23 October, 2016

लखलख.. मिणमिण

दीड वाजता सुटणारी दापोली-मुंबई, फलाट क्रमांक 7 वर लावण्यात आली आहे, चालक आणि वाहकांनी 'आपली' गाडी मार्गस्थ करावी..

खरखरीत आवाजात सूचना मिळते, चालक वाहक गाडीकडे येतात.. आतल्या आणि बाहेरच्या लोकांमध्ये अच्छा-टाटा-बाय ची देवाणघेवाण होते.
"बाबू, सांभालून आस हां, जा सावकास, फोन लाव!!"
किंवा
"गाडी सुटली रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओले!!"
वगैरे सोपस्कार पार पडतात.. आणि डबल बेल मारली जाते, गाडी सुटते...

तोपर्यंत, दत्ताचे देऊळ आणि पार्किंग ह्याच्या मधल्या गेटात उभी असलेली 'दापोली-पुणे-पिंपरीचिंचवड' सरसावून पुढे येते..त्याच फलाट क्रमांक 7 वर उभी राहते.. हेच चक्र पुनःपुन्हा सुरु राहते...

ह्याच चक्राचा चकचकीत अवतार काल रात्रीच्या काळोखात लांबवरून बघितला.. दिव्यांनी लखलखलेल्या मुंबईत.

नजर पोचेल तिथपर्यंत असंख्य चमचमणारे दिवे, त्यात हवेत अधांतरी तरंगणारे दोन दिवे.. अगदी चारचौघात वेगळे उठून दिसणारे, बाकीच्यांपासून अंतर राखून असलेले..

तेवढ्यात जमिनीवरचा एक दिवा सुसाट वेगाने पळत सुटला.. पळता पळता एकदम उंच उसळून झुम्पकन वर उठला, तर्राट वेगाने उडत उडत उंच उंच निघाला...

मग लगेच हवेत तरंगणारा एक दिवा उडत उडत खाली उतरला, जमिनीवरच्या असंख्य दिव्यांमध्ये मिसळून गेला....

हाच खेळ दर काही मिनिटांनी सारखा सुरूच!

एरव्ही कधीतरी क्वचित, दूरवरून, अगदी छोटंसं दिसणारं विमान-- इतक्या वारंवार, इतक्या जवळून, इतकं अवाढव्य बघणं म्हणजे गंमत आहे खरी खास!!

"अहा काय शोभा वदू त्या क्षणांची..
तती त्यावरी शोभली दिपिकांची.."

हे लिहिताना कवीला आता दूर राहिलेल्या बालपणी अनुभवलेल्या नर्मदेच्या पात्राची आठवण होत होती..

इथे विलेपार्ले मुक्कामी हि विमानांची शोभा बघताना मुर्डीच्या रस्त्याची खूप खूप आठवण आली. चार पाच खांबांवरच्या मिणमिणत्या दिव्यांनी रात्रीच्या वेळी उजळलेला आमच्या मुर्डीचा रस्ता.. तो मिणमिण उजेड मनाचा कानाकोपरा उजळवून टाकतो..

इथे क्षितीजापर्यंत झगमगलेलं आकाश बघून एकदम काळोख भरून आला मनात...
विचारांचं विमान सर्रर्रकन जमिनीवर आलं..

आठवडा झाला मुंबईत येऊन, आता घर दिसायला लागलं.. मुर्डी दिसायला लागली!!

©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे.

11 October, 2016

शस्त्रपूजन

नवरात्र संपले, दसरा उजाडला..
आमचा बाप आदितला म्हणाला..
उठ अरे उठ, अजून झोपलास काय..
दसरा आहे माहिती नाही कि काय..

मग नेहेमीप्रमाणे "पाचच मिनिटं" असं पुटपुटत परत झोपत थोड्यावेळाने आदित उठला. आज लवकर आंघोळ आणि मग पूजा करून मग तू बाहेर पड, असे फर्मान त्याला मिळाले आणि आमचे फादर लवकरच कामासाठी बाहेर पडले.

आदितने स्वतःची आंघोळ फडफडवली, देवांना पण आंघोळ घातली, आणि मग शस्त्रपूजनासाठी शस्त्र गोळा करायला घरभर फिरू लागला..

