19 March, 2019

शिमगोत्सव 2019

एकेकाळी जिवाभावाची सोबती असलेल्या एसटीच्या लाल डब्याचा प्रवास करायचा योग आज पावणेदोन वर्षांनी आला. निमित्त होतं साताई आणि माटवणच्या पालख्यांच्या आगमनाचं!

अबीरच्या बालपणामुळे प्रवासाबाबत आलेलं परावलंबित्व ह्या निमित्ताने दूर करावं असा विचार केला. शिमग्यामुळे असलेली वाढीव व्यवसायिक कामं बघता, "आम्हाला मुर्डीला सोडायला चल" असं नवऱ्याला म्हणणं बरं वाटत नव्हतं. गेल्या वर्षी शिमग्याच्या वेळी अबीरचा जन्म दोन दिवसांवर येऊन ठेपला होता, म्हणून पालखीला मुर्डीला येणं झालं नव्हतं त्यामुळे यंदा यायचंच अशी इच्छा होती. इथे मुर्डीला सकाळीच साताईचे आगमन- त्यामुळे त्या माहोलातून बाहेर निघून बाबा, भाऊ यापैकी कुणाला न्यायला बोलवावं असंही वाटेना.

मग ठरवलं की आता परत एसटी बरोबर गट्टी करायची. अबीरला पण आत्ताच लाल डब्याची सवय होईल.  कमीतकमी सामान हा मंत्र आचरणात आणून, पहाटेच अंथरुणातुन अबीरला उचलला व एसटीत बसलो. कॉलेजसाठी दापोलीत जाणाऱ्या बारक्या दिराने गाडी बदलेपर्यंत मदत केली व पाजपंढरी गाडीत बसून आमच्या स्वाऱ्या एकदाच्या दोन तासांच्या )प्रदीर्घ😜😁🤣) प्रवासानंतर घरी डेरेदाखल झाल्या.

दोन वर्षांनी शिमगोत्सव अनुभवताना आज जरा वेगळंच वाटत होतं. घरी येत असताना कोंडावरच साताईची पालखी दिसली, तो पंचक्रोशीत जगप्रसिद्ध असलेला ढाकुमाकूम बाजा ऐकायला आला, आणि मन अगदी प्रसन्न व नॉस्टॅलजीक झालं. दारासमोर पाणी मारून रस्ते स्वच्छ झाले होते. भराभर पोरांना भरवून, भराभर आंघोळया करून, पोरांनाही विसळून काढण्यात आलं, आणि अबीर अर्णवसाठी पहिलावाहिला असलेला पालखीचा अनुभव अनुभवण्यास आम्हीही सज्ज झालो.

पूजा, ओटी, नमस्कार करणे झाल्यावर, दोघा पोरांनीही आज्ञाधारकपणे मोरया केला. मुलं पहिल्यांदाच शिमगा अनुभवत आहेत हे कळल्यावर प्रथेप्रमाणे पालखीबरोबरच्या लोकांनी मला व मृदुलाला आपापली पोरं कडेवर घेऊन पालखीच्या खालून पलीकडे जायला सांगितलं तेव्हा आम्हाला पण भरपूरच मजा आली. साताईची पालखी पुढे जाईपर्यंत अबीर अर्णव ढाकुमाकूमच्या तालावर एक बोट वर करून नाचत गंमत बघत राहिले😍

दुपारी जेऊन मुर्डीच्या घरातली निवांत झोप काढून होते तोच माटवणकरीण आलीच. ही आमची पेंडसे कुटुंबियांची मानाची पालखी. तिला आधीच्या घरी आणायला, पूजा, ओटी, प्रार्थना, प्रसाद सगळं व्यवस्थित झाल्यावर मग सुरेश काकाच्या घरापर्यंत सोबत, तिथून होळीपर्यंत निरोप द्यायला असे आदित्य, संदीप, स्पृहा जाऊन आले.

मुसलमानी आक्रमणांच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतरित झाल्यामुळे मुर्डीच्या पेंडसे कुटुंबीयांचा माटवण गावाशी संबंध आला असं म्हणतात.  इतिहासातले ऋणानुबंध जपत, वर्षानुवर्षे प्रथा सांभाळत, इतक्या दूरवरून- काट्याकुट्यातून चालत चालत पालखी घेऊन येणाऱ्या, आणि भक्तांच्या भल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या खेळ्याना नमन ---^---

माटवणकरिणीला निरोप देऊन घरी आलो तर आईने पुरणपोळ्याना सुरुवात केली सुद्धा होती. मृदुला व मी लुडबुडत उरलेल्या थोड्या पुरणपोळ्या केल्या, तितक्यात रणवाद्य गर्जवीत ताडीलचा भैरी आल्याची वार्ता धडकली. तशीच सगळी कामं टाकून पोरांना काखोटीस मारून पळत सुटलो, तर यंदा ब्राह्मणवाडीत ताडीलचा भैरी येत नाही हे समजलं. पण खट्टूपणा मनभर पसरण्याचा आधीच कोंडावर पोचलोसुद्धा!

रामाच्या देवळात पालखी बसवून वाडीतले लोक पूजा करत होते, तिथेच नमस्कार केला. सगळ्यांच्या पूजा झाल्यावर मानकऱ्यांच्या घरी जाण्यास भैरी उठले, आणि पुन्हा तो रणवाद्यांचा थरारक कल्लोळ सुरू झाला. डोल डोल करत अखंड डोलणारी भैरीची पालखी, सभोवार डुलणारे भगवे ध्वज, तश्याच भगव्या रंगाने रंगलेले मावळतीचे आभाळ, होळीपौर्णिमेच्या पूर्वसंध्येचे चंद्रबिंब आणि धताडधाडधाड धताडधाडधाड करून गर्जणारे ढोल ताशे यांनी आसमंत कोंदून गेलेला असतानाच, ग्रामदेवतेची- चाचवलकरिणीची पालखी खाली उतरून आली.

दोन्ही पालख्यांची उंच उचलून झालेली भेट, आर्जव, आणि पालखी घेऊन नाचणारे खेळी! निव्वळ काही सेकंदांचा हा काळ उपस्थितांना खिळवून भारावून टाकणारा! काही सेकंदातच दोन्ही पालख्या आपापल्या मानकऱ्यांकडे मार्गस्थ झाल्या. गर्दीही दोन दिशांना पांगली.

उद्याच होम. होळी पौर्णिमा. उद्या पहाटे खाडी किनाऱ्याने बिकट वाट तुडवत साताई देवळात परतेल. बाकीच्याही सर्व पालख्या संध्याकाळपर्यंत सहाणेवर जातील, मग गावोगावची पोरं होळ्या पेटवतील. मग वर्षभर पुरेल एवढी एनर्जी घेऊन, सगळ्या नकारात्मक भावना होळीत नष्ट करून, नव्या उत्साहाने जगणं जगायला सुरुवात होईल. पुढच्या वर्षी पुन्हा शिमग्यात उत्साह व भक्तीची लयलूट करण्यासाठी!

©ऐश्वर्या पेंडसे जोशी