08 September, 2016

घरवापसी...

लोक दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाहून घरी आलेत. रात्रीचं जेवण उरकून निवांत बसलेत. दिडच दिवसाची सुटी घेऊन मुंबईहून कोकणात घरी आलेला नातू आणि नव्वदीतले चिरतरुण आजोबांच्या गप्पा रंगल्यायत.
*******
"मग, उद्याच लगेच निघायचंच म्हणतायस?"

"हो आजोबा, कामं आहेत खूप, खरं तर इतक्या दिवसांनी आलो, निघायचं जीवावर येतंय, पण निघावंच लागेल.."

"बरं, झाल्ये ना रे सगळी तयारी? तुझ्या आईने बांधून ठेवलेला खाऊ भरलास का ब्यागेत? सगळ्या मित्रांच्या भेटी गाठी झाल्या ना रे? आणि निघायच्या अगोदर देवळात जाऊन ये हो!!"

"हो आजोबा, खाऊ बॅगमध्ये ठेवला, बरेचसे मित्र भेटले, देवळात जाऊन येईनच उद्या निघताना."

"पुन्हा केव्हा येशील?"

"..."

"मी काल तुला सांगितलाय त्यावर काही विचार केलास?"

"हम्म, पण आताच नाही काही सांगता येणार, विचार करीन मग सावकाश."

"आमचे आजोबा म्हणत- जो करी पाप तो मुंबईस जाई आपोआप.. खरंच आहे हो ते, काय ती तिकडे गर्दी.. अरे आपल्या संबंध गावातले सुरविंट, मुंग्या, डोंगळे एकत्र मोजले तरी त्यांच्याहून मुंबईतली माणसे जास्त भरतील हो मोजलीस तर!! किती रे ती गिचमीड.. इथे बघ कसं स्वच्छ मोकळं आहे.. तुझ्या बरोबरीची कितीतरी मुलं सुद्धा इथेच कशी मार्गाला लागलीत बघ.. आहे काय त्या मुंबईत? म्हणजे बरंच काय काय आहे तिकडे, पण तुझ्याकडे पर्याय असताना तू त्या शहरातल्या गर्दीत अजून भर का घालतायस?? इकडे कायमचा आलास तर किती रे बरं होईल..
मी आता नव्वदीचा झालो, तुझी आजी पंच्याऐशीची, तुझे आईबाबा सुद्धा साठीच्या जवळ आलेत आता.. अजून काही वर्षांनी आम्हाला झेपेनासं होईल तेव्हा?? तू इतक्या लांब?? अरे आपलं घर.. जागतं राहावं असं वाटतं हो मला म्हाताऱ्याला"

"सगळं पटतंय मला आजोबा, मला सुद्धा वाटतं आपलं घर कायम उघडं, नांदतं, गाजतं असावं.. आणि नशिबाने माझं काम पण असं आहे कि ते मी इथून पण करू शकतो, फारतर आठवड्यातून एकदा-दोनदा ऑफिसला जावं लागेल"

"मेल्या तेच तर मी म्हणताय.. ते तुमचं ते काय ते -वर्क फ्रॉम होम- का काय ते.. सातासमुद्रापार असलेल्या त्या शिंच्या साहेबाची कामं तुम्ही मुंबईत बसून केलीत काय नि हिते कोकणात बसून केलीत काय? फरक काय पडणारे त्यात? तू डाक्टर नाहीतर वकील असतास तर नसतं हो शक्य झालं, घरात बसून तिकडचे पेशण्ट तपासायचे किंवा घरात बसून खटले चालवायचे हे शक्य नाही अद्यापपावेतो तरी,, पण तू कॉम्प्युटरवाला ना.. इथे तुमचं ते ब्रॉडब्यांड नि बिडब्यांड सगळं आहे हो.. कुणी सांगावं?? उद्या इथेच तुझ्या हाताखाली तुझ्यासारखे आणखी चार कॉम्युटरवाले काम करतील.. त्यांची घरं सुद्धा नांदती राहतील.."