दाभण, सुरी, कोयती, कुऱ्हाड, पिकाव, सिकॅटर, टिन-ओपनर, अडकित्ता, काठी, करवत हे सगळं सहजपणे ठरलेल्या जागी सापडलं.. ह्या सगळ्या वस्तू रोजच्या वापरात असतात, त्यामुळे काय प्रश्न नाही. मग कापडात गुंडाळून जपून ठेवलेली तलवार आणि बंदूक.. ह्या पण पाटावर स्थानापन्न झाल्या..

"हां!! कात्री राहिली.. दीदी, ए दीदी.. एक कात्री दे चल.."

अस्मादिक सध्या प्रदर्शनाच्या तयारीत असल्यामुळे भल्या पहाटेच आमचं सुईंगमशीन गरगरायला लागलेलं होतं. आता पूजा करून कात्री ठेवली कि ती दिवसभर वापरता कशी येईल, म्हणून मग मी आपली एक जुनी-पुराणी कात्री त्याला दिली..

तश्या तीन-चार कात्र्या वापरात आहेत.. कापड, स्पंज, रबरशीट, कागद वगैरे वेगवेगळ्या वस्तू कापायला वेगवेगळी कात्री वापरली कि धार जास्त टिकते, असा माझा समज आहे..

तर त्यातली सर्वात बोगस झालेली, एक्स्ट्रा, नावडती, कमी उपयोगाची अशी कात्री दिली पूजेत ठेवायला..

"हे काय तुझं? हे बरं आहे.. बेकार झालेली कात्री देत्येस होय पूजेत ठेवायला.. हि चांगली दे पितळेची आहे ती!" - आदित

"ह्या, ती नाही मिळणार, माझं काम ठप्प होईल इथे त्याचं काय.. शस्त्र हि पूजा करून ठेवण्यापेक्षा वापरली तर त्याचा सार्थ उपयोग!" - मी

"हो माहित्येय मोठी वर्कोहोलिक.. एक दिवस करायची पूजा.. त्यात नाही ती नाटकं तुझी! जरा देवाला तरी घाबर!!" - आदित

वगैरे प्रेमळ संवादांनंतर फायनली, तीच जुनी पुराणी कात्री पूजा करून घ्यायला पाटावर जाऊन बसली.. बाकीच्या ऍक्टिव्ह कात्र्या सटासट कामावर रुजू झाल्या..

नसे राऊळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी

अशी स्वतःची समजूत घालून, मनातला गिल्टीपणा झटकून बॅगा शिवायला सुरुवात केली!!

सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे.

09 October, 2016

रस्ता...

******************************
विश्वनाथ एकदम आनंदला......

"म्हणजे आज फिफ्थ कंपनीचा बुलडोझर नक्की इथे येत आहे."

"बरं येईल. पण बुलडोझर म्हणजे काय मेरेलिन मन्रो आहे कि जी येणार म्हणताच तुला एवढं भान विसरायला व्हावं?"

"येस कॅप्टन खंबाटा, काही वेळा एखाद्या अप्सरेपेक्षा बुलडोझर अधिक सुंदर, अधिक हवासा वाटतो."

"आय ऍग्री!"  मिनूनं विश्वनाथच्या पाठीवर थाप दिली....
******************************

कितीही वेळा वाचूनही पुन्हापुन्हा वाचावीशी वाटतात अश्या काही अतिआवडत्या पुस्तकांपैकी एक म्हणजे 'रारंगढांग'!! पारायणे करून करून काहीकाही भाग अक्षरशः पाठ होऊन बसलेत त्यापैकीच एक हा भाग आमच्याही विश्वात नुकताच येऊन गेला!

मान्य आहे त्या रारंगढांगातल्या विलक्षण आयुष्याच्या पासंगालाही पुरणार नाही इतके शांत, निरस, एकसुरी, मिळमिळीत आयुष्य तुम्ही आम्ही जगत असतो, पण बुलडोझरच नव्हे तर 'रोडरोलर' सुद्धा एखाद्या अप्सरेइतका सुंदर, हवाहवासा वाटू शकतो याचा अनुभव आम्हीही घेतला!

'कोकण म्हणजे लाल मातीचे रस्ते' हे समीकरण इतिहासजमा होऊनही जमाना उलटून गेला, पण आमच्या आळीतला रस्ता मात्र अजून मातीचाच.. विविध ऑफिसांमध्ये हरप्रयत्न करून झाले, बाकी गावातल्या गल्ल्याबोळे डांबरी झाली, पण तो डांबर काय आमच्या रस्त्याला लागेना..

