31 August, 2016

गॉन केस!

खूप खूप जुन्या काळी- एखादा मनुष्य वारला कि त्याच्या बायकोचे केस, केशकर्तन व्यावसायिक पुरुषाकडून कापून टाकले जायचे( जुन्या सिनेमा, कथा-कादंबऱ्या ह्यात दाखवलेले असते)

काही काळानंतर- हि केशवपन प्रथा बंद झाली पण "केस आणि कात्री एकत्र येणं म्हणजे काहीतरी अभद्र" अशी समजूत अनेक पिढ्यानी बाळगली. अगदी भावानेही बहिणीच्या केसांना हातसुद्धा लावायचा नाही असा कडक कायदाही त्या काळी होता.
ह्याच काळात जन्मलेल्या काही आज्या-आज 80च्या घरात असलेल्या - जे काय थोडेसे केस शिल्लक असतात ते खूप मोठ्या लांबीसह बाळगून असलेल्या दिसतात, पण केसांना कध्धी-च कात्री लावून घेत नाहीत.

काही काळानंतर- केस कापत राहिल्यास ते व्यवस्थित दिसतात, हेल्दी राहतात..स्वच्छ ठेवायला सोपे जातात हे शोध लागले, आणि दोन पिढ्यांचे संघर्ष उद्भवले.
"सासरी जाऊन काय ती थेरं करा"
हा डायलॉग जन्माला आला. (ज्या नवऱ्याच्या सेफ्टीसाठी हे व्याप पिढ्यानपिढ्या चाललेत त्याची हरकत नसेल तर कापा मग केस, पण त्या नवऱ्याचा जीव धोक्यात घातल्याचं(???) खापर आमच्या डोसक्यावर नको फुटायला!!)

काही काळानंतर- आजी, वडील अश्या कडक पहाऱ्याना चुकवून बंडखोर मुली केस कापायला शिकल्या.कदाचित मैत्रिणी,बहिणी एकमेकींचे.. (आता कापून झाले, आता ओरडूनदेत घरचे.कापून झालेले केस परत डोक्यावर चिकटवू तर शकत नाहीत)

अजून काही काळानंतर- पद्धतशीर केस कापण्याच्या पद्धती, शास्त्र, आणि दुकाने निघाली. ब्युटी पार्लर ह्या संस्थेचा उदय झाला.
******
इथपर्यंत सगळ्या ऐकीव/ वाचिव गोष्टी.. आता आँखो देखा हाल.
******
"चला ह्या रविवारी केस कापायलाच हवेत हो.. खांद्यावर आलेत.. उवा झाल्या तर माझ्या मागे नसतं झेंगट लागेल."  मुलीचे केस आणि ते कापणे ह्याच्याशी बाबांचा दूरदूरवर संबंध उरला नाही- काय करायचाय ते करा गो तुम्ही दोघी..(निदान आमच्याकडे तरी)!! ज्या मुलींना(उदा.अस्मादिक) छोटे केसच आवडत तिथे वादाचा प्रश्नच राहिला नाही..

क्वचित कुणाला असलीच लांब केसांची हौस, "तरी स्वतःचे स्वतः मेंटेन करायला जमायला लागले ना, कि मग करा काय ते केस वाढवायचे नखरे.. मला इथे जमणार नाहीत हे चोचले" हा डायलॉग आया बोलू लागल्या!!

एकदा मी 4 वर्षाची असताना उन्हाळ्यात माझा तुळतुळीत चमनगोटा केलेला, म्हणून आजी आईवर रुसून बसलेली म्हणतात!!😂😂

आमच्याकडे मी जन्माला आल्यापासून ते इयत्ता पहिली- घरी येणाऱ्या बाबूदादा कडून केस कापून घेणे.मग त्याने निक्षून सांगितले- आता ताई मोठी झाली, मी तिचे केस कापायचा नाही..
पहिली ते चौथी- आई तिला जमतील तसे माझे केस कापायची.
पाचवी ते दहावी- वर्षातून 5-6वेळा आत्या,मावशीकडे जाणं झालं कि त्यांच्या शहरातल्या ब्युटी पार्लर मध्ये केस कापायचा कार्यक्रम(तेव्हा इथे हि सोय नव्हती)
11वी ला पुण्यात गेल्यावर तिथे केस कापायचे पैसे दापोलीच्या तिप्पट असल्याने दर सुट्टीत घरी आल्यावर आवर्जून केस कापणे हे काम झालेलं.

