07 February, 2016

जावे त्या वंशा, आणि तरीही गावे!!😂

एकदा माझी आई बोलता बोलता म्हणाली कि माझा आवाज चांगला असता तर मी गायिका झाले असते. त्यावर बाबा म्हणाले "व्वा! मोठंच सांगत्येस.. हे म्हणजे तहान लागलेली असती तर आत्ता पाणी प्यायले असते असं म्हणण्यासारखं आहे!"
पण मला आईच्या म्हणण्याचा नीट अर्थ कळला. आमचे घरात सगळ्यांचे आवाज वाईट म्हणावे इतके भसाडे आहेत, पण आईचा अपवाद. एकतर तिला ऐकलेली चाल तशीच म्हणता येते आणि कुणाच्या बारश्यात पाळणा, मंगळागौरीत झिम्याची गाणी, लग्ना-मुंजीचे पापड करताना ओव्या इतपत ती गाऊ शकते, आणि बायका तिला आग्रहाने म्हणायला सांगतातही. म्हणून तिचं विधान खरंच खरं आहे, कि आवाज अजून खूप चांगला असता, तर ती व्यवस्थित शिकून गाऊ शकली असती.
पण मी आणि आदित म्हणजे कुठे गुणगुण करायला लागलो कि लोक एकतर स्वतः पळून जातील नाहीतर आम्हाला हाकलून लावतील, इतका आनंदीआनंद आहे. बाबा पण आमच्यासारखे नॉन गायक गटातच आहेत.
बरं गाण्याबद्दलच नॉलेज म्हणाल तर तेही अगाध! म्हणजे उदाहरणार्थ. समजा, आमच्या मिलिंद मामाच्या गाडीतून जाताना संगीताचा एखादा तुकडा वाजतो आहे, आणि मामा आम्हाला त्याबद्दल माहिती देतो आहे, तर, " 'किराणा' घराण्याचे 'तोडणकर'बुवा यांनी गायलेला 'जोग' राग " अश्या माहितीच्या ऐवजी, " 'भुसार' घराण्याचे 'खेडेकर' बुवा यांनी गायलेला 'केतकर' राग"  अशी माहिती पुरवली तरी आम्हाला खरं वाटू शकेल!

शाळा कॉलेजच्या ट्रीपा, किंवा विविध गुणदर्शन हा जो प्रकार असतो, त्यात किंचित जरी गायक असलं किंवा बासरी, माऊथ ऑर्गन, गेलाबाजार शिट्टी असं काहीतरी वाजवता येत असेल त्यांना वेळ मारून न्यायला बरं पडतं. आम्हाला म्हणजे, अश्या ठिकाणी कुठल्या गुणाचं दर्शन घडवावं हा यक्षप्रश्न कॉम्प्लेक्समध्ये नेऊन टाकतो..
त्यामुळे अगदी गोड नको, पण थोडा ऍव्हरेज आवाज देवाने मला द्यायला हवा होता असं मला फार वाटतं.
गाणी ऐकायला खूप आवडतात, आणि ऐकलेलं गाणं गुणगुणायची भयंकर सुरसुरी येते. त्यावर मी काय काय उपाय शोधून काढले.
एकतर शेतावर किंवा कलमात गेल्यावर किती हव्या तेवढ्या मोठ्या आवाजात मनसोक्त गाणी म्हणायची,कारण तिथे दूरदूर पर्यंत ऐकायला कोणी नसतं.
दुसरा मार्ग म्हणजे गाडी चालवताना, तोंडाला कडेकोट स्कार्फ बांधून जोरात गाणी म्हणायची! ह्यात एक मोठा धोका असतो. गावातले जे लोक चेहेरा दिसला नाही तरी, गाडीवरून किंवा कपड्यांवरून मला ओळखू शकतील, त्यापैकी कुणीतरी नंतर विचारतात. "आज बायपासला क्रॉस झालीस तेव्हा मला काही म्हणालीस का तू?"

