30 May, 2016

गुलमोहोर

आमच्याकडे असंख्य प्रकारची फुलझाडं/शोभेची झाडं आहेत ती फक्त आईच्या हौसेमुळे!! फक्त 'डोळ्यांना सुख' इतकाच ज्यांचा उपयोग आहे त्या झाडांच्यात मला जास्त काही इंटरेस्ट नसतो, हे मी "निगरगट्ट प्रांजळपणाने" कबुल केलंच पाहिजे..

पण कित्येक वर्षं आमच्याकडे गुलमोहोर नव्हता. आजूबाजूला पण जास्त कुठे आढळत नसावा बहुतेक..

माझ्या 11वी च्या ऍडमिशनसाठी आम्ही पुण्याला गेलो तिथून हा गुलमोहोर आमच्याबरोबर आला.. कॉलेजच्या आवारात पहिलं पाऊल टाकलं तेव्हाच समोर गुलमोहोराचं झाड दिसलं होत.. समोरच्या रस्त्याचं नाव पण गुलमोहोर पथ!!

ऍडमिशनचे सोपस्कार पूर्ण करून बाहेर पडलो तेव्हा माझ्या डोक्यात विचार चाललेले कि इथली पुढची 5, कदाचित 7 वर्षं कशी काय जातील...
आणि आईच्या डोक्यात विचार चाललेले कि ह्या गुलमोहोराच्या बिया मिळतील तर किती बरं होईल...
जूनचा शेवट किंवा जुलैची सुरुवात होती, फुलांचा लालभडक बहर संपून, गुलमोहोराच्या तलवारीसारख्या दिसणाऱ्या काळ्या शेंगा जमिनीवर पडल्या होत्या, त्या उचलून आम्ही घरच्या वाटेला लागलो..
त्या शेंगांच्या आत खुळखुळणाऱ्या बिया रुजवून आईने त्यांची रोपं तयार केली, ती कारखान्याच्या आवारात लावली...

कॉलेज आणि पुणे सोडून बाहेर पडल्यानंतरही- डिग्री/शिक्षण, अनेक अनुभव, कडू-गोड आठवणी, जगायला आवश्यक अशी कौशल्ये, मित्रपरिवार हे सगळं जसं कायमसाठी बरोबर आहे, तसंच हे झाड आणि त्याच शेंगांमधल्या बाकीच्या बियांची झालेली झाडं सुद्धा!! माझ्या कॉलेजची आठवण..आता इतकी मोठी झाली आहे.. डोळ्यांना सुख आणि सावली सुद्धा देत आहे!!!

#memories
#sndt_pune
#Gulmohor

28 May, 2016

आगोट आणि पाऊस

कालचीच गोष्ट-- दिवसभर 12-14 तास ड्युटी करून, कॅनिंग संपवून संध्याकाळी घरी आल्यावर अक्षरशः तंगड्या गळ्यात आलेल्या.. तहान, भूक 'लागते' तशी- त्याहून जास्त - आंघोळ 'लागलेली', तरीही तश्याच आमरसात बरबटलेल्या कपड्यानीच एक चहा मारून मग आंघोळया आवरून आम्ही जरासे माणसात येतो.. टीव्ही,पेपर वगैरे कशातही जीव रमत नाही, अर्धमेला मोबाईल चार्जिंगला लावून मग, दिवसभराचे धावते अहवाल-आढावे, गमती जमती एकमेकांच्या कानावर घालत घालत दोन घास आमटीभात ओरपुन वर आंबे हाणून झाले कि जरासा मोबाईल घेऊन नेटवर एक फेरफटका मारावा म्हणून निघावं, तर केव्हाच मोबाईल हातातून गळून पडतो तेही समजत नाही...
पुन्हा जाग येते, तेव्हा असं वाटत असतं कि काही मिनिटचं झोप झाली फक्त, पण प्रत्यक्षात दुसरा दिवस सुरु झालेला असतो..

आजचा दिवसपण असाच सुरु झाला, पण उठून बाहेर बघितलं तेव्हा, कधीतरी पहाटे पाऊस पडून गेल्याचा शोध लागला..
"ऑ!! पाऊस??"
असं म्हटल्यावर "आत्ता का कळलं??" अशी आईची प्रतिक्रिया मिळाली..