आणि हो 3 इडियट्स मधल्या वीरू सहस्त्रबुद्धे मास्तरांची आज्ञा शिरसावंद्य मानलेल्या अनेक भावांसाठी आणि मित्रांसाठी दाढी करणं हे अनप्रॉडक्टिव्ह कार्य आहे तसं- आमच्यासाठी केस कापणे हे कार्य अजिबात अनप्रॉडक्टिव्ह नाहीय्ये-- कारण "मनी सेव्हड इज मनी गेन" का कायसं म्हणतात ना.. तसे केस छोटे म्हणजे शाम्पूची बचत, वेळेची बचत-- आणि बचत-काटकसर-कमाई ह्या बहिणी बहिणीच आहेत कि नै???😂😂😂

पुण्यात असताना तिथे मुलामुलींची एकाच ठिकाणी केस कापायची सोय असलेली ऐकून मला भयंकर धक्का बसलेला. आमच्या वर्गातल्या मुली 'सलॉन'का काय तिकडे केस कापायच्या. माझी बेस्ट फ्रेंड- जी पुण्याची असूनही माझ्यासारखीच बाळबोध उर्फ बावळट- तीही नेहेमी फक्त बायकांसाठी असलेल्या पार्लर मध्येच केस कापायची.
तेव्हा आमच्या दोघींची चर्चा चालायची- का बरं आपल्याला एखाद्या मुलाकडून केस कापून घेणं ऑड वाटतं?? त्या फार पूर्वीच्या लोकांच्या मनात "बाईचे केस पुरुषाने कापणे" ह्यामागे जे संदर्भ होते ते तर आपल्या वशिवर्गी सुद्धा नाहीयेत.. पण कारण असं आहे कि आपल्याला - कोणाही अनोळखी/परक्या मुलाशी कसं वागावं-  हे जे शिकवण्यात आलं आहे, त्यात परक्या मुलाने आपल्या डोक्याला हात लावणं बसत नाही म्हणून आपल्याला ऑड वाटतं!! असा निष्कर्ष काढला होता..
**********
मग अजून काही काळानंतर-
आमचं कॉलेज संपलं, मी पुणे सोडून परत आले.
एक दिवस हि माझी बेस्ट फ्रेंड मला फोनवर सांगायला लागली, कि

"हाय!! ऐक.. गंमत ऐक.. आज त्या जावेद हबीब कडून जाऊन मी केस कापून आले. आपल्याला वाटायचं तसं काहीच ऑड नाही वाटत!! उलट त्या मुलाने अगदी सफाईदार आणि झटकन केस कापले. आणि लेयरकट म्हणजे लेयर कसे मssस्त दिसतायत.. आपण डॉक्टरांकडे नाही का जात, तितकं सहज आहे हे!!"

अरेच्चा खरंच कि!! इतक्या वर्षात डॉक्टरबद्दल कधी असं वाटलं नाही ते आपल्याला कि हा परका माणूस आपल्या डोळ्यांची कातडी हाताने ओढून डोळ्यात बॅटरी मारतोय!! किंवा हात धरून पल्सरेट मोजतोय.. तसंच हा केस कापणारा माणूस!! काळ बदलला कि संदर्भ बदलतात ते असे!!

30 August, 2016

नाव आणि आडनाव!

माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाला आपापल्या आडनावाचा अभिमान वाटतोच, मग ते काहीही असो. शाळेत असताना तर सगळे जण एकमेकांना संपूर्ण नावाने ओळखायचे. ऐश्वर्या अनिल पेंडसे, अश्याच प्रकारे आमच्या दहावीच्या वर्गातल्या बहुतेक सगळ्या मुलामुलींची संपूर्ण नावं अजूनही माझ्या लक्षात आहेत. पण नंतर कॉलेज पासून बघितलं तर बहुतेक लोक फक्त पहिल्या नावाने स्वतःची किंवा दुसऱ्याची ओळख करून देतात. हे अगदीच विचित्र वाटतं. आपल्याला जर आपल्या आडनावाचा अभिमान वाटत असेल तर ते लपवावं असं का वाटत असेल? ह्याला फॅशन म्हणायचं का जात लपवायचा आटापिटा म्हणायचं कोण जाणे?

काही काही लोक तर ह्या बाबतीत अर्क असतात. ऑर्डर द्यायला किंवा तत्सम व्यावसाईक कारणाने फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटीत पहिल्यांदाच बोलत असताना पण फक्त पहिल नाव सांगतात. आडनाव विचारलं तरी म्हणतात कि
"नको, फक्त पूजा एवढच सेव्ह करा."

आता पूजा हे काय अगदी एकमेवाद्वितीय नाव आहे का काय? अश्या नावांचे तर डझनावारी लोक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असतात, मग आडनाव असल कि नक्की कोणती पूजा ते लगेच लक्षात येत नाही का? पण ते नाही. अश्या कॉमन नावाच्या लोकांच्या आडनावाचे उल्लेख केले नाहीत तर साहजिकच एकसारखे गोंधळ निर्माण होतात.

होस्टेलवर असताना आम्ही चार मैत्रिणी एका रूमवर राहत होतो आणि चार वेगळ्या कॉलेजमध्ये शिकत होतो, प्रत्येकीचे क्लास, मित्रपरिवार वेगवेगळा होता, आणि सगळ्यांच्या वर्तुळात प्रत्येकी ३-४ राहुल नावाचे मित्र होते. त्यामुळे रूमवर गप्पा मारताना आणि एकमेकींच्या अनुपस्थितीत निरोपांची देवघेव करताना आडनावाच्या अभावामुळे भयंकर घोटाळे व्हायचे.

