08 February, 2016

पैल तो गे उडून गेला (एकदाचा) काऊ

काल बाबांची रोजची ड्युटी माझ्यावर सोपवलेली होती, ती पार पाडून घरी यायला निघत होते. उन्हात वाळत ठेवलेले आंबा पोळी, म्हणजेच साठांचे ट्रे आत आणून झाले, झाक-पाक झाली, दारं लावून झाली, आणि निघण्यापूर्वी काही बाहेर राहिलं नाही ना, म्हणून मयादादाने पुन्हा साठं वाळत घालायच्या मोकळ्या जागेत नजर टाकली, तर तिथे एक कावळा दिसला.

वाळत घातलेले पदार्थ सुरक्षित राहावेत म्हणून चारी बाजुंनी जे जाळं लावलेलं आहे ते दिसलं नाही त्याला, आणि आंबा पोळी खाण्याच्या हेतूने उडत उडत येताना त्या जाळ्यात तो अडकला असा आमचा प्राथमिक अंदाज.
समोरच आमचा मामा कातकरी आणि कुटुंबीय, त्याचे सत्राशेसाठ पाहुणे, त्यांची चौतीसशेसाठ पोरं असे सगळे होते. त्या पोरांना सणकन उत्साह संचारला. हातातले उद्योग सोडून सगळी पोरं (वयवर्षं 2 ते 10च्या मधली)त्या कावळ्याभोवती जमली. एक काळाकुट्ट गलेलठ्ठ बोका- नुकतेच मासे फस्त करून लोळत होता- तो पण ताडकन उठून तिथे आला.
पोरांपैकी संजय नावाचा हिरो उडी मारून रिकाम्या हौदात उतरला, आणि त्याने कावळ्याला हातात घेतलं. मग त्या सगळ्या पोरांची एक गोलमेज परिषद सदृश्य गंभीर चर्चा झाली. त्यात विविध पर्याय, त्यातली शक्याशक्यता, व्यवहार्यता अश्या विविध पैलूंवर कावळा हातात धरून विचार विनिमय झाला. सगळं बोलणं कातकऱ्यांच्या बोलीभाषेत सुरु होतं. मराठीचीच बोली आहे ती, पण नीट लक्षपूर्वक ऐकलं तरच, मतीतार्थच फक्त कळेल इतकी वेगळी आहे.

बहुमत असं होतं कि त्या कावळ्याला अडकलेल्या स्थितीत तिथे तसाच सोडून आपण लांब जावं. म्हणजे जाड्या बोक्याला कावळा खायला मिळेल.
काही मुलांचं म्हणणं होतं कि पाय जाळ्यात अडकल्यामुळे आता बहुतेक त्याला उडता नाहीच येणार तर आपण त्याला पाळूया.
संजयचं म्हणणं होतं, काई नको, जहुंदे उडून बिचाऱ्याला.
अर्थात कातकरी समाजात कावळा हा 'अभक्षभक्षण' मानलेला आहे म्हणून हे प्रश्न उदभवले होते. तिथे कावळ्याच्या ऐवजी चिमणी, बुलबुल, कवडा वगैरे असते तर एव्हाना फोडणीत पडले असते.
तर "शेवटी ज्याच्या हातात कावळा त्याचा निर्णय फायनल" ह्या न्यायाने गोलमेज परिषदेचे अध्यक्ष माननीय संजय यांच्या शुभहस्ते कावळ्याची जाळ्यातून सुटका करण्यात आली.
दोन्ही हातात कावळा धरून तो हौदातून बाहेर आला, क्रिकेटमधील बॉलर जसा बॉल घेऊन धावत येतो तसा संजय कावळा घेऊन धावला.. आणि पतंग उडवतात तसा दोन्ही हातांना लयदार झोका देत त्याने त्या कावळ्याला हवेत उडवला!!
आणि मी इतका वेळ तोंडाचा आ उघडलेला तो मिटला!

 हि सगळी खरोखरच निसर्गाची लेकरं असतात. रानडुकरांचा पाठलाग करत अनवाणी पायांनी सुसाट वेगाने रात्रीच्या काळोखात धावण्याची क्षमता निसर्गाने त्यांना दिली आहे, आपले डाएटचे नितीनियम त्यांच्या कामाचे नाहीत!!

No comments:

Post a Comment