पण अखेरीस अच्छे दिन आलेच आमचे, आणि एका सकाळी खडाडखड आवाज करत दगड,खडीचे ढिगारे,डांबराची पिंपे, आणि तो सुंदरसा रोडरोलर यांचे आगमन झाले!!

सिस्टीमेटिक कामाने वेग घेतला आणि आमची फार अडवणूक न होता 2-3 दिवसात रस्ता तयार झाला काळा कुळकुळीत..
कवितेत, सिनेमात आणि चार दिवसाच्या सुट्टीत खेड्यातले लालचुटुक रस्ते छान दिसतात हो, पण कायम इथेच राहाणाऱ्यांना सोय हवीच ना राव!!

पण का कुणास ठाऊक, पोटात काहीतरी तुटलं.. परत कधीच न दिसण्यासाठी काहीतरी हरवलं. आमच्या बालपणीचा एक मित्र हरवला!

आईच्या कडेवरून उतरून पहिली पाऊले टाकायला लागलो तेव्हा, नंतर लाल धुरळा आणि दगडधोंड्यांमधून भर दुपारी बिनचप्पलांचे उंडारताना हा मित्र आमच्यासोबत होता. ह्या रस्त्यावरचे दगड धोंडे घेऊन आमचे दिवाळीचे किल्ले होत होते. ह्याच रस्त्यावर तडमडत लहानपणी सायकली आणि आता गाड्या चालवायला शिकलो. सतरावेळा पडून ढोपरं फोडून घेतली. दिवाळीत आणि चैत्रपाडव्याला सडे-सारवण-रांगोळ्यांनी ह्या रस्त्यावर लाल मातीवर विविध रंगी सजावट केली. ओबडधोबड रस्त्यावरून गणपतीना विसर्जनासाठी नेताना लेझीमच्या खेळाने मिरवणूक गाजत आली..

रस्त्यावरचा प्रत्येक खाचखड्डा आणि दगड आम्हाला पाठ होता. रात्रीच्या मिट्ट काळोखातून कधी चालायची वेळ आली तर टॉर्चशिवाय आरामात चालता येत होतं..पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणाऱ्या गढूळ मातकट पाण्यात सोडलेल्या होड्या त्यांच्याबरोबर आमचं बालपण सुद्धा वाहून घेऊन गेल्या..

ह्या सगळ्या आठवणी आता डांबराखाली झाकून गेल्या हि जाणीव होतानाच, तो रोडरोलर एखाद्या राक्षसासारखा क्रूर वाटायला लागला!

उगीच गळून गेल्यासारखं झालं.. जुन्या आठवणीत हरवून रस्त्याकडे बघत असतानाच, वरच्या आळीतून मैत्रिणीची आजी चालत येताना दिसली.

"झाला बाई एकदाचा रस्ता, त्या दगड-धोंड्यात चालवत नसे हो, सारखी भीती वाटे, चप्पल अडकेल कि काय, पडल्ये तर घ्या काय.. किती दिवसांनी मी एकटी बाहेर पडल्ये फिरायला.. किती वर्षं तो रस्ता होताय. झाला आता... देवच पावला हो!"

टकाटक तयार होवून फिरायला निघालेल्या आजीचा उत्साह आणि आनंद बघून कुठच्या कुठे औदासिन्य निघून गेलं!! असं वाटलं, आपलं बालपण त्या रस्त्याने श्रीमंत केलेलं, आता हे "दुसरं बालपण" सुरु झालेल्या ह्या आजीआजोबांच्या पिढीला हा रस्ता कम्फर्ट देतोय...

काळसुद्धा 'मार्ग'क्रमण करतोय, एक वळण घेऊन पुढे सरकतोय, संथपणाची जागा वेग घेतोय.. बदल होणारच, होयलाच हवेत!!
जुन्या पिढीच्या आजीने नव्या पिढीच्या मला, भूतकाळातून वर्तमानकाळात ओढलं!!
खरंच मग तो रोडरोलर अप्सरेसारखा सुंदर वाटला!!

©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे.

फोटो सौजन्य- अस्मिता पेंडसे.

04 October, 2016

एका अमावास्येची आठवण..

अमावस्या ह्या शब्दाभोवती भीतीच गूढ आवरण कायम असतच असतं. त्यातून पावसाळ्यात एकंदरच काळोखी वातावरण जास्त, त्यात अमावास्या असेल तर बघायलाच नको. “डोळ्यात बोट घातलं (म्हणजे समोरून येऊन कुणी दुसर्याने आपल्या डोळ्यात) तरी दिसायचं नाही” हा शब्दप्रयोग प्रत्यक्षात अनुभवायची वेळ आत्तापर्यंत जेव्हाजेव्हा आली, त्यापैकी एक गोष्ट.

घटस्थापनेचा दिवस. अजून पावसाळा संपलेला नव्हता. मी काही कामानिमित्त मुंबईला गेलेले, आणि परत येताना माझी आत्या आणि आप्पाकाका (म्हणजे मिस्टरआत्या) आणि मी असे एकत्र मुर्डीला येणार असा बेत होता. आत्याचं नुकतच एक मेजर ऑपरेशन झालेलं, ती विश्रांतीसाठी काही दिवस मुर्डीला येणार होती. दुपारी जेवून वगेरे दोन वाजता आम्ही मुंबईहून निघालो. काकांची काळ्या रंगाची पॅलिओ गाडी, (मॉडेल बंद झाल्यामुळे पार्ट मिळेनासे झालेत असं सगळेजण म्हणायला लागलेले तेव्हा). त्यांच्या ओळखीचा तो चक्रधर म्हणजे एक वस्तूच होती.

गप्पा टप्पा हास्यविनोद असा नेहेमीप्रमाणे मजेत वेळ चालला होता. मुंबई सोडून १७ नंबर हायवे (आता ६६) सुरु झाल्यावरच सगळीकडे हिरवळ (येथे अर्थ शब्दशः गवत) दिसायला लागल्यावर घरी आल्याचा फील यायला सुरुवात होत होती.

संध्याकाळ होता होता लोणेरे फाट्याला वळल्यावर चक्रधर साहेब बराच वेळ गायब झाले, गोरेगाव त्याच गाव असल्यामुळे तो कुणाला तरी भेटायला गेलेला. काळोख पडायला सुरुवात झाली आणि आजोबांचे काळजीग्रस्त होऊन होऊन एकसारखे फोन यायला लागले, आता हायवे सोडून आत वळल्यावर फोन पण नेटवर्कच्या बाहेर जाणार, म्हणून साडेनऊ पर्यंत घरी पोचतो, काळजी नसावी असं त्यांना सांगून ठेवलं, पण असा एका जागी थांबून जाणारा वेळ त्यात गृहीत धरलेला नव्हता. तेव्हा आडगावांमध्ये आत्तासारखा चांगलं नेटवर्क नव्हत. (तेव्हा म्हणजे 5 वर्षापूर्वी)

शेवटी एकदाचे चक्रधर परत आले. तो तेवढयात पिऊन बिऊन नसेल ना आला हि आमच्या आत्याबाईना शंका, आणि तो कोणत्या बाबतीत नग आहे कोणत्या बाबतीत नाही हे पक्कं माहिती असल्याने काका तसे निवांत. मुंबईहून निघाल्यापासुनच काका म्हणत होते, कि कसलातरी आवाज येतोय. पण “काही नाही हो,, चला” असं म्हणून तो विषय सोडून देत होता. आता रहदारी संपल्यावर तो आवाज सगळ्यांनाच जाणवू लागला. “काही काम नाही ना रे निघालाय गाडीच? आता मंडणगड शिवाय काही सोय नाही हो मध्ये.’  असं आत्या त्याला परत परत विचारत्येय आणि तो नाही म्हणतोय हा प्रयोग सारखा चालू.

पाऊस तसा थांबून थांबून पडत होता, पण मध्येच जोरदार सर दणकावून देत होता. नेहेमीचा रस्ता,, आंबेतचा पूल ओलांडून रायगड जिल्हा संपवून रत्नागिरी जिल्ह्यात शिरलो. सामसूम रस्त्यावर आमची गाडी सोडली तर मानवनिर्मित आवाज काहीच नव्हता. वाऱ्याचा, पावसाचा, नद्या पर्ह्ये यांच्या पाण्याचा, आणि परतीचा पाऊस असल्यामुळे मधूनच गडगडण्याचाच काय तो आवाज.