घरात आदितचे सत्राशेसाठ मित्र फोन करतात, "आदित्य आहे? वैभव बोलतोय."
मग मातोश्री विचारतात- "कोण वैभव? त्याला वैभव नावाचे खंडीभर मित्र आहेत, तू कुठला?"

तश्या मैत्रिणी, कष्टमर, ओळखीतल्या मिळून माझ्या ओळखीत मणभर अमृता आहेत. पण माझी बेस्ट फ्रेंड अमृता आहे, तिच्या फोनला मात्र आमच्या घरात आडनाव सांगितले नाही तरी सहज प्रवेश देण्यात आलाय..

आमच्या घरात आता अर्चना आणि आदित्य ह्या नावाचे प्राणी एवढे साठलेत कि ह्यापुढे पाचपन्नास वर्ष तरी ह्या दोन नावांवर बंदी आणायला हवी असं वाटायला लागलाय.

तर ह्या सगळ्यामुळे आम्हाला सगळ्यांना बहुतेक ठिकाणी नाव सांगताना संपूर्ण नाव किंवा निदान नाव-आडनाव असच सांगायची सवय लागल्ये. आमचे बाबा तर ह्या बाबतीत कधीकधी इतके काटेकोर, कि  आम्हाला फोन केल्यावर (खरं तर मोबाईलवर फोन केल्यावर हेही सांगायची गरज नाही, पण तरी...) "मी बाबा बोलतोय" असं म्हणावं कि नाही?? पण नाही!!
"हां, अनिल पेंडसे बोलतोय. जेवायचे थांबलोय, वेळेवर घरी या"- आता काय बोलणार! एकदा तर बाबांनी कहरच केलेला.

गावच्या उत्सवासाठी सगळे काका, आत्या सहकुटुंब घरी आलेले त्यामुळे तीन चार दिवसांसाठी घरात ३५ -४० लोक होते. एवढ्या सगळ्यांच्या आंघोळी सकाळी वेळच्यावेळी व्हायच्या तर बंबात सतत विस्तव पेटता राहायला हवा होता, आणि ही जबाबदारी माझ्याकडे होती.

आगरातून जळवण गोळा करून आणलं ते बंबात घालून आता विस्तव परत धगधगवायचा... पण बाथरूममध्ये कोणी असेल तर धूर कोंडायला नको, म्हणून मी विचारलं कि बाथरुममध्ये कुणी आहे का? तर आंघोळ करता करता बाबांनी जोरदार उत्तर दिलं, "हो मी आहे अनिल पेंडसे!"

आजूबाजूला वावरत असलेल्या लोकांची हे उत्तर ऐकून अक्षरशः हसून हसून मुरकुंडी वळली. अजून पण हि आठवण निघाली कि आम्ही बाबांना विचारतो काय मग अनिल पेंडसे? आंघोळ झाली का?

26 August, 2016

पोहोण्याची पर्वणी

पावसाळा आणि पोहोणे हे पाठोपाठ येणारे शब्द आहेत निदान आमच्या मुर्डीत तरी. मुर्डीत जन्माला आलेली व्यक्ती आणि पोहोता येत नाही असे बहुतेक कुणी नाहीच. आत्ताच्या पिढीतच नव्हे तर आत्ता ८० च्या घरात  असलेल्या आत्याआज्या सुद्धा बिनधास्त पोहोणाऱ्या आहेत/होत्या. पूर्वी कदाचित असा उद्देश असेल कि विहिरीवर पाणी भरायला गेलं आणि पाण्यात पडल तरी धोका नसावा. आता तो उद्देश तर असतोच, पण ते कौशल्य आत्मसात झालच पाहिजे, किंवा फिटनेस साठी म्हणून.. उद्देश  काहीही असला तरी ४-५ वर्षाच्या पुढच प्रत्येक पोर पावसाळा सुरु झाला कि तळ्यावर प्रकट होतंच.

लहान असताना मोठे दादा ताई पोहायला जायचे तेव्हा काठावर बसून गम्मत बघायची. मग एका पावसाळ्यात पालक फतवा काढतात चला आता पोहायला शिकायचय यंदा. तेव्हा आधी भीती, क्वचित रडारड होऊन मग कानात तेल बिल घालून, पाठीवर बोया (कोळीवाड्यात उपलब्ध असलेली एक वस्तू जी दोरीत अडकवून कमरेला बांधली कि बुडू म्हटलं तरी बुडता येत नाही.) बांधून पोहायला सुरुवात. मोठ्या मुलांपैकी किंवा काका लोकांपैकी कुणीतरी काठाकाठाने सोबत म्हणून नवशिक्याच्या  बरोबर असतात. देवळासमोरच्या तळ्यात हि शिकवणी चालते. तळ्याच्या आतल्या बाजूने एक दगडी कठडा तळ्याच्या भिंतीच्या बाहेर आलेला असा आहे, कि त्या फुटभर रुंदीच्या कठड्यावर उभं राहिल्यावर मोठ्या माणसाच्या कमरेइतक पाणी असेल. त्याच्यावर उभं राहून कोचगिरी करायला बर पडत. भीत भीत आधी काठाकाठाने, मग मध्यातून, अस करत करत उडी मारण्यापर्यंत मजल जाते. कोणी अतीच नाटकं करायला लागलं, तर बकोट धरून सरळ पाण्यात ढकलून देण्याचा जालीम उपाय केला जातो. मग उडी मारण्याच कौतुक सगळ्यांना दाखवून होत आणि मग पाठीचा बोया कधी अनावश्यक होतो ते कळतच नाही.

