28 March, 2016

MyBicycle 3 मुर्डी-नानटे-मुर्डी

मुर्डी-नानटे-मुर्डी
24 मार्च 2016

बारावीत असताना, परीक्षा संपली कि काय काय करायचं ह्याची चर्चा अभ्यासापेक्षा जास्त चालायची. तेव्हा अमृता आणि मी पुण्याहून गोव्याला सायकलने जाण्याचा घाऊक आराखडा अत्यंत डिटेलवार, तोपण लेखी, तयार केला होता. पुढे पालकांनी असहकार चळवळ उभारली आणि आमचे बेत धुळीस मिळविले. पण नंतर कॉलेज संपेपर्यंतच्या वर्षात मी आणि अमृताने अश्या कित्येक भन्नाट कल्पना शोधून ठेवलेल्या, त्यातल्या काही प्रत्यक्षातही आणल्या. गोवा नाही तर नाही, पण गेला बाजार खडकवासल्यापर्यंत सायकलींनी अनेकदा जाऊन आलो.
अशी सायकल हि आमच्या दोघींची तेव्हापासूनच बेस्ट फ्रेंड!

योगायोग असा कि आत्ता मी नवीन सायकल घेतली त्यानंतर लगेच अमृता & कंपनीचा नानटे दौरा ठरला. ह्यावेळी मी तिच्याकडे जायचं असं ठरल्यावर मी हेही ठरवून टाकलं कि ह्यावेळी सायकलनेच जायचं,म्हणजे माझ्या दोन्ही बेस्ट फ्रेंड एकमेकींना भेटतील!

सणसणीत उन्हाळा सुरु झालाय आता, त्यामुळे जास्तीत जास्त लवकर निघून उन्ह होयच्या आत पोचवं असं ठरवलं होतं, तरी निघेपर्यंत पावणेसात झालेच. हवेचा पंप, लिंबू सरबत, वगैरे जामानिमा घेतला.

देवळाजवळचा सुप्रसिद्ध चढ अर्थातच खाली उतरून सायकल ढकलत पार केला, आणि मुर्डीफाट्यापासून खरी सफर सुरु झाली.

आसुदघाटात फोन वाजला तो घ्यायचं निमित्त करून थांबले. मोजून 5 मिनिटं दम टाकून आणि एका घोटात अर्धा लिटर लिंबू सरबत ढोसून पुढे निघाले तर मागून आदित गाडीवरून आला.
"काये??" ह्या माझ्या प्रश्नावर त्याने कायतरी थातुरमातुर उत्तर दिलं, पण खरं त्याला बाबानीच पाठवला असणार एस्कॉर्ट म्हणून, असा माझा डाऊटखाऊ विचार! रिकामी झालेली सरबताची बाटली त्याच्याकडे दिली आणि कुणाकडूनतरी पाणी भरून आणायला सांगितलं. दापोलीत भेटायचं ठरवून तो पुढे गेला.
दापोलीत पोचायला पावणेनऊ वाजले(20किमी-2तास)
घरी फोन केला, आदितला घरी जायला सांगितलं आणि 9 वाजता दाभोळ रोड पकडला. सूर्य पटपट वर येत होता आणि वाजले किती तेच कळत नव्हतं,मोबाईल सॅकमध्ये होता, म्हणून दापोलीत आदितच रिस्टवॉच मागून घेतलं.

आता हा रस्ता रोजच्या पायाखालच्या वहिवाटीचा नाही, त्यामुळे खड्डे, चढउतार, स्पीडब्रेकर ह्यांच्या जागा पाठ नाहीत. उतार आला कि झुमकन तरंगत जातानाचा आनंद लगेच ओसरत होता, कारण ह्याच रस्त्याने संध्याकाळी परत यायचाय हि जाणीव होत होती, उलट चढच जास्त दिलासा देत होते कि परतताना इथे मज्जा येईल!!

पुढे जाताजाता सायकल एकेक धडे देत होती, चढात एकदम समोर रस्त्याकडे बघून धीर खचवून घेण्यापेक्षा पायाखाली बघत हळूहळू पुढे सरकत राहायची आयडिया मिळाली. तसेच दमश्वास नीट व्हायला श्वासावर लक्ष ठेवायचं आपोआपच सुचलं, म्हणजे डावा पाय मारताना श्वास, उजवा पाय मारताना उच्छवास..अशी लय तयार झाली.

उंबर्ले टाकून पुढे जाऊन थांबून अर्धा लिटर पाणी ढोसलं. नानट्याला दाभोळ रोड सोडून मातीच्या कच्च्या रस्त्याला वळले, तेव्हा 50%मोहीम पार पडल्याचं समाधान होत होतं. (दापोली-नानटे 13 किमी, सव्वा तास) सव्वादहा वाजता अमृताच्या घरी पोचले, तेव्हा समस्त कुंटे फॅमिली दरवाज्यात स्वागत करत उभे होते..

