19 April, 2015

भाग १ 
आमच्या कलामांच्या बागेशी निगडीत असलेल्या माझ्या आठवणी तीन वर्षे वयापासुनच्या आहेत. तेव्हा घरापासून तिथपर्यंत जायचं तर तीन चार किमी. चालत जाणे हा एकच मार्ग होता. घरातून बाहेर पडल कि लगेचच जी चढण सुरु व्हायची ती शेवटपर्यंत. त्यामुळे चालताना दम लागला कि बाबा कडेवर बसवून घेऊन जायचे. एखाद्या सहलीला निघाल्यासारखा खाऊचा डबा बरोबर घेतलेला असायचा. वरती पोचल कि आधी तो खाऊ खाणे. मग ‘कोल्ह्याच्या पाण्यावर’ जाऊन पाणी पिणे असा कार्यक्रम असायचा. मग बाबांना सगळीकडे फिरून कलमांकडे लक्ष द्यायचं असायचं, आणि आमचं त्राण आधीच संपलेलं असल्यामुळे तिथे वाड्यातच देवजी नानाच्या इथे मला आणि आदितला बसवून बाबा त्यांची काम करायला जायचे. परत येताना बोरं, चिंचा, आवळे, बिया, कोकम, फणस, बिब्बे, हरडे, उंड्या, लिंब, रामफळ ह्यातील ज्याच सिझन असेल ते घरी घेऊन जायचं. आंबे काढणी हा एक स्वतंत्र सोहळा!
हि कलमांची बाग आजोबांच्या अति जिव्हाळ्याची, कारण त्यांनी स्वतः ती घेतलेली. पहिल्यापासूनच त्या जागेला कमपोंड असं नाव पडल! म्हणजे कम्पाउंड. घेतली तेव्हाच त्यातील काही कलमे ५०-६० वर्षाची होती म्हणतात. म्हणजे आज त्याचं वय नक्कीच १०० च्या वर आहे. शिवाय प्रत्यक्ष ज्यापासून काही आर्थिक फायदा होत नाही पण उपयुक्त अशी वड, कळकी, आईन, यासारखी झाडं चिक्कार असल्याने दिवसासुद्धा घनदाटपणा असतो. त्याकाळी झाडं तोडणे म्हणजे डेव्हलपमेंट हि संकल्पना उगवलेली नव्हती. जमीन एका लेव्हलची नाही तर सतत चढ उतार असल्यामुळे सगळा भाग नजरेच्या टप्प्यात येत नाही आणि जास्तच गूढ वाटत. रात्रीच्या वेळी बाऊळ, रानडुक्कर ह्यांचा नेहेमी आणि क्वचित बिबट्याचा वावर चालतो. काळाबरोबर काहीकाही बदल झाले, बऱ्यापैकी अंतरापर्यंत कशीबशी तरी गाडी जाईल असा रस्ता झाला. मोठे झाल्यामुळे कुणाच्याही सोबतीशिवाय एकटच तिथे जाणं हि नेहेमीची गोष्ट झाली.
पावसाळ्यात अनावश्यक रान भयंकर माजत आणि धो धो धो पडणाऱ्या पावसाच्या घनघोर आवाजात सगळ कमपोंड किर्रर्र झालेलं असतं. आधीच पावसाची काळोखी, त्यात वाढलेलं रान. माजत चाललेल्या वेली आणि झुडपं कलमांना वेढून टाकतात, आणि मग सुरु होतो रान तोडणीचा कार्यक्रम. कोल्ह्याच पाणी धोधो वाहायला लागतं. सगळीकडे बारीक बारीक प्रवाह असतात त्यांना ओलांडत कमपोंडात शिरलं, कि कुठल्या भागात काम सुरु आहे हे कळण्यासाठी हुऊऊउ अश्यासारखा आवाज करायचा, प्रत्युत्तर आल कि त्या रोखानी जायचं. आईबरोबर गेल असेल तर काम करणाऱ्या सगळ्यांसाठी आई गोळ्या, किंवा काहीतरी खाऊ देते.
ह्या आमच्या कमपोंडाला लागुनच ग्रामदेवतेच देऊळ आहे. दगडांनी बांधलेल्या सुबक पाखाडीवरून चढून गेल कि घनदाट झाडीत कौलारू दगडी देऊळ दिसत. रायवळ आंबे, कोकम, बकुळ, सुरंगी, अश्यांच्या अजस्त्र वृक्षानी अक्षरशः वेढलेलं. यायच्या जायच्या वाटेला अगदी लागून असलेल भुवन. म्हणजे नागाच वारूळ. रान तोडणी, गवत काढणी, आंबे काढणी ह्या सगळ्याला सुरुवात करताना, ग्रामदेवतेला नारळ न चुकता देणे ह्याच्यावर सगळ्याचा कटाक्ष असतो.
उन्हाळा जवळ आला कि सगळ्या वातावरणाला कायमचाच एक सुगंध व्यापून टाकतो. आठवणीतल्या कवितांमधल्या कवी माधव यांच्या ‘कोकणवर्णन’ ह्या कवितेच्या ओळी प्रत्यक्षात दिसायला लागतात. आंब्याने चिंचेवर सावली धरली म्हणून कोपलेली रातांबी(कोकम), नवयुवतींच्या कोमल गालांसारखे काजू, रानोरानी पिकलेली करवंदे-तोरणे, भुळूभूळू फळे गाळणाऱ्या जांभळी, आणि पोटात साखरगोटे आणि बाहेरून कंटक घेऊन झुलणारा पुरातन रहिवासी फणस. ह्या सगळ्याच्या लोभाने सगळ्याच झाडावर झोके घेणारे वांदर.
हाच उन्हाळा माणसांना निरुत्साही बनवतो म्हणतात, पण इथे घरोघरी सगळ्यांच्याच कार्यक्षमतेत अचानक इतकी वाढ होते कशी हे एक कोडंच आहे. दिवस उगवतो केव्हा आणि भरभर काम उरकताना संपतो केव्हा ते काळातच नाही. बारीक बारीक कैऱ्या दिसायला लागल्यापासूनच कमपोंडातल्या खेपा वाढतात. चोर, माकडं, नैसर्गिक अडचणी ह्यातून पार पडून आंबे उतरवून झाले पाहिजेत हाच विचार. गेल्या वर्षी एकदा आंबे काढणीच्या दिवसात, संध्याकाळी, वाड्याच्या भिंतीला टेकून उभं राहून खाली बघितलं, आडवे तिडवे हात पसरून वर्षानुवर्ष उन पाऊस झेलत असलेली हि अजस्त्र कलम. लांब सावल्या पडल्यामुळे अजूनच मोठमोठी दिसत होती. कुणी लावली असतील? आजोबांच्या पण आठवणीच्या अगोदर. ह्या झाडांकडे आठवणी आहेत तेवढ्या आजघडीला दुसऱ्या कुणाकडे नाहीत, पण त्या आपल्याला कळणार नाहीत कधीच. आत्ता तिसरी पिढी इथे आल्याच बघून ह्या कलमांना काय वाटत असेल? कौतुक वाटत असेल कि आयते आंबे न्यायला आले असं वाटत असेल? एक एक विचार मनात येत गेले. काळोख पडत चाललेला आणि समोर शतकभराची साक्षीदार असलेली कलम. सर्रकन काटाच आला एकदम. आपणही जमतील तशी कलम लावायला हवीत असा विचार पण चमकून गेला मनात.