घनदाट झाडी आणि मंडणगडचा घाट संपला तेव्हा साडेआठ वाजत होते, म्हणजे आजोबांना सांगितल्याप्रमाणे साडेनऊला घरी पोचायला काहीच अडचण नव्हती. गाडीचं काम निघालेलं नाही हे १७६० व्यांदा वदवून घेऊन मंडणगड सोडून निघालो आणि कादिवली मार्गे जुन्या वाकडा आंजर्ले रस्त्याला लागलो.
शांत रिकाम्या रस्त्यावरून गाडी चाललेली, गप्पा बंद होऊन गाणी ऐकणे, डुलकी काढणे, इत्यादी आपापली कामे आम्ही तिघे करायला लागलेलो. आता आलोच जवळपास घरी अश्या विचारात रीलॅक्स होत आलेलो, तेवढयात धाब्बक्कन आवाज करून गाडी जागच्या जागी ठप्प आणि तिरकी.

खडबडून काय झाल काय झाल? असं म्हणतोय तेवढयात कळलं कि गाडीचं पुढचं डावीकडच चाक गळून गेलेलं आहे. गळून म्हणजे गडगडत कुठेतरी जाऊन काळोखात नाहीसं झालेलं आहे. एवढा वेळ आम्ही हातीपायी धड जिवंत कसे काय इथपर्यंत आलो ह्याचं आश्चर्य वाटायची वेळ होती. हा प्रकार हायवेला स्पीड मध्ये किंवा घाटात झाला असता तर?

पण सध्या हे सगळे विचार बाजूला ठेऊन आता पुढे काय ते ठरवायला हवं होतं. मिट्ट काळोख आणि पावसामुळे किरर्र झालेलं रान. नेहेमीच्या रस्त्यावर सुद्धा आपण नेमके कुठे आहोत हे कळणार नाही इतका मिट्ट काळोख. कोणाकडेही बॅटरी नाही. त्या काळचे मोबाईल म्हणजे पिवळा किंवा केशरी उजेड पडणारे पेपरवेट. धाब्बक्कन आपटल्यामुळे का काय कोण जाणे गाडीचे दिवे पण लागेनासे झालेले. गाडी रस्त्याच्या मध्यभागी. घड्याळ दाखवत होतं कि अजून मुंबईला जाणारी रातराणी (एष्टी) ह्या रस्त्यांनी जायची आहे. ह्या बंद पडलेल्या गाडीच्या कडेनी एसटी जाणं केवळ अशक्य. त्यातल्या त्यात नशीब एवढच कि पाऊस पडत नव्हता-निदान त्या क्षणी तरी.

शेवटी असं ठरवलं कि आत्या आणि काकानी गाडी जवळच थांबायचं. आत्याच ऑपरेशन झाल्यामुळे आणि काकांना गुडघेदुखी असल्यानी काळोखातून चालणं जमणारं नव्हतं. त्यामुळे मी त्या मनुष्याबरोबर जाऊन कुणाची तरी मदत मिळेपर्यंत चालत राहणे हाच एक पर्याय होता. तोही आत्याला(आणि थोडासा मलापण) रीस्कीच वाटत होता, पण इलाज नव्हता, कारण ह्या रस्त्यावर माझ्या ओळखीची लोकं भेटायची काहीतरी शक्यता होती. तो मनुष्य अशा बाबतीत फालतू नाही असं काकांनी सूचित केल्यामुळे किंचित निर्धास्त होऊन आम्ही चालायला सुरुवात केली.

मोबाईलचा केशरी उजेड अश्या वेळी मिसगाईड कसा करतो त्याचं प्रत्यय आला. त्या उजेडाने डोळे विस्फारून जातात.. आणि आपण रस्ता सोडून भरकटत चालायला लागलो तरी कळेना, झाडांच्या काळपट आकृत्या सुद्धा त्या काळोखात बेमालूम मिसळून गेलेल्या. वातावरण निर्मितीसाठी कोल्ह्यांनी कोल्हेकुई सुरु केलेली. शेवटी तो मोबाईल खिशात टाकला, आणि अंदाजाने चाचपडत चालत राहिलो.