खाखा नाष्टा झाला, मग कधीपासून साठवून ठेवलेल्या गप्पा, साग्रसंगीत जेवण, सावनीबरोबर दंगा मस्ती करत वेळ भरभर पुढे सरकत होता. सावनीची मस्ती थांबून तिने दुपारी झोपावं,म्हणून अमृताने मला सांगितलं कि "तू झोपेचं नाटक कर म्हणजेच ती झोपेल." तर काय, तिच्या आधी मला झोप लागली.

खाडकन जाग आली तेव्हा चार वाजत आलेले. मस्त गारगार करवंद सरबत पिऊन, पावणेपाचला निघाले.

आता उताराचा आनंद खरोखर अनुभवता येत होता. परतीच्या वाटेवर बैल जसे वेगात चालतात, तसाच येताना दापोलीला यायला एक तासच लागला.

कृषी विद्यापीठातला उसाचा रस 2 ग्लास भरून पिऊन दापोली सोडली, बरोबर 6 वाजता. इथेही परतीच्या वाटेवर उताराची मजा होती..

व्यवस्थित बनवलेले स्टेट हायवे किंवा ऑफिशियल रस्ते असतील तिथे सायकल चढ चढताना कुरकुरत नाही. 1 फूट उंच जायला 10 फुटाचा वळसा का असं कायतरी जे रस्ते बांधणीचं परिमाण आहे ते तिथे अंमलात आणलेलं असत. पण " नाय तं काय बोल्लो, बोल्लो आमच्या वाडीवर रस्ता होया हवा" हे परिमाण वापरून, जिथे पाखाड्या बुजवून वर डांबर ओतून त्यांना रस्ते असं संबोधण्यात येत, तिथे सायकल कुथते! हे आपलं माझं निरीक्षण...

लॉन्ग विकेन्डमुळे, समुद्रावर पर्यटकांच्या अंगात आलेलं होत. असं वाटलं कि लोक लांबून लांबून जीव टाकत इथे येतात, पण आपल्याला ह्या समुद्राकडे ढुंकून बघायला वेळ नसतो. आज सायकलच्या निमित्ताने तोही अनुभव घ्यायला मिळाला.

हर्णै गाव येईपर्यंत काळोख पडायला लागलेला, घरून फोन येत होता, पण फोनची बॅटरी संपली होती. मिलिंदकाकाच्या दुकानात शिरून त्याला घरी फोन करून कळवायला सांगितलं कि मी इथून निघाले आहे.

आता सफरीचा शेवटचा टप्पा. हत्ती सहज गेला होता, पण शेपूट जड वाटायला लागलं होतं. घामाच्या धारा आणि संध्याकाळचा गार वारा असा विरोधाभास तयार झालेला. काळोख पण वाढत होता. समोरून पर्यटकांच्या आलिशान गाड्या भयंकर प्रखर हेडलाईट घेऊन येत होत्या. समोरून आलेली गाडी पास होऊन निघून गेली कि काही क्षण काहीच दिसेनासं होत होतं.
ओव्हरटेक करताना, समोरून पास होताना लोक सायकलीला रस्त्यावरचा घटक म्हणून खिजगणतीतच धरत नाहीत ह्याची खूप जाणीव होत होती. 3-4 वेळा तरी ट्रॅफिकमध्ये वापरण्याचे खास अस्खलित शब्द वापरायची वेळ आली.

घरी पोचले तेव्हा साडेसात वाजत होते. एकूण दिवसभरात येऊन जाऊन 66 किमी अंतर झाले, सगळा मिळून वेळ सव्वापाच तास इतका लागला.
बाबांनी बंबात विस्तव पेटवून पाणी तापवून ठेवलं होतं. आईने स्वयंपाक तयार ठेवला होता. मुंबईचे काका काकू आले होते, सगळ्यांना दिवसभराच्या हकिगती सांगता सांगता लहान बाळासारखी अलगद झोप लागली.. पाय दुखले अजिबात नाहीत, पण झोपेत सुद्धा दिवसभराचा प्रवास दिसत राहिला!

8 comments:

  1. छान वर्णन, रस्ता वाडीवरचा आणी हायवे तर मस्तच
    66 कि मी म्हणजे खुप रपेट झाली .

    ReplyDelete
  2. आसूद दापोली जीवघेणा चढ आहे ,कसे निभाव्लेत

    ReplyDelete
    Replies
    1. इतका नाही जाणवलं..हळू हळू पुढे सरकत राहिले.

      Delete
  3. लेखन छानच जमले आहे.

    ReplyDelete
  4. लेखन छानच जमले आहे.

    ReplyDelete
  5. अतरंगी अवली आहेस .❤️😘

    ReplyDelete