मला माझा पहिला मोबाईल इयत्ता टी वाय बीएस्सी ला असताना मिळाला. आधी इयत्ता अकरावी ते एफवाय हि तीन वर्षं कॉलेजचे हॉस्टेल उर्फ तुरुंग हे आमचे वास्तव्यस्थान होते, तिथे मोबाईल वापरू नये हा कडक नियम होता. अधूनमधून झडती पण घेतली जायची. तेव्हा मग ज्यांच्याकडे मोबाईल होते त्या मुली स्पोर्ट्सशूजमध्ये, केस धुतल्यावर टॉवेलचा बुचडा बांधतात त्यात.. कुठेकुठे मोबाईल लपवायच्या. आमच्या घरच्या लोकांना नियम पाळायची फार आवड असल्याने हे थ्रिल अनुभवायचं राहून गेलं. असो.
नंतर एसवायला पेईंग गेस्ट असताना त्या काकूंच्या लँडलाईनवर फोन आल्यास बोलता येत असे, आणि आपल्याला करायचा झाल्यास केव्हापण एसटीडी करायला बाहेर जाता येत होते. मग मोबाईलची जरूर पडली नाही.
टीवायला दुसरीकडे पीजी असताना तिथे लँडलाईन तळ मजल्यावर आणि आम्ही चौथ्या मजल्यावर. आणि तोपर्यंत हे असे फोन येणं पण औटडेटेड झालं, मग एकदा बाबा पुण्याला आलेले असताना त्यांनी स्वतःहून,, मी न मागताच मला फोन घेऊन दिला.
मोबाईल मिळणं हेच मला इतकं अप्रूप होतं कि कोणता, कसा, वगैरे काही मतसुद्धा मांडायचं सुचलं नाही.
"आपल्याला त्यातलं काही कळत नाही ना, मिलिंदाला बरोबर घेऊन जायचं" म्हणून माझा पुण्यातला लोकल गार्डियन चुलत भाऊ मिलिंददादा आमच्यासोबत आला.
-- दुकानात --
बाबा: तुमच्याकडे स्वदेशी मोबाईल कुठला आहे?
दुकानदार: (चकलेले हावभाव) टाटा इंडिकॉम
बाबा: किंमत काय?
दुकानदार: ह्याची अमुक, त्याची तमुक ..... इत्यादी.
अशी बरीच चर्चा झाली. मग टाटांच्या हँडसेटमध्ये bsnl चे कार्ड असे होऊ शकत नाही हे जरा बाबांना पटत नव्हतं😂 तेव्हा ती cdma, gsm वगैरे भानगड मिलिंद दादाने समजावली.
मग पटलं एकदाचं आणि मग कागदपत्रांची चर्चा सुरु झाली.
दुकानदार: सिमकार्डासाठी असं असं घेऊन या.
बाबा: मिलिंदा, फोन तुझ्या नावावर घ्यायचा हो.(आपली पोरगी अगदी म्हणजे अगदीच हि असावी असा कायतरी डौट असणार😂)
मिलिंद दादा: अरे काका, असं काही नाही रे, तिला तिच्या स्वतःच्या नावाने फोन हवा असेल तर घेऊन दे कि.
मग बरीच भवतिनभवती होऊन मिलिंद दादाच्या नावावर तो फोन घ्यायचं ठरलं. सर्वात शेवटी काळा का सिल्व्हर? एवढा एकच प्रश्न माझ्यासाठी शिल्लक ठेवला गेला.
तो होता टाटा इंडिकॉमचा 'जेम' रंग सिल्व्हर आणि किंमत ₹९००/ मात्र!!!
भगव्या रंगाचा उजेड पडणारा, फक्त आणि फक्त फोन करणे, आलेले घेणे, एसेमेस करणे, आलेले वाचणे... बास!!!
बरोबर फक्त चार्जर... हँड्सफ्री नाही कि usb नाही कि काही नाही..
तेव्हा टाटा टू टाटा संपूर्ण फ्री होते. 30 रुपयात 1000 एसेमेस ची चंगळ होती!! अमृताकडे टाटांचा लँडलाईन होता तोही त्या टाटा टू टाटा फ्री मध्ये बसायचा.. मग आम्ही प्रचंड वापर केला ह्या स्कीमचा. गप्पा, अभ्यास, सगळं फोनवर!! नॉन टाटा धारी लोक्स म्हणायचे, तुमच्या ह्या करण्याने टाटा धुपतील तिकडे😜😂
माझ्या फोननंतर वर्षभरात घरी आईने पण टाटाचाच मोबाईल घेतला, तरीही ते t2t फ्री सुरूच होतं, मग काय!! मज्जाच!!