“कोकणातली भुते” जगप्रसिध्द आहेत खरी पण अजून तरी त्यांनी मला दर्शन नाही दिलेले. (टच वूड) त्यामुळे ती एक भीती अजिबातच वाटत नव्हती. कोल्हा किंवा डुक्कर आले तर लांबून दिसेल- म्हणजे चाहूल लागेल.. आणि भ्यायला थोडा तरी वेळ मिळेल, पण जनजनावर पायातच वळवळत आलं तर मात्र ते चावल्यावर मगच कळेल... अशी सगळी बिन उपयोगी मुत्सद्देगिरी मनातल्या मनात करून थोडा जीव रमवला चालता चालता!!

इकडे आत्या आणि काकांची परिस्थिती अशी झालेली, कि गाडीत बसून राहावं तर मागून/पुढून कुणी गाडीवाला सुसाट आला, आणि ती बिनदिव्यांची वळणावर उभी असलेली काळी गाडी दिसली नाही त्याला तर? आणि बाहेर येऊन उभं राहावं, तर काळोख,कोल्हे,रानडुक्कर ह्यांचा धोका, आणि शिवाय आत्या आणि काकांच्या तब्येती.

अर्धा तास चालून झाल्यावर पहिल्यांदा एका पिवळ्या बल्बचा उजेड दिसल्यावर तो (उजेड) माझ्या डोक्यात पण पडला आणि लक्षात आल कि देहेण आलं. मग झपाझप पाय उचलत गावातल्या पहिल्या घरच दार वाजवलं. देहेंण मध्ये राहणारा आमचा एक फॅमिली फ्रेंड संतोषदादा नशिबाने तेव्हा तिथे होता, त्याला सगळा प्रकार सांगितला, मग तो त्याच्या मित्रांना बोलवायला म्हणून गावात गेला, तोपर्यंत ११ वाजत आलेले. तेवढयात रस्त्यावर प्रखर हेडलाईट चा झोत दिसला, म्हटलं आली वाटतं मुंबई गाडी.. आता बसा.. पण बघितलं तर ती गाडी आंजर्ल्याची दरीपपकरांची झायलो होती. तिला हात करून थांबवलं, आणि म्हटलं, “काका कुठे जाताय?”

“तू आत्ता हिते काय करत्येस ते सांग अगोदर”- मग सगळी गोष्ट त्यांना सांगितली, तेवढयात देहेण मित्रमंडळ ब्याटऱ्या काठ्या दोऱ्या घेऊन आलेच, मग सगळेजण गाडीत बसून आत्या आणि काका अडकलेले होते तिथे आलो.  ते दोघं ह्या गाडीतून त्या गाडीत आले. ब्याटरीच्या उजेडात गडगडत गेलेलं चाक शोधून झालं. मग ती पॅलिओ ह्या गाडीला मागून अडकवून कशीबशी देहेण गावात आणून ठेऊन, देहेणकरांना घरी सोडून, त्यांचे पुनःपुन्हा आभार मानले. नेमकी त्यादिवशी मुंबईची रातराणी अगोदरच  पंक्चर झालेली असल्याने तिचा खोळंबा करायचं पाप आमच्या डोस्क्यावर आलं नाही!

रात्री साडे बाराच्या दरम्यान झायलोवाल्या दरीपकरकाकांनी आम्हाला घरी सोडलं तेव्हा आजोबांनी देव पाण्यात बुडवायचेच बाकी ठेवलेले आणि बाबा बाईक काढून आम्हाला शोधायला निघायच्या तयारीतच होते. त्याकाळी ह्या रानातल्या रस्त्यावर मोबाईलवरून संपर्क होण्याचा प्रश्नच नव्हता.

“म्हणून मी नेहेमी सांगतो, वेळीअवेळी प्रवास करू नये. दासबोधात ते मूर्ख लक्षणात सांगितलेलंच आहे ”.. आजोबा

“किती आव आणलास तरी तेव्हा फाटलेली ना पण.. खरं सांग..?”.. बंधुराज

“घर सापडलं वाटत तुला संतोषच?.”.. बाबा.

“हि पोरगी म्हणजे तुझा मोठा पोरगाच हो खरा अनिल.”.. आत्या.

“गप्प बसा आता सगळे. केवढा प्रसंग होता, देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ते असं, देवाला गूळ ठेवा आणि जेवायला बसा आता सगळे!”.. आई.

©ऐश्वर्या विद्या अनिल पेंडसे, @मुर्डी .