दीड वाजता सुटणारी दापोली-मुंबई, फलाट क्रमांक 7 वर लावण्यात आली आहे, चालक आणि वाहकांनी 'आपली' गाडी मार्गस्थ करावी..
खरखरीत आवाजात सूचना मिळते, चालक वाहक गाडीकडे येतात.. आतल्या आणि बाहेरच्या लोकांमध्ये अच्छा-टाटा-बाय ची देवाणघेवाण होते.
"बाबू, सांभालून आस हां, जा सावकास, फोन लाव!!"
किंवा
"गाडी सुटली रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओले!!"
वगैरे सोपस्कार पार पडतात.. आणि डबल बेल मारली जाते, गाडी सुटते...
तोपर्यंत, दत्ताचे देऊळ आणि पार्किंग ह्याच्या मधल्या गेटात उभी असलेली 'दापोली-पुणे-पिंपरीचिंचवड' सरसावून पुढे येते..त्याच फलाट क्रमांक 7 वर उभी राहते.. हेच चक्र पुनःपुन्हा सुरु राहते...
ह्याच चक्राचा चकचकीत अवतार काल रात्रीच्या काळोखात लांबवरून बघितला.. दिव्यांनी लखलखलेल्या मुंबईत.
नजर पोचेल तिथपर्यंत असंख्य चमचमणारे दिवे, त्यात हवेत अधांतरी तरंगणारे दोन दिवे.. अगदी चारचौघात वेगळे उठून दिसणारे, बाकीच्यांपासून अंतर राखून असलेले..
तेवढ्यात जमिनीवरचा एक दिवा सुसाट वेगाने पळत सुटला.. पळता पळता एकदम उंच उसळून झुम्पकन वर उठला, तर्राट वेगाने उडत उडत उंच उंच निघाला...
मग लगेच हवेत तरंगणारा एक दिवा उडत उडत खाली उतरला, जमिनीवरच्या असंख्य दिव्यांमध्ये मिसळून गेला....
हाच खेळ दर काही मिनिटांनी सारखा सुरूच!
एरव्ही कधीतरी क्वचित, दूरवरून, अगदी छोटंसं दिसणारं विमान-- इतक्या वारंवार, इतक्या जवळून, इतकं अवाढव्य बघणं म्हणजे गंमत आहे खरी खास!!
"अहा काय शोभा वदू त्या क्षणांची..
तती त्यावरी शोभली दिपिकांची.."
हे लिहिताना कवीला आता दूर राहिलेल्या बालपणी अनुभवलेल्या नर्मदेच्या पात्राची आठवण होत होती..
इथे विलेपार्ले मुक्कामी हि विमानांची शोभा बघताना मुर्डीच्या रस्त्याची खूप खूप आठवण आली. चार पाच खांबांवरच्या मिणमिणत्या दिव्यांनी रात्रीच्या वेळी उजळलेला आमच्या मुर्डीचा रस्ता.. तो मिणमिण उजेड मनाचा कानाकोपरा उजळवून टाकतो..
इथे क्षितीजापर्यंत झगमगलेलं आकाश बघून एकदम काळोख भरून आला मनात...
विचारांचं विमान सर्रर्रकन जमिनीवर आलं..
आठवडा झाला मुंबईत येऊन, आता घर दिसायला लागलं.. मुर्डी दिसायला लागली!!
©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे.
No comments:
Post a Comment