17 March, 2016

MyBicycle

#MyBicycle 1

किती दिवस घेऊ घेऊ म्हणत असलेली गियरवाली सायकल काल फायनली आमच्या घरी दाखल झाली. ह्यात विशेष असं काहीच नाही, पुण्यामुंबईकडे तर शाळेतली चिंटुकली पोरंपोरी सुद्धा अठरा गियरच्या सायकली सहजगत्या क्लासला जायला वगैरे वापरत असतात. पण कुणाला कशाचं कौतुक असावं ह्याला काय माप नसतं ना, तर मला बापडं आहे जरा सायकलींचं (आणि चालवणाऱ्यांचं) कौतुक, म्हणून आमचे तमाम बंधूवर्ग आणि मित्रगण जसे त्या हार्लीडेव्हिडसन का काय ते - तिच्याकडे बघून लाळ गाळत असतात तशी आपली अवस्था होते ब्वॉ छानशा गियरवाल्या सायकली बघून!

तर कण कण बचत करून करून पैसे साठवणे सुरूच होते आणि एकीकडे पालकांना पटवायची मोहीम पण सुरु होती.  गावातल्या गावात फिरायला साधी सायकल आहे हे उघड बोलायचं कारण, आणि एकदा का ती चढ चढू शकणारी सायकल घेतली कि मग कुठे कुठे उनाडक्या सुरु होतील ह्याची धास्ती हे खरं मनातलं कारण!

 दापोलीत सायकलच्या दुकानात आधीच मी  चौकश्या करून ठेवलेल्या, ट्रायल घेऊन वगैरे झालेली होती. अगदी बेसिक, सर्वात स्वस्त, साधा प्रकार निवडला, कारण झेपत नाही म्हणून किंवा वेळ मिळत नाही म्हणून जर सायकलिंगचा उत्साह बारगळला तर फार जास्त पैसे अडकून राहायला नकोत.
माझ्याकडे पुरेसे पैसे साठल्यावर मग घरात जाहीर करून टाकलं कि, "मी आज सायकल घेऊन येत्येय!"

मग काय, बाबा माझ्याबरोबर स्वतः येऊन सायकल बघून, घेऊन, वर," माहित्येय मोठी पैसे साठवणारी!" असं म्हणून स्वतःच पैसे देऊन मोकळे झाले!
मग नवी सायकल दापोलीहून घरी चालवत आणायला बाबांनी परवानगी दिली तेव्हा पहिला गड फत्ते झाला. माझ्यामागून अर्ध्या तासाने प्लेजरवरून निघून बाबांनी मला हर्णै गावात गाठलं. आणि म्हणाले "बघू गो मला जरा! गियर कसे बदलायचे?" वाहनांची अदलाबदल करून पाजेपर्यंत आलो. पाजेत शाळेजवळच्या मोठ्या चढाच्या आधी थांबलो.

आमच्या इथे बदलत्या काळाबरोबर, वाढत्या आर्थिक प्रगतीबरोबर इतर सगळ्या आधुनिक सुविधा आणि चैनीच्या वस्तू सर्व थरातल्या समाजात आल्या, पण सायकलींची क्रेझ मात्र मुळीच आली नाही हि जाणीव रस्त्यात खूपच होत होती, इतके लोक्स विचित्र हावभाव करत होते. पाजेत उभं राहून बाबा घाम पुसत असताना तर एक अनोळखी मुलगा अगदी मनापासून म्हणाला, "एसटीवर टाकून नाही का आणायची सायकल!"
बाबा: "अरे, असं बघ, सायकल एसटीवर टाकून आणणं, म्हणजे पवनचक्की विजेवर चालवण्यातला प्रकार आहे!"
तो मनुष्य(विथ चमत्कारिक हावभाव): "...."
मी: "बाबा, चला आता! मी चालवते"
मग परत वाहनांची अदलाबदली करून निघालो. पुलाच्या अगोदर रिक्षास्टँड जवळ उजवीकडे वळल्यावरचा चढ किती महाभयंकर आहे ते सायकल असल्याशिवाय कळत नाही. तिथे मात्र सायकल हातातूनच न्यावी लागली, बायपासच्या टोकाजवळ पुन्हा बसून- उतार आणि मग पुलावरून तर अक्षरशः तरंगल्याचा अनुभव घेतला! 

मुर्डी गावाची सीमा लागताच बाबा पुन्हा "दे मला जरा आता!" म्हणून तयार!
विमलेश्वराच्या देवळाजवलचा सुप्रसिद्ध उतार उतरून देवळात जाऊन, मोरया करून घरी पोचलो.
आईने सायकलवरून तांदूळ ओवाळून टाकले, आणि आमची नवी सायकल आमच्या कुटुंबाचा घटक झाली!

आई तिच्या रोजच्या संध्याकाळच्या चालण्याला बाहेर पडली तेव्हा, "ऑऑ! अनिलकाका सायकल चालवत आला!" म्हणून कौतुकयुक्त आश्चर्योद्गार तिला ऐकायला मिळाले. (टचवूड)
बाबा म्हणाले, "आता सांगतोच ह्या पोरांना, हि गाडी ब्याटरीवर चालणारी आहे, पण ब्याटरी आपापल्या ढोपरात बसवून घ्यायची!"

No comments:

Post a Comment