मुंढा (पाण्यात उडी मारायचा एक प्रकार- उंच उडी मारून पाण्यात पडण्यापूर्वी हवेतल्या हवेत दोन्ही पायांचं मुटकुळ करून पाय पोटाशी धरून धाप्पाक्कन पाण्यात पडणे), बुडपोहाणी(पाण्याच्या खाली जाऊन पोहोणे- संकटकाळी ह्याचा उपयोग खरा,)  तसेच तळ्याची खर काढणे म्हणजे तळ्याच्या तळापर्यंत जाऊन माती घेऊन येणे. सूर हा अत्यंत देखणा प्रकार, हे सगळे टप्पे ओलांडून झाले कि मग तो मनुष्य अशी पात्रता कमावतो कि चिल्यापिल्यांचे पालक त्याच्या भरवशावर पोरांना पोहायला पाठवतात बिनधास्त.

इतक चांगल पोहोता यायला लागल कि तासंतास पोहण्याचा आनंद केवळ शब्दातीत.. पण लहानपणी मारझोड करून जबरदस्तीने पोहायला पाठवणारे पालक आता वैतागायला लागलेले असतात,, घरची काम आणि अभ्यास टाकून सारख काय पोहायला जाता?

तरीही मुलगे खूपच नशीबवान कारण आषाढातल अनुष्ठान, गोकुळाष्टमी, गणपती विसर्जन हे त्यांचे पर्वणीचे दिवस असतात,, गोकुळअष्टमीला तर वेड्यासारखे घरोघरीच्या विहिरीत उड्या  ठोकत मनसोक्त डुंबण्याचा त्यांचा प्रयोग अगदी जगावेगळाच. आम्हाला पोरीना त्या दिवशी हेवा करण्याशिवाय दुसर काही करता येत नाही. पण तरीही, उर्वरित पावसाळाभर शक्य होईल तेव्हा तेव्हा संधी साधून घेतोच. आईने सांगितलेली काम पटापट आटपून जास्तीत जास्त वेळ पोहायची हौस भागवायला हजर. शहरात स्विमिंग पूल मध्ये जसे वेगवेगळे स्ट्रोक्स शिकवतात तसले काही कुणाला येत नाही, आणि त्या पूल सारखे आपल्या तळ्यातल पाणी ८ नी १२ फुट असलं नाही तर थेट पन्नास फुट.

जिद्दीने न थांबता जास्तीत जास्त फेऱ्या मारण्यातली निर्हेतुक स्पर्धा,,मध्येच जोरदार पाऊस सुरु झाला तर पाण्यावर पडणारे पावसाचे थेंब आणि गोलाकार उठणारे तरंग बघत राहाण  ,अलगद पाण्यावर तरंगताना वर दिसणारं पावसाळी आभाळ आणि चिंब भिजलेली झाडं, ,कुणी मधोमध मुंढा टाकला आणि नेमके आपण त्यात सापडलो तर नाकातोंडात पाणी जाण,, घाबरून कडेकडेला थांबणाऱ्यांच्या खोड्या काढण, खांब-खांब-खांबोळीचा पाण्यातला खेळ, आणि एकूणच पाण्यावर आपण तरंगतो हि अनुभूती, हे सगळंच आनंददायक...

25 August, 2016

आज आहे दहीकालाsss

थरांची संख्या किती, हंडीची उंची किती, वर टांगलेली रक्कम किती, पाठीशी असलेल्या नेत्याचे वजन किती, नाच करायला आलेले सेलिब्रिटी उथळ किती...
ह्या आणि आणि अश्या अनेक प्रश्नांशी काडीचंही देणंघेणं नसलेला आमच्या मुर्डीचा गोकुळाष्टमी उत्सव म्हणजे आबालवृद्धांना आनंदाची पर्वणी..
आदल्या रात्री देवळात भजन आणि खावटी झाली कि वेध लागलेच सगळ्यांना..

कितीही पाण्यात भिजा, चिखलात लोळा पण मोठी माणसं ओरडणं तर दूरच उलट स्वतःच किती भिजतायत, आणि नाचतायत चिखलात.. ह्या आनंदात दीड दोन वर्षाचे चिमुकले..