"☺☺☺ पॉईंट आहे आजोबा तुमच्या बोलण्यात!!"

"मग! मी पॉइंटाचंच सांगताय तुला.. आणि कानात हळूच सांगतो तुला, तू सवडीने इथे राहिलास म्हणजे ते फेसबुक वगैरे शिकवशील ना मला, तुझा बाबा सारखं वाचीत असतो हो ते बुक.. आम्हाला जगाच्या बरोबर राहायचं तर तुमची मदत हवीच आता"

"नक्की आजोबा, मी नक्की शिकवतो तुम्हाला.. ह्या वयात तुमचं हे स्पिरिट आहे ना.. बेस्ट आहात तुम्ही!! पण मला शंका वाटते कि मीच इथे कायमचा आलो तर जगाच्या बरोबर राहीन कि नाही..
..
म्हणजे कामाच्या दृष्टीने नाही म्हणत मी, ते होत राहील.. पण तिकडे आता माझं एक वेगळं वर्तुळ तयार झालंय, वेगळी लाइफस्टाइल मिळवलीय मी आणि मला ह्या सगळ्याची सवय झालीय. ते सगळं सोडून मला इथे कायमसाठी करमेल का? मी बोअर तर नाही ना होणार...
तिकडे गर्दी, ट्रॅफिक, पोल्युशन सगळं आहे, पण त्यातून एकदा घरी पोचलात कि आयुष्य इथल्यापेक्षा खूप सोपं आहे. सोईसुविधा, एन्टरटेनमेन्ट सगळ्या बाबतीत तिकडे खूप सोपं आणि खूप जास्त आहे सगळं.. आणि हॉस्टेल लाईफ संपवून मी कमवायला लागलो त्यालाही आता दहा वर्षं होत आलीयेत.. दहावीपर्यंत इथे असलेला मी आणि आताचा मी ह्यात फरक पडलाय.. जुन्या मित्रांशी आधीसारखं ट्युनिंग उरलं नाही आता.. परदेशातून भारतात परतलेल्या लोकांचं होतं तसं नाही ना होणार माझं मुंबई सोडून इथे आल्यावर??"

"मौजमजा, आनंद, करमणूक हि मानण्यावर असते रे बाळा.. तुम्ही ज्याला मूड म्हणता ना, तो चांगला नसेल तर, अगदी तुमच्या त्या मल्टिफ्लेक्स का काय त्यातल्या सिनेमात पण तुमचं मन नाहीच हो रमायचे.. आणि मूड चांगला असला ना, म्हणजे एष्टी स्टॅण्डवरच्या डोंबऱ्याच्या खेळात सुद्धा भान विसरून तंद्री लागेल तुमची.. तो मूड चिरंतन चांगला ठेवायला जमलं पाहिजे बघ.. त्यासाठी बारक्या बारक्या गोष्टीत आनंद शोधायला हवा.. आणि मुख्य म्हणजे आपण कुणी वेगळे आणि मोठे शहाणे आहोत हा दंभ मनात येता कामा नये.. "ह्यात काये आणि त्यात काये??" हा दृष्टिकोन तुम्हाला झटकन बोअर करतो!!! असो, तुझ्या भाषेत काय ती 'शाळा खूप घेतली हो तुझी!"

"असं काय म्हणता आजोबा, पण खरंच हे सगळं ऐकणं सोपं आणि करणं कठीण आहे.. पण मी नक्की विचार करतो"

