11 October, 2016

शस्त्रपूजन

नवरात्र संपले, दसरा उजाडला..
आमचा बाप आदितला म्हणाला..
उठ अरे उठ, अजून झोपलास काय..
दसरा आहे माहिती नाही कि काय..

मग नेहेमीप्रमाणे "पाचच मिनिटं" असं पुटपुटत परत झोपत थोड्यावेळाने आदित उठला. आज लवकर आंघोळ आणि मग पूजा करून मग तू बाहेर पड, असे फर्मान त्याला मिळाले आणि आमचे फादर लवकरच कामासाठी बाहेर पडले.

आदितने स्वतःची आंघोळ फडफडवली, देवांना पण आंघोळ घातली, आणि मग शस्त्रपूजनासाठी शस्त्र गोळा करायला घरभर फिरू लागला..

दाभण, सुरी, कोयती, कुऱ्हाड, पिकाव, सिकॅटर, टिन-ओपनर, अडकित्ता, काठी, करवत हे सगळं सहजपणे ठरलेल्या जागी सापडलं.. ह्या सगळ्या वस्तू रोजच्या वापरात असतात, त्यामुळे काय प्रश्न नाही. मग कापडात गुंडाळून जपून ठेवलेली तलवार आणि बंदूक.. ह्या पण पाटावर स्थानापन्न झाल्या..

"हां!! कात्री राहिली.. दीदी, ए दीदी.. एक कात्री दे चल.."

अस्मादिक सध्या प्रदर्शनाच्या तयारीत असल्यामुळे भल्या पहाटेच आमचं सुईंगमशीन गरगरायला लागलेलं होतं. आता पूजा करून कात्री ठेवली कि ती दिवसभर वापरता कशी येईल, म्हणून मग मी आपली एक जुनी-पुराणी कात्री त्याला दिली..

तश्या तीन-चार कात्र्या वापरात आहेत.. कापड, स्पंज, रबरशीट, कागद वगैरे वेगवेगळ्या वस्तू कापायला वेगवेगळी कात्री वापरली कि धार जास्त टिकते, असा माझा समज आहे..

तर त्यातली सर्वात बोगस झालेली, एक्स्ट्रा, नावडती, कमी उपयोगाची अशी कात्री दिली पूजेत ठेवायला..

"हे काय तुझं? हे बरं आहे.. बेकार झालेली कात्री देत्येस होय पूजेत ठेवायला.. हि चांगली दे पितळेची आहे ती!" - आदित

"ह्या, ती नाही मिळणार, माझं काम ठप्प होईल इथे त्याचं काय.. शस्त्र हि पूजा करून ठेवण्यापेक्षा वापरली तर त्याचा सार्थ उपयोग!" - मी

"हो माहित्येय मोठी वर्कोहोलिक.. एक दिवस करायची पूजा.. त्यात नाही ती नाटकं तुझी! जरा देवाला तरी घाबर!!" - आदित

वगैरे प्रेमळ संवादांनंतर फायनली, तीच जुनी पुराणी कात्री पूजा करून घ्यायला पाटावर जाऊन बसली.. बाकीच्या ऍक्टिव्ह कात्र्या सटासट कामावर रुजू झाल्या..

नसे राऊळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी

अशी स्वतःची समजूत घालून, मनातला गिल्टीपणा झटकून बॅगा शिवायला सुरुवात केली!!

सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

©ऐश्वर्या अनिल विद्या पेंडसे.

No comments:

Post a Comment