02 April, 2015

कोकडकोंबडा आणि मुंगुस


लहानपणापासून कायम ऐकलेलं कि मुंगुस किंवा कोकडकोंबडा (म्हणजे ज्याला छापील भाषेत भारद्वाज म्हणतात तो) दिसण हे अगदी चांगल. म्हणजे तो दिवस आता अगदी मस्त असणार. काहीही संबंध नाही, पण मला खरोखरच बऱ्याच वेळा ह्या दोन्ही प्राण्याच्या बाबतीत असा अनुभव आलाय. अर्थात मुंगुस किंवा कोकडकोंबडा दिसल्यानंतर पूर्ण दिवस चांगला जाणे किंवा काहीतरी चांगले घडणे, ह्यातील ‘चांगले’ हि संकल्पना वयोपरत्वे बदलत असते.
घरचा अभ्यास पूर्ण झालेला नसताना, आता वर्गात काय होईल हि भीती मनात घेऊन शाळेत निघावं, रस्त्यात अगदी आपल्याकडे बघतच असलेल मुंगुस दिसावं, आणि नेमका तो घरच्या अभ्यासाच्या विषयाचा तास ऑफ मिळावा, कि झालाच तो दिवस अगदी चांगला. इथून सुरुवात झाली. दिवसभर मरमर कष्ट करून पण किती कमी पैसे मिळतात, कसा आणि कधी वाढेल आपला उद्योग हा विचार घेऊन नैराश्याच्या गर्तेत जायला निघावं, त्या विचारात असतानाच माडाच्या झापावर ऐटीत बसलेला कोकडकोंबडा आवाज करून लक्ष वेधून घ्यावा, काही वेळातच ४-५ बायकांचं एक टोळकं घरात प्रवेश कराव आणि “वारली पेंटिंगवाली ड्रेस मटेरियल तुमच्याकडेच मिळतात ना? आम्हाला ती अमकी तमकी म्हणाली, तिने परवा ड्रेस घातलेला तुमच्याकडचा इतका आवडला आम्हाला” वगेरे म्हणत फटाफट खरेदी करून टाकावी. इथपर्यंत ह्या काहीतरी चांगलं घडण्याचा प्रवास होत आलाय.
योगायोग अंधश्रद्धा काय असेल ते असो, पण एक मात्र नक्की, कि मुंगुस किंवा कोकडकोंबडा दिसलेल्या प्रत्येक दिवशी काही चांगल घडेल किंवा नाही, तरी ह्या दोघांपैकी कुणी दर्शन दिल कि त्या क्षणी तरी अगदी मस्तच वाटतं. गंमत म्हणजे जेव्हा अगदी कंटाळवाणा, निराश, उदास, भकास, इत्यादी प्रकारचा काळ असतो तेव्हा नेमकी सगळी मुंगस आणि कोकडकोंबडे कुठे गायब झालेले असतात कोण जाणे! एकंदरीत काय तर वैतागलेल्या मनस्थितीतून बाहेर पडायला काहीतरी कारण म्हणजे कोकडकोंबडा किंवा मुंगुस.
असा विचार करता करता अचानक लक्षात आल असे कोकडकोंबडे आणि मुंगस बरीच असतात. ज्यांच्या आगमनाने किंवा चाहुलीने जाम भारी वाटत किंवा निदान नैराश्य मरगळ ह्याचा तात्पुरता तरी विसर पडतो.
कॉलेजला असताना एकदा फेब्रुवारी मध्ये पुणे दापोली एसटी पकडली रात्री १० नंतर पुण्याबाहेर पडल्यावर थंडीने कुडकुडून सगळ्या लोकांनी काचा बंद केलेल्या. मध्येच जाग आल्यावर कुठे आलोय ते बघाव म्हणून काच उघडली आणि आंब्याच्या मोहोराचा बेफाट वास नाकात शिरला, तेव्हा कळल दापोली जवळ आली, घर जवळ आल, आणि आंब्याचा सीझन पण जवळ आला. एकदम तरतरीत! तेव्हा खाडीवर पूल नव्हता. मी येणार हे घरी माहिती नव्हत. तरीने(होडी) खाडी ओलांडून आल्यावर आता ब्यागा घेऊन घरापर्यंत दीड दोन किमी चालायचं हा विचार करतानाच संदीप दिसला कोकडकोंबड्यासारखा! पहाटे पहिली एसटी पकडून पहिल्या लेक्चरला पोचायला निघालेला, म्हणाला माझी सायकल ने, दुपारपर्यंत आणून ठेव परत.
असे कितीतरी कोकडकोंबडे लोक आणि क्षण. रात्रभर धोधो पाऊस पडल्यावर सकाळी धारोधार भरलेली विहीर, आणि तासंतास पोहोणं.. कित्येक दिवस प्रयत्न केल्यानंतर सायकल दामटत न थांबता चढलेला सावण्याच्या पुळणीजवळचा चढ.. स्वतः तयार केलेल्या आकाशकंदिलाच्या वाऱ्याबरोबर हलणाऱ्या झिरमिळ्या.. शिवरात्रीच्या उत्सवात जीव खाऊन फुंकलेल्या शंखांचा नाद.. होळीच्या पहाटे परतीच्या प्रवासाला लागलेली साताई देवीची पालखी.. मनात चाललेल्या विचाराच तंतोतंत वर्णन करणारं आवडीच गाणं.. लाईट गेल्यावर मिट्ट काळोखात झोपाळयावर बसून म्हटलेल्या कविता.. पावसाळ्याच्या सुरुवातीला काजव्यांनी भरून गेलेली झाडं.. हि सगळी माझी मुंगस.. !
काय कराव आता अश्या विवंचनेत असताना नेमका आलेला अमृताचा फोन.. खऱ्या मैत्रीला जगणारे मित्र मैत्रिणी, फेसबुकमुळे वेव्ह्लेग्थ जुळून मारलेल्या गप्पा आणि मिळालेली मैत्री.. माझीसुद्धा मुलगीच आहेस तू असं म्हणणारी मावशी.. “गावात आता लोक मला तुझी आत्या म्हणून ओळखायला लागले” असं म्हणताना खुश होणारी आत्या.. जावायाची पोरं आल्येत त्यांना करा काहीतरी खाऊ असं म्हणणारे भाऊ(आजोबा), एवढ मोठ झाल्यावर पण लहानपणीसारखेच लाड करणारे मामा.. भरपूर काम केल्यावर दमलीस बाळा असं म्हणून स्वतः चहा करून देणारे बाबा.. काही न सांगता मनातले विचार ओळखणारी आई.. आणि भांडण आणि अबोला झाल्यावर मी सोर्री बिट्टू म्हणायच्या क्षणालाच सोर्री दिदू म्हणणारा भाऊ..
हे माझे सगळे कोकडकोंबडे!..काही सहज भेटणारे,, काही वाट बघायला लावून मग भेटणारे..

No comments:

Post a Comment