पहिल्या पावसाचं स्वागत आम्हाला कधीच, "ऑसम,कूल,वॉव" वगैरे म्हणून करता येतच नाही.. लगेच भजी,ट्रिप,ट्रेक हा तर विचार पण नाही..
"आगोटची कामे" संपल्याशिवाय पावसाने येऊ नये असंच वाटत राहत.. परीक्षेत जस शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास पूर्ण झालाय असं कधीच वाटत नाही, तस हि आगोटची कामं पण कधीच संपत नाहीत.. तरीही परीक्षा जशी ठरल्या वेळी येतेच तसाच पाऊस पण एखाद्या कर्तव्यकठोर तरीही विद्यार्थीप्रिय शिक्षकासारखा हजर होतोच...
उनाड विद्यार्थी परीक्षेच्या वेळी "देवा मला पास कर" म्हणतात, तसे लवकर आलेल्या पावसाला दहीभाताचा नैवैद्य दाखवून सांगतात,"थांब रे बावा जरा, एवढी आमची आगोटची कामं होऊंदेत, मग लावणीच्या वेळी भरपूर पड हो!!"

पावसाच्या आधी आंबे उतरवून झाले पाहिजेत, हा परीक्षेतील सर्वात जास्त imp.. गवत-पेंढा-फाटी-गोवरी भरणे, छपराच्या कौलांची डागडुजी, पावसाचे पाणी घराच्या भिंतींवर येऊ नये म्हणून बाहेरच्या बाजूनी झड्या काढणे(छपराला एक्स्टेंशन) अजूनही रखडलेल्या असल्यास शेताच्या भाजावणी एक ना अनेक..

स्कॉलर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासारखे काही लोकांचे हे उद्योग वेळच्यावेळी पूर्ण होतातही, पण ऐन वेळेची धावपळ हि होणारच!!

आमच्याकडे तर परीक्षा तोंडावर आली तरी खेळात रंगलेल्या उनाड पोरासारखं, आम्ही कॅनिंगमध्ये रमलेलो असतानाच कधीतरी अकस्मात हा पाहूणा हजर होतो.. रात्रीचा आला तर मुक्कामाला थांबतो, आणि मग "अरे जनरेटरवर प्लॅस्टिक पांघरलंय का रे?" "मोटारी (यंत्रं फिरवणाऱ्या विजेच्या मोटारी)कोणत्या उघड्या नाहीत ना रे?" अश्या चौकश्या आणि धावपळी सुरु होतात..

यंदा ह्या सगळ्या खबरदाऱ्या आधीच घेऊन झालेल्या असल्यामुळे, पावसाच्या येण्याने काहीच हलचल माजली नाही.. गाढ झोपेत मातीचा सुगंध पण जाणवला नाही आणि पत्र्यावर ताडताड वाजलेला ताशा सुद्धा ऐकायला आला नाही..
पहाटे आलेला पाहुणा मुक्कामाला राहिला नाही, सकाळ होताच निघून गेला, आणि आज सकाळी ओल्या चिप्प रस्त्यावरून, ओलसर-हिरवट वास नाकात भरून घेत, धुतल्या गेलेल्या स्वच्छ झाडांकडे बघतबघत आम्ही रोजच्याप्रमाणे ड्युटीवर पोचलो..
दिवसभर पुन्हा कॅनिंगच्या धुमधडाक्यात ह्या पावसाबिवसाचा पूर्ण विसर पडला.. टरर्र, खर्रर्र, फस्सस, चर्रर्र, ए- गप्पा नंतर मारा आत्ता काम चालूंदे, 5 नंबर मध्ये साखर, 48 किलोची पावती, 26 तारखेची आढी, नळ बारीक करा, पटपट आटपा, क्रेट धुवून झाले का? चला चपला घालून साली-बाठी टाकायला---  हे असे असंख्य काय काय काय काय आवाज करत दिवस संपला....

