22 December, 2018

तेजसचे कीर्तन

कोकणातल्या गावागावातून होणारे उत्सव ही त्या त्या गावासाठी एक पर्वणी असते.. वर्षभरासाठी पुरेल इतकी ऊर्जा मिळवून देणारे.. आपापल्या गावातल्या उत्सवाबद्दल प्रत्येकाला विशेष आत्मीयता असते जिव्हाळा असतो.

मोठ्या वयात लग्न झालं की अचानक सासरच्या गावाला, उत्सवाला आपलं समजणं जरा कठीण किंवा वेळखाऊ ठरत असावं. वर्षानुवर्षे माहेरच्या उत्सवात, तिथल्या माहोलात आपण रममाण झालेलो असतो, ते सोडून दुसऱ्या वातावरणात सामावून जाणं हे मोठ्या वयात जर जडच जातं.  यंदा पंचनदीला दत्तजयंती उत्सवात सहभागी होण्याचं माझं दुसरं वर्षं. पण यंदा हा उत्सव गेल्यावर्षीपेक्षा जिव्हाळ्याचा वाटू लागायला कदाचित कारणीभूत ठरला तो माहेरचा सख्खाशेजारी कीर्तनकार तेजसबुवा जोशी!

तेजसच्या किर्तनातल्या करियरला एक वर्ष होत आलं, तरी त्याचं कीर्तन ऐकायचा योग आला नव्हता. त्यामुळे यंदा दत्तजयंतीला मुर्डीच्या तेजसबुवांचं कीर्तन आहे हे ऐकल्यावर खूपच आनंद झाला. लहानपणापासून बघितलेला एवढासा तेजस, किर्तनकाराच्या भारदस्त लूकमध्ये बघून आधी मजा वाटली त्याचबरोबर, 'टाइम फ्लाईज' हे परत एकदा जाणवलं.

"तुला खडीसाखर, लवंग, गरम पाणी किंवा तत्सम काय काय लागेल?" असं विचारल्यावर "गरम पाणी चालेल थोडसं असलं तर" असं अत्यन्त विनोदी आणि तितकंच निरागस उत्तर बुवांकडून मिळालं😃

अतोनात उत्सुकतेपोटी अगदी पहिल्या सेकंदापासून कीर्तन अनुभवायला मिळावं म्हणून वेळेआधीच देवळात पोचलो आम्ही. नेहेमीची कवनं, पदं झाल्यावर विविध जयजयकार करताना भारतमाता, शिवाजीमहाराज यांचा समावेश असणार हे माहितीच होतं, तसंच झालंही! विमलेश्वराचा उल्लेख ऐकून क्षणभर मुर्डीच्याच उत्सवात आहोत का काय असाही भास झाला!.

दु आ तिवारींची जोशपूर्ण संग्रामगीते कीर्तनात उठाव आणत होती. 'एक काळ ऐसा होता' जेव्हा लोक एकत्र जमून देशाची चिंता करत होते. "ऐश्या वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, समर्थ सद्गुरू वाणी, दुमदुमली ती सर्वत्र, जयजयरघुवीर समर्थ" या सगळ्यामुळे फार चांगली वातावरणनिर्मिती झाली.

'मरावे परी किर्तीरूपे उरावे' हा श्लोक निरुपणाला घेतलेला ऐकताच खात्री पटली की कोणत्यातरी राष्ट्रपुरुषावर किंवा क्रांतिकारकावर आख्यान असणार. त्याचप्रमाणे उत्तररंगात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवन्त फडके यांचा जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा समोर उलगडत गेला.

कितीतरी नवीन गोष्टी, घटना यांची माहिती मिळाली. वासुदेव बळवंत यांच्या बालपणापासून ते एडन येथे त्यांनी भोगलेल्या शिक्षेपर्यंत.. तेजसने केलेले सखोल वाचन, मुद्यांची अचूक मांडणी, उदाहरणे देऊन झाल्यावर पुन्हा अलगद मुद्द्यावर येणे ह्या सगळ्यात कमालीची सफाई व प्रगल्भता जाणवत होती. मजकुराच्या भावार्थानुसार आवाजातले व देहबोलीतली बदल यातून त्याच्यातील अभिनेता दिसत होता.

अत्यन्त अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासाने बोलताना सुद्धा असं कुठेही जाणवत नव्हतं की 'अरे हा विशी पंचवीशीचा मुलगा काय हे बोलतोय उपदेशासारखं'.. उलट समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून किर्तनाकडे बघायला गेलं तर तेजसचे हे कीर्तन अगदी आयडियल म्हणायला हवं. वासुदेव बळवंतांच्या काळात जशी, "आज अमुक वाजता शनिवारवाड्यावर अमुक यांचे व्याख्यान आहे होssss" अशी दवंडी पिटली जात असे व लोक व्याख्याने ऐकायला जात असत, तशीच आज तेजससारख्या काळोचित किर्तनकाराच्या कीर्तनाची दवंडी पिटवून जाहिरात करायला हवी. (तीच सोशल मीडियावरून मी करत आहे असं समजायला हरकत नाही)😊

त्यानेच कीर्तनात उल्लेख केला, त्याप्रमाणे मेकॉलेच्या शिक्षणातून शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांचा चोर लुटारू म्हणून उल्लेख केला गेला होता, तरीही हे खोटं आहे असं बालमनावर ठसवणारी एक समांतर संस्था पूर्वी अस्तित्वात होती- ती म्हणजे आजीआजोबा. आज ही प्रेमळ संस्था प्रत्येकाच्या वाट्याला येत नसते(किंवा सिरीयल बघण्यात बिझी असते😓) हे खरं, पण आपल्याच पिढीचा एक मुलगा हे कीर्तनातून मांडतोय ते आवर्जून निदान ऐकण्याचे संस्कार आईवडिलांनी नक्की करायला हवेत. आपल्यासारखाच स्मार्टफोनच्या युगातील मुलगा अडीच तीन तास अभ्यासपूर्ण बोलतोय गातोय, ते निदान मांडी न हलवता बसून ऐकायची कुवत मुलांमध्ये निर्माण करायची अत्यन्त गरज वाटली, आणि ही आमच्यासारख्या नवपालकांची जबाबदारी आहे.

तर बुवा, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! अशीच तुमची उत्तमोत्तम कीर्तने आम्हाला ऐकायला मिळोत, आणि त्यातून काहीतरी शिकण्याची पुढच्या पिढीला बुद्धी मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना! --^--

©ऐश्वर्या पेंडसे जोशी

06 December, 2018

बैलगाडी

एक खेडेगावात राहणारी, एका मोठ्या आणि परंपरा जपणाऱ्या एकत्र कुटुंबातली ती. लहान-मोठ्या, सख्ख्या-चुलत भावंडांबरोबर वाढणारी. आई काकवा आजी पणजी यांच्या तालमीत तयार होणारी. मुलीच्या 'जातीने' काय जे करायचं असतं(?) ते करायला शिकणारी. सोवळ्याओवळ्याचे नियम पाळणारी, लोक काय म्हणतील ह्याचा भरपूर विचार करणारी, शाळेत अमुक मार्क मिळालेच पाहिजेत म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करणारी. इकडेतिकडे न बघता नाकासमोर चालणारी शहाणी मुलगी.

