17 August, 2016

सागरकिनारे...

आज नारळी पौर्णिमेनिमित्त कित्येक महिन्यांनी समुद्रावर जाण्याचा योग आला. एका ढेंगेच्या अंतरावर समुद्र असूनही असं म्हणायची वेळ यावी हे आश्चर्य आहे वाचणाऱ्यांसाठी.. पण आता असं आहे खरं!
समुद्र तसा आमच्या आवडीचा आहे, पण अगदी समुद्राला चिकटून राहणाऱ्या कोळी बांधवांच्या घट्ट नात्यातला आहे तितकं आमचं जवळचं नातं नाही. ब्राह्मणवाडीतल्या गणपतींचं विसर्जन सुद्धा तळ्यातच होतं. नारळी पौर्णिमेला घरातले पुरुषलोक समुद्रावर जाऊन नारळ अर्पण करून येतात, कि झालं.

लहानपणी गावातून कुठेही बाहेर जायचं झालं कि तरीतून जावं लागायचं, कधीकधी उधाण भरती असेल तर होडी जोरात हलायची. अगदी लहानपणी भयंकर भीती वाटायची, नंतर भीती गेली, सवय झाली, पाण्याच्या पातळीनुसार कधी जर होडी किनाऱ्यापासून जरा लांब पाण्यात उभी राहिली, तर जीव खाऊन लॉन्ग जम्प मारून पुळणीवर अवतरण्याची प्रॅक्टिस होते न होते तोच पूल तयार होऊन वापरासाठी खुला झाला आणि खाडीच्या मध्यस्तीतुन समुद्राशी असलेलं नातं पण मागे पडलं.. इतकं, कि अगदी हल्लीच दाभोळ खाडीतून वेलदूरला जाताना अशीच होडीतून पुळणीत लॉन्ग जम्प मारताना जीव वरखाली झाला होता क्षणभर! "सवय गेली आता" अशी चुटपुट लागली उगीच..

राहता राहिलं कुठलं निमित्त, तर आल्यागेल्या पाहुण्यारावळ्यांना समुद्रावर फिरवायला नेण्याचं.. त्यातही लहानपणीच अप्रूप-उत्साह कमी आणि कर्तव्यभावना जास्त, पण घरातून निघून समुद्रावर पोचेपर्यंत.. एकदा समुद्र दिसला कि हटकून वाटतं," अरेच्चा, आपण एरवी सहज म्हणून, आपल्या स्वतःसाठी म्हणून का नाही येत!!"

क्वचित- म्हणजे फक्त समुद्रावर जाऊ तेव्हाच मिळणारा वडापाव, किल्ले, शंख-शिंपले, सूर्य पाण्यात बुडणे(!) पाण्यात भिजून भावंडांशी दंगामस्ती करणे, तुफान धावाधावी, पकडापकडी हि सगळी आकर्षणं केव्हाच संपली. 9वीत असताना भल्या पहाटे आमच्या सगळ्या वर्गाला बापट सर समुद्रावर बोलवून प्रचंड व्यायाम करून घ्यायचे, वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये सायकलींच्या शर्यती फार म्हणजे फार प्रतिष्ठेच्या असायच्या आमच्या शाळेत- म्हणजे असं आपलं आम्हीच ठरवलेलं.. सायकलच्या शर्यतीत मागे पडणं हे गणितात दांड्या उडण्यापेक्षा जास्त नामुष्कीचं होतं आमच्यासाठी, आणि हे सगळे पराक्रम समुद्रावर गाजवण्यात यायचे!! ते पर्व सुद्धा शाळा संपली तेव्हाच संपलं.

वेळ मिळत नाही ह्या कारणामुळे समुद्रावर जाणं जास्त जास्त विरळ होत गेलं.. पाहुणेरावळे सुद्धा फुरसत घेऊन येईनासे झाले. आता दापोलीच्या दिशेला किंवा केळशीच्या दिशेला जाता येता फक्त प्रवासात चालत्या गाडीवर-  काठाकाठाने सोबत करण्यापुरता समुद्राचा संबंध..

आज नारळीपौर्णिमेचा नारळ द्यायला समुद्रावर मलाच जावं लागलं. 6 वाजून गेले होते, मला वाटलं बहुतेक सगळेजण जाऊन आले असतील. पटकन जाऊन नारळ पाण्यात टाकून परत येऊ म्हणून गाडी काढली तर योगायोगाने बरेच मुर्डीकर एकाच वेळी न ठरवता आंजर्ल्याच्या वाटेवर!

स्वच्छ, मोकळी, खारट हवा एका सेकंदात किती फ्रेश वाटायला लावते!! बूट काढून अनवाणी पायाखाली मऊमऊ वाळू तुडवत पाण्यात जाऊन नारळ-सुपारी-तांदूळ समुद्रात सोडले, नमस्कार केला. लाटांचा स्पर्श जाणववत, एकामागून एक येणाऱ्या लाटा अनुभवल्या. ओलसर-दमट-खारट वाऱ्याचा विशिष्ठ वास नाकात साठवून ठेवला.. काळ्या ढगांच्या आडून सूर्य पाण्यात जाताना बघितला. आपले डोळे, आपले विचार हाच आपला कॅमेरा.. कितीही फोटो काढले तरी समुद्र कसा काय मावेल त्या फोटोंमध्ये..

हाताला वीजेचा शॉक बसतो तेव्हा कसा,, पायातुन वीजप्रवाह जमिनीत जाताना जाणवतो ना, अर्थिंग का काय ते होऊन, तसाच अगदी, परत मागे फिरून जाणाऱ्या लाटेतून, पायाखालच्या निसटून जाणाऱ्या वाळूतून सगळा शीण, थकवा, टेन्शन, स्ट्रेस, वैताग समुद्र वाहवुन दवडतो.. नवीन येणाऱ्या लाटेतून परत नवीन एक्साईटपणा..

आहाहा, किती बरं वाटलं, नेहेमी का नाही येत अस सहज, उगाचच, स्वतःसाठीच.. परत तोच प्रश्न, प्रत्येकवेळी.

यायचं आता अधूनमधून.. आपली आपणच समजून घालायची प्रत्येकवेळी आणि परत बुडून जायचं रुटिनच्या व्यापात.. पुन्हा समुद्रावर जायला निमित्त मिळेपर्यंत!!

1 comment:

  1. पायाखालची जमीन सरकणे काय असते याचा अनुभव येतो लाट परत जाताना , थोड्या गुदगुल्या पण होतात , मन एकदम शांत होते ती अथांगता अनुभवताना , अलोट तृप्ती मिळते सांजवेळी समुद्रावर

    ReplyDelete