22 March, 2016

#shimgotsav साताई

ढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुमढाकुमाकुम
होळी जवळ आली कि हा असा आवाज चारी दिशांना निनादायला सुरुवात होते.. गावोगावी घनदाट रानातल्या देवळांमध्ये असलेल्या ग्रामदेवता पालखीतून भक्तांच्या भेटीला घरोघरी जाण्याचा सोहळा. ढोल ताशे आणि सनईच्या गजरात गावोगावी सुरु होतो कोकणातला शिमगोत्सव !
पूर्वी लहानपणी तर होळीच्या अगोदर ४-५ दिवसात सुमारे २५-३० पालख्या यायच्या. ह्या पालख्यांच्या पुजेची तयारी असलेलं एक ताट आई, आजीने कायम तयारच ठेवलेलं असायचं. रात्रंदिवस गर्जत असलेला हा ढाकुमाकुम आवाज जवळ जवळ येतोयसं वाटलं कि धावत रस्त्यात जाऊन बघायचं, आणि एखादी पालखी आपल्या घराकडे वळलेली असेल तर घरात तशी वर्दी द्यायची. मग सगळेजण बाहेर येऊन पालखीतल्या देवतेची पूजा, आपलं आडनाव सांगितलं कि पालखीबरोबरचा मुख्य माणूस प्रार्थना करून सगळ्यांसाठी सुख समृद्धी मागणार. मग पालखी पुढच्या घराच्या कवाडीत.
आता काळपरत्वे हि पालख्यांची संख्या ७-८ वर आल्येय, पण उत्साह अजून तसाच ! काल संध्याकाळी अंगण सारवताना हाच विचार मनात येत होता, वाढत्या वयाबरोबर आनंदाच्या-उत्साहाच्या कल्पना बदलतात, पण पालखी म्हटलं कि निर्माण होणारे भाव वर्षानुवर्ष,, पिढ्यानपिढ्या तसेच.
आजचा होळीचा आदला दिवस म्हणजे साताईची पालखी. सातांबा गावाची देवता म्हणून साताई. हि पालखी सर्वांत हायप्रोफाइल! ह्या पालखीला इतर पालख्यांपेक्षा जास्त मान. जास्त श्रद्धा, स्वागताची लगबग, भीती, दरारा, प्रोटोकॉलमधला काटेकोरपणा सगळच जास्त. साताई येणार म्हणून आज शाळेला, शेती-बागायती कामांना, फॅक्टऱ्यांना सगळ्यांना सुट्टी!
सकाळी जाग आल्यापासूनच ढाकुमाकुम ऐकू येत असत. इतर सगळ्या पालख्यांच्या वाद्यांपेक्षा साताईचा वैशिष्ठ्यपूर्ण बाजा सवयीनी वेगळा समजतो. साताई पहाटे अडीच तीनला सातांब्याहून निघून वर्षानुवर्ष ठरलेल्याच मार्गाने ठरलेल्याच क्रमाने एकेक गाव एकेक वाडी घेत मजल दरमजल करत आमच्या मुर्डी ब्राह्मणवाडीत येईपर्यंत साडेनऊ दहा होतात. घराचा, अंगणाचा, रस्त्याचा लखलखीत केर काढून, पाणी मारून, शेणाने सारवून चकाचक करून त्याच्यावर रांगोळी, घरच्या देवांची पूजा, सगळ्या लोकांच्या आंघोळ्या, साताईच्या पुजेची आणि ओटीची तयारी होईपर्यंत रस्त्यावर एक एक करून साताईचे खेळी दिसायला लागतात.
खेळी म्हणजे पालखी खांद्यावर घेऊन येणारे सातांबा आणि कोंगळे गावाचे ग्रामस्थ. स्वच्छ पांढरे शर्ट/झब्बे, डोक्यात पांढऱ्या टोप्या, धोतर/लेंगा/पाटलोण/जीन्स/हाफ चड्डी अश्या सगळ्या पिढ्यांचे प्रतिनिधी,,  एकुण एक सगळ्यांचे अनवाणी पाय. आता डांबरी रस्ते झाले असले तरी ठरलेला मार्ग बदलायचा नाही ह्या कडक संकेतामुळे आडरानातून काट्याकुट्यातून पालखी घेऊन सलग पंचवीस तीस तास चालतात.
क्षणोक्षणी जवळ येणारा साताईच्या ढोलाचा आवाज, आली का? आली का? अशा उत्कंठेनी प्रत्येक कवाडीत उभे असलेले आम्ही सगळे, असं एकदम भक्तीभावानी भारलेल वातावरण पार करत करत साताईची पालखी आमच्या सगळ्यांच्या घरांवरून, भरभर चालत साताईचा बाजा पुढे सरकतो. पाठोपाठ प्रत्यक्ष पालखी वेगात आणि दिमाखात पुढे जाते!
टोकातल्या घरापासून सुरुवात करून एकेका घरापुढे थांबून पूजा घेत घेत येते. वेळेचं काटेकोर गणित, आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होण्यापूर्वी देवळात परत पोचण्याचा कडक नियम ह्याची सांगड घालताना सुद्धा प्रत्येक घरी थोड्याच वेळात, तरी मनाच समाधान होईल अशी पूजा प्रत्येकाला करायला मिळते. बाबांनी पूजा केली, आईने ओटी भरली, आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला, कि आडनाव विचारून
