04 July, 2019

सुमारे 12-15 वर्षे लोटली असतील, आमच्या ओळखीत एकांच्या घरी नवजात बालकाचे आगमन झाले व बायाबापड्या निघाल्या बाळांतविडे व ओट्या घेऊन. जनरीतच ती, जाणारच. पण नव्या बाबाचे मित्र, समवयीन परिचित पुरुष मंडळीही हौसेनी 'बाळ बघायला' जाणं हे खेडेगावात तरी जरा नवीन होतं तेव्हा.

काही बुजुर्ग मंडळींची सहज प्रतिक्रिया होती-"त्यात काय बघायला जायचाय, पाय फुटले की ते पोर का घरात बसणारे? दिसेलच की मग इकडे तिकडे धावताना!😄"

बाळ आणि आई एकमेकांबरोबर रुळण्याच्या कार्यात पुरुष व्हिजिटर्स अडचणीचे ठरू शकतात म्हणून पुरुषांनी बाळ बघायला जाण्याची पूर्वी पद्धत नसावी हा एक मुद्दा रास्त वाटतो खरा, पण एकंदरीत बाळ आणि हगोली-मुतोली हे बायकी काम, त्यात लक्ष घालणं हे पुरुषीपणात बसणारं नाही, हाही दृष्टिकोन भरपूर असे.

अर्थात ह्या प्रवृत्तीला खणखणीत अपवाद आमच्या घरातच आहे. माझ्या बाबांनी आम्हा भावंडांचे दात घासणे, जेवण भरवणे, खांद्याशी घेऊन ओव्या/अंगाई म्हणत झोपवणे, पुढे आंघोळ घालून तयाऱ्या करून शाळेत पाठवणे असे सगळे उद्योग हौसेनी केले. पण असे बाबा त्यावेळी अपवाद असत. आमच्या बाबांनाही डॉक्टर किंवा कपडे दुकानदार यांना स्वतःच्या मुलांबद्दल तब्येतीचे, कपड्याच्या मापाचे तपशील  देताना आईला विचारावे लागे ते एक सोडून द्या🤣

बघता बघता एवढी वर्षं निघून गेली. तेव्हा शाळा कॉलेजात असणाऱ्या आमच्यासारख्याना आता मुलं झाली, आणि जाणवलं की पुलाखालून किती पाणी वाहून गेलंय आणि काळ किती बदललाय!

आजच आमच्या दुकानात एक आजोबा आले होते- त्यांच्या नातीसाठी डायपर विकत घ्यायला. हाही एक चांगला बदल. (हे मी खेडेगावाच्या दृष्टींतून लिहीत आहे.) साईज कुठला लागेल हे मात्र त्या आजोबांना माहिती नव्हतं. सूनबाईंना फोन करून विचारायचं तर त्या आजोबांना मोबाईल नंबर पाठ नव्हता. नातीचं वजन किती ते माहिती नव्हतं.

आता हगोली मुतोली ह्या विषयात एक्सपर्ट झाल्यामुळे अजयने पटकन हिशोब करून, ह्या मनुष्याची नात चार महिन्याची आहे म्हणजे 4 ते 8 किलो वजनासाठी असलेला डायपर लागेल हे ओळखून त्यांना दिले.

आमचं पोरगं अगदी बारकं - 2 दिवसाचं-असताना माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये आम्हाला भेटायला आला. तेव्हा तिथे मी, बाळ आणि काकू(सासूबाई) एवढेच होतो. पोग्गुने शी शू चा सगळा रबरबाट करून ठेवलेला तो काकू निस्तरत होत्या. लगेच आमचे बंधुराज पुढे सरसावले, आणि भराभर काकूंना लागेल ती मदत करू लागले. त्या हात धुवायला गेल्यावर ह्याने लगेच कापडाची त्रिकोणी घडी करून त्यात ते गोड गाठोडं पुडी करून बांधलं नि बोबड्या गप्पा सुरु झाल्या मामाभाच्याच्या😍 त्याचं पोरगं तेव्हा 23 दिवसाचं झालेलं आणि हा तब्बल 21 दिवसांचा अनुभव त्याला सिनियर करून मोकळा झाला होता!