हॉस्टेलवर असताना एक मैत्रीण अशीच भसाड्या आवाजात गायची तेव्हा आम्ही तिला म्हणायचो, "अगं ए,, कुणी गुळखोबरं दिलाय?"
त्याच्यावर तीच म्हणणं असायचं कि,"गायक लोक दुसऱ्यांच्या आनंदासाठी गातात, आपण स्वतःच्या आनंदासाठी गायलं तर प्रॉब्लेम काय आहे!!"
हे तत्व अंगी बाणवून हि भसाडेगिरी आम्ही अंमलात आणतोच तरी!
******************************************

संध्याकाळी लाईट गेलेले असताना, फक्त देवांसमोर लावलेल्या निरांजनाचा उजेड माजघरात पसरलेला, बाकी सगळीकडे मिट्ट काळोख, आणि आम्ही चौघेजण झोपाळ्यावर बसलो असू, तर म्हणजे गाणी आणि कवितांची आमची आम्हालाच मेजवानी!!
ह्याची सुरुवात झाली ती आम्ही बहीणभाऊ लहान होतो तेव्हा आई बाबा आम्हाला खांद्यावर झोपवताना झोपाळ्यावर गाणी म्हणायचे तिथून. आदित खांद्यावर झोपयचा तेव्हा कितीही कंटाळून किरकिर करत असला तरी रडत रडतच म्हणायचा, "शिवरायांचं गाणं कर ना!!" आणि मग गोविंदाग्रज लिखित "शिवरायांचा पाळणा- गुणी बाळ असा जागसी का रे वाया" हे आई म्हणायची..

बाबा नॉन गायक गटातलेच, पण आम्ही लहान असताना आम्हाला खांद्यावर झोपवताना बाबा गाणी म्हणायचे ती जामच मनःपूर्वक!!
"ताई गुणाची माझी छकुली" आणि सोपानदेव चौधरींचे "सभोवती संतजन सुपुत्रांचा मेळा' हे त्यातले खास!!
ऐकून ऐकून अशी खूप गाणी कविता पाठ होत गेल्या, आणि मोठे होता होता आम्ही संध्याकाळी झोपाळ्यावर बसून म्हणू लागलो.

एरवी एखादं गाणं आवडण्यासाठी अर्थ, क्लासिकपणा ह्या कशाशी फार देणंघेणं असावं लागत नाही,(अर्थात एक किमान लेव्हल धरून हो!! म्हणजे साजूक तुपातल्या 'पोली'ची, रिक्षावाल्याची वगैरे गाणी आणि तत्सम प्रकार कधीच नाही आवडू शकत, पण कधीकधी "लडकी क्यूं न जाने क्यूं" सारखी गद्य धड्याला चाल लावलेली गाणी पण आवडून जातात)पण ह्या आमच्या खास मैफलीत जुन्या वृत्तबद्ध कविताना अग्रमानांकन!!

"सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण" हि अवाढव्य कविता पाठ झाली ती ह्या झोपाळ्यावरच्या गायनातूनच! गोदावरी नदीचं स्तोत्र म्हणजे "तुज हृदयंगम रवे विहंगम- अर्थात गोदागौरव" - म्हणता म्हणता कधीही न बघितलेल्या गोदावरी नदीशी काय नातं जुळलं कोण जाणे.. त्यातल्या
"तल्लिलेमधी तल्लीन न हो कल्लोलिनी कवी कवण तरी" हे म्हणताना जी काय बोबडी वळायची, कि हे म्हणतोय ते मराठी आहे का संस्कृत तेही कळत नसे! तीच गत महाराष्ट्र गीतातल्या "यन्नामा परीसुनि रिपु शमीतबल अहा!" ची!!
"आजीच्या जवळी घड्याळ कसले" म्हणता म्हणता, आम्ही आईबाबांच्या बालपणीचा काळ स्पष्ट अनुभवतो, तर "पडू आजारी मौज हीच वाटे भारी" म्हणताना ते आजारपणातले लाड सुखावून जायचे..
वर्षं पुढे पुढे सरकली, आणि आम्ही आजोबांना गाणी म्हणून दाखवू लागलो, त्यांचा कंटाळा जावा म्हणून.. त्यांना पुसटशी आठवत असलेली "येथे काय असे गडावर.." हि रायगडबद्दलची कविता शोधून काढून त्यांच्या बरोबर म्हटत त्यांच्या लहानपणात गेलो.
आमच्या आजोळच्या आजीकडून शिकलेलं "शिवरायांचा सिंह सिंहगडी पडला समरांगणी" हे तानाजींचं काव्यमय चरित्रच संपूर्ण म्हणताना एकदम शूरवीर वाटायला लागतं, तसं वसईच्या किल्ल्याची लढाई, "बेलाग दुर्ग जंजिरा" म्हणताना पण!
दरम्यान आम्ही शिबिरांना जाऊन वेगवेगळी गाणी(पद्य) शिकून आलो कि तीही सगळे मिळून मोठ्या आवाजात म्हणू लागलो. आई बाबाही आमच्यात अजूनही सामील होतात, आणि ह्या मैफलीची सुरुवात "आक्रमकांशी झुंजत झुंजत समरी विजयी होऊ" ने करायची हा अलिखित कायदा झाला,  चला निघूया सरसावोनी म्हणताना बिनदिक्कत आवाज टिपेला पोचवू लागलो, तर 'वसुंधरा हि कुटुंब अवघे" ह्या अतिकठिण चालीच्या गाण्याला पण सोडलं नाही. "रणी फडकती लाखो झेंडे" चा ठेका, एकदिलाची सिंहगर्जना, हि अनादी भरतभू, आम्ही डोंगरचे राहणार अशी कितीतरी..

काळोखात, वही हातात न घेता, तोंडपाठ- दोन अडीच तास नॉनस्टॉप म्हणत राहिलो तरी संपणार नाहीत एवढी आमची "माय फेव्हरिट" फोल्डरवाली प्ले लिस्ट आहे!! -  जुन्या कविता आणि संघगीते- गायक आमचे आम्हीच! ह्या नादात बऱ्यापैकी पाठांतर झालं!

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे,शेजारी पाजारी ऐकतील, रस्त्याने येणारे जाणारे हसतील हि धास्ती मनात असतेच! एरवी "अरे जरा गप्प बसा" हे सांगून आई दमते, पण आमची गाणी रंगात आलेली असताना जर विनोददादा, प्रणव किंवा अन्य सगळेच गायक लोक अश्या कुणाची रस्त्यावर चाहूल जरी लागली तरी आम्ही झटकन म्युट होतो!! (आता हि पोस्ट त्यांनी वाचली कि पितळ उघडं पडणारच आहे तरी!!)

 बलसागर भारत होवो हे फार पूर्वी केव्हातरी तळजाईच्या शिबिरातून पसरत आलेले, आणि ह्या चालीला भैरवी म्हणतात (त्या शिबिरात सुधीर फडके यांनी ते पद्य ह्या चालीत म्हटलेलं), हे माहिती झालेल आहे, त्यामुळे लाईट आले, आता उठून कामाला लागावे असं झालं कि आम्ही 'बलसागर भारत होवो..' ने कार्यक्रम संपवतो! ते सगळं ऐकायला अगदी बेसूर असणार, माझी खात्री आहे, पण ते शब्द, त्यांचा अर्थ, आणि त्या चालीतली आर्तता- जी आम्ही म्हणत असताना सुद्धा फक्त आमच्या का होईना मनाला भिडते..बास, अजून काय हवाय? झालीच कि गायनाची हौस वसूल!!

6 comments:

  1. Hya kavita aani gani milu shaktil ka

    ReplyDelete
    Replies
    1. ऑनलाइन मिळतील का ते माहिती नाही, पण आठवणीतल्या कविता म्हणून पुस्तके आहेत- 4 भाग आहेत.

      Delete