खेडेगाव असलं तरी आजूबाजूचं जग बदलत होतं, पण ह्या कुटुंबाच्या गावी ते जरा कमीच होतं! तिच्या वर्गातल्या मुली युनिफॉर्म व्यतिरिक्त क्लासला वगैरे जाताना छानसे स्कर्ट-टॉप, जीन्स-टॉप घालत होत्या तर हिच्या नशिबात पाचवीपासूनच कॉटनचे पंजाबी ड्रेस- वर ओढणीची त्रिकोणी घडी पिनअप केलेले. इतर मुली फ्रॉक किंवा स्कर्टच्या आत गुढघ्याएव्हढी शॉर्ट घातली की हव्या तश्या हुंदडायला मोकळ्या होत, तेव्हा ही 'नीट बस' हा मंत्र ऐकत आवरून सावरून वावरून शालीनपणा गोळा करत होती. क्वचित बंडखोरी करून छानसे कपडे घेण्यासाठी हट्ट केलाच, तर "सासरी गेलात की नवऱ्यास चालत असेल तर करा ही थेरं" हे उत्तर मिळत असे.

तिच्या मैत्रिणी गणिताचा क्लास करून परस्पर सायकल हाणत गावाबाहेर लांबवर रपेट मारायला जात, तेव्हा ही आजी आई काकवांबरोबर घरच्या बैलगाडीतून कुठे देवदर्शनाला नाहीतर हळदीकुंकवाला जात असायची. त्यांची ती घरची बैलजोडी, बैलगाडी, ती हाकायला बसलेला धाकटा काका, आणि गाडीत बसून हळदीकुंकवाला जाणाऱ्या दागदागिन्यांनी मढलेल्या घरातल्या स्त्रिया हा त्यांच्या अभिमानाचा विषय होता, आणि हिच्या मैत्रिणींमध्ये थट्टेचा!

दहावीला भरपूर मार्क मिळाले. दूरदृष्टी असलेल्या मुंबईच्या आत्याने अकरावीला भाचीला आपल्या घरी नेलं. मुंबईचं वातावरण, अभ्यास, इंग्लिश ह्याच्याशी जुळवून घेताना तिची भयंकर दमछाक झाली. पण एकदा त्यातून बाहेर पडल्यावर रुळली ती. सुट्टीत घरी जाणं झालं की दोन्हीकडच्या वातावरणातील फरक स्पष्ट जाणवायचा तिला. आत्याकडे काकांची नोकरी बेतासबात असली तरी तिच्या आत्तेभावाची व वहिनीची उत्तम नोकरी होती. ते दादा वहिनी स्वतंत्र घरात पण आत्याच्या जवळच राहात आणि येऊन जाऊन असत.

दरम्यान घरी सर्वात मोठ्या चुलतभावासाठी स्थळं शोधणं सुरू होतं. "यमू वन्संच्या चुलत जावयाची धाकटी बहीण लग्नाची आहे, मागवायची का त्यांच्याकडे पत्रिका?" अश्या प्रश्नावर "छे छे ती मुलगी चांगली शिकलेली नि 'शहरात पडण्यासारखी सरस' आहे, कश्याला उगीच हात दाखवून अवलक्षण करायचं, आपल्या दाद्याला जरा बेताची शिकलेली नि साधीशी हवी हो मुलगी.. " हा निष्कर्ष तिच्या समोरच निघाला होता.

वास्तविक पदवी सुद्धा घेण्याची इच्छा नसलेल्या तिच्या दाद्यासारख्या मुलांची गावांमधून कमी नसली तरी मुली मात्र गेलाबाजार ग्रॅज्युएशन नाहीतर एखादा व्यवसायाभिमुख कोर्स केल्याशिवाय शिक्षण पुरे करत नव्हत्या नि लग्नाला तयार त्याहून होत नव्हत्या. पण नशिबाने तिला मिळाली ग्रॅज्युएट असूनही तिच्या दाद्याशी लग्न करणारी वहिनी. वाचनाची आवड असलेली, गाण्याच्या परीक्षा देणारी.. तरीही गावात राहण्यासारखी, सालस, नम्र, परंपरा-सोवळंओवळ-कुळाचार पाळणारी,  वगैरे वगैरे वहिनी, साड्या दागदागिने खरेदी अश्या निमित्ताने घरी येऊ लागली होती. बारावीनंतरच्या दीर्घ सुट्टीत घरी आलेल्या तिचं होणाऱ्या वहिनीबरोबर पटकन मेतकूट जमलं. आवडीनिवडी, छंद, अभ्यास अश्या गप्पांबरोबर त्यांची गट्टी जमत गेली.

खरेदी, केळवणे, पापड फेण्या ह्यात करवलीबाई दंग होत्या. होणाऱ्या सूनबाईंना घेऊन दागिन्यांची मापे व डिझाइन द्यायला मंडळी तालुक्याच्या गावी त्यांच्या पिढीजात ठरलेल्या सोनारकडे गेली. ही होतीच बरोबर. मंगळसूत्र निवडताना नव्या वहिनीने निवडलेलं ट्रेंडी डिझाइन डावलून ज्येष्ठ महिलामंडळाने परस्परच दुसराच जुन्या पद्धतीचा नमुना फायनल करून टाकला, वर "कसली गो ती तुमची हल्लीची फ्याशन उगीच नाजूकसाजुक, आमच्या सुनेच मंगळसूत्र कसं आमच्या घराण्याला शोभेस ठसठशीत कराच्च" अशी टिप्पणी टाकून दिली. शिवाय "आपलं एवढं मोठ्ठ कुटुंब, नव्या सुनेला बघायला वर्षभर कोणी ना कोणी येतच राहणार, आल्यागेल्याला सांगावं लागता कामा नये नवी नवरी कोणती ते! त्यामुळे वर्षभर हेच्च मोठं मंगळसूत्र कायम वापरायचं" अशीही सूचना पाठोपाठ आली. वरकरणी हसून साजरं करणाऱ्या वहिनीच्या डोळ्यातल्या छटा अचूक टिपणाऱ्या तिला, तिची मुंबईची वहिनी आठवली. कायम ट्रेंडी आणि सुटसुटीत राहणारी.

लग्न झालं, वहिनी तिच्या नव्या संसारात आणि ती तिच्या पुढच्या शिक्षणात रमल्या. फोनवर गप्पा आणि सुट्टीतलाच काय तो सहवास. पण वर्षभरातच तिला कळून चुकलं- वडवते, गोपदमे, शिवामुठी, मंगळागौरी, महालक्ष्मी, सोमवार, शनिवार, चतुर्थी, एकादशी, सणवार, घरकाम, स्वयंपाक, जिनसांची बेगमी, वाळवणे, दिवाळीत गावभर एकमेकांचा फराळ बनवत राहणे, एकमेकांचे पापड लाटणे, नवी नवरी म्हणून शोभेच्या बाहुलीगत स्वतःला मिरवून घेणे, कळवून किंवा न कळवता आलेल्या पाहुण्यांची सरबराई करणे- फर्माईशी पुरवणे... ह्या सगळ्या व्यापात तिच्या वहिनीचं वाचन, गाण्याचा रियाज, हे सगळं इतिहासजमा झालंय. शिक्षणाचा उपयोग धाकट्या शाळकरी दीर-नणंदांना अभ्यासात मदत करण्यापूरता उरलाय. लग्नापूर्वी कसरीच्या किड्यासारखी लायब्ररी फस्त करणारी तिची वहिनी रोजचा पेपर वाचायला मोताद झालीय, आणि रमाबाई रानडे जेव्हा लिखित मजकूर वाचत असताना त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया जश्या बघत, तस्सचं तिच्या वहिनीकडे बघतात जेव्हा तिची वहिनी मोबाईलवर बोटं फिरवत असताना तिची आई काकू घरकाम करताना दिसत तेव्हा!

वहिनीने कधी तालुक्याच्या गावी जाऊन हौशीने काही खरेदी करावी, दादाबरोबर नाटक-सिनेमा बघावा तर लगेच काय ही उधळमाधळ हा शेरा मारायचा अधिकार गावातल्या प्रत्येक स्त्रीला अलिखित प्राप्त झालेला, आणि चार बायका जमून गप्पा मारू लागल्या की कोण किती तारखेला 'बाजूला बसली' ह्याचे हिशोब सुरू... कुणाचे अनारसे कसे नेहेमीच हसतात नि करंज्या फसतात असली टिंगल सुरू...