"कर हो कर.. चल, मधल्या आळीत नानाचा गणपती आहे अजून गौरींबरोबरचा.. भजन आहे ना आज गावातल्या मुलांचं!! मला घेऊन चल जरा तिकडे.. बाबाच्या स्कुटरच्या मागे बसतो हो मी! तू चालव स्कुटर.. चार अभंग ऐकिन नि येईन मग घरी."
********
आजोबा आणि नातू भजनाला पोचले.. सगळे आबालवृद्ध भजनात रंगून गेले होते.. झनचकझनचक टाळांचा गजर, पेटीचे मधुर सूर, तबल्याच्या ठेका.. एकसुरात गायलेली भजनं.. साताठ वर्षांच्या मुलांना बुजुर्गांनी बोट धरून प्रवाहात आणणे.. बेभान होऊन भजन आळवताना सगळ्यांचे सस्मित हावभाव.. आणि कडवं संपताना अगदी सैनिकी शिस्तीत एकाच वेळी एकाच ठेक्यात थांबून लय बदलणारी वाद्ये- बरोबर डुलणाऱ्या माना!!! प्रचंड एनर्जीला तिथे वाट मिळाली होती.. एखाद्या मैदानी खेळाच्या चुरशीच्या स्पर्धेसारखी.. डीजेबरोबरच्या डान्स इतकीच.. पण एकदम पवित्र, स्वच्छ...

विठोबाला तुळशी.. गणपतीला दुर्वा..
शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा...

घुमवून घुमवून गजर चालला होता.. दोनच ओळी.. एकसुरात आळवल्या जात होत्या.. अख्ख्या जगातली सगळी एन्जॉयमेन्ट त्या माजघरात गणपतीसमोर एकवटली होती..

शेवटी भैरवीचे आर्त सूर आणि पाठोपाठ "हेचि दान देगा देवा- तुझा विसर न व्हावा!" म्हणून भजन संपलं आणि वाद्यांचा कल्लोळ टिपेला जाऊन पोचला.. प्रसन्नता, समाधान, आनंद शिगोशिग भरून ओसंडला होता..

गणपतीला नमस्कार करून, नानाने दिलेला प्रसाद घेऊन सगळे घरी जायला उठले.. बाहेर पडवीत भजन ऐकायला बसलेल्या आजोबांना स्कुटरवर बसवून नातू घरी निघाला..
"आजोबा!! आपलं फायनल झालंय.. मी परत येतोय! लवकरच!"

©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे@मुर्डी.

04 September, 2016

स्वागत मंगलमूर्तीचे !!

गेले 15 दिवस ज्याचे वेध लागलेले होते तो गणपती आज घरी आला. मी अजिबातच धार्मिक प्राणी नाही. देवदेव करणे, उपास, व्रते ह्या भानगडीत पडणे नाही, पण तरीही सगळ्या सणांमध्ये गणपती हा सगळ्यात उच्च जागेवर आहेसा वाटतो.

गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, शिमगा हे सगळे सण येतात आणि बराचसा वेळ अंगणातच असतात. किंवा दिवसातला ठराविक वेळच त्यांचं अस्तित्व आहेसं वाटतं. गणपतीचं तसं नाही. येतो तो थेट घरात, आणि तो घरात असेपर्यंत सतत काहीनाकाही सुरु असतं घरात.. हॅपनिंग अगदी!!

म्हणूनच बाकीच्या सणांना घर स्वच्छतेची एवढी जंगी मोहीम काढवीशी वाटत नाही. पण गणपती म्हणजे घराची अक्षरशः नखशिखांत स्वच्छता. तेवढाच घराच्या प्रत्येक कणाकणाला आपला स्पर्श होतो. वासे,रिफा,कौलं,भालं पुसण्यापासून ते भिंती सारवणे, लाकडी कडीपाट ओल्या फडक्याने पुसणे, सर्वात शेवटी जमिनीवर घट्ट आणि डिझायनर सारवण झालं कि कसं मस्त स्वच्छ वाटतं..

सांदीकोपऱ्यातील कचरा, धूळ, कोळीष्टके निघून जातात त्यांच्याबरोबर जशी काय घरातली आणि मनातली निगेटिव्हीटी निघून जाते बाहेर, एकदम मस्त-स्वच्छ-प्रसन्न-गारगार-मऊमऊ काहीतरी वाटायला लागतं. सहज झोपाळ्यावर बसल्याबसल्या जमिनीचा पावलांना होणारा स्पर्श पण एकदम स्वच्छ शुचिर्भूत वाटतो. सारवलेल्या भिंतीवरून अलगद हात फिरवताना पण नवीन कपड्याना हात लावल्यासारखं फेस्टिव्ह वाटतं... आणि लक्षात येतं, आलेच कि गणपती जवळ!!