पुढे माझी नणंद तिचं बाळ घेऊन 'बाळंतपणा'साठी आली तेव्हा अनुभवी मामा आणि त्याचा भाचा अशी अजून एक जोडी आम्हाला बघायला मिळाली😍 माझा मामा पण मला चमच्याने दूध पाजण्यापासून ते स्वतः माझ्यासाठी दुपट शिवण्यापर्यंत खूप काय काय करत असायचा😍

ह्या सगळ्या बदलाचे चांगले परिणाम ही दिसतायतच- की पूर्वी लोक वडिलांसमोर चळचळ कापत असत म्हणे🙄, मग पुढच्या काळात जरा धाक उरला, आता तर बाबांशी मैत्री आमचीही आहेच, आणि आमच्या पोरांना तर त्यांचा बाबा कुल ड्युड का काय तो असणारे हे नक्की😄

त्याचबरोबर आधी कश्या, "मूल झालं नि सगळं हिंडणेफिरणं, छंद, मित्रमैत्रिणी मागेच पडले" हा सर्रास बायकांचा अनुभव असे. तोही काही प्रमाणात मागे पडतोय. सुरुवातीचे काही महिने पार पडले की पोरं आणि बाबा एकमेकांना व्यवस्थित सांभाळून घेतात (ज्यांच्याकडे आजी आजोबा मदतीला- मार्गदर्शनाला  असतात त्यांना तर फारच बरं.) आणि आया त्यांची कामं, उनाडक्या, छंद, पब्लिक रिलेशन्स वगैरे अगदी नीट पार पाडून येतात- हा माझ्यासकट बऱ्याच मैत्रिणी-बहिणी यांचा अनुभव आहे. त्याने जरा बदल मिळतो त्यामुळे मेंदू तरतरीत झाला की बरं वाटतच, शिवाय पोरगं जरावेळ लांब राहून परत भेटलं की नंतर जास्त दर्जेदार वेळ पोरांना दिला जातो हे एक निरीक्षण.

'नवबाबा' असलेले दोन मित्र एकमेकांना भेटले की, क्रिकेट/ राजकारण ह्यांच्या बरोबरीने "तुमचा सोनू काय काय खायला लागला आता? आमचा बाळू अमुक अमुक खातो" किंवा "तुमचा सोनू किती शब्द बोलतो रे? आमचा अजून बाबा काका ह्याच्यापुढे काहीच बोलत नाही" असे संवाद होतात.

सुट्टीच्या दिवशी ही नवबाबा जमात तंगड्या पसरून लोळण्याऐवजी पोराचं कपाट आवरून लहान होणारे कपडे बाहेर काढणे, "चड्ड्या संपत आल्यायत ग पोरग्याच्या आणायला हव्यात, अजून काही कपडे लागतील का आत्ता घ्यायला त्याला" असे सर्व्हे करतात. ट्रीमरने पोरांचे केस कापतात,बेबी नेलकटरने नखं काढतात.. तेवढाच आत्ताच्या आयांना पूर्वीच्या आयांपेक्षा रिलीफ मिळतो. तो रिलीफ आपण घ्यावा आणि बाबा-मुलांना एकमेकांची कंपनी साजरी करायला संधीही द्यावी.

आता हे सगळं चित्र खरं तर घरोघरी दिसत असेल. पण अलीकडेच एक मैत्रीण भेटली, रात्रीबेरात्री बाळ रडताना, बाळाची दुपटी बदलताना नवऱ्याची झोपमोड होते म्हणून गिल्ट घेऊन वावरत असलेली. "अजूनही असं का वाटावं?" असं मनात आलं आणि त्यामुळे हे सगळं लिहावंसं वाटलं.. मी लिहीत असतानाच लेकरू पेंगुळलं आहेच. त्याचा बाबा त्याला खांद्याशी घेऊन झोपाळ्यावर बसलाय- लेकरू त्याला "कोकिळेचा गाना" म्हण म्हणून हट्ट करतंय, आणि बाबा गातोय😍

©ऐश्वर्या पेंडसे जोशी