काही वर्षे निघून गेली, तिच्या पाठच्या सख्ख्या चुलत बहिणी शिक्षणाच्या निमित्ताने गावाबाहेर पडल्या. एखादा अपवाद वगळता भावांनी पदवीच्या वाटेला न जाता शेती बागायती गुरांकडे मोर्चे वळवले. कुणी टेम्पो घेतला, कुणी पर्यटकांना निवास-न्याहरी सुरू केली, कुणी गरे-साठं-अमृतकोकमाकडे वळले

हिचं शिक्षण पूर्ण झालं आणि वरसंशोधनाच्या हालचाली सुरू झाल्या. रितीनुसार थोडे आढेवेढे घेऊन झाल्यावर हिने अपेक्षा सांगायला घेतल्या- आणि तेच प्रसिद्ध , लोकप्रिय तरीही वादग्रस्त वाक्य उच्चारलं- "पुण्यात किंवा मुंबईत स्थायिक असावा!"

वरकरणी रोषाने पण अंतरीच्या समाधानाने "हल्लीच्या मुलींना नकोच मुळी खेडेगाव!" हे वाक्य उच्चारून मंडळी मोहीम सुरू करती झाली.

वेळेवारी लग्न ठरलं आणि झालं, आत्याच्याच ओळखीतला मुंबईचा मुलगा. आता ती अधिकृत मुंबईकर झाली. मुंबईच्या घरात जागा क्षेत्रफळदृष्ट्या माहेरपेक्षा खूपच कमी होती, पण 'स्पेस' भरपूर होती... माहेरी खंडीनी भात होते, पण त्याची कांडण-पाखडणे वगैरे व्याप होते, तर मुंबईच्या सासरी तांदूळ-पोहे किलो किलो येत, पण ते एका फोनकॉलवर दारात हजर होत. माहेरी नारळ शेकड्यात मोजले जात, पण इथे एक जिना उतरला की खरवडलेल्या खोबऱ्याचं पाकीट मिळत होतं. सोवळेओवळे हा प्रकार अस्तित्वात नव्हता, तुम्ही काय करता, काय खाता ह्याच्याशी शेजारच्यालोकांना देणंघेणं नव्हतं..पाहुणे आले की हॉटेलात नेण्याची किंवा पार्सल आणायची सोय व पद्धत होती.. माहेरी ज्याला 'नवऱ्याला चालत असतील तर करा ही थेरं' म्हंटलं जायचं ते कपडे, केस कापणे सहज करता येत होतं..

वर्षभराचे सणवार कोकणातल्या माहेरी हौशीने झाले, मुंबईच्या सासरच्यांनीही ते सगळं कूल आणि वंडरफुल म्हणत एन्जॉय केलं. एकुणात सगळं छान सुरू झालं..

यथावकाश तिला मुलंबाळं झाली, ती मोठी होऊ लागली, मग मामाच्या गावाला एन्जॉय करायला काय कमतरता! अश्याच एका मे महिन्यात तिच्या मुलांनी धाकट्या काकाआजोबांकडे हट्ट धरला-- "आम्हाला बुलक्कार्ट राईड हवी!" कामांची घणाघाई असूनही लाडक्या नातवंडांसाठी बैल जोडले गेले, ती नवरा व मुलांसह बैलगाडीत बसली.. मुलांनी, नवऱ्याने खूप एन्जॉय केलं, तिनेही सेल्फी काढून फेसबुकवर टाकला- कॅप्शन लिहिली- गावाकडची मजा!

©ऐश्वर्या पेंडसे-जोशी

02 September, 2018

सुंदर बोअर श्रावण आला⛅️⛈️🌦️☔️🌈🤽

पावसाळा व त्यातल्यात्यात श्रावण हा सगळ्या कवी लोकांचा, भाविक लोकांचा, उत्सवप्रिय लोकांचा, भटकंतीप्रिय लोकांचा, आणि नुसताच पाऊस आवडणाऱ्यालोकांचा आवडीचा काळ..

वरील वर्गवारीत कवी आणि भाविक नसले तरी भटके आणि नुसताच पाऊस आवडणारे असल्यामुळे अस्मादिकांस गेल्या वर्षीपर्यंत पाऊस व श्रावण परमप्रियच होते..

तुफान पावसात हेडलाईट सुरू ठेवून भिजत भिजत गाडी चालवत उंडारणे..
तुडुंब भरलेल्या तळ्यात मनसोक्त पोहोणे...
एकदा भिजलेली जीन्स वाळायला किती आठवडे लागतील ह्याची पर्वा न करता- रेनकोटचा फक्त कोट जीन्सवर घालून सायकल दामटवणे...
धुव्वाधार पावसात एकामागून एक चहा पिणे, चिखल तुडवत कंपोंडात(आमच्या आंब्याच्या बागेत) फिरणे... ढोपरभर चिखलात भात लावायला जाणे...
नदीला हौर आला की भिजत भिजत पाणी बघायला जाणे...
रात्रीच्या वेळी पत्र्यावर ताड ताड वाजणारा पावसाचा ताशा ऐकत पुस्तक वाचण्यात गढून जाऊन पहाटे ते पुस्तक संपवूनच झोपणे...
ताया, वहिन्या, मैत्रिणी यांच्या मंगळागौरीत फक्त धटिंगण खेळांचा का होईना पण धुडगूस घालणे... आणि गोपाळकाल्याला त्या ढाकुमाकूम ढाकुमाकूम आवाजाने नादावून जाणे....

असा अगदी मस्त फकिरी पावसाळा होता गेल्या वर्षीपर्यंत... पण यंदा अबीरबाबूचे आगमन काय झाले आणि पाऊस अगदी नकोसा वाटायला लागला. 50 लंगोटांची चळत घड्या करून कपाटात ठेवली तरी एक क्षण असा यावा की एकही सुख्खा लंगोट उपलब्ध नाही.. मग इस्त्री करा... ह्याच्यात 50%पावसाळा संपला आणि श्रावण आल्यावर जरा जरासं उन्ह दिसू लागल्यावर किंचित हायसं वाटलं. उन्ह आलं म्हणून जरा कुठे कपड्यांचा स्टँड उन्हात सरकवावा तोच आला पाऊस सणसण करत!
जल्लामेला तो काय तो " क्षणात येते सरसर शिरवे.."

"च्यायला त्या पावसाच्या" असं म्हणत धावत जाऊन स्टँड पागोळीच्या आत ओढला, तर नवरा म्हणायला लागला, "च्यायला काय त्यात? पावसाळ्यात पाऊस तर येणारच.. तू आणि काकू (म्हणजे माझी चुलत सासू) नॉर्वेला जा बघू राहायला.. मनसोक्त कपडे वाळवा, वाळवण सुद्धा करा हवं तरी!"😂

अबीरला घेऊन फिरायला जावे तरीही वेळीअवेळी येणारा पाऊस आता पूर्वीसारखा एन्जॉय करता येत नाही हे लक्षात आलं.. अशीच आमची मंगळागौर पण यंदा पावसाने त्रस्त असल्यामुळे कुणी बोलावलं तरीही तेव्हा पाऊस किती असेल? त्या दिवशी अबीर किती वाजता उठेल? त्याचा मूड कसा असेल? असे प्रश्न पडायला लागलेत..

