30 March, 2016

रंगून काजू भरले त्यांनी गिरीडोंगर दुर्गम!

"आता कसले हे कातकरी जागेवर भेटतायत, आता बिया झाल्या ना?? आता ते एका जागी भेटणं अशक्य"
हा संवाद पांढरपेशा घरात कानावर पडला कि समजावं, काजूंचा सीझन आला.

शहरी लोकांना काजू म्हटल्यावर जे डोळ्यासमोर येतं, त्या म्हणजे काजूच्या बियाच असतात, आणि बहुतेक कोणत्याच फळाच्या बी ला इतका रुबाब मिळत नसल्यामुळे ह्या काजूच्या बियांचा उल्लेख आम्ही फक्त "बिया" असाच करतो, बस 'बिया' इतनाच नाम काफी है! कसल्या ते बोलायचं कामच नाही!

ह्या बियांवर आधारलेलं प्रचंड अर्थशास्त्र ह्या दिवसात सर्वत्र गाजत असतं.
ज्यांची स्वतःच्या मालकीची काजूची झाडं आहेत, ती कातकऱ्यांना कराराने देणे - त्यात पण अमुक रोख रक्कम ह्याच्या बरोबर "मुंबईचे दादा येतील तेव्हा, ताई माहेरपणाला येईल तेव्हा, वहिनींच्या माहेरी पाठवायला...... असे इतक्या वेळा अमुक अमुक बियांचे वाटे द्यायचेस" असं एक कलम त्या करारात असतंच! मग तेवढ्या बिया आणि ठरलेली रोख रक्कम झाडांच्या मालकाला देऊन उरलेल्या बियांचं त्यांनी काय वाटेल ते करावं..

करार बिरार न करता स्वतः बिया काढायचा पराक्रम करणारे काही थोडेजण असतात. कडेकपारीत, काट्याकुट्यात हिंडून बारीकबारीक बिया पातेऱ्यात शोधून जमवणं, झाडांवरून काढणं म्हणजे काय खायचं काम नाही. चोरांची कटकट सुद्धा भरपूर..  काही काही गुणविशेष निसर्ग जीन्समधूनच माणसाना देतो, त्यामुळे चोरीची टीप जरी गुप्तहेरांनी दिली, तरी मध्यरात्री मिट्ट काळोखातून रानात चोरांचा पाठलाग करणं हे सगळ्या लोकांना जमण्यासारखं नाही.. अर्थात अश्या बिकट वाटेवर चोरी करणं सुद्धा येऱ्यागबाळ्याचं काम नाही. त्यामुळे बिया चोरीची एकतरी चटपटीत ष्टोरी दरवर्षी चवीने चर्चिली जाते, त्या ष्टोरीत जर चोर रंगेहाथ पकडला गेला असेल तर मग ती ष्टोरी अजूनच रोमहर्षक!!

ज्यांची स्वतःची झाडं नसतील ते कातकऱ्यांकडून बिया विकत घेणार, त्यात पण 10 रुपयाला 4 बिया असल्या तरी हजारो रुपयांच्या ओल्या बिया विकत घेणारे हौशी कलाकार कमी नाहीत. कातकऱ्यांची लगबग अगदीच प्रेक्षणीय!

खास पाहुण्यांचं अगत्य करायला बियांची उसळ, बियांची आमटी, तंद्री लाऊन- एकाग्रचित्ताने सोलून खायला मीठ घालून उकडलेल्या बिया, धुरीच्या शेगडीत भाजून- हात काळे करून- फोडून खायला बिया, कसकसल्या भाजीत व्यंजन म्हणून बिया असले लाड यथेच्छ होतात. प्रोफेशनल काजुवाले तर त्यांच्याकडच्या शेरंडावलेल्या(शेरंडावणे=फाजील लाड) बियांना मसाला, चॉकलेट, मँगो, स्ट्रॉबेरी असले फ्लेवर लावतात.. शिवाय मग ऑफ सीझनसाठी सुख्या बिया, हे सगळे जास्तीचे सोपस्कार!
******************************

हे सगळे कौतुकसोहोळे वाट्याला येतात ते बियांच्या.. काय करणार ना, फिरते रुपयाभोवती दुनिया....

पण हि बी ज्या फळातून निघते -म्हणजे त्याला आम्ही बोंडं म्हणतो - त्यांच्याकडे मात्र लाल गुलाबी शेंदरी पिवळे असं विविधरंगी मोहक रूप आणि रसदार अंतरंग असूनसुद्धा सर्रास दुर्लक्ष झालेलं असतं.

नाही म्हणायला कोकणवर्णन ह्या जुन्या कवितेत मात्र बियांनी नाही तर बोंडांनीच जागा पटकावली आहे,
"लज्जारंजित नवयुवतींच्या कोमल गालांसम..
रंगुनी काजू भरले त्यांनी गिरीडोंगर दुर्गम!"
ह्याच्या व्यतिरिक्त कुठे त्या बोंडांची कुणी दखल तरी घेतल्येय का शंकाच आहे...

अगदी तुरळक कुणीतरी त्याचा स्क्वॅश/सिरप वगैरे करून विकतात, आणि 'म्हणे' कुणीकुणी त्याची दारू बनवितात वाटतं!

फारच झालं, तर "ह्या झाडाखाली बोंडांचा खच पडलाय, आणि वर बिया दिसत नाहीत त्याअर्थी चोरी झालेली आहे" इतपत सीआयडी गिरी करायपुरताच बोंडांचा उपयोग.. नाहीतर मातीत मिसळून जाणे हेच त्यांचे प्रारब्ध!

आपल्याला तर बोंडं खायला जाम म्हणजे जामच आवडतात. ह्या दिवसात कामानिमित्त रानात भरपूर फिरणं होतं, आमच्या आणि आमच्या आजूबाजूच्यांच्या बागेतल्या कातकऱ्यांच्या लहान पोरांशी माझी खास दोस्ती.. आमच्याच झाडांपैकी कुठल्या झाडांची बोंडं जास्त खास लागतात, कुठल्या झाडांची बोंडं खाजरी आहेत, हे ती पोरंच मला शिकवतात! सरसर झाडाच्या शेंड्यात जाऊन, अलगद यथेच्छ बोंडं काढून मोकळे! चालताचालता त्यातला चविष्ट रस हातांवर, तोंडावर पाघळत पाघळत ती कचाकच फस्त करायचं माझं प्रशिक्षण तिथलंच. वर "ताई, घरी जातेवेलीं काकींना खायाला न्हे बोंडां" हा हुकूम.

पण खरोखरच वर खाली फेऱ्या घालून, उन्हात तळपुन, काट्याकुट्यात फिरून स्वतःला ओरबाडून घेऊन, घाम गाळून झाल्यानंतर ह्या पोरांशी गप्पा मारतमारत, रानातला गार गार वारा खात, काजूची बोंडं खाणं म्हणजे ह्या जगातली एक नंबरची रिफ्रेशमेंट आहे.

त्याच्यात आयर्न आणि व्हिटॅमिन सी असतं म्हणून उद्या ती कोणी दुकानात विकायला ठेवील(कदाचित कुठे महानगरात सुरुवात झाली पण असेल) तर त्यात हि अशी  वातावरण निर्मिती नसेल. सफरचंद-बीफरचंद असल्या ऐदी कॅटेग्रीत बोंडं नाहीतच. ती कापून, बशीत घेऊन, टुथपिकला टोचून खायचा कुणी विचारच मनात आणू नये. ती वाईल्ड आहेत, त्याच पद्धतीने ती खायला पाहिजेत, कचाकचा...

No comments:

Post a Comment