चला आज अभ्यासाची कटकट नाही, दिवसभर हुंदडायला मिळणारे.. मज्जा!! (शाळकरी)

***त गेलं कॉलेज.. आजच्या दिवशी गावाच्या बाहेर राहूच शकत नाही आपण(कॉलेजवाले)

एरवी असतातच जळ्ळ्या त्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि पोक्तपणाच्या झूली, आज आपला हक्काचा दिवस, धमाल करण्याचा...(नवव्यावसायिक)

आता काय नाचायचं का वय आहे आमचं, पण तिथे जबाबदार म्हणून कुणीतरी हवंच.. आणि एकदा गेल्यावर नाचल्याशिवाय कसं राहावेल..(मध्यमवयीन)

जुने दिवस आठवतात हो अगदी, अशीच मजा आम्ही करत असू.. आता बरोबरीचे काहीकाही मित्र राहिले नाहीत, पण देवळाशी तरी जायलाच हवं हंडी फोडतील ती बघायला..(वृद्ध)

असं असतं सगळं!! आपापली वयं, बिरुदं, क्वालिफिकेशन्स, स्टेटस सगळं बाजूला ठेवून सगळे एकाच चिखलात माखलेले!!

अगदी अपरिहार्य कारणाने कुणी गावात नसेलच तरी मनाने इथे असणार म्हणजे असणारच.. 12 वाजले.. देवळाशी जमले असतील सगळे.. आता हंडी फोडून झाली असेल रस्त्याने नाचत निघाले असतील...
काही वर्षांपूर्वीपर्यंत परगावी असणाऱ्यांचे फोन यायचे, ढोलाचा आवाज तरी ऐकावा रे!!
तसाच आज प्रणवचा मेसेज आला कुणीतरी व्हिडिओ टाका रे!!
******************************

ठरलेल्या एका घरी महिलावर्ग फराळाच्या तयाऱ्या करत असतात आणि घरोघरी अंगण स्वच्छ करणे, भरपूर पाणी भरून ठेवणे, गरम पाण्याची व्यवस्था, वाटायला प्रसाद, चहाची सामुग्री, अश्या तयाऱ्या..

दुपारी बरोबर बाराला देवळात हजेरी होते, पोरं धपाधप तळ्यात उड्या मारतात.. मग  देवळासमोरच्या अंगणात हातात हात अडकवून मोठा फेर धरला जातो, दोघेजण कुणीतरी तळ्याच्या पायठणीवर उभे राहून बादल्यानी पाणी उडवायचा सपाटा लावतात, आणि ढोल सनईच्या तालावर, पायांनी ठेका धरून नाच सुरु होतो, सगळे एकसुरात गायला लागतात
आ-नं-दा-चा दिवस आला,
आ-ज  आ-हे दहीकाला!!

कुठेही लिहून न ठेवता चालत आलेली हि कवने कुणी रचली आहेत कोण जाणे!! पण त्यात मुर्डी गावातली पोरं किती हुशार आहेत इथपासून ते आपण सगळे असेच एकत्र राहीलो तर ह्या देशाचा शत्रू चटणीलाही पुरायचा नाही इथपर्यंत विषय कव्हर केलेत! "कृष्णासारखा शासनकर्ता आज 'हवा' देशाला"
ह्या कवनात गेली दोन वर्षं बदल करून, "कृष्णासारखा शासनकर्ता आज 'आहे' देशाला" असं एकमुखाने म्हणायला मिळतंय!!

मनसोक्त नाचून झालं कि आरती करून मग  हंडी फोडायचा कार्यक्रम. जेमतेम अडीच थरांची हंडी. त्यात सराव वगैरे भानगड नाहीच! ऑन द स्पॉट- काय ती रचना करून टाकायची.. फुटलेल्या हंडीच्या खापराचे तुकडे पटकन जाऊन उचलून आणायचे! त्यातला एक तुकडा दुभत्याच्या कपाटात ठेवला कि वर्षभर दूधदुभत्याची कमी नाही पडणार म्हणतात..
******************************

देवळाजवळची हंडी फोडून झाली कि रस्त्याने नाचत प्रत्येक घरी जाऊन हाच कार्यक्रम.. कवनातूनच चहा, कॉफी, काकड्या अश्या फर्माईशी.. अंगावर ताक शिंपडणे, क्वचित ओंजळीनेच ताक पिणे, मनसोक्त पाणी उडवून घेणे..
सुरेशकाकाकडे तर आख्खा भरलेला हौद संपवून- परत पंप लाऊन पुन्हा हौद संपवून, वर "यांच्या घरात नाही पाणी घागर उताणी रे.." म्हणायला मोकळे! मग गरम पाणी उडवणे, हंडी बांधली असेल तर फोडणे(घरोघर हंडीची पद्धत असतेच अस नाही) शेवटी त्याच चिखलात फतकल मारून चहा/प्रसाद जे काय असेल ते... कि चालला गोइंदा पुढच्या घरी..

अगदीच चिखलाने, ताकाने अंगाला खाज सुटली तर कुणाच्याही विहिरीत उडया मारून स्वच्छ होयला लायसन असतं आज त्यांना!

अशी सगळी घरं नाचून संपली कि संध्याकाळी सहाच्या सुमारास सगळे आपापल्या घरी.. गरमागरम पाणी तयारच असतं ठेवलेलं. आंघोळया झाल्या कि सगळा गाव एकत्र फराळाला जमतो. खाऊन झाल्याक्षणी सगळेजण आपापल्या घरी पळतात तेव्हा भयंकर दमलेल्या अवस्थेत पण वर्षभर पुरेल एवढी मनाची एनर्जी साठलेली असणार नक्कीच!