त्यामुळे आज घरातल्या घरात मंगळागौर पूजा 10 मिनिटात- ट्रॅकपॅन्ट व विटका टीशर्ट घालून साग्रसंगीत पार पडली😂 माझ्या ट्रॅकपॅन्टला सासूबाई म्हणाल्या, " छानच आहे तुझी ही कोमोफ्लाज डिझाईनची साडी😜😜😜.. आणि आमची देवी पण बघा कशी मॉडर्न झाली आहे.. उगाच भारंभार फुलांचा पसारा नाही. एकच जास्वंदीचं फुल आणि एकच बेलाचं पान. डिसेंट एकदम😂😂😂😃😃😃"

एकदम मला पूर्वीच्या बायकांची सर्वार्थाने कमालच वाटायला लागली. एकतर त्यांना भरपूर मुलं. वीज नाही, वीज आल्यावर सुद्धा वॉशिंग मशीन नाही- एवढया पोरांचे कपडे हाताने धुवा, पिळा, तव्यावर वगैरे वाळवा... चारीठाव स्वयंपाक करा, लोकांना वाढा, आवराआवर करा, भरीला सगळे सणवार, व्रतवैकल्ये करा, उपास करा, आणि हे सगळं करून वर बालसंगोपन करा. हे सगळं करताना सासुरवास असणं हे तसं सामान्यच असेल, साडीशिवाय दुसऱ्या पोशाखाचा पर्याय उपलब्ध नसेल आणि त्याकाळचे बाबालोक तान्ह्या बाळाच्या संगोपनात काय मदत करत असतील हा एक वेगळाच विषय....

तरीही त्या सगळे सणवार भयंकर उत्साहाने करत होत्या.. किंवा उत्साहाने करतोय असं दाखवत होत्या,  किंवा कदाचित त्याकाळी व्रतवैकल्ये ही बाळांच्या लसीकरणाईतकी आत्यावश्यक मानत असतील... कितीही पाऊस असला तरी ठराविक महिन्यात करायचीच असतात अशी...  किंवा त्याकाळी पोरांच्या मूडला विशेष महत्व देत नसतील.. किंवा दर दोन वर्षांनी पुन्हापुन्हा नवीन पोर होणारच तर मग किती वर्षं   त्यातच जात असतील आणि मग त्यातलं नावीन्य स्वारस्य वगैरे काय म्हणतात ते उरतच नसेल😓

काय असेल ते असो.. पुढच्या पावसाळ्यात मी माझ्या सगळ्या वेड्या हौसा- भिजणे, सायकल चालवणे, पोहोणे, पुस्तकं वाचणे वगैरे वगैरे सगळं पूर्वीसारखच करत राहणारे. नवरा आणि मुलगा बरोबर आले, तर त्यांना घेऊन नाहीतर त्यांना टुकटुक करून!😜😜😜

©ऐश्वर्या पेंडसे-जोशी

05 May, 2018

जीन्स

लहान बाळाला बघितलं की बघणारे नातेवाईक लग्गेच तर्क सुरू करतात.. बाबाकडच्या व आईकडच्या दोघाही बाजूंच्या नातेवाईकांना वाटत असतं की बाळ त्यांच्या त्यांच्या कुटुंबातल्या कुणासारखं तरी दिसतं😂 आजोळच्या लोकांना बाळाचे मामा किंवा मावशी लहानपणी तस्सेच दिसायचे असं वाटतं, तर बाबाकडच्या नातेवाईकांना बाळाला बघून बाळाच्या आत्या किंवा काकाचं बालपण आठवायला लागतं..

प्रत्यक्षात आपण सगळेच आपल्या इतक्या पिढ्यांचे गुणधर्म घेऊन आलेलो असतो की असं एका वाक्यात निष्कर्ष काढणं अगदीच विनोदी आहे..

हे बालपणीचे निष्कर्ष फक्त दिसण्यावरून झाले.. मोठेपणी वागण्यातले गुण दिसायला लागतात, तेव्हापण अशीच लेबले लावली जातात.. की अगदी अमक्याच्या वळणावर गेलाय... वगैरे!

