25 August, 2019

हरितालिकेची कहाणी

.ऐका हरितालिके तुमची कहाणी
एक आटपाट नगर होतं, तिथे गणेशोत्सव ऐन तोंडावर आला होता व लोक त्याच तयारीत लगबगीत होते. बाल गणेश आपल्या उंदरावर बसून प्रवासाला मार्गस्थ झाल्यावर इकडे कैलास पर्वतावर शंकर व पार्वती माता यांना घर ओकेबोके वाटू लागले. त्यांनी कलियुगात पृथ्वीतलावर कायकाय सुरू आहे हे पहाण्यास जाण्याचा निर्णय घेतला व तेही प्रवासाला मार्गस्थ झाले.

पृथ्वीतलावरील प्रवासाचा योग भगवान शंकर व पर्वतीमातेचा बऱ्याच कालावधीनंतर येत असल्याने त्यांना इथे फार फार बदल झाल्याचे जाणवत होते, व त्याबद्दलक चर्चा करत उभयतांच्या प्रवास मोठ्या मजेत सुरू होता.

विविध गावे शहरे न्याहाळत मार्गक्रमण करीत असता  शंकर म्हणाले, "पार्वती देवी!, आज हरितालिका तृतीया.. तुम्ही वस्तुपाठ घालून दिल्याप्रमाणे कुमारिकांनी करण्याच्या व्रताचा दिवस. पण इथे कुठे त्याचा काही मागमूस दिसेना! लग्न झालेल्या मोठाल्या स्त्रियाच तुमची पूजा करून हे व्रत आचरीत आहेत! आणि उपवर मुली मात्र घराबाहेर फिरताना दिसताहेत"

"अहो! असं काय म्हणता, उपवर मुली बाहेर फिरताहेत म्हणे! त्यांना त्यांची शाळा-महाविद्यालये, शिकवणी वर्ग, नोकरी- व्यवसाय, हे सर्व बघावे लागते आजकाल. अर्थात हे सर्व लग्न झालेल्या स्त्रियांनाही लागतेच हो बघावे, पण जबाबदारी पडली की त्या नेतात सर्व निभावून असे दिसते!"- पार्वती माता

"पार्वती देवी, हे सर्व आपणास कसे माहिती? आणि हे सर्व पुरुषी उद्योग ह्या स्त्रिया कशाकरिता करीत आहेत?"

"अहो काळ बदलतो आहे! आता आपल्या काळात आम्हीही हाच पती असावा म्हणून आपणासाठी हट्ट धरला होताच की! अगदी तपश्चर्या ही केली होती! पण आजकालच्या मुलींसाठी ही तपश्चर्या सुद्धा निराळी आहे बरं. मुलगी उत्तम शिकली आहे ना, स्वतःच्या पायावर उभी आहे ना, अर्थार्जन उत्तम करते ना, सुसंस्कारित आहे ना, तिचे चारित्र्य उत्तम आहे ना, तिला स्वयंपाक येतो ना, घरकाम येते ना, शिवाय दिसण्यात सुंदर व वागण्यात चटपटीत आहे ना .... ह्या सगळ्या प्रश्नावलीत उत्तीर्ण व्हावयाचे म्हणजे अपार कष्ट आलेच- एक प्रकारे तपश्चर्याच की! आता हे सर्व करण्याच्या नादात जर ह्या लेकी-बाळींनी जर नाही केला हरतालिकेचा निर्जली उपवास तर आम्ही काही त्यांच्यावर रागावणार नाही हो!"

"खरं आहे तुमचं म्हणणं पार्वती देवी! पण ह्या अश्या बदलत्या काळात हल्ली इथे लग्न न टिकण्याचे प्रमाण किती वाढले आहे, ह्याची कल्पना आहे का आपणास?

"होय तर.. खरी गोष्ट आहे. पण पूर्वीही स्त्रिया कठोर उपासतापास करूनही मनासारखा नवरा मिळेलच असे नव्हते बरं, आहे तोच चांगला मानून घेत असत त्याकाळी! हल्ली मुली सहन करणाऱ्यातल्या नाहीत!"