संध्याकाळी कित्येक दिवसांनी 7 च्या आत घरात येणं झालं, येताना वाटेवर पुन्हा तो अदृश्य पाऊस दिसला.. आणि तारखेचं, ऋतूचं, वेळ-काळाचं भान आलं!!
सूर्य तर स्पष्ट होता--अजून काम संपायला अवकाश आहे.. बरंच काम शिल्लक आहे..

पण काळे ढग त्यांचं अस्तित्व ठळक करून दाखवत होते-- आता पटपट आटपा, आम्ही आलोय!!

कुणाच्या शेतातून उठलेले भाजवणीच्या धुराचे लोट,, एखादीच अलगद गिरकी घेऊन निश्चल तरंगत होते--- शेतीचे दिवस जवळ येतायत, लक्षात आहे ना??

समुद्र धीरगंभीर आणि शांत-- हालचालीपूर्वीची स्तब्धता...आता पाऊस येईल, शेतीची कामं, कॉलेजं सुरु होतील, कामगार तिकडे मोर्चे वळवतील, एकूण मुडच बदलेल,  आत्ता रुटीन बनलंय ते बदलेल, आता समुद्र खवळेल, माणसांनी शांत व्हा, काम आवरा भरभर!!!

सगळ्या आसमंतात पिवळं,सोनेरी,हिरवं,काळं,धुरकट,चमकदार असं संमिश्र वातावरण भरलेलं...
तुरुतुरु धावत पाणकोंबड्या दिसायला लागल्यायत, आणि हि पोस्ट लिहिताना कोल्हे जोरात आरडाओरडा करतायत!! पाऊस जवळ जवळ येतोय!!!

दरवर्षीचचं चक्र,पण पुन्हापुन्हा तेच अप्रूप, पुन्हा पुन्हा तेच कौतुक!

विनाशकाले विपरीत बुद्धी

सकाळी रोजच्याप्रमाणे कलमांच्या बागेत गेले. आंब्यांवर आपल्या आधीचा हक्क वांदरांचा हे तर नक्कीच, पण ह्यावर्षी वांदरांचा मूड काही वेगळाच आहे. एकतर मनुष्यजातीला घाबरणे त्यांनी सोडून दिलंय. कशालाही न भिता इतके बेरकी नजरेने बघत राहतात, आणि आरडाओरडा केला तरी बिनदिक्कत आपल्याच रोखाने पुढे पुढे येत राहतात कि सर्ऱर्ऱकन काटा येतो अंगावर.

भूक हि जित्या जीवाला कुठल्याही थराला घेऊन जाऊ शकते. आजूबाजूच्या तुटत चाललेल्या जंगलांमुळे वांदरांवर उपासमारीची वेळ आली आहे, जिथे थोडीफार झाडी दिसेल तिथे ते प्रचंड संख्येने एकवटत आहेत.. त्यामुळे आमच्या झाडांवर आंबे दिसत असताना ते आम्ही त्यांना खाऊ देत नाही हे त्यांना का म्हणून आवडेल?

बरं, एकेक वांदर म्हणजे एवढं मोठं धूड कि बकोट धरून अख्खा माणूस उचलून नेऊ शकतील सहज.. आपल्याच कलमात आपल्याला कधी कुणाची भीती वाटेल हे मला बापजन्मात शक्य वाटत नव्हतं ते आता घडत आहे..

त्यातच मामी- आमची राखणदार म्हणाली, "ताई पाणी आटला, आता रोज येताना आमच्यासाठी घरून पाणी घेऊन येत जा"
"पूर्वी रानातील पाणी आटलं" म्हणजे पाऊस 2 दिवसांवर आला अशी खूण पटायची. आता अजून महिना आहे पाऊस यायला आणि पाणी आटलं. जमीन तर एवढी शुष्क झाली आहे कि नवीन लागवड करून ती जगवणं म्हणजे कर्मकठीण झालंय.
डोळ्यादेखत जिवंत झाडं मरू कशी देणार?? म्हणून पेट्रोल जाळून, गाडीवरून पाणी घेऊन जातोय, रक्त आटवून- वाटेवर शब्दशः घाम सांडवत झाडांपर्यंत पाणी पोचवतोय रोज...