“ह्या पेंडश्यांच्या घरादारा, मुलामाणसा, येण्याजाण्या, गुराढोरा, शेतीवाडी, सगळ्यांचा सांभाळ कर, तोटा आला तर पार कर, ह्या आर्जवाला मान दे” अशी प्रार्थना करून, झाल ना मनासारखं दर्शन असं विचारून मग पुढच्या कवाडीकडे निघतात. पूजेच्या ताटात अंगारा देतात. त्याची पुडी घरोघरच्या देवघरात वर्षभर असते. आजारी असलेली गुरं, कारणाशिवाय रडणारी लहान पोरं ह्या सगळ्यावर त्या अंगाऱ्याचा उतारा ठरलेला.
विशेष मानकरी असलेल्यांच्या घरी अंगणात चटई घालून त्याच्यावर पालखी खाली बसवून पूजा केली जाते, बाकी सगळ्यांकडे रस्त्यातच कवाडीसमोर उभे राहून पूजा घेतात.
आजच्या पहाटेपासून सुरु झालेला हा पालखीचा प्रवास आजचा संपूर्ण दिवस, आजची संपूर्ण रात्र सुरूच असतो. मध्यरात्रीनंतर साडेतीन चार च्या सुमारास सगळी ठरलेली घरं ठरलेल्या क्रमाने घेऊन झाली कि पालखीचा परतीचा प्रवास सुरु होतो, तेव्हाचा स्पीड अगदी अभूतपूर्व असतो. पहाटे उजाडायच्या अगोदर, पेट्रोम्याक्स बत्त्यांच्या उजेडात, वाद्यांच्या आता  अतिद्रुतगतीत वाजवलेल्या निनादात जवळपास धावत म्हणावे इतक्या जास्त वेगाने पालखी देवळाकडे निघते.
ह्या प्रथेमागे एक मजेदार दंतकथा ऐकली आहे. परतीच्या प्रवासात खाडीच्या किनाऱ्याने पालखी सातांब्याला जाते, त्याचप्रमाणे खाडीच्या पलीकडच्या किनाऱ्यावरच्या गावात असलेल्या 'खेम' नावाच्या देवाची पालखी सुद्धा परतीला लागलेली असते. जर खाडीच्या ह्या किनाऱ्यावर साताई आणि त्या किनाऱ्यावर खेम अश्या पालख्या एकावेळी समोरासमोर आल्या तर मग साताई आणि खेमाचे लग्न होईल, मग जर सासरी गेली तर आपली साताई आपल्याकडे कशी येऊ शकणार? म्हणून मग त्या खेमाच्या पालखीची वेळ टाळायची! कोणत्याही परिस्थितीत साताई सूर्योदयाच्या आत देवळात पोचलीच पाहिजे हा कडक संकेत ह्यासाठीच!
आता विचार करताना वाटतं कि हि दंतकथा म्हणजे हुशार पूर्वजांची टाईम मॅनेजमेंट आहे! नाहीतर पोरंटोरं इकडम् तिकडम् करत टाईमपास करत राहतील, होळीच्या सणाला घरची मुलं घरी पोचायला हवीत ना? म्हणून मग हा दंतकथेच्या मार्गाने नेमून दिलेला प्रोटोकॉल!! असंच असणार!
आता ह्या परतीच्या मार्गावर पहाटेच्या वेळेला मात्र खेळ्यांचा अवतार अगदी बदललेला असतो. सलग २५-३० तास न थांबता चालून दमलेले चेहेरे, घामानी, धुळीनी, आणि गुलालाच्या उधळणीने मळलेले कपडे, सूर्योदय होण्यापूर्वी देवतेला देवळात नेण्याच्या उद्दिष्टाने धावणारे, अडखळायला लागलेले अनवाणी पाय... भरीला सगळीकडे जमा झालेल्या नारळ, तांदुळाचे खांद्यावर घेतलेले बोजे...पण त्यांच्या आगमनाने वातावरणात भरलेली प्रसन्नता, आदल्या दिवसापेक्षा जराही कमी नसते...
हा परतीचा रस्ता आमच्या घरावरूनच जातो, त्यामुळे पुन्हा ते सुपरफास्ट ढाकुमाकुम ऐकू आलं कि कुणीही न उठवता आपोआपच साखरझोपेतून जाग येतेच येते. पुन्हा कवाडीत येऊन समोरून जाणाऱ्या पालखीला मनापासून हात जोडले जातात.  आणि तिठ्ठ्यावर पालखी वळून दिसेनाशी होईपर्यंत... दूरवर काळोखात दिसणारे पेट्रोमॅक्सचे तेजस्वी ठिपके दिसेनासे होईपर्यंत... परह्याच्या पुढे आमच्या होळीच्या पुढपर्यंत ऐकायला येणारा सुपरफास्ट ढाकुमाकूम आवाज बारीक बारीक होत ऐकू यायचा थांबेपर्यंत.... पाय जागचे हलत नाहीत...

No comments:

Post a Comment