17 August, 2016

सागरकिनारे...

आज नारळी पौर्णिमेनिमित्त कित्येक महिन्यांनी समुद्रावर जाण्याचा योग आला. एका ढेंगेच्या अंतरावर समुद्र असूनही असं म्हणायची वेळ यावी हे आश्चर्य आहे वाचणाऱ्यांसाठी.. पण आता असं आहे खरं!
समुद्र तसा आमच्या आवडीचा आहे, पण अगदी समुद्राला चिकटून राहणाऱ्या कोळी बांधवांच्या घट्ट नात्यातला आहे तितकं आमचं जवळचं नातं नाही. ब्राह्मणवाडीतल्या गणपतींचं विसर्जन सुद्धा तळ्यातच होतं. नारळी पौर्णिमेला घरातले पुरुषलोक समुद्रावर जाऊन नारळ अर्पण करून येतात, कि झालं.

लहानपणी गावातून कुठेही बाहेर जायचं झालं कि तरीतून जावं लागायचं, कधीकधी उधाण भरती असेल तर होडी जोरात हलायची. अगदी लहानपणी भयंकर भीती वाटायची, नंतर भीती गेली, सवय झाली, पाण्याच्या पातळीनुसार कधी जर होडी किनाऱ्यापासून जरा लांब पाण्यात उभी राहिली, तर जीव खाऊन लॉन्ग जम्प मारून पुळणीवर अवतरण्याची प्रॅक्टिस होते न होते तोच पूल तयार होऊन वापरासाठी खुला झाला आणि खाडीच्या मध्यस्तीतुन समुद्राशी असलेलं नातं पण मागे पडलं.. इतकं, कि अगदी हल्लीच दाभोळ खाडीतून वेलदूरला जाताना अशीच होडीतून पुळणीत लॉन्ग जम्प मारताना जीव वरखाली झाला होता क्षणभर! "सवय गेली आता" अशी चुटपुट लागली उगीच..

राहता राहिलं कुठलं निमित्त, तर आल्यागेल्या पाहुण्यारावळ्यांना समुद्रावर फिरवायला नेण्याचं.. त्यातही लहानपणीच अप्रूप-उत्साह कमी आणि कर्तव्यभावना जास्त, पण घरातून निघून समुद्रावर पोचेपर्यंत.. एकदा समुद्र दिसला कि हटकून वाटतं," अरेच्चा, आपण एरवी सहज म्हणून, आपल्या स्वतःसाठी म्हणून का नाही येत!!"

क्वचित- म्हणजे फक्त समुद्रावर जाऊ तेव्हाच मिळणारा वडापाव, किल्ले, शंख-शिंपले, सूर्य पाण्यात बुडणे(!) पाण्यात भिजून भावंडांशी दंगामस्ती करणे, तुफान धावाधावी, पकडापकडी हि सगळी आकर्षणं केव्हाच संपली. 9वीत असताना भल्या पहाटे आमच्या सगळ्या वर्गाला बापट सर समुद्रावर बोलवून प्रचंड व्यायाम करून घ्यायचे, वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये सायकलींच्या शर्यती फार म्हणजे फार प्रतिष्ठेच्या असायच्या आमच्या शाळेत- म्हणजे असं आपलं आम्हीच ठरवलेलं.. सायकलच्या शर्यतीत मागे पडणं हे गणितात दांड्या उडण्यापेक्षा जास्त नामुष्कीचं होतं आमच्यासाठी, आणि हे सगळे पराक्रम समुद्रावर गाजवण्यात यायचे!! ते पर्व सुद्धा शाळा संपली तेव्हाच संपलं.

वेळ मिळत नाही ह्या कारणामुळे समुद्रावर जाणं जास्त जास्त विरळ होत गेलं.. पाहुणेरावळे सुद्धा फुरसत घेऊन येईनासे झाले. आता दापोलीच्या दिशेला किंवा केळशीच्या दिशेला जाता येता फक्त प्रवासात चालत्या गाडीवर-  काठाकाठाने सोबत करण्यापुरता समुद्राचा संबंध..

आज नारळीपौर्णिमेचा नारळ द्यायला समुद्रावर मलाच जावं लागलं. 6 वाजून गेले होते, मला वाटलं बहुतेक सगळेजण जाऊन आले असतील. पटकन जाऊन नारळ पाण्यात टाकून परत येऊ म्हणून गाडी काढली तर योगायोगाने बरेच मुर्डीकर एकाच वेळी न ठरवता आंजर्ल्याच्या वाटेवर!

स्वच्छ, मोकळी, खारट हवा एका सेकंदात किती फ्रेश वाटायला लावते!! बूट काढून अनवाणी पायाखाली मऊमऊ वाळू तुडवत पाण्यात जाऊन नारळ-सुपारी-तांदूळ समुद्रात सोडले, नमस्कार केला. लाटांचा स्पर्श जाणववत, एकामागून एक येणाऱ्या लाटा अनुभवल्या. ओलसर-दमट-खारट वाऱ्याचा विशिष्ठ वास नाकात साठवून ठेवला.. काळ्या ढगांच्या आडून सूर्य पाण्यात जाताना बघितला. आपले डोळे, आपले विचार हाच आपला कॅमेरा.. कितीही फोटो काढले तरी समुद्र कसा काय मावेल त्या फोटोंमध्ये..