सिझन संपत असताना झाडबाकी झाली, आणि शेवटचे आंबे घरी आणायचे होते. योगायोगाने आत्या आलेली होती. मी निघाल्यावर म्हणाली चल ग मी पण येते, मग तिच्याच गाडीने आम्ही आंबे आणायला गेलो. क्रेट गाडीत ठेवले आणि देवळात जायला म्हणून पाखाडी चढून वर गेलो. गणपती विसर्जनाच्या नंतर जसं उदास वाटत, तसच वाटत होत, देवळाजवळ पोचलो आणि दाराची कडी काढून आता शिरणार तोच आत कसली तरी चाहूल लागली. देवतांच्या दगडी मूर्तींच्या मागून एक लांबलचक जनावर देवळाची भिंत चढून देवळाबाहेर गेलं. तिथे बाजूला काढून ठेवलेल्या घंटांना त्याचा धक्का लागला आणि एक बारीकसा नाद काही क्षण जाणवत राहिला. जागेवरच थांबून आम्ही त्याच्याकडे बघत राहिलो होतो, ते पुढे जाऊन देवाला नमस्कार केला आणि शांतपणे पाखाडी उतरलो. पुढच्या सिझन पर्यंत आणि कायमच दरवर्षीच हा राखण्या आपल्या कंपोडाची राखण करील, असा शांत विचार मनात घेऊन घरी येण्यासाठी गाडीत बसलो.
©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे@मुर्डी

2 comments: