27 November, 2015

मुंबई-पुणे-मुंबई-1-2-3

मुंबई पुणे मुंबई- माझ्या अत्यंत आवडीचा पिक्चर! 2010 च्या दरम्यान हा सिनेमा आला तेव्हा "थिएटरला सिनेमा बघणे" हे आमच्यासाठी खुप दुर्मिळ होतं. कारण आमच्या गावाच्या आसपास तेव्हा सिनेमागृह नव्हतं. आताही आमच्यासाठी सर्वात जवळचं थिएटर 50 किमीवर आहे. पण तेव्हा तर तेही नव्हतं.
तर हा पहिला mpm आम्ही खुप उशिरा dvd वर बघितला, आणि आमच्या घरातले सग्गळे जण अक्षरशः ह्या सिनेमाच्या प्रेमात पडलो. ह्या सिनेमातले डायलॉग येता जाता विविध संदर्भात बोलले जाऊ लागले, "अभिमान हवा" "संस्कार आहेत हां" "हिरवळ" असं येताजाता बोलून मनमुराद हसू येत राहिलं. त्यातली गाणी आमच्या मोबाईलचा आणि गुणगुणण्याचा अविभाज्य भाग झाली. एवढंच कशाला आमच्या खेड़ेगावातल्या, जुन्या वळणाच्या -पारंपारिक घराघरांत ह्या सिनेमाने एक मोठ्ठा बदल घडवला.. एखादं 'स्थळ' सांगून आलं आणि त्यात कितपत अर्थ आहे अशी साशंकता असेल तेव्हा, पारंपारिक 'बघणे-दाखवणे-कांदेपोहे' कार्यक्रमावर पुढच्या पिढीने नाराजी दर्शवली, की चक्क मोठ्या पिढीचे लोक म्हणू लागले- "जा नाहीतर, त्या मुक्ता बर्वे सारखी तू एकटीच जाऊन भेटून ये त्या मुलाला, तुला पटलं तर मग बघू पुढे!" (अर्थात,, त्याचा शेवट ह्या सिनेमासारखाच- "आईशी बोलून मग काय ते सांगते!" -ह्या एटिट्यूडने होणं हेच त्यांना अपेक्षित!!)
टीव्हीवर हा सिनेमा जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा तो बघावासा वाटतोच आणि मी बघतेच्! कितीही कामाचे ताणतणाव असोत, mpm बघता बघता खळखळून हसू येतंच येतं. सतीश राजवाडेंनी एका मुलाखतीत “A film should have the ability to spread happiness” असं सांगितल्याच वाचलंय. ते त्यांनी अक्षरशः खरं करुन दाखवलंय!! ह्या सिनेमात ठाई ठाई भरलेला आनंद, गंमत, निखळ हास्य - हे सगळं बघता बघता आपल्या डोळ्यात,कानात, मनात, झिरपत जातं,, प्रत्येकवेळी बघताना तितक्याच् उत्कटपणे!
प्रत्येकवेळी पिक्चर संपताना वाटायचं की ही गोष्ट पुढे अजुन दाखवायला हवी होती. आणि अगदी मनातली इच्छा पूर्ण व्हावी तसा ह्या सिनेमाचा दुसरा भाग खरोखरच आला!!
ह्या दरम्यान सतीश राजवाडेंचे अजुन पण सिनेमे, मालिका बघुन झाल्या. मालिका मी यूटयूब वर बघितल्या, अजुनही बघते. (कारण सध्या टीव्हीवर एकही बघण्यासारखी सीरियल नाही.) असंभव, अग्निहोत्र, गुंतता ह्रदय हे, ए.ल.दु.गो.- हे सगळं अगदी मनात घर करून राहिलं. "प्रेमाची गोष्ट" हा सिनेमा तर मी असंख्य वेळा बघते. त्यात "गोष्ट बनते कशी" हे इतकं सुंदर दाखवलंय, की मी जे काही अधूनमधून लेखन करत असते, त्यासाठी हा सिनेमा बघणं हा एक आनंददायक अभ्यास असतो! थोडक्यात mpm ते mpm2 ह्या काळात सतीश राजवाडे ह्या माणसाचा मी मनःपूर्वक पंखा झालेले होते!
अर्थात.. mpm2 हा रिलीज झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात मुद्दाम चिपळूणला जाऊन थिएटरमध्ये बघितला. पहिल्या mpm इतकाच् हा mpm2 पण आवडला हे वेगळं सांगायला नकोच.