आमच्याकडे गणपती बसवायची जागा पक्की ठरलेली- तीच आणि तेवढीच. त्यात फरक नाही. एका बाजूला दार आणि एका बाजूला देवांचा कोनाडा. त्यामुळे जास्त डेकोरेशन करायला वाव नाही. मग आहे त्यात काहीतरी करायचं, पण स्वतः करायचं.. आणि कमीतकमी गोष्टी विकत आणून करायचं..

आमचे दीपक दादा, संजय दादा नेहेमी म्हणतात.. " आमच्या घरून आणू काय लायटीचा तोरण?"
त्यांच्या घराच्या आराशीपुढे आमची अगदीच साधी दिसते, पण आम्हाला तसंच आवडतं! झगझगीत माळा, जिलेटीन पेपरची थर्माकोलची मखरं, भरपूर लायटिंग-- नकोच वाटतं.

अगदी आदल्या दिवशी "आवरणं"- म्हणजे बहुतेक आवराआवरी, स्वछता ह्याचा फिनिशिंग टच म्हणून आवरणं.. असंच असेल!

चला, मोदकांचं पुरण झालं, छत ताणून झालं, कंगण्या-कौंडल आणून झालं, प्रसादाचे वड्या-पेढे करून झाले,कापसाळी झाल्या, नारळ निसून झाले..

प्रभावळ दादुकडे नेऊन ठेव, माजघर सारवून घ्या, ते कापडी वॉल हँगिंग भिंतीवर लावायचाय, मोदकपात्र घासून ठेवायचंय, खोपटीतून लाकडं आणून चुलीजवळ ठेवायच्येत..

अशी झालेल्या आणि करायच्या एकामागून एक कामांची यादी एकेक टिकमार्क करत संपवली जाते..

गणपतीचा आदला दिवस उगवतो आणि इतका भरभर पुढे सरकतो कि संध्याकाळ केव्हा होते तेच कळत नाही. दुपारी 1000 दुर्वा, सगळी पत्री जमवून होते; चहाचा अजून एक राऊंड होतो.. मग सजावटीचा पसारा आवरून लख्ख केर काढून होतो. मग हळदीची पेस्ट करून त्याने पिवळी- सोन्याची बारकी बारकी पावलं- दारापासून घरात उमटवून झाली, दरवाज्यात थोडीशी रांगोळी काढून झाली कि तोपर्यंत येतातच वरच्या आळीतून सगळेजण..

नवीन कपडे घालून चपला न घालता दादुकडे जाऊन पोचलो, कि तिथे नुसता माहोल!! गावातले, आजूबाजूच्या गावातले अनेकजण आपापला गणपती न्यायला जमलेले असतात. ढोलांच्या आणि सनईच्या आवजांची नुसती धांदल उडालेली असते. सगळ्यांचे गणपती प्रभावळीवर बसवून, मातीने फिक्स करून होतात.. श्रद्धापूर्वक पैसे आणि नारळाची देवघेव होते.. प्रत्येकजण आपापला गणपती उचलून हातात घेतात आणि एकच गजर होतो- "मंssगलमूर्ती मोssरया!!"
वाटेने घरी येताना दुसऱ्या कोणत्या वाडीवरचे गणपती नेताना भेटले कि एकमेकांना, "मंगलमूर्ती मोरया" अश्या गजराने साद-प्रतिसाद होतात..
वाजतगाजत मंगलमूर्ती घरी येते. पायावर दूध पाणी घालून, ओवाळून, सोन्याच्या पावलांनी गणपतीबाप्पा घरात येतात... त्याच्या बरोबरच भरपूर एनर्जी, उत्साह, पवित्रपणा, आणि चांगलं म्हणून काय मनाला वाटतं ते घरात येतं..
उत्सव सुरु झालेला असतो!!
"मंगलमूर्ती मोरया!!"