मला महित्येय दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील दुःखापुढे माझ्या ह्या रडगाण्याला "सुख दुखतंय" असं म्हणतील वाचणारे, कारण आम्हाला प्यायला पोटभर विहिरीचं पाणी आहे, पेट्रोल जाळून झाडांची कौतुकं करायची चैन आहे,.. पण हे सगळं अशासाठी चाललंय कि,आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेला ठेवा जपणं हि आमची जबाबदारी आहे. हे नाही केलं, तर आम्ही पण मराठवाड्यासारखे रखरखीत होऊन बसू.

मुळात हि वेळ का आली? इथे पोटभर पाऊस पडूनसुद्धा जमीन का शुष्क झाली? 20 वर्षांपूर्वी आमचे आईवडील आम्हाला, "तो बघितलास का हुप्प्या?" असं म्हणून ज्या वांदरांकडे कौतुकाने बोटं दाखवत होते ते निवांत वांदरं एवढे हिंस्त्र का झालेत?

जमिनी खरेदी करून, त्याच्यावरच हिरवेपण नष्ट करण्याची हौस घेऊन शहरातली विकृत माणसं इथे आली, ह्या टोळधाडीने हे वाटोळं केलय. आईइतकी आदरणीय अशी जमीन विकायचं पाप जे करत आहेत त्यांनी हि दुर्दशा केली आहे.
शहरातले लँडडेव्हलपर इथे जमिनी घेतायत, हिरव्यागर्द रानांची बेताल कत्तल करतायत-शेकडो वर्षांपूर्वीचे अजस्त्र वृक्ष क्षणात भुईसपाट करतायत, डोंगराचे उतार सपाट करून टाकतायत. त्याचावर आलिशान रिसॉर्ट किंवा सेकण्ड होम बांधतायत,सिमेंटच्या जंगलाची गर्दी उभी करतायत, इथलं पाणी नासून स्वामींग पूल बनवतायत.. तिथे पर्यटक येतायत, रान उजाड केल्यामुळे हॉटेलांतून थेट समुद्र दिसतोय त्याच्याकडे बघत बघत दारू पितायत..कचरा फेकतायत..
आमचं जगणं दिवसेंदिवस कठीण करून टाकतायत.

आत्ता ह्या सगळ्यांना मजा वाटत असेल, पण इथल्या पूर्वजांचे, त्यांनी लावलेल्या आणि आता तुटून गेलेल्या झाडांचे, त्यातल्या घरटी मोडून गेलेल्या पशुपक्षांचे, इथल्या जमिनीचे, रानावनात वसलेल्या ग्रामदेवतांचे, सृष्टीच्या चक्राशी चाळे केल्यामुळे बिथरलेल्या पंचमहाभूतांचे-- सगळ्यांचे शाप ह्या लोकांना भोवतील.. ह्या सगळ्या विनाशामुळे त्रस्त झालेल्या आमच्यासारख्या इथल्या भूमीपुत्रांचे तळतळाट लागतील ह्या लँड डेव्हलपर आणि तत्सम लोकांना.. वाटोळं होईल त्यांच्या भव्य-दिव्य प्रोजेक्ट्सचं.. असे पैसे खरोखर लाभणार नाहीत कधीच (अश्या गोष्टी घडल्याची उदाहरणं आहेत सुद्धा!! हे कारभार करणाऱ्या पूर्ण कुटुंबीयांवर अनाकलनीय संकटं आल्याचं लोकांनी बघितलं आहे..)
नंतर परत निसर्ग आपले रंग दाखवील, आणि त्यांच्या भुईसपाट झालेल्या इस्टेटींवर घनदाट रान माजेल.. पशुपक्षी सुखी होतील, पाणी आटायचं थांबेल.पण...तोपर्यंत आमची पिढी जिवंत असली तर हे सगळं पुन्हा बघायचं भाग्य मिळेल!
पटत असेल तर शेयर करा.. ह्या विनाशाला कारणीभूत होणाऱ्यांना वाचूदेत, जमीन विकणारे, विकत घेणारे, एजंटगिरी करणाऱ्यांना वाचूदेत, इथल्या निसर्गाच्या प्रेतावर स्वतःच्या हौशीचे चोचले पुरविणाऱ्याना वाचूदेत.. कोणाच्या तरी टाळक्यात उजेड पडला तरी पुरे!