अधूनमधून टाटांकडून फोन यायचा😃😜😂 तुमचं नाव काय? व्यवसाय काय? पत्ता सांगा... फोन घेताना दिलेली कागदपत्र क्रॉसचेक करायचे ते. बहुतेक अतिरेकी वगैरे वापरत नाहीत ना ते बघायला असेल. दुसऱ्या कुठल्या कंपन्या हे उपद्व्याप करायच्या का ते माहिती नाही!!
पण टाटा ह्या नावाचा लौकिक ह्या फोनने सिद्ध केला माझ्या बाबतीती तरी. फसवणूक, छुप्या अटी लागू, सांगणं एक करणं दुसरंच वगैरे झंझट नव्हतं.
दरम्यान आमच्या गावात व्यवस्थित नेटवर्क मिळू लागलं, म्हणून घरात एक व बाहेर एक असे दोन फोन जरुरीचे झाले, मग दोनवर्ष माझ्याकडे असलेला माझा जेम, नंबरासकट घरी रवाना झाला.
मला बीएसएनएल चा नंबर व नोकियाचा हँडसेट घेऊन दिला गेला😍 अजून एक वर्षं पुण्यात काढणं बाकी होतं..
जेम घरी पण मस्तच चालत होता. एकदा मे महिन्यात जेम आमच्या पडवीत रायटिंग टेबलावर ठेवलेला होता. तिथून तो एका माणसाने चोरला. माणूस गडगंज.. पण फोन चोरला. योगायोग असा कि तो माणूस आमच्या अंगणातुन बाहेर गेला मात्र, मी फोन शोधायला लागले!!
आत्ता तर इथे होता.... लँडलाईनवरून रिंग दिली...
तो माणूस शेजारच्या घरासमोरून चालत जात होता,, मांडवावर मेघनाकाकू साठं सोडवत होती. तिच्या लक्षात आलं, ह्या *** *** ने मोबाईल कधी घेतला? आणि रिंगटोन सेम शेजारसारखा आहे...शंकर महादेवनचे ब्रेथलेस
एका सेकंदात सगळा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला.. तेजस, प्रणव आणि मी -- तिघेजण त्यांचा मोबाईल घेऊन सुसाट पाखाडी चढून मुर्डी फाट्यावर गेलो.. तिथे गाठला त्या चोरसाहेबाला..
"काका आत्ता तुम्ही आमच्याकडून निघालात तेव्हा माझा मोबाईल चुकून तुमच्या खिशात आला का??"
"छे गो बाय! मला मोबाईल येतच नाही चालवता!"
तेवढ्यात एक जीप आली आणि तिला रस्ता द्यायला आम्ही एका बाजूला नि चोर दुसऱ्या बाजूला झालो, मधून जीप निघून गेली.
परत विचारलं. तरी तेच उत्तर. मग जोश्यांच्या मोबाईलवरून रिंग दिली तर माझा जेम रस्त्याच्या कडेला कुंपणीत, काट्याकुट्यात- दगड धोंड्यात पडल्यापडल्या भगवा डिस्प्ले चमकवीत वाजताना दिसला!!! राकट देशा कणखर देशाचा स्वदेशी मोबाईल😍
ती जीप जाईपर्यंत त्याने तो कुंपणीत करवंदीच्या जाळीत भिरकावून दिला होता!😞😞😞
झटकन फोन उचलला, आणि चोराकडे बघितलं फक्त..
"मी नाही टाकलाय!! त्या अमुक ने टाकलाय" असं म्हणून त्याने अश्या एका व्यक्तीचं नाव घेतलं कि ज्या कुटुंबाशी आमचे गेल्या 4 पिढ्यांचे घरगुती संबंध आहेत, आणि तो अमुक त्या संपूर्ण दिवसात आमच्याकडे आलेला नव्हता!!
विजयी वीरांसारखे उधळत आम्ही घरी आलो तीघेजण... मी सांगितलंच त्या अमुक ला, कि तुझ्यावर आळ घालतोय तो..
मग काय गावकी भरली, साक्षी पुरावे झाले. चोराने अमुक ची माफी मागितली. स्वतःच्या सुपुत्रांकडून शिव्या खाल्या.. आमचा जेम मात्र पंचक्रोशीत फेमस झाला..
Very nice. I enjoyed every sentence. You write very well :) khup maja aali wachun
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDelete