भाचरे व पुतण्याना न्हाऊमाखू केलं त्याला आता 25 वर्ष लोटली आहेत.. हात पाय नी पाठ कम्बर बोलू लागलेत. त्यात अवनीचे सीझर झालेलं, तिला हवं नको बघा, तिचे चार वेळेस गरम खाणं पिणं बघा, घरकाम बघा... आणि शिवाय प्रयागचे न्हाऊमाखू आणि अवनीचे तेल मालिश... जीव दमून गेला आठवड्यातच. 

त्यांची दगदग बघून आणि वर आपलं त्यांना करावं लागतं हे बघून अवनीला कानकोंडं झालेलं.  कितीही प्रेमळ असली तरी ती सासूच, त्यामुळे किरकोळ का होईना पण मतभेद- मनभेद सुरू झालेच. प्रणवच्या सुटीच्या दिवशी व घरी असेल तेव्हा जास्तीत जास्त मदत तो करतच होता. सासरेबुवांचा तर बालसंगोपन व घरकाम/स्वयंपाक ह्याच्याशी दुरान्वये संबंध नव्हता. अवनीच्या माहेरी तिची वयोवृद्ध आजी असल्यामुळे आईला तिथे येणे शक्य नव्हते.
हा सगळा थाटमाट बघून अवनीने आपले बाळंतपणाचे कौतुक आवरते घेऊन कामकाजाला सुरुवात केली होती.

हळूहळू ते अवघड दिवस संपले आणि दोन वर्षांत ओवीचा जन्म झाला. मागचे अनुभव जमेस धरता आणि आता सुनीताकाकूची अजूनच कमी झालेली कार्यक्षमता बघता तीन दिवसाच्या ओवीला आंघोळ घालण्याचे काम प्रणवने सुरू केले. टाके दुखायचं थांबल्यावर पुढच्या पंधरा दिवसात अवनीही ह्या कामात तरबेज झाली. ओवीचंही बालपण पुढे सरकलं आणि हे सगळे प्रकार 'आठवणी' ह्या कप्प्यात जाऊन बसले!

काही दिवसातच गावातच राहणाऱ्या त्यांच्या मित्राकडे बाळ जन्माला आलं, आणि पुन्हा ह्या सगळ्या चर्चा नव्याने सुरू झाल्या.  मित्र फिरतीच्या नोकरीचा, घरात वडीलधारी कुणी नाहीत.. क्षणाचाही विलंब न करता अवनी व प्रणव त्यांच्या मदतीला धावले. सकाळी लवकर उठून आपल्या घरचं आवरून दोघेजण तिथे पोचत. प्रणव बाळाला तेल लावून, आंघोळ घालून, अगदी तिटी लावून , धुरी देऊन, बाळाची दृष्ट सुद्धा काढून मग बाळ आईच्या ताब्यात देई. मग तो त्याच्या कामाच्या ठिकाणी जायला निघे. तोपर्यंत अवनी बाळाच्या आईला तेल मालिश, शेक शेगडी करून घेई.

सुशिक्षित, पांढरपेशा घरातील हे दोघे हे असले काम करतात- विशेषतः प्रणव- हाफ पॅन्ट घालून,पाटावर लांब पाय पसरून बसून, बाळाला (तेही लोकाच्या) पायावर घेऊन आंघोळ घालतो हा अतिशय कुचेष्टेचा विषय झाला.  पण स्वतःचे अनुभव आठवले की ह्या दोघांना त्या कुचेष्टेचे काही वाटेना!

पुढे हेच कुचेष्टा करणारे स्वतःवर  वेळ आली की ह्या दोघांना गळ घालू लागले. मित्राच्या मुलासाठी मैत्रीखातर केलेत, पण आमच्याकडे याल का? पैसे घ्या रीतसर! अश्या विचारणा होऊ लागल्या. पंचक्रोशीतील निमंत्रणे येऊ लागली. सुरुवातीला ओकवर्ड वाटणारा प्रणवचा वावर- त्याच्या सभ्य, सुसंस्कृत आणि कुटुंबवत्सल स्वभावामुळे माताभगिनींना अगदी कम्फर्टेबल वाटू लागला. पुरुष डॉक्टरप्रमाणेच त्यालाही स्वीकारार्हता मिळाली. 

अवनी सुद्धा अगदी मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीला प्रेमाने समजावून सांगावे तसे सर्व सोपस्कार हळुवारपणे करायची. मदत नाही काडीची, पण आगाऊ प्रश्न विचारून त्या नवमातेचा आत्मविश्वास खच्ची करणाऱ्या भोचकभवान्या कितीतरी असतात आजूबाजूला.. अवनी मात्र तज्ज्ञांच्या मदतीने शास्त्रीय माहिती मिळवून, त्याला स्वतःच्या अनुभवाची जोड देत असे. आईचा आहार, स्तन्यपानातील समस्या ह्या बाबतीत अगदी प्रेमाने मदत करत असे. 

बाळंतपणाचे 2/3 महिने उरकले की बाळाची अंघोळ आई बाबांनी स्वतःच घालावी असं ट्रेनिंगही दिलं जाई.

प्रणवचे उत्तम चालणारे मेडिकल स्टोअर्स आणि अवनीचे गणिताचे क्लासेस सांभाळून सर्व लोकांच्या ऑफर स्वीकारणे अशक्य होऊ लागले आणि तिथूनच तोतोछान चा उगम झाला!

गावातून तरुण मंडळी मुंबईत जायला फार उत्सुक असतात, त्यांना इथेच काम मिळवून देण्याच्या हिशोबाने प्रशिक्षण देण्यात आलं. अश्या सुशिक्षित, स्मार्ट तरुण मुलामुलींची टीम गोळा झाली. आंघोळवाल्या मावशी बिझी,  म्हणून बाळाला वाट्टेल त्या वेळेस आंघोळ घालण्याचा ट्रेंड 'तोतोछान' मध्ये नव्हता. सकाळी एका ठिकाणी काम करुन तोतोछानच्या कर्मचाऱ्याची मामा-मावशीची जोडी आपल्या दुसऱ्या कामाला/शिक्षणाला मोकळी होई. बाळासाठी मामा-मावशी जसे जवळचे असतात तसेच ही मुले वागत, ते अर्थातच बाळंतिणीलाही आपल्या भावंडांप्रमाणे कम्फर्टेबल वाटले पाहिजेत असा कटाक्ष ठेवण्यात आला. 

कसोशीने पाळलेली स्वच्छता, घरात ज्येष्ठ स्त्रिया असल्यास त्यांच्या मतांचा आदर करत काम करण्याची सवय, वेळेत पोचण्याचा काटेकोरपणाबरोबरच- बाळ झोपलं आहे, आईचं खाणं व्हायचंय, अश्या वेळेस घिसाडघाई न करता थांबण्याची तयारी, विशेषतः तोतोछान मधील मामा मंडळींना महिलावर्गाशी वागण्याबद्दल विशेष सूचना होत्या. तसेच त्यांचा पूर्वेतिहास जाणून घेऊनच नेमणुका केलेल्या होत्या.  टीम तोतोछान चा छान जम बसू लागला. आज ह्या आस्थापनाच्या कल्पनेचे बीज रुजले त्याला एक वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्तच हा कार्यक्रम होता.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेले बालरोगतज्ञ आले. ह्या संकल्पनेचे त्यांनी अगदी तोंडभरून कौतुक केले. काहीही शास्त्रीय माहिती/ज्ञान कधीही लागले तरी मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. तसेच भविष्यात लवकरच एखादया Lactation Consultant ना ह्या परिवारात निदान व्हर्च्युअली तरी समाविष्ट करा असा सल्लाही त्यांनी दिला. कारण सुरुवातीच्या अवघड दिवसात हा प्रश्न ना आईच्या डॉक्टरांकडे विचारला  जातो, ना बाळाच्या डॉक्टरांकडे!

सुनीताकाकूनी भाषणातून आपल्या मुलाचे व सुनेचे कौतुक करतानाच, ह्याच आस्थापनात एक भाग म्हणून बाळंतिणीसाठी पथ्याचा डबा, तसेच पौष्टिक खुराक ऑर्डरप्रमाणे पुरवण्याचे डिपार्टमेंट स्वतः हौसेने सांभाळणार असल्याचे जाहीर केले.

उपस्थित मंडळींमधील कित्येक भावी आई-बाबा व भावी आजीआजोबा यांना निश्चिन्त करून कार्यक्रम संपला. आता उद्यापासून 'तोतोछान' चा सुंदर गणवेश घातलेले आंघोळमामा आणि मालिशमावशींच्या दुचाक्या तालुकाभर फिरू लागणार होत्या.. महिलांची मक्तेदारी असलेल्या करियरच्या एका क्षेत्रात पुरुष शिरकाव करणार होते.

मूळ संकल्पना- अजय जोशी
लेखन ©ऐश्वर्या पेंडसे जोशी

02 January, 2022

रंगुनी रंगात साऱ्या

महिलामंडळींपेक्षा पुरुषमाणसांना रंगांचं ज्ञान अंमळ कमीच असतं, ह्यात बहुतेक कुणाचं दुमत नसावं. काही वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा व दुसऱ्या एका मैत्रिणीची मुलगी हे साधारण समवयस्क असलेले- 3-4 वर्षांचे. त्यापैकी मैत्रिणीचा मुलगा एकदा म्हणत होता, 
"माझा रंग शर्ट भिजलाय पाणी पिताना!"
ह्या वाक्याचा अर्थ लावून मेंदू दमला, शेवटी त्याच्या आईने उलगडा केला- अगं 'रंग शर्ट' म्हणजे त्याचा एक लाल रंगाचा शर्ट..🤣'
जगातला सर्वात भडक उठावदार रंग हाच मुळी त्याने 'रंग' ह्या एका शब्दात उरकून टाकला होता..

त्याच वेळी, त्याच वयाची असलेली मैत्रिणीची मुलगी मजेंटा, नेव्ही ब्ल्यू, ऍक्वा ग्रीन असले तपशीलवार रंगसुद्धा ओळखून, बोलताना त्यांचा उल्लेख करायची. तिची आई ही बुटीकची मालकीण असल्याचाही तो परिणाम असणार..

तेव्हा अस्मादिक मात्र पोरं-बाळं, संगोपन, जडणघडण असल्या भानगडीपासून कोसो दूर असलेले शिंगलत्वाचे स्वच्छंदी आयुष्य जगत असल्याने "प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यांच्यात तुलना करू नये" ह्या ज्ञानापासून वंचित होते.
 
तेव्हा सुद्धा कपाट उघडलं की आईच्या व माझ्या खणात असलेली विविध रंगांची रेलचेल दिसते.. आणि बाबा व भाऊ यांच्या खणात ठराविक काळा, पांढरा, राखाडी, आकाशी, चॉकलेटी, अतीच झालं तर लिंबू कलर वगैरे, आणि संघ गणवेशाचा खाकी एवढेच रंग दिसतात ह्याची नोंद मेंदूने घेतली होती.

पुढे स्वतःलाच मुलगाबाळ (मराठीत- बेबीबॉय) झालं, तो मोठा होऊ लागला. आता हा बारका रंगांशी कसा वागतो ह्याचं कुतूहल वाटायला लागलं. रांगत्या वयापासून त्याला माझ्या बॅग्स तयार करण्याच्या खोलीत मुक्त प्रवेश दिलेला आहे. नको असलेली छोटी कापडं, चिंध्या खेळायला दिल्या आहेत. शिवाय मी आणि माझ्या मदतनीस आपसात बोलत असतो ते त्याच्या कानावर पडत असतंच. 
"ह्याला हिरवी चेन लावू की पोपटी?" असं विचारताना कुठल्या दोन चेन मावशीच्या हातात आहेत हे तो बघत असतो, त्यामुळे रंगांच्या बाबतीत अगदीच 'हा' नाही राहिलाय😁 आणि नेहेमीच्या ढोबळ रंगांपेक्षा वेगळे असे बरेच रंग त्याने ऐकलेत.

नवरा मात्र रंगांच्या ज्ञानात जरा 'हा'च म्हणायला हवा.. तरी हल्ली रंगांचं नाव उच्चारल्यावर साधारण काय प्रकारचा रंग असावा ह्याचा त्याला तर्क करता येतोय- उदा. शेवाळी म्हणजे शेवाळ असतं कातळावर तसा असावा, किंवा डाळींबी रंग आणि डाळिंब फळ, अमसुली रंग आणि बरणीतलं आमसूल, लेमन यलो आणि लिंबू, यांचा काहीतरी परस्परसंबंध असेल इतपत प्रगती आहे. 

पण एकदा आमच्या दुकानात एक काकू छत्री विसरून गेल्या. घरी जाऊन त्यांचा फोन आला, "अरे अजय, तिथे मी माझी छत्री विसरले बहुतेक, राणी कलरची छत्री आहे का रे तिथे?"
"ऑ?? राणी कलर??? इथे तीन छत्र्या आहेत, त्यातल्या कुठल्या छत्रीचा रंग म्हणजे "राणीकलर" ते बघायला तुम्ही या इथे" असं सांगून फोन ठेऊन दिलंन🤣🤣🤣
कुठली राणी ह्या रंगाची होती कुणास ठाऊक? व्हिक्टोरिया की लक्ष्मीबाई? असं पुटपुटत हतबुद्ध झाला फक्त!

मग ही कैफियत ऐकून "अरे चिंतामणी कलर ह्या नावाचा पण रंग असतो, माहित्येय का तुला?" असं विचारून आणखी बुचकळ्यात टाकला त्याला..

आता खरी गंमत पुढेच- अबीरला अगदी रंगवून गोष्ट सांगत होते- टोपीवाला आणि माकडे. तर त्या टोपीवाल्याकडे खूप टोप्या होत्या.. त्यांचं वर्णन करायचं तर रंगांच्या नावांची जंत्री आलीच. लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या, काळ्या, पांढऱ्या... असं करत करत अबीरकडून जास्तीत जास्त रंगांची नावं काढून घेत गोष्ट पुढे सरकत होती.. अबीर आठवून आठवून रंगांची नावं सांगतोय.. त्याच्याकडचा रंग-नाव-संग्रह संपत आला तशी शेवटी फिक्कट निळा, गडद निळा, असं सुरू झालं.. 

मग बाबा मदतीला धावून आला.. "अरे 'विनायक कलर राहिला !!"
आता चक्रावायची वेळ माझी होती...माझं हे 🤔🤔🤔 असं तोंड झालेलं बघून अजयला वाटलं काहीतरी गडबड आहे.
"असतो ना ग असा रंग? तूच मागे  कधीतरी म्हणत होतीस🤣"
मग एकदम ट्यूब पेटली..
"अरे! विनायक नाही रे बाबा, चिंतामणी! चिंतामणी कलर😂😂😂"
असो तसंही सुभाषितकारांनी म्हटलेच आहे- "सर्वदेवनमस्कारा: केशवं प्रति गच्छति"
चिंतामणी काय नि विनायक काय..
उद्या रामा ग्रीन सारखा लक्ष्मण ब्ल्यू दिसला कुठे तरी आश्चर्य नको वाटायला!

©ऐश्वर्या पेंडसे जोशी



27 May, 2021

आम्ही आंबेवाल्यांच्या लेकीसुना

आपल्या आडनावापुढे ब्रदर्स, बंधू, सन्स असं लिहिलेले कित्येक उद्योग आपण बघतो- चितळे बंधू, देसाई बंधू, जोशी अँड सन्स वगैरे.. मुली सासरी जाणार आणि सासरच्यांना आवडेल ते करणार (नोकरी, व्यवसाय, गृहिणी) ही मानसिकता व वस्तुस्थिती दोन्ही आहेच. त्यामुळे पेंडसे भगिनी, (किंवा बंधूभगिनी) जोशी अँड डॉटर्स असं कुठे ऐकलंय का हो कुणी??? मी तरी अपवाद म्हणून सुद्धा असं उदाहरण बघितलेलं नाही.

वास्तविक आम्हा आंबेवाल्यांच्या घराघरातून अगदी तीनचार वर्षांचे झाल्यापासूनच मुलामुलींना व्यावसायिक कामात सहभागी केलं जातं. यथावकाश लुडबुडीचं रूपांतर वाकबगार सफाईदार काम करणाऱ्या व करवून घेणाऱ्या जबाबदार व्यक्तीत कधी होतं ते घरात कुणाला कळतही नाही. शाळा कॉलेजच्या सुटीच्या काळातच आंब्याच्या कामांची धामधूम असल्यामुळे बरोबर कामाच्या वेळेत घरातली मुलं कामाला उपलब्ध होतात. मे महिन्याच्या सुटीत उशिरा उठणे, फिरायला जाणे, पत्ते खेळणे हे आंबेवाल्यांच्या पोरांना कधी जन्मात ठाऊक नाही!

काळ पुढे सरकत जातो.. मुलंमुली हळूहळू एकेक जबाबदाऱ्या घ्यायला शिकतात. आणि अचानक लग्नाची वयं येऊन ठेपतात. 20 किलोचा आंब्याने भरलेला क्रेट डोक्यावर घेण्यापासून ते समोरच्या पार्टीबरोबर/ ट्रान्सपोर्टवाल्याबरोबर फोनाफोनी करण्यापर्यंत.. आणि लादी पुसण्यापासून बँकेची कामे करण्यापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या समान उचलणाऱ्या मुलगे व मुलींच्या वाटा इथे बदलायला लागतात.

मुलगे जर वडिलोपार्जित आंबा व्यवसायात येणार असं ठरलं, तर ह्या सगळ्या कष्टमय आयुष्यात साथ देणारी बायको भेटणार का, आणि भेटली तर ग्रामीण किंवा निमशहरी ठिकाणी टिकणार का... 

मुलींपुढे प्रश्न असतो- दुसऱ्या कोणत्या आंबेवाल्यांच्या मुलाशी लग्न करावं की हे कष्टमय आयुष्य आता ह्यापुढे आपल्या वाटेला येणार नाही असा महानगरातील मुलगा निवडावा.. ऑप्शन्स दोन्ही उपलब्ध असतात😄😄😄

कोणता ऑप्शन निवडावा हे मुलींच्या स्वभावावर आणि लहानपणापासून आपल्या आईला घरात मिळणाऱ्या वागणुकीवर आवलंबून असते. ऐन आंबा सिझन मध्ये नेहेमीची घरकामे, आलागेला, गडीमाणसे, पाहुणे, चहापाणी, स्वयंपाक हे सगळं सांभाळत दिवसभर व्यवसायात कष्ट करून वेळ पडली तर संध्याकाळी कामगार घरी निघून गेल्यावर आलेला आंब्याचा ट्रक लोड किंवा अनलोड करायलाही मागेपुढे न बघणारी आई- आणि ह्यावेळेच्या माहेरपणात वहिनीने सांदण काही करून घातले नाहीत आणि ताटावर पाटावर केलं नाही... म्हणून बोल लावणारी आत्या ज्यांना आहे त्या मुली करतील का आंबेवाल्या मुलाशी लग्न?

पण माहेरपणाला येऊन राहिल्यावर "वहिनी, घर व स्वयंपाक मी बघते- तू जा गडीमाणसांच्या पाठीवर बिनधास्त" असं आईला म्हणणारी आत्या ज्या मुलींना मिळते.. त्यांच्यासाठी हा आम्रमहोत्सव कष्टमय न वाटता खरोखर उत्सवच बनून जातो. त्यांना चालतो मग आंबेवाला नवरा😄 अर्थात ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पिढीसाठी - की ज्यांना पालक विचारतात की कश्या प्रकारचा नवरा हवा तुला म्हणून! 

पूर्वी मुलींना चॉईस नव्हता, किंवा चॉईस विचारला तरी अति अटी घालायची परवानगी नव्हती तेव्हच्याही आंबेवाल्यांच्या लेकी- शहरात सासरी राहून माहेरच्या आंब्यांची विक्री करताना दिसतात.. गिरगावातील चाळीतल्या चिमुकल्या घरात माहेरहून आलेले गाडीभर आंबे विकणं ही काय गंमत नव्हे.. मुलांची सुट्टी संपण्यापूर्वी एकदा माहेरी जाऊन येऊ म्हणून पहाटे निघून दुपारला घरी पोचलेली माहेरवाशीण- घरामागच्या कारखान्यात ऐन रंगात आलेलं कॅनिंग आणि त्यात रंगलेले दादा वहिनी बघून हातपाय धुवून ताबडतोब गॅसच्या शेगडीचा ताबा घेते ती ह्याच संस्कारातून..

आताच्या काळात आम्ही 'हल्लीच्या मुलींमधून'- (बरेचदा शिवीसारखा वापरला जाणारा शब्द) एखादी मुलगी लग्न करताना जवळच्या शहरातील, नोकरी करणारा, आखीवरेखीव रुटीन असलेला, फ्लॅटमधला नवरा निवडते, त्यामागचं- आपला लहान भाऊ जाणता होऊन वडिलांच्या हाताशी येईपर्यंत दरवर्षी आंब्याच्या दिवसात माहेरी मदतीला जाता येईल- नवरा आला तिकडे मदतीला तर त्याच्यासह नाहीतर त्याच्याशिवाय😄 -  हे कारण असू शकतं. खरं वाटेल का हो कुणाला?

लग्न करून महानगरात गेलेल्या आंबेवाल्यांच्या लेकी- आंबे विकतात हे तर अगदी कॉमन.. पण परत जाणाऱ्या रिकाम्या ट्रकमधून काय काय परत पाठवलं जातं माहेरी? रिकाम्या बॉक्समधील उरलेला पेंढा- पुन्हा वापरायला होईल, आंबे संपले की तो पेंढा गुरं खातील, अगदीच काही नाही तर बंब पेटवायला होईल.. तीच गत नारळाच्या करवंट्या व शेंड्यांची! 

एकदा सरसकट झाले की फणसाला कुणी विचारत नाही कोकणात. "असतील तितके फणस पाठवा बाबा" असं आत्मविश्वासाने सांगणाऱ्या मुलीच्या अंगात कामाचा उरक किती असेल हे गरे विकत घेणाऱ्याना कळणार नाही. पहाटे साडेचारला उठून घरादाराचा चहा-नाष्टा, स्वयंपाक करून ही पुण्याच्या फ्लॅटमध्ये विळी मांडून फणस फोडायला बसते, आणि आठ वाजेपर्यंत काप्या गऱ्यांच्या 200 ग्रामच्या सुबक पिशव्या भरून तयार ठेवते.. कच्चे गरे चिरून उकडगऱ्याच्या भाजीसाठी विकते... उरल्या सुरल्या आंब्याचा मुरांबा, मावा, करून एकही आंबा फुकट जाऊ द्यायचा नाही हे सगळं सोपं नाही. हे कष्ट आणि वेळ व्यवस्थापन एकत्र आणायला कारणीभूत होतं आंबेवाल्यांच्या घरातले बालपण.

हल्ली रिसेलिंगचे पेव फुटलेले आहे.. जो तो उठून whatsapp स्टेट्सला असंख्य फोटो चिकटवून ऑर्डर घेतात व वस्तू परस्पर पाठवायला सांगतात.. ते वाईट आहे असं मुळीच नव्हे.. पण एक साधारण निरीक्षण असं की नवरा भरपूर पगार कमवत असेल तर हे रिसेलिंग प्रकरण फार काळ टिकत नाही.. पण इथून कोकण प्रॉडक्टस st पार्सलने मागवा, स्कुटरवर लादून, हमाली करत घरी आणा, प्रत्येकाची चव घ्या, वैशिष्ट्ये सांगा.. लोकांची वर्दळ किंवा होम डिलिव्हरी पोचवणे.. लोकसंपर्क आलाच आहे तर अश्या काही सेवा ह्या मुली पुरवतात की जे शहरात वाढलेल्या मैत्रिणींना कठीण आहे, पण असमच्यासाठी हाताचा मळ आहे- जसे नारळ खरवडणे, नारळाचे दूध काढून सोलकढी, तांदुळाच्या पिठाच्या उकडीच्या भाकऱ्या आणि उकडीचे मोदक😋...हे सगळं करत असताना घरातील ज्येष्ठ, लहान मुलं, आणि वर्क फ्रॉम होम वाला नवरा सांभाळणे हे सगळं ह्या लीलया जमवून आणतात. अर्थात ह्यासाठी घरभर जो काय देखावा बनतो तो फ्लॅटमध्ये सहन करणाऱ्या ह्या तायांच्या सासूसासऱ्यांना अभिवादन!

माहेरचे आंबे उशिरा आले, तोपर्यंत दर कोसळले.. प्रक्रिया करण्यासाठी मनुष्यबळ नाही.. अश्या स्थितीत एक मुलगी आपल्या इंजिनियर होऊन mba करत असलेल्या मुलाला कामाला लावते- आणि शहरातील मध्यवर्ती चौकात - जिथे खेडेगावातील लोक भाजीपाला फळे विकायला रस्त्यावर बसतात.. त्यांच्या रांगेत बसून हा सुशिक्षित हँडसम पोरगा आजोळचे आंबे विकून मोकळा होतो!  आता सोशल मीडिया हा विक्रीचे ठिकाण झाल्यावर इथे घेतलेल्या ऑर्डरी जरी बटणं दाबून मिळवल्या तरी कुरियर ऑफिसपर्यंत आंब्याची स्वतः हमाली करायला ही आंबेवाल्यांची नातवंडं लाजत नाहीत.

आंब्याच्या दिवसातील कामं हे कष्ट नसून उत्सव आहे असं मत असूनही कॅनिंगवाला नवरा नको ही अट सुद्धा ह्या कॅनिंगवाल्यांच्या पोरी घालतात ह्याला काय म्हणावं🤣🤣🤣 आता भलावण कुठल्या रसाची करावी मग अश्या  परिस्थितीत सांगा.. रायव्हलरी नावाचा प्रकार असतोच की हो. त्यापेक्षा ती भानगडच नको. माहेरचा ब्रँड जे पदार्थ बनवत नाही तेच पदार्थ सासरच्या ब्रँडमध्ये बनवायचे.. हा एक फंडा. सासर माहेर जवळच्या अंतरात असल्यामुळे  मुरंब्याची पूर्वतयारी सासरी करून माहेरी पाठवायची- मुरंबा तिकडे करतील.. सासरी पिंप/क्रेट/ट्रे कमी पडतायत- माहेरहून आणायचे-- हे ही प्रकार आंब्यांच्या लगीनघाईमध्ये होऊन जातात.

आंबेवाल्यांच्या सुना हेही असंच अजब रसायन असतं.. ह्या आंबेवाल्यांचा लेकीसुद्धा असतील तर ठीक, पण ह्या इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या पूर्वाश्रमीच्या शिक्षिका, काउन्सेलर, चित्रकार, विशेष मुलांच्या ट्रेनर अश्या विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या असतात.. कित्येकदा माहेरी संपूर्ण नोकरीपेशाचं वातावरण असतं. कित्येकीचं बालपण महानगरात गेलेलं असतं आणि इथे 12-14 तासांची अव्याहत ड्युटी करत असतात. 

कामगार मंडळींशी खेळीमेळीचे संबंध ठेवतानाच, "वैनी बघतायत" ह्या एवढ्या धाकाने पटापट कामे करवून घेतात. बरोबरीच्या मैत्रिणी उन्हाळा आला म्हणून नवरा आणि पोरांबरोबर थंड हवेच्या ठिकाणी जात असतात, आणि ह्या मात्र धगधगत्या चुलीजवळ रस आटवत नाहीतर गरे तळत उभ्या असतात नाहीतर कडक उन्हात साठं वाळत घालत असतात.. 

आता कोरोना आहे म्हणून सोडा, पण लग्नकार्याचे दिवस असताना लोक नटूनथटून समारंभाला जात असतात तेव्हा ह्या धुवट कॉटनचे कपडे घालून, केसांच्या बुचड्यावर कॅप चढवून कपड्यांवर आमरसाचे डाग मिरवत असतात.

मे महिन्यात माहेरी जाणे ही जनतेची कॉमन गोष्ट असताना- आंबेवाल्यांच्या सुना मात्र माहेरी तर राहोच, दीड महिना घराबाहेर सुद्धा पडू शकत नाहीत.. पार्लर, शॉपिंग हे तर कोसो दूर राहिलं.

 तरुणपणी हेच सगळं अनुभवलेल्या, आता घराची आघाडी व नातवंडं सांभाळणाऱ्या आणि संध्याकाळी दमून घरी आलेल्या मुलगासुनेला चहाचा कप देणाऱ्या सासूबाई सुद्धा मुळात आंबेवाल्यांची सूनच पण त्यांना ह्यात मुरून आता बराच काळ झालाय. पण आत्ताच्या पिढीतील जोडप्यालाही आंब्याच्या दिवसात संध्याकाळी एकत्र फिरायला बाहेर पडणे परवडत नाही.. आंबेवाल्यांच्या सुना हे चालवून घेतात.  कारण ह्या दिवसात सासूसासऱ्यांबरोबर बसून दिवसभराचा आढावा, लिखाण,गप्पा व उद्याचं नियोजन ह्यावर चर्चा करणं अतिशय गरजेचं असतं.. हे त्यांना पटलेलं असतं!

 ज्यांच्याकडे ह्या एवढ्या धामधुमीत सुद्धा रोजचा सोवळ्यात स्वयंपाक, नैवैद्य असतो त्यांचे तर आपण पाय धरावेत फक्त.. आणि ज्यांच्याकडे मे महिन्यात पाहुण्यांचा पाऊस पडतो, आणि सासुरवाशिणीने त्यांची बडदास्त ठेवावी अशी अपेक्षा असते त्यांच्यासाठी- "आता तरी सुधारा रे प्लिज!"

तुम्ही म्हणाल, काय मोठं कौतुक आलंय ह्यात.. स्वतःच्या चरितार्थासाठी तर कावळे चिमण्या पण कष्ट करतात.. खरं आहेच ते. पण- 
तुळशीचं आणि सब्जाचं बी मिक्स झालंय काय करू ?..
उपासाला वांग्याचे काप चालतील का ?..
उजव्या डोळ्याची पापणी दुखते,घरगुती उपाय सांगा...
अश्या गहन विचारात फेसबुकावर वेळ घालवणाऱ्या किंवा महागाई झाली आहे बेरोजगारी वाढली आहे असं आळवणाऱ्या लोकांना दुसरीही बाजू कळवी म्हणून हे लिहावंसं वाटलं..

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

11 March, 2020

शिमगोत्सव

संकासूराची बायको मेली,
सायाच्या पानात गुंडलून नेली,
सायाच्या पान फाटला,
म्हातारीचा डोस्का आपाटला!!!

आमच्या लहानपणी शिमग्याचे दिवस आले की हे 'अभिजात काव्य'😉 दिवसातून कित्येकवेळा ऐकायला यायचे! ते ऐकायला आले की "संकासूर आला, संकासूर आला असं ओरडत आम्ही तो संकासूर बघायला धावायचो. चित्रविचित्र- चिवटेबावटे कपडे घालून तोंडावर मुखवटा (मास्क) लावून येणारे संकासुर वरील गाणं म्हणत म्हणत घरोघरी नाचायचे.. मग लोक त्यांना काय ते पैसे वगैरे द्यायचे.

आमची आजी त्यांना म्हणायची की "दरवर्षी एकच कसलं रे तुमचं गाणं.. आणि प्रत्येकवेळी बायकोला मारता रे कश्याला??"😂... मग दुसरं काव्य यायचं..
पॅकपॅकपॅकपॅक बदक वराडतो
कोनाच्या घरी जातो...😃

आता हे सगळं अगदी पोरकट वाटतं.. वाढत्या आर्थिक सुबत्तेचा परिणाम म्हणून त्याचप्रमाणे ह्या पोराटकी संकासुरांना काही धार्मिक अधिष्ठान नसल्यामुळे हे संकासुर यायचं प्रमाण आता खूपच कमी झालं. पण त्या वयात व त्या काळात हा प्रकार खूपच मनोरंजक वाटायचा!

ह्याच दिवसात येणाऱ्या पालख्या मात्र अजूनही येतात.. त्यापैकी रेवली नावाच्या गावाची पालखी येते तिच्याबरोबर संकासुर असतो. विशेष म्हणजे हा संकासुर कुणी लहान पोरगा नसून अगदी मोठ्ठा बाप्या माणूस असतो.. त्याचे ते काळे काळे कपडे, उंचच उंच काळी टोपी.. सगळंच आम्हाला तेव्हा अद्भुतरम्य व किंचित भीतीदायक पण वाटायचं, तरी संकासुर बघण्यातली गंमत कधी कमी नाही झाली...

इथे पंचनदीला फक्त 40 किलोमीटर अंतराचा फरक, पण शिमग्याची पद्धत प्रथा थोडीफार वेगळी..इकडे  ह्या संकासुरसदृश सोंग घेऊन येणाऱ्यांना 'नकटा' म्हणतात.. तो बघायचा यंदा प्रथमच योग्य आला. तो नकटा म्हणजे अगदी भीतीदायक प्राणी.. लोकांना, लहान मुलांना घाबरवून सोडतो.. त्याला बघून लोक जोरजोरात किंचाळत पळत सुटतात आणि क्वचित तो नकटा पण लोकांच्या मागून पळत सुटतो, अशी एकूण सगळी गंमत.

नकट्याबरोबर नाच्या असतोच. म्हणजे नऊवारी साडी नेसलेला सालंकृत पुरुष. टीव्ही वर असले चाळे फार झाल्यामुळे ते अगदी डोक्यात जातात पण इथे तसं नसतं. लोकगीते म्हणत त्यावर नाच करणाऱ्या नाच्यांमध्ये लोक साक्षात देवाचं रूप बघतात. हळदीकुंकू लावून, आरती ओवाळून त्याचा सन्मान करतात. मागच्या वर्षी आमचं व नणंदेचं अशी दोन्ही मुलं लहान होती तर सा बा नी नाच्याची ओटी भरलेली- दोघींची बाळंतपणे सुखरूप झाली ह्याबद्दल देवाची कृतज्ञता व लेकरांचं सगळं व्यवस्थित होउदे म्हणून प्रार्थना अश्या अर्थाने. खरं तर नाच्या म्हणजे रोज तुमच्या आमच्यात वावरणारा, नॉर्मल नोकरी व्यवसाय करणारा, बायकोमुलं असलेला संसारी पुरुष. पण शिमग्यात हौसेनी व भक्तभावानी नाच्या म्हणून जातात.

भैरीचा झेंडा येऊन गेला, खेळ्यांचा नाच वगैरे झाले की वेध लागतात पालखीचे. मुर्डीसारखं इथे खूप खूप पालख्यांचे प्रस्थ नाहीये. एकमेव पालखी येते- तीही घरी नव्हे. घराच्या मागे सुपारीचे आगर, त्याच्यामागे नदी, नदीपलीकडे डोंगर चढून गेलं की कलमांची बाग, त्या बागेत असलेल्या वाड्यासमोर पालखी येते. ही आडी गावच्या सातमाय न्हावनकरीण देवीची पालखी.

धुळवडीच्या दिवशी संध्याकाळी तिन्हीसांजेला पालखीचे आगमन. मुर्डीला जसे ढाकुमाकूम ढाकुमाकूम असा साताईचा बाजा वाजतो, ताडीलचा भैरी धाताडधाडधाड  धाताडधाडधाड असा वाजतो, तशी ही सातमाय न्हावनकरीण येते तिच्या बरोबरच्या वाद्यांचे बोल असतात, "ढगाशी बसलाय" 😂😂😂

ते ढगाशी बसलाय ऐकू यायला लागलं की सर्व सरंजाम- ओट्या, पुजेचं साहित्य, प्रसाद, सतरंज्या, सोलर कंदील, पिण्याचे पाणी वगैरे घेऊन नदी ओलांडून डोंगर चढून कलमात जायचं. हळूहळू गावातील आबालवृद्ध स्त्रीपुरुष तिथे यायला लागतात. ज्येष्ठ मंडळी, प्रौढ महिला मंडळ सतरंजीवर बसून घेतं आणि तरुण मंडळी  अजून डोंगर चढून रस्त्यापर्यंत जातात --- पालखीत बसून आपल्याला भेटायला येणाऱ्या देवतेला आणायला म्हणून. आपण पाहुण्यांना आणायला कसे कौतुकाने, प्रेमाने स्टेशनवर जातो, तसेच!

कालही असेच आम्ही पालखीच्या स्वागताला म्हणून डोंगर चढून गेलो. हळूहळू काळोख व्हायला लागला, आणि 'ढगाशी बसलाय' असा आवाज करत, बॅटरीच्या उजेडात पालखी आलीच. झटकन पुढे होऊन अजय- पुष्करने (नवरा आणि दिर) पालखी खांद्यावर घेतली व आम्ही चालत बरोबर निघालो. बिनचप्पलानी काळोखातून दगडधोंड्यातून चालायच्या ह्या प्रथा- माणसाचा कणखरपणा टिकवण्यासाठी आजही तितक्याच उपयोगाच्या वाटतात मला.

दुतर्फा असलेल्या आम्रवृक्षांच्या कमानीतून पालखीने वाड्याच्या आवारात प्रवेश केला. "जय बोला डबुल्या"- असं म्हणतात तिथे😀 बहुतेक पालखी उचलणाऱ्यांना जोर यावा म्हणून वापरला जाणारा शब्दप्रयोग असावा. पालखीच्या खुरांवर दूध पाणी घालून प्रसादकाकांनी पालखीचे स्वागत केलं. सतरंजीवर पालखी विराजमान झाली. मग सासऱ्यानी, प्रसादकाकांनी पूजा केली. घरातील महिलामंडळीनी(म्हणजे आम्हीच) देवतेची ओटी भरून झाली. घरातील सर्वांचे दर्शन घेऊन झाले. मग जमलेल्या सर्व पुरुष मंडळींनी रांगेत दर्शन घेतले आणि महिला वर्गाने तसेच रांगेत येऊन ओट्या भरल्या.

सर्व मंडळींचे दर्शन होईपर्यंत सुरू झाला परत नाचाचा कार्यक्रम. तिथेही नाच्ये आले होते. देवादिकांच्या भक्तीगीतांपासून ते काही वात्रट म्हणावे असे आशय असलेली ती गाणी आजच्या काळातही जमलेल्या गर्दीचे मनोरंजन करत होती. ती कुणी रचली असावीत हा एक कुतूहलाचा विषय आहे. एक नवविवाहित मनुष्य तिथे आल्यावर सुरू झालेल्या गाण्याचे शब्द होते -'" घेऊन चला पतीराज मजला चौपाटीला"😂😂😂  तर "मुंबईची बायको, कोकणचा नवरा, हिला पसंत येईल काय" ह्यात काय ते सामाजिक वास्तव का कायसं दाखवलं असावं🤣🤣🤣 "फ्याशनवाला पती मिळाला फ्याशन मी करते" - असली इंग्रजीप्रचुर गाणी पण त्यात होती..फक्त त्यात नॉयलॉनची साडी हा लेटेस्ट ट्रेंड उल्लेखिला असल्याने त्या गाण्याचा काळ सहज कळून येत होता🤣🤣🤣 एकूण हसून हसून लोकांची भरपूर करमणूक चालली होती. एरव्ही शर्ट-पॅन्ट ची सवय असलेले ते नर्तक नऊवारीसाडी सारखा बोजड प्रकार अंगात असताना जे काय भयंकर चपळ नाचतात की त्यांची पावले जमिनीवर कमी नि अधांतरी जास्त असावीत!

सर्वांचे दर्शन घेऊन झाल्यावर नाचाचा कार्यक्रम संपला. मग खेळ्यांमधील मुख्य असलेल्या एकांनी सर्व भक्तांच्या भल्यासाठी प्रार्थना केली, कुणाचे नवस होते ते देवीला सांगितले. प्रसाद वाटप झाले. पालखीतील नारळ तांदूळ वगैरे नीट आवरून ठेवले गेले.

एव्हाना तरुण मंडळींचे हातपाय सज्ज व्हायला लागलेच होते.. तसेच वादकही सज्ज झाले होते. परत अजय-पुष्कर दोघांनी पालखी उचलली आणि पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मग आळीपाळीने एकेकानी पुढे येत बऱ्याच मंडळींनी पालखी नाचवण्याचा आनंद लुटला. अबीरच्या दोन आजोबांनी एका कडेवर अबीर आणि एका खांद्यावर पालखी असे घेऊन नाचवले तेव्हा अबीर तर कमालीचा खुश झाला😍 

बघणारे व नाचणारे ह्या दोघांसाठी हा कार्यक्रम संपूच नये असे वाटणारा! पण वेळेची मर्यादा देवालाही आहेच. त्यामुळे वादन बंद होताच जड मनाने नाचणे थांबले. पालखीला निरोप द्यायला अजय-पुष्कर पालखी खांद्यावर घेऊन काही अंतर चालून गेले व मग पालखी मार्गस्थ झाली.

एव्हाना रात्र बरीच झाली होती. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रप्रकाशात घनदाट झाडीतून परतीच्या वाटेला लागलेल्या पालखीकडे वळून वळून बघत आम्हीही परत फिरलो. पुन्हा पाण्यातून नदी ओलांडून घराच्या दिशेनी निघालो ,तेव्हा अगदी उदास होऊन अबीर मला विचारू लागला, "आई ग, बाप्पा कुठे गेला?" बाकीच्यांच्या मनाची अवस्था मुळीच वेगळी नव्हती

©ऐश्वर्या पेंडसे जोशी