29 June, 2017

वाघ्या

आत्तापर्यंत मला माहिती होता तो शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा. पण इथे जोश्यांच्या कुत्र्याचे नाव पण वाघ्याच आहे.

मुळात मला कुत्रे मांजरे आणि सगळ्याच फरयुक्त प्राण्यांची, वस्तूंची किळस येते. त्यातुन कुत्र्यांबद्दल मला विशेष भीतीयुक्त तिरस्कार आहे, कारण आमच्या लक्ष्मीआजीला कुत्र्याने हल्ला करून अक्षरशः पाय फाडून रक्तबंबाळ केलेले मी डोळ्यासमोर बघितले आहे.

लग्नासाठी स्थळे शोधण्याच्या मोहिमेत काही ठिकाणी - "घरात सर्वत्र वावरणारा व फाजील लाडावलेला कुत्रा असणे" हे माझ्यासाठी नकाराचे सबळ आणि एकमेव कारण ठरू शकलेले होते. "तो काही करत नाही" हे एक हास्यास्पद विधान कुत्राप्रेमी लोक करत असतात. मुळात माझ्या दृष्टीने फक्त गाय, म्हैस, बैल, रेडा हेच प्राणी पाळायच्या योग्यतेचे आहेत, असो!

तर, इथे लग्नाच्या वाटाघाटी प्रगतीपथावर असताना, एक पुढचा टप्पा म्हणून आम्ही अजयचे घर बघायला आलो, तेव्हाच घरातल्या लोकांच्या बोलण्यातून मला ह्या वाघ्याचा उल्लेख ऐकायला आला होता. बहुतेक माझं तोंड अगदीच प्रेक्षणीय झालं असणार तेव्हा😜.. कारण घराच्या आवारात त्या वाघ्याची टेरीटरी कुठून कुठपर्यंत आहे ते लगेचच सगळ्यांनी समजावून सांगितलं मला😃 त्यात तो घरातल्या खोल्यांमध्ये तर नाहीच पण समोर अंगणात सुद्धा येत नाही, फक्त रस्त्यावर आणि बाकी आवारात म्हणजे आगरात, कलमांच्या बागेत वगैरे फिरत असतो अशी माहिती मिळाली. म्हणून मग 'हो' म्हणायचा विचार पुढे सरकू शकला😅 पुढे लग्न ठरून जाहीर झाल्यावर अमृताने अजयला सावध करून ठेवलं- "कुत्र्याची काळजी घे रे! हि घरच्या कुत्र्याला पण दगड मारू शकते"

लग्न झाल्यावर प्रत्यक्ष इथे राहायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की ह्या वाघ्याचा आपल्या दैनंदिन जगण्यात फारसा हस्तक्षेप नाही. किंवा त्याला पण कळलं असेल- की ही नवीन आलेली पोरगी आता इथेच राहणार बहुतेक कायम- म्हणून तो पण माझ्याकडे दुर्लक्ष करायला शिकला.. नाही म्हणायला संध्याकाळी आम्ही चालायला निघालो कि हा वाघ्या मागून चालत यायचा, आणि मग माझं सगळं लक्ष तो आपल्याला काही करणार नाही ना इकडेच.. पण आम्ही जसे चालण्याचे अंतर वाढवत खूपच लांबवर जायला लागलो तसा तो हळूहळू बरोबर यायचा बंद झाला.

परवा सकाळची गोष्ट- तुळशीअंगणाच्या पलीकडे शेजाऱ्यांच्या आवारात विचित्र असे धापा टाकल्यासारखे आवाज येऊ लागले म्हणून बघितलं, तर प्रचंड आकाराचं काळ्या तोंडाचं वांदर जिवाच्या आकांताने धावत धावत वेगाने आगराच्या दिशेने पळून गेलं,, आणि पाठोपाठ वाघ्याचं धूड इथे दाखल झालं. काय चाललंय ते मेंदूत शिरेपर्यंत काही सेकंद गेले आणि मग लक्षात आलं, कि तिथे अजून एक तसाच वांदर आहे, त्याला वाघ्याने धरलाय!

पूर्ण ताकदीनिशी वाघ्या त्या वांदराचा जीव घ्यायचा प्रयत्न करत होता , वांदर सुटकेसाठी धडपडत आणि आम्ही श्वास रोखून बघत राहिलेलो फक्त.. सुमारे अर्धा ते पाऊण मिनिट हि झटपट चालली. मग वांदर सटाक्कन निसटून सुसाट वेगाने धावत जाऊन पत्र्यावर उडी मारून पसार झाला.

वाघ्याच्या जबड्याला वांदराने जोरदार जखम करून ठेवलेली.. आता काय? ह्या विचाराने आम्ही भानावर यायच्या आत थरारनाट्याचा पुढचा अंक सुरु झाला-

ह्या वाघ्याच्या दोघी मैत्रिणी आहेत. त्या आशाळभूत हावभाव करत धावत धावत शेपटी हलवत तिथे आल्या. त्यांना वाटलं होतं की एव्हाना शिकार यशस्वी झाली असेल, आता मस्त ताव मारू... वेळेवर मदतीला तर आल्या नाहीत टवळया, जर तिघे मिळून तुटून पडले असते तर वांदर नक्कीच पळत नव्हता, पण तेव्हा ह्या आल्या नाहीत दोघी!!

वाघ्या भयंकर हताश होऊन उभा, अगदी परवाच तो हार्दिक पांड्या कसा फुक्कट रनौट झाला तर जाडेजाकडे बघून दात विचकत होता सेम तसंच झालेलं वाघ्याचं.. असा काय संतापला कि त्या दोघींवर हल्ला करत त्याने थेट रस्त्यापर्यंत धाव घेतली.. सगळं लाचांड रस्त्यावर पोचलं आणि केकटत केकटत केवढा तरी किचाट झाला..

काका म्हणाले- आता वय झालंय त्याचं, आणला तेव्हा 4 महिन्याचं पिल्लू होतं, आता तो 10 वर्षाचा झालाय.. नाहीतर हातात गावलेला वांदर कधी सुटत नसे त्याच्या. पण अजून हिंमत कायम आहे.. पूर्वी त्याचा अधूनमधून हा कार्यक्रम असायचाच.. वांदर मारून खायचा, मग नदीत डुबक्या मारून यायचं आणि स्वस्थ पडून राहायचं..नो जेवणखाण.. कडक लंघन, फक्त ताक प्यायचा 3-4 दिवस बास!!

"ऐकावं ते नवल" असे बावळट हावभाव घेऊन घालवला मी अख्खा दिवस😂😂😂

©ऐश्वर्या पेंडसे जोशी