"पण मग आत्ताच्या ह्या लेकीबाळीना काय सांगाल तुम्ही?"

हे व्रत फक्त मुलींनीच नव्हे तर मुलांनीही आचारावे असे आहे.

हे काय भलतंच? पार्वतीदेवी! असं कुठे झालं होतं का? म्हणजे तुम्ही काय म्हणताय की चांगली बायको मिळावी म्हणून पुरुषांनीही व्रते करावीत?"

अर्थात! आजकाल मुलींचे लग्न जमणे ही समस्या नाही बरं..  मुलग्यांचे लग्न जमणे ही मोठी समस्या आहे! वर्षानुवर्षांची मानसिकता मुलग्यांनी व त्यांच्या मातापित्यांनी सोडायला हवी.. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण हल्ली लग्न जमवताना वरपिते विचारणा करतात की, " काय हो तुमची मुलगी निर्व्यसनी आहे ना?"--- आता बोला!

काय सांगता काय पार्वती देवी? पण मग ह्या मुलामुलींना तुम्ही व्रत म्हणून सांगाल तरी काय?

ऐका सांगते आजच्या काळात हे व्रत कसं करावं-
हे व्रत एकच दिवस करण्याचे नसून आयुष्यभराचे आहे हे प्रथम लक्षात घ्यावे!

मुलामुलींना बालवयात आईवडील सांगतात ते आपल्या भल्याचे आहे मनात ठसवावे. उत्तम अभ्यास करावा, शिक्षण घ्यावे, स्वावलंबनाने स्वतःच्या पायावर उभे राहावे. जमतील तितकी जीवनोपयोगी कौशल्ये शिकून घ्यावीत.

तरुणपणी जोडीदार निवडताना तारतम्य बाळगावे, आईवडिलांना विश्वासात घ्यावे. स्वप्नरंजनापेक्षा वास्तविकतेवर भर द्यावा. नीट विचार करून, एकमेकांना वेळ देऊन आयुष्यभराचा निर्णय घ्यावा. एकदा आपले म्हटल्यावर गुणदोषांसहित स्वीकार करावा. एकमेकांसाठी स्वभावाचे टोकदार कंगोरे दोघांनीही बोथट करावे. एकमेकांच्या कुटुंबियांना दोघानीही आपले म्हणावे, सुखदुःखात सोबत असावे.

एकमेकांचे आरोग्य, एकमेकांचे मनःस्वास्थ्य उत्तम राहावे ह्यासाठी प्रयत्नशील असावे. आपापल्या जोडीदाराच्या वैद्यकीय तपासण्या वेळेवर होतात ना हे पाहावे. जोडीदाराला व्यसनांपासून दूर ठेवावे व स्वतः दूर राहावे. आधुनिकतेच्या नावाखाली वाढीस लागलेला स्वैराचार आपल्या जवळपास फिरकू देऊ नये. एकमेकांना सन्मानाने तसेच मित्रत्वाने वागावे

मनाला प्रसन्नता वाटणार असेल तर पारंपरिक पद्धतीने व्रत जरूर करावे, पण त्याची सक्ती नसावी. आजच्या दिवशी बायकांनी जरी काही खाल्लं तरी त्यांच्या आयुष्यात काही वाईट घडणार नाही... उलट वेळच्यावेळी पोषक व उत्तम आहार घेणाऱ्या स्त्रियाच उत्तम आरोग्य मिळवतील, घरादाराची जबाबदारी सक्षमपणे पेलतील व त्यांची मुलेबाळेसुद्धा तोच वारसा चालवतील. सर्वांची आयुष्य सुखासमाधानाने भरून राहतील.

व्रतानिमित्त एक दिवस वाण द्यायचे तर यथाशक्ती द्या, पण त्याहून महत्वाचे म्हणजे कायमच माणसांशी माणुसकीने वागावे. केवळ सवाष्णच नव्हे तर सर्वच स्त्रियांशी सन्मानाची वागणूक ठेवावी. हे व्रत कधीही विसर्जन न करता आयुष्यभर सुरू ठेवावं  ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

©ऐश्वर्या पेंडसे जोशी