02 April, 2015

माझं एकमेव व्यसन

एक वर्ष बंद केलेला चहा प्यायला सुरुवात केली, आणि चहाबद्दलच्या आठवणी आठवल्या. असं म्हणतात कि आपल्या जवळची व्यक्ती गेल्यावर अशी एखादी गोष्ट वर्ज्य करावी कि ज्यामुळे त्या व्यक्तीची रोज आठवण होईल. काही जण असं पण म्हणतात कि त्या व्यक्तीला आवडणारी गोष्ट आपण वर्ज्य करायची. गुरुजी जन्मशताब्दीच्या वेळी संघाचे कुणीतरी काका म्हणत होते कि गुरुजीना आवडायचा म्हणून मी चहा सोडलाय, त्यावर एक मित्र “चहा”टळ पणे म्हणाला होता “गुरुजीना आवडायची म्हणून मी शाखा सोडली आहे”
जे काय असेल ते असो, मी आजोबांसाठी चहा सोडला होता. त्यांना आवडणारा हे तर आहेच, पण मला हे बघायचं होत कि मी चहा शिवाय राहू शकते का? म्हणजे चहा पिणे टाळायचे म्हणजे आजोबांची आठवण रोज आलीच.
कोणे एके काळी तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीचा भाग म्हणून चहा पिणे हे देशद्रोहाचे लक्षण मानले जायचे. त्याच काळात बहुतेक चहाला “व्यसन” म्हणजे पर्यायाने वाईट गोष्ट समजले जात असणार. नंतर ह्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलले तरीही लहान मुलांनी चहा पिऊ नये हा कायदा होताच. एकंदरीत चहा वाईट असतो हे पटवून देण्यासाठी; चहा पिऊन पिऊन माणूस काळा होतो, एकदा चहाच्या आहारी गेलं कि मग चहा शिवाय पान हलत नाही, आणि वेळेवर चहा मिळाला नाही तर लोकांची डोकी दुखतात इथपर्यंत वाट्टेल ती विधाने मोठी माणसे करत असायची! म्हणूनच कि काय कोण जाणे पण माझी आई आणि मावशी ह्यांनी अजून चहाची चव सुद्धा घेतलेली नाही. त्या दोघी कॉफी टीम मध्ये! साहजिकच मी चहा पिऊ नये असेच माझ्या आईचे पूर्वी मत होते, आणि इयत्ता सहावीपर्यंत मीही चहाला स्पर्श केला नव्हता.
ह्याच्या अगदी उलट म्हणजे बाबा दिवसाला असंख्य कप चहा पीत असतात. आजी तर रागारागाने बाबांना म्हणायची “उद्यापासून मी एक कळशीभर चहा करून ठेवणारे.. त्यात कप बुचकळून भरून घ्यायचा आणि प्यायचा. माझ्या कामात लुडबुड करून एकसारखा चहा करायला सांगत जाऊ नकोस”
आजोबा सांगायचे, चहा प्यायला हवा, कारण आपण कोणाच्या घरी गेलो तर चहा हे सगळ्या थरातल्या लोकांचे पेय आहे, त्यामुळे तेच आपण पीत असू तर आपले आतिथ्य करणे समोरच्याला अडचणीचे वाटत नाही. हीच गोष्ट प्रत्यक्षात घडली आणि माझी चहाशी पहिली ओळख झाली. सहावीत असताना एका मैत्रिणीच्या घरी तिची आई चहा पिण्याचा अतिआग्रह करत होती, आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन असणं शक्य नाही हे तेव्हाही मला स्पष्ट कळत होतं. शिवाय जर अट्टहासाने नको म्हटलं तर मी ब्राह्मण असल्याने तिच्या घरी काही घेत नाहीये असा गैरसमज सहजगत्या तेव्हा तरी नक्कीच झाला असता, आणि ते मला कुठल्याही परीस्थित नको होतं. त्यामुळे “पण अगदी अर्धा कपच दे काय” असं म्हणत कबुल झाले. मनात हजारो वेळा आईला सॉरी म्हटलं, आणि अर्धा कप कोरा गोड चहा नॉर्मल हावभाव करत पिऊन टाकला. घरी आईला भीत भीत सगळ सांगितलं पण मला वाटल होतं तशी आई रागावली वगेरे मुळीच नाही.
त्यानंतर फक्त अश्याच प्रसंगात चहा प्यायला काही वाटेनासं झालं.
अकरावीला पुण्याला गेल्यावर रोज सकाळी चहा प्यायची सवय लागली ती मात्र कायमची. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना चहाची खरी किंमत कळली. दिवसभर कॉलेजमध्ये राब राब राबून झाल्यावर मग रूमवर जायच्या आधी टपरीवरच्या चहाच्या एकेका घोटाबरोबर दमलेला मेंदू तरतरीत होताना जाणवला कि कळायचं कि चहाला उत्तेजक पेय म्हणतात म्हणजे नक्की काय ते.
अश्याप्रकारे पुणे सोडून परत घरी येईपर्यंत मी पूर्ण चहाबाज झालेली होते. बाहेर राहत असताना साहजिकच घरासारखे खाण्यापिण्याचे नखरे चालत नाहीत, आणि मग ज्या ज्या खाद्य वस्तू आहेत त्या न कुरकुरता खाण्याची सवय लागून जाते, खास आवडी निवडी अश्या उरतच नाहीत. पण घरी परत आल्यावर निराश्या दुधाचा चहा हा मात्र अगदी विकपॉइंट बनला. संध्याकाळी सगळी काम आटपली, घरचे सगळेजण घरी आले, कि निराश्या दुधाचा फेसाळ गोड चहा सगळ्यांनी एकत्र पिणे, त्याबरोबर दिवसभराच्या घडामोडी एकमेकांना सांगणे, आणि त्यावेळेला देवासमोरचे निरांजन, उदबत्तीचा वास, घरभर पसरलेला धुपयुक्त धूर हा संपूर्ण दिवसात माझ्या अगदी आवडीचा क्षण.. रोज अनुभवण्याचा..
आमच्या मुर्डीमध्ये तर जणू काही आपले अधिकृत राष्ट्रीय पेय असल्याच्या भक्तिभावाने सगळेजण चहा पितात, आणि लोकांना पाजतात.
ह्या सगळ्या चित्रात आता आजोबा नाहीत, तेव्हा चहा सोडायचा प्रयोग केला, आणि खरोखरच वर्षभरात एकदाही चहा प्यायला नाही. डोकेदुखी, रेस्टलेसपणा असल्या काहीही प्रकारांशिवाय निश्चय पार पडला. ज्यासाठी मुळात चहा प्यायला सुरुवात केली त्याच्यासारखे सामाजिक अडचणीचे प्रसंग क्वचित आले, पण आजोबांसाठी चहा पीत नाही हे कारण पुरेसं संयुक्तिक वाटल्याने कुणी फोर्स केला नाही. एका वर्षानंतर मी पुन्हा चहावाल्यांच्या गोटात प्रवेश केला आहे, माझ हे एकमेव व्यसन पूर्णपणे माझ्या ताब्यात आहे ह्या खात्रीसह!

No comments:

Post a Comment