22 April, 2015

भाग २
मी केलेली हापूसची कलमे
गेल्या वर्षी एकदा आंबे काढणीच्या दिवसात, संध्याकाळी, वाड्याच्या भिंतीला टेकून उभं राहून खाली बघितलं, आडवे तिडवे हात पसरून वर्षानुवर्ष उन पाऊस झेलत असलेली हि अजस्त्र कलम. लांब सावल्या पडल्यामुळे अजूनच मोठमोठी दिसत होती. कुणी लावली असतील? आजोबांच्या पण आठवणीच्या अगोदर. ह्या झाडांकडे आठवणी आहेत तेवढ्या आजघडीला दुसऱ्या कुणाकडे नाहीत, पण त्या आपल्याला कळणार नाहीत कधीच. तिसरी पिढी इथे आल्याच बघून ह्या कलमांना काय वाटत असेल? कौतुक वाटत असेल कि आयते आंबे न्यायला आले असं वाटत असेल? एक एक विचार मनात येत गेले. काळोख पडत चाललेला आणि समोर शतकभराची साक्षीदार असलेली कलम. सर्रकन काटाच आला एकदम. आपणही जमतील तशी कलम लावायला हवीत असा विचार पण चमकून गेला मनात.
आणि मग पावसाळा सुरु झाल्यावर कलमं भरायची मोहीम सुरु केली. लहानपणी गावातले काकालोक प्रचंड प्रमाणावर कलमं भरायचे ते आठवल, पण ताडपत्रीची शेड आणि त्यात ठेवलेली कलमं ह्याशिवाय डोळ्यासमोर काही येईना. म्हणजे कलमं भरायचं तंत्र आणि पद्धत आठवेना. तेव्हा अगदीच शाळकरी वयात ते काही एवढ बारकाईने बघितलेलं पण नव्हतं.
आंब्याची बाठ मातीत टाकून दिल्यावर त्यातून रोप रुजत, त्याला मोठेपणी जे आंबे येतात, ते मुळच्या जातीचे नसतात. ते सगळे रायवळ. वेगवेगळ्या चवींचे. विशिष्ठ जातीच्या आंब्याचे झाड बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या अनेक पद्धतींपैकी एक म्हणजे स्टोन ग्राफटिंग. त्याला बोलीभाषेत कलमे भरणे असे म्हटले जाते. आंब्याच्या रोपावर(माड्यावर) हव्या त्या जातीच्या आंब्याची फांदी(खुंटी) जोडली कि त्या झाडाला येणारे आंबे हे खुंटी ज्या झाडाची आहे तसेच होतात.
आंब्यांचा अख्खा सिझनभर टाकलेल्या बाठा पाऊस पडल्यावर रुजायला लागल्या. कोवळे आणि मऊ तांबूस रंगाचे कोंब बाठीतून वर डोकावले आणि बघता बघता वितभर उंचीचे माडे दिसायला लागले. जून जाड आणि टरटरीत डोळे असलेल्या चांगल्या खुंट्या. धारदार सुरी, ब्लेड, कोरी प्लास्टिकची पिशवी असं सगळ साहित्य जमा केलं. आणि सुरुवात केली. दुसऱ्याला कलम भरताना बघताना ते जितक सोप वाटत तितकं ते सोप नाही ह्याची जाणीव पहिल्या दोन तीन प्रयत्नात झाली. कधी चीर तिरकी पडून माडा फुकट जायचा तर कधी तासून तासून खुंटी संपूनच जायची. कधी गाठ सैल पडून कलम ताठच राहीना.
हि सगळी धडपड बघून दीपकदादाला दया आली बहुतेक, आणि म्हणाला मी दाखवतो ते बघ नीट एकदा. कमीतकमी हालचाल करत आणि माडा, खुंटीला कमीतकमी हाताळत त्याने सफाईने कलम भरले ते इतके झटकन कि काही कळायच्या आत! अमुक नंबरला अमक्याचा नंबर मेसेजने पाठवायचा कसा ते दाखव असं बाबांनी म्हटल्यावर, मी फटाफट बटण दाबून तो मेसेज पाठवून पण दिला, तेव्हा बाबा वैतागून म्हणाले, “अगो जरा सावकाश दाखवा हा. भरभर बटण दाबून काय करता ते कळतसुद्धा नाही” तेव्हा त्यांना कस वाटत असेल ते मला आत्ता कळल.
नंतर प्रयत्न आणि निरीक्षणाने हळूहळू जमायला लागल. वितभर उंच माडा, बाठीसकट, बऱ्यापैकी जाड झालेला, पण कोवळा, तांबूस रंगाची जागा हिरवा रंग घेण्याच्या आधी, असा निवडून धारदार ब्लेडनी सपकन अर्ध्यात कापला कि हातावर चिकाची बारीकशी चिळकांडी उडते. पालवीचा भाग टाकून देऊन बाठीकडच्या भागाला बरोबर मध्यावर उभा छेद देताना सुरुवातीला भयंकर तारांबळ उडायची. नंतर खुंटीला खालच्या बाजूने सुरीने तासून निमुळता पण चपटा आणि टोकेरी आकार दिला कि शाळेतल्या सवयीप्रमाणे पेन्सिल तासल्यावर जस हातावर टोचून टोक तपासायचो, तसा तासलेल्या खुंटीला हात लावायचा हटकून मोह व्हायचा. तो टाळायचा. कारण आपल्या हाताने इन्फेक्शन झाल तर कलम जगत नाही. तासलेली खुंटी उभ्या चिरलेल्या माड्यात अलगद अडकवून प्लास्टिकच्या पिशवीची पट्टी कापून घट्ट बांधून टाकायची. पिशवीत माती भरून त्यात कलम लावायचं. सांधा होतो त्याला पाणी लागू न देता फुलपात्राने  अलगद पाणी घालायचं. आडोश्याला, उन पाऊस लागणार नाही असं ठेवायचं.
एकदा तंत्र जमल आणि मग वेडच लागलं. सारखा तोच उद्योग. पण खरी चिंता पुढेच होती. हि कलम जगतात का नाही हे बघण्याची. रोज सकाळी उठल कि दात घासता घासताच कलमांच निरिक्षण. पहिले चार पाच दिवस झाले तरी काही ढिम्म लक्षण दिसेना तेव्हा निराशाच वाटायला लागली, पण अजून एक दोन दिवसांनी बघितलं तर खुंटीच्या डोळ्यातून एक पोपटी रंगाचा थेंब दिसायला लागला होता, पूर्णविराम असतो तितका बारीक. आश्चर्य, आनंद, उत्सुकता, काळजी, असं सगळ एकदमच वाटायला लागलं. परवापर्यंत हा माडा आगरात होता, आणि खुंटी ४ किमीवर असलेल्या एका प्रचंड मोठ्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर. नुसतं प्लास्टिकच्या पिशवीने त्यांना एकत्र बांधायला आपण निमित्त झालो, आणि आता एक नवीन हापूसच झाड तयार होतंय. मातीतून मिळणारा जीवनरस त्या माड्यामार्फत खुंटीच्या टोकापर्यंत पोचला होता. पुढच्या २-३ दिवसात त्या पूर्णविरामाएवढ्या पोपटी थेंबाची जागा लुसलुशीत पानांनी घेतली. बघता बघता त्या पानांचा रंग गुलाबी, तांबूस, मातकट, पोपटी, हिरवा, कळपट हिरवा असा बदलत गेला. दोन तीन आठवड्यात उंची आणि पानांची संख्या वाढली.
आता त्या कलमांना मोकळ्या आकाशाखाली, उन पाऊस दिसायला पाहिजे, त्यामुळे सगळ्याची रवानगी अंगणात झाली. रांगेने ५०-६०  कलम मांडून ठेवल्यावर, शेजारची मेघनाकाकू कौतुकाने म्हणाली,”ऐश्वर्या कपौंड झकास झालाय हो तुझ” तेव्हा जाम म्हणजे जामच भारी वाटल!

धो धो पावसाच्या धारा झेलताना, जी दुर्बल होती त्यांनी तिथेच राम म्हटला. बाकीची जोरात वाढायला लागली. पूर्ण एक वर्ष त्यांना पाणी लागेल असं बघून पुढचा पाऊस आला (यंदाचा) तेव्हा काही कलम तर कंबरभर उंचीची झालेली. लगेच त्यातली काही प्लेजरवर घेतली, कमपोंडात नेली, आणि खड्डे खणून लागवड झाली सुद्धा! आजोबांच्या कलमांसमोर हि कलम म्हणजे अगदी आजोबांचं बोट धरून चालायला शिकणारी मीच वाटत होते मलाच. ह्या कलमांकडे बघताना अगदी वाकून बघायला लागतंय, काही वर्षांनी मान उंच करून बघव लागेल, आजोबांच्या कलमांसारखीच हि पण कलम मोठी मोठी होतील. त्यांच्यावर चढायला पण कसबी मनुष्य लागतील. मग तेव्हा मी ह्या जगात असेन किंवा नसेन, पण इतकी वर्ष जे भरमसाठ आंबे खाल्ले त्याची परतफेड निसर्गाला आपण काही अंशी तरी करत आहोत ह्याच समाधान झाल. बुंध्यात हाताने माती चेपताना मनात म्हटलं, लवकर आणि भरपूर लागायला लागा रे बाबानो.

No comments:

Post a Comment