अस्मादिकांच्या बारश्यात आई-बाबा दोघांच्या बाजूचे नातेवाईक जमले असताना.. बाबांकडची एक वयस्कर आजी वारंवार उद्गारू लागली, "अगदी अस्साच गोरा होता आमचा अनिल लहानपणी!!" चारपाच वेळा हे ऐकून घेतल्यावर आईच्या बाजूच्या नातेवाईकांपैकी अशीच एक खमकी आजी म्हणाली, "आग्गोबाई! खरं म्हणता की काय? म्हणजे मग आता मला नातीच्या रंगाची काळजीच वाटायला लागल्ये हो! कारण जावईबापूंच्यात आता कुठे त्या गोरेपणाचा मागमूसही दिसेना! म्हणून म्हणत्ये हो!"😂😂😂 अर्थात गोऱ्या कातडीचं कौतुक तितपतच असल्यामुळे, उन्हात फिरून कामं करून मीही माझ्या बाबांसारखी रापलेल्या रंगाची झाले ह्याचाच मला आता आनंद वाटतो तो भाग वेगळा!

मला जेव्हा सगळेजण म्हणतात की "तू अगदी मालघरच्या(आजोळच्या) आजीसारखी दिसतेस आता.." तेव्हा मला खूप छान वाटतं.. पण त्याचवेळी हे पण जाणवतं की तिच्यासारखं सतत कार्यमग्न राहणं, सहनशील बनणं मला कधीच शक्य नाही होणार कितीही प्रयत्न केले तरीही... गंमत म्हणजे माझा स्वभाव बऱ्यापैकी दांडगट, उर्मट असूनही अत्यन्त सोशिक, सात्विक, सोज्वळ स्वभावाच्या आजीच्या व माझ्या दिसण्यात काहीतरी साम्य नक्की आहे!
असे कित्येक पिढ्यांचे गुणधर्म आपल्यात येत असणार.. फक्त जर दोन्ही व्यक्तींना आपण वारंवार बघितलेले असते त्यांच्यातली साम्यस्थळे आपल्या लक्षात येतात.

जोशी आडनावाचा माझा मुलगा- हा मी आणि अजय, आमचे दोघांचे आई-बाबा, आमचे दोघांचेही दोन्हीकडचे आजी-आजोबा, दोघांचे दोन्हीकडचे पणजी-पणजोबा असे मिळून पेंडसे, साठे,आगाशे, करंदीकर, देवधर, जोशी........ आणि जोशी, वैद्य, पेंडसे, सोमण, घांगुर्डे, दांडेकर... इतक्या आडनावाच्या लोकांचे गुणधर्म घेऊन आला असणार!!! त्यात पुन्हा माझी एक पणजी माहेरची जोशी, आणि अजयची एक पणजी माहेरची पेंडसे! म्हणजे अजूनच गुंतागुंत! आणि ही फक्त ज्ञात आडनावे! ह्यापुर्वीच्या पिढ्यांची आडनावे काय होती कुणास ठाऊक.. तर त्या माणसांना बघण्याचा-ओळखण्याचा प्रश्नच येत नाही..

परवा सहजच माझ्या लक्षात आलं- जन्मल्या क्षणापासून सर्वानुमते सेम माझ्यासारखा दिसणारा माझा मुलगा एका मूडमध्ये माझ्या आत्तेबहिणीच्या मुलासारखा- अजिंक्य गोखलेसारखा दिसला! ह्या दोघांचे पणजी-पणजोबा कॉमन. त्यामुळे एखाद्या लूकमध्ये त्या दोघांच्यात साम्य असू शकते. अर्थात ह्या दोघांना जवळून ओळखणाऱ्यांनाच ते जाणवणार. असेच एखादे साम्य जोश्यांच्या मागच्या पिढीतल्या कुणा व्यक्तिमध्येही आढळेल ते मला माहिती नसणार.

थोडक्यात काय तर आडनाव ही एक सामाजिक सोय आहे फक्त! कधी बऱ्या वाईट दिसण्या-वागण्यावरून अमुक आडनावावर गेलाय/गेलीय हे लेबल अगदी निरर्थकच म्हणायचं.
©ऐश्वर्या पेंडसे-जोशी.