पहिल्या भागाच्या पुढे गोष्ट सरकणार, म्हणजे अर्थातच ह्या दोघांचं लग्न, पोस्टर पण तशीच दिसत होती. कितीतरी सासु-सुन सीरियल मध्ये किंवा अनेक सिनेमांमध्ये जे अगदी तपशीलवारपणे कंटाळा येईल इतके लग्नाचे विधि दाखवतात. ते इथे चक्क सिनेमा संपून आपण घरी जायला उठतो तेव्हा दाखवले, आणि आधी संपूर्ण वेळ अनिश्चिततेचे ट्विस्ट!! अर्थात "सतीश राजवाडे आणि सरधोपट गोष्ट" असं होणार नाहीच हे गृहीत होतं! पण तरीही ती गोष्ट अगदी आपलीच, आपल्यातल्याच कोणाची तरी, वाटत राहिली. "प्रेमाची गोष्ट" मध्ये उल्लेख झालेले "चांगल्या गोष्टीचे" सग्गळे निकष इथे एकवटलेले होते.
गोष्ट म्हटलं तर साधी सोपी, असं सगळं तुमच्या आमच्या बाबतीत सहज घडू शकतं.. पण ती बघतानाचा थरार आपली उत्कण्ठा वाढवत नेतो. त्याच वेळी "हे असं आपल्या बाबतीत घडलं तर किती छान होईल" हे फिलिंग आपली पाठ सोडत नाही. प्रत्येकजण जेन्युइन वाटतो, कुणी टोकाचे त्यागमूर्ति आणि कुणी टोकाचे दुष्ट असं नाही..
आई-मुलीचे भावनिक करून टाकणारे संवाद, बहिणींची दंगामस्ती, मावशीचा सपोर्ट, गौरीच्या मनातलं कन्फ्यूजन, शेवटी सोक्षमोक्ष लावताना चिडलेला गौतम..  त्याचे समजूतदार आईबाबा आजी, प्रत्येक गोष्ट आपण आपल्याशी आणि आपल्या भोवतीच्या माणसांशी रिलेट करत राहतो,आणि त्यात गुंतत जातो. आणि सर्वात क्लासिक कळस् म्हणजे "कितीही चुकीची वागली तरी ती माझी मुलगी आहे, त्यामुळे मी प्रत्येक निर्णयात तिला सपोर्ट करणार" हा तिच्या बाबांचा डायलॉग आणि तो प्रसंग! आजवर इमोशनल सिनेमे बघताना रडारड करणाऱ्या बायकांना मी टिंगल करून हसत आले, पण हा बाप-मुलीचा प्रसंग बघताना खरोखर काही क्षण- फ़क्त काही क्षणांसाठी- स्क्रीन धूसर झाली. पण लगेचच सगळं काही all well होऊन मनात हसू झिरपायला सुरुवातही झाली!
पहिल्या भागाप्रमाणेच हा भागही टीव्ही वर लागेल तितक्यांदा बघायचा हे तर ठरलंच आता.
आणि आजच वाचलं की आता mpm 3 येतोय! तोही बघणारच, अर्थात, पण बातमी वाचून किंचित भीति पण वाटली.. आपण तर ह्या गोष्टीचे- ह्या टिमचे फॅन आहोत, पण सगळ्याच लोकांना अजुन पुढे ही गोष्ट आवडेल ना.. अर्थात "सतीश राजवाडयांची गोष्ट" ही आवडण्याला पर्याय असुच शकत नाही,, पण "अतिपरिचयात अवद्न्या" म्हणतात तसं होऊ नये. कारण mpm किंवा सतीश राजवाडयांचा कोणताच प्रकल्प फ्लॉप हे ऐकायला नक्कीच आवडणार नाही, रादर सहन होणार नाही..
अत्ताही फेसबुक किंवा प्रत्यक्षात बोलताना कोणी थोडी जरी निगेटिव्ह प्रतिक्रया दिली, किंवा ओढुनताणुन loopholes शोधायचा प्रयत्न केला, तर ते आपल्याला त्रासदायक वाटते. आपल्या ओळखीच्या काही काही लोकांना, ह्यातली काही acting ही over किंवा loud वाटते, हे ऐकून आपल्याला त्रास होतो. (कदाचित 'असंभव' मध्ये अत्यंत कमी शब्दात,अत्यंत कमी हातवारे करून,, पण डोळ्यांची किंचित हालचाल किंवा चेहऱ्यावरचे बोलके भाव ह्यातुन खुप काही बोलणाऱ्या विक्रांत भोसलेची 'शांत acting' आठवत असेल!)
पण लगेच लक्षात येतं,, की ही भीती अनाठाई आहे.. 1 आणि 2 गाजले म्हणून 3 येतोय इतकं साधं प्रकरण नसणार हे! त्यामागे नक्कीच काहीतरी मजबूत संकल्पना असणार.. आपण विचारही करू शकलो नसू अश्या शक्यता असणार.. नक्कीच काहीतरी ख़ास असणार.. कारण content is king हे तर राजवाडे सिनेमांचं बेसिक सूत्र. आणि entertainment is responsibility हे तत्व!! तेव्हा आता वाट बघुया तिसऱ्या भागाची!
पाचवर फिरणाऱ्या 'पंख्या'च्या रेग्युलेटरला 10 खटके असायला हवेत असं वाटायला लागलय आता..☺☺

14 November, 2015

दिवली


कालचा दिवाळीचा शेवटचा दिवस. संध्याकाळी काळोख होयला लागल्यावर बाहेर गडग्यावर दिवल्या नेऊन रांगेत लावुन ठेवल्या आणि तिथेच जरावेळ बसून राहिले. दिवलीच्या जळत्या ज्योतिकडे बघताबघता तंद्री लावून.

टेराकोटाच्या 6 पणत्या.. चांदणीच्या आकाराच्या.. ह्या आमच्याकडे गेली सुमारे 12-15 वर्ष तरी आहेत. तेव्हा ह्या फॅशनेबल पणत्यांचं लोण जरा जरा नुकतंच यायला लागलेलं. तोपर्यंत आमच्याकडे फक्त स्थानिक कुंभारांनी केलेल्या साध्या मातीच्या दिवल्या असायच्या. दरवर्षी 2 तरी नविन घ्यायच्याच् असं असे. अजुनही ही पद्धत आहे. त्यामुळे रोवळीभर त्या पारंपारिक दिवल्या घरात आहेत. कितीतरी प्रकारच्या नवनवीन पणत्या असल्यामुळे ह्या जुन्या दिवल्यांची वर्णी आता अंगणात गडग्यावर न लागता वाडयात, जिन्यात, विहिरीवर अशी लागते. आणि फॅशनेबल पणत्या दर्शनी भागात पुढच्या अंगणात..

खरं म्हणजे ह्या रंगीत चमकीवाल्या पणत्यांमध्ये गोडंतेल घालत असणार लोक.. पण खायची वस्तू जळायला वापरायची म्हणजे कोकणस्थी बाणा आड़ येतोच. शिवाय "कडुतेलाच्या दिवल्या हवा शुद्ध करतात" हे ऐकीव नॉलेज आहेच! कडुतेल वर्षानुवर्ष वापरत आलोय तेच बरं! पण त्यामुळे ह्या देखण्या पणत्या काळ्या होतात, कायमच्या. जुन्या दिवल्या कश्या, काळ्या होतातच.. मग एक घमेलंभर शेणखळा करून त्यात भिजत घातल्या की झाल्या पूर्ववत्..

उगीच मनात आलं, सालं ह्या कडुतेलानी काळ्या झालेल्या आधुनिक पणत्यांसारखं झालंय आपलं! जग बदलत चाललाय तसे आपण पण  बाह्यतः बदलतोय- पण कडुतेलाची काहीकाही काळी पुटं आपल्याला सोडत नाहीयेत आणि आपल्याला ती सुटावी असं वाटत पण नाहीये.

म्हणजे इथल्या अनेक परंपरा टोकाला जाउन जपणाऱ्याना आम्ही फुकट जाण्याइतके वहावलेले वाटतोय,, आणि आत्याधुनिक शहरी लोकांना आम्ही परकोटीचे मागास वाटतोय..
आंघोळ न करता पोळ्या केल्या म्हणून पण आम्ही फुकट गेलोय,,, आणि अभक्ष्यभक्षण - अपेयपान नाही म्हणून बॅकवर्ड पण ठरवले जातोय!..
साध्या बोलण्यात एखाद्याचा केलेला " माझा मित्र" असा उल्लेख ऐकून लोक आम्हाला अगोचर ठरवून टाकतायत,,, आणि पहिल्यांदा ओळख करुन दिली जात असलेल्या मुलाला शेकहॅंड न करता नमस्कार म्हणाल्याबद्दल लोक आम्हाला मॅनरलेस ठरवून टाकतायत!
आधुनिक पणती गोडयातेलाचीच आणि मातीची दिवाली कडुतेलाचीच असायला हवी असं घट्ट समीकरण! टेराकोटाच्या पणतीत कडुतेल हे काय पटत नाही कोणाला!

जाउंदे.. शेवटी काय दिवली मुख्यतः उजेड पाडण्यासाठी असते, एकंदरीत "उजेड पाडणे" हे खुपच कठीण काम.. तेव्हा जास्त विचार न करता यथाशक्ति उजेड पाडायला जमला तरी चिक्कार झालं..
नाहीतरी कुणी तरी थोरमोठ्यांनी व्हॉट्सऍपवर म्हणून ठेवलंच आहे की, "लोक काय म्हणतील ह्याचा विचार पण आपणच केला तर मग लोकांना काम काय?"󾰀󾰀󾰀

-ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे@मुर्डी.