हाताला वीजेचा शॉक बसतो तेव्हा कसा,, पायातुन वीजप्रवाह जमिनीत जाताना जाणवतो ना, अर्थिंग का काय ते होऊन, तसाच अगदी, परत मागे फिरून जाणाऱ्या लाटेतून, पायाखालच्या निसटून जाणाऱ्या वाळूतून सगळा शीण, थकवा, टेन्शन, स्ट्रेस, वैताग समुद्र वाहवुन दवडतो.. नवीन येणाऱ्या लाटेतून परत नवीन एक्साईटपणा..

आहाहा, किती बरं वाटलं, नेहेमी का नाही येत अस सहज, उगाचच, स्वतःसाठीच.. परत तोच प्रश्न, प्रत्येकवेळी.

यायचं आता अधूनमधून.. आपली आपणच समजून घालायची प्रत्येकवेळी आणि परत बुडून जायचं रुटिनच्या व्यापात.. पुन्हा समुद्रावर जायला निमित्त मिळेपर्यंत!!

05 August, 2016

माझा पहिला मोबाईल

मला माझा पहिला मोबाईल इयत्ता टी वाय बीएस्सी ला असताना मिळाला. आधी इयत्ता अकरावी ते एफवाय हि तीन वर्षं कॉलेजचे हॉस्टेल उर्फ तुरुंग हे आमचे वास्तव्यस्थान होते, तिथे मोबाईल वापरू नये हा कडक नियम होता. अधूनमधून झडती पण घेतली जायची. तेव्हा मग ज्यांच्याकडे मोबाईल होते त्या मुली स्पोर्ट्सशूजमध्ये,  केस धुतल्यावर टॉवेलचा बुचडा बांधतात त्यात.. कुठेकुठे मोबाईल लपवायच्या. आमच्या घरच्या लोकांना नियम पाळायची फार आवड असल्याने हे थ्रिल अनुभवायचं राहून गेलं. असो.

नंतर एसवायला पेईंग गेस्ट असताना त्या काकूंच्या लँडलाईनवर फोन आल्यास बोलता येत असे, आणि आपल्याला करायचा झाल्यास केव्हापण एसटीडी करायला बाहेर जाता येत होते. मग मोबाईलची जरूर पडली नाही.

टीवायला दुसरीकडे पीजी असताना तिथे लँडलाईन तळ मजल्यावर आणि आम्ही चौथ्या मजल्यावर. आणि तोपर्यंत हे असे फोन येणं पण औटडेटेड झालं, मग एकदा बाबा पुण्याला आलेले असताना त्यांनी स्वतःहून,, मी न मागताच मला फोन घेऊन दिला.

मोबाईल मिळणं हेच मला इतकं अप्रूप होतं कि कोणता, कसा, वगैरे काही मतसुद्धा मांडायचं सुचलं नाही.
"आपल्याला त्यातलं काही कळत नाही ना, मिलिंदाला बरोबर घेऊन जायचं" म्हणून माझा पुण्यातला लोकल गार्डियन चुलत भाऊ मिलिंददादा आमच्यासोबत आला.
-- दुकानात --
बाबा: तुमच्याकडे स्वदेशी मोबाईल कुठला आहे?
दुकानदार: (चकलेले हावभाव) टाटा इंडिकॉम
बाबा: किंमत काय?
दुकानदार: ह्याची अमुक, त्याची तमुक ..... इत्यादी.
अशी बरीच चर्चा झाली. मग टाटांच्या हँडसेटमध्ये bsnl चे कार्ड असे होऊ शकत नाही हे जरा बाबांना पटत नव्हतं😂 तेव्हा ती cdma, gsm वगैरे भानगड मिलिंद दादाने समजावली.

मग पटलं एकदाचं आणि मग कागदपत्रांची चर्चा सुरु झाली.
दुकानदार: सिमकार्डासाठी असं असं घेऊन या.
बाबा: मिलिंदा, फोन तुझ्या नावावर घ्यायचा हो.(आपली पोरगी अगदी म्हणजे अगदीच हि असावी असा कायतरी डौट असणार😂)
मिलिंद दादा: अरे काका, असं काही नाही रे, तिला तिच्या स्वतःच्या नावाने फोन हवा असेल तर घेऊन दे कि.

मग बरीच भवतिनभवती होऊन मिलिंद दादाच्या नावावर तो फोन घ्यायचं ठरलं. सर्वात शेवटी काळा का सिल्व्हर? एवढा एकच प्रश्न माझ्यासाठी शिल्लक ठेवला गेला.
तो होता टाटा इंडिकॉमचा 'जेम' रंग सिल्व्हर आणि किंमत ₹९००/ मात्र!!!
भगव्या रंगाचा उजेड पडणारा, फक्त आणि फक्त फोन करणे, आलेले घेणे, एसेमेस करणे, आलेले वाचणे... बास!!!
बरोबर फक्त चार्जर...  हँड्सफ्री नाही कि usb नाही कि काही नाही..

तेव्हा टाटा टू टाटा संपूर्ण फ्री होते. 30 रुपयात 1000 एसेमेस ची चंगळ होती!! अमृताकडे टाटांचा लँडलाईन होता तोही त्या टाटा टू टाटा फ्री मध्ये बसायचा.. मग आम्ही प्रचंड वापर केला ह्या स्कीमचा. गप्पा, अभ्यास, सगळं फोनवर!! नॉन टाटा धारी लोक्स म्हणायचे, तुमच्या ह्या करण्याने टाटा धुपतील तिकडे😜😂

माझ्या फोननंतर वर्षभरात घरी आईने पण टाटाचाच मोबाईल घेतला, तरीही ते t2t फ्री सुरूच होतं, मग काय!! मज्जाच!!

अधूनमधून टाटांकडून फोन यायचा😃😜😂 तुमचं नाव काय? व्यवसाय काय? पत्ता सांगा... फोन घेताना दिलेली कागदपत्र क्रॉसचेक करायचे ते. बहुतेक अतिरेकी वगैरे वापरत नाहीत ना ते बघायला असेल. दुसऱ्या कुठल्या कंपन्या हे उपद्व्याप करायच्या का ते माहिती नाही!!

पण टाटा ह्या नावाचा लौकिक ह्या फोनने सिद्ध केला माझ्या बाबतीती तरी. फसवणूक, छुप्या अटी लागू, सांगणं एक करणं दुसरंच वगैरे झंझट नव्हतं.

दरम्यान आमच्या गावात व्यवस्थित नेटवर्क मिळू लागलं, म्हणून घरात एक व बाहेर एक असे दोन फोन जरुरीचे झाले, मग दोनवर्ष माझ्याकडे असलेला माझा जेम, नंबरासकट घरी रवाना झाला.
मला बीएसएनएल चा नंबर व नोकियाचा हँडसेट घेऊन दिला गेला😍  अजून एक वर्षं पुण्यात काढणं बाकी होतं..

जेम घरी पण मस्तच चालत होता. एकदा मे महिन्यात जेम आमच्या पडवीत रायटिंग टेबलावर ठेवलेला होता. तिथून तो एका माणसाने चोरला. माणूस गडगंज.. पण फोन चोरला. योगायोग असा कि तो माणूस आमच्या अंगणातुन बाहेर गेला मात्र, मी फोन शोधायला लागले!!
आत्ता तर इथे होता.... लँडलाईनवरून रिंग दिली...
तो माणूस शेजारच्या घरासमोरून चालत जात होता,, मांडवावर मेघनाकाकू साठं सोडवत होती. तिच्या लक्षात आलं, ह्या *** *** ने मोबाईल कधी घेतला? आणि रिंगटोन सेम शेजारसारखा आहे...शंकर महादेवनचे ब्रेथलेस

एका सेकंदात सगळा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला.. तेजस, प्रणव आणि मी -- तिघेजण त्यांचा मोबाईल घेऊन सुसाट पाखाडी चढून मुर्डी फाट्यावर गेलो.. तिथे गाठला त्या चोरसाहेबाला..

"काका आत्ता तुम्ही आमच्याकडून निघालात तेव्हा माझा मोबाईल चुकून तुमच्या खिशात आला का??"

"छे गो बाय! मला मोबाईल येतच नाही चालवता!"

तेवढ्यात एक जीप आली आणि तिला रस्ता द्यायला आम्ही एका बाजूला नि चोर दुसऱ्या बाजूला झालो, मधून जीप निघून गेली.

परत विचारलं. तरी तेच उत्तर. मग जोश्यांच्या मोबाईलवरून रिंग दिली तर माझा जेम रस्त्याच्या कडेला कुंपणीत, काट्याकुट्यात- दगड धोंड्यात पडल्यापडल्या भगवा डिस्प्ले चमकवीत वाजताना दिसला!!! राकट देशा कणखर देशाचा स्वदेशी मोबाईल😍

ती जीप जाईपर्यंत त्याने तो कुंपणीत करवंदीच्या जाळीत भिरकावून दिला होता!😞😞😞
झटकन फोन उचलला, आणि चोराकडे बघितलं फक्त..
"मी नाही टाकलाय!! त्या अमुक ने टाकलाय" असं म्हणून त्याने अश्या एका व्यक्तीचं नाव घेतलं कि ज्या कुटुंबाशी आमचे गेल्या 4 पिढ्यांचे घरगुती संबंध आहेत, आणि तो अमुक त्या संपूर्ण दिवसात आमच्याकडे आलेला नव्हता!!

विजयी वीरांसारखे उधळत आम्ही घरी आलो तीघेजण... मी सांगितलंच त्या अमुक ला, कि तुझ्यावर आळ घालतोय तो..

मग काय गावकी भरली, साक्षी पुरावे झाले. चोराने अमुक ची माफी मागितली. स्वतःच्या सुपुत्रांकडून शिव्या खाल्या.. आमचा जेम मात्र पंचक्रोशीत फेमस झाला..