******************************
3 वर्षांपूर्वीचा मे महिना, कॅनिंग ऐन रंगात आलेलं..
ठरलेलं टार्गेट, बुक झालेल्या ऑर्डर अश्या हिशोबाने आंबा खरेदी सुरु होती.
हाच सुट्टीचा आणि लग्नाचा सीझन म्हणून कामगार लोक खाडे करून करून नाकी नऊ आणत होते. लांबलांबच्या लग्नाला सुद्धा अख्ख्या वाडीची दिवसेंदिवस उपस्थिती, आणि शिवाय क्रिकेटचे सामने, गावकीच्या सत्यनारायण पूजा, मुंबईच्या पाहुणे मंडळींना समुद्रावर फिरायला नेणे अशी अनेक महत्वपूर्ण कारणं घेऊन लोक्स पसार झालेले.
आमच्याकडे वर्षानुवर्षे, कायमचे असलेले ठराविक लोक आणि आम्ही घरचे असे मिळून 12-14 लोक 40 लोकांचे काम उरापोटावरून उरकत होतो. नाशिवंत मालाचा प्रॉब्लेम हा कि आज नाही काम पूर्ण झालं तर उद्या करू हे शक्यच नाही. आंबे थोडे जरी अधिक झाले कि क्वालिटी बिघडते आणि मग टन भर आंबा कचऱ्यात टाकणे हाच पर्याय, ती वेळ येऊ नये म्हणून आमच्या 12-14 तास ड्युट्या सुरु होत्या.
वाढत्या उन्हाळ्यामुळे पाठोपाठच्या आढ्या झपाट्याने पिकत होत्या. सकाळी सहाला शटर वर करून जी धावाधाव सुरु,, ते रात्री आठच्या पुढे घरी येऊन चार घास पोटात ढकलून जरा डोळे मिटतात तोच परत पहाट होते असा प्रकार चाललेला..
एरवी सिमर ऑपरेटर म्हणून ज्याला फुटकळ कामांमधून सवलत मिळते तोही सुरी हातात घेऊन आंब्याची डेखं काढत होता, थोडक्यात प्रत्येकजण पडेल ते काम करत होता.. सिमर आणि बॉयलरवर आदित्य, आंब्याचा ट्रक खाली करायला बाबा आणि त्यांच्याच वयाचा एक सिनियर कामगार काका, एका दांडगट मुलीच्या(कामावर येणारी) मदतीने पल्पर चालवायला मी, असंख्य चहा-नाष्टा-जेवण हे झटकन उरकून टाकून अफाट धावाधाव करायला आई.. कोणीही कोणाचंही काम करत होता..
इतकंच कशाला, इंजिनियरिंग शिकणारे आमचे दोघे मावस आणि मामेभाऊ- कणाद आणि शंतनू- मुद्दाम कामासाठी येऊन राहिलेले आणि हमालीपासून वाट्टेल ते काम करत होते..
सगळ्यांवरच प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण होता. एक दिवस सुरळीत मावळला कि अंशतः हुश्श वाटत होतं..
अश्याच एका संध्याकाळी, दिवस मावळतीला लागल्यावर कॅनिंग संपले तेव्हा सगळ्यांच्या तंगड्या अक्षरशः गळ्यात आलेल्या होत्या आणि साली-बाठींचा ढीग (कचरा) कंपोस्ट खड्यात नेऊन टाकायच्या होत्या. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलंय तसं, "शीण जाण्यापूर्वी नव्हे, तर शीण येण्याच्या आतच" आम्ही झाडून सगळेजण एकेक तो कचऱ्याचा क्रेट डोक्यावर घेऊन मोहिमेवर सुटलो..
******************************
आमच्या मामा कातकऱ्यांच्या बिऱ्हाडात तेव्हा पाहुण्यांचं पूर आला होता. आऊचा काऊ तो शिपणेकऱ्याचा मावसभाऊ इतके नातेवाईक जमले होते. एका खोलीत सुमारे 25-30 लोक राहत होते, ती खोली खरं म्हणजे मामा मामी आणि त्यांची 2 वर्षाची मुलगी ह्यांना राहायला दिली होती. मामाला एक 20 वर्षाची मुलगी पण आहे, तिचा एक नवरा, दोन मुलं सगळे तिकडेच होते मुक्कामाला.
मोठ्यांदा गाणी लाऊन हाहाहूहू करून हसाहशी चाललेली. बाबांच्या सांगण्यावरून तिथे जाऊन आदित त्या सगळ्या घोळक्याला रिक्वेस्ट करत होता कि जरा सालीबाठी टाकायला मदतीला येताव काय?? सगळे (मोठी माणसं) आलात तर 15-20 मिनिटात काम संपेल. बाबा म्हणालेत कि तुम्हाला वेगळे पैसे देईन ह्या कामासाठी. मामाला राखण(?) केल्याबद्दल पगार ठरलेला आहे.
करकरीत तिन्हीसांजेची वेळ. कातकरी राहत असले तरी ते घर आमचंच. साग्रसंगीत देव नाहीत, पण एक गणपतीचा फोटो तिथे आहे. निरांजन उदबत्ती लावायच्या ह्या वेळेला तिथे राहणारी प्रत्येक व्यक्ती तरर्र दारू पिऊन फीस झालेली होती- बायका, पुरुष, किंचित मोठी झालेली मुलं- सगळे! अर्थात कोणाच्यातही सालीबाठी टाकायचं सोडा, उठून उभं राहायचंहि त्राण नव्हतं.
बाबापुता करून करूनहि कोणीही मदतीला येईना. "मामा, तुझे पाहुणे ना? तू सांग ना त्यांना.. उशीर होतोय सगळ्यांनाच!"
पण मामाचं म्हणणं होतं कि माझं नाही ऐकणार कुणी.
भयंकर हतबल होऊन गेलो होतो आम्ही. डोक्यावर सालीबाठींचा क्रेट घेऊन खेपा घालता घालता त्या मंडळींना सांगत होतो मदतीला या म्हणून.
आणि एका क्षणाला आदितला भयंकर म्हणजे भयंकर राग आला. तिथे घराच्या मुख्य उंबरठ्यात ऐटीत बसून तिथेच पक्या- मामाचा जावई- दारू पीत होता. तोंडाने सतत आणि अर्वाच्य बडबड चालू होती. मध्येच पचपचा थुंकत होता.
"अरे ए #@*च्या, तोंड बंद कर. आम्ही इथे बिन चप्पलचे चालतोय ना, थुंकायचं बंद कर आधी, आणि घरात जा गप्प"- आदित
"हे ब्बघ, बारीकशेट, मी माझ्या सासऱ्याच्या बिऱ्हाडात राहताय, तू नाय मला बोलू शकत"- पक्या
"हो?? तुझ्या सासऱ्याला राहायची सोय माझ्या बापसाने दिल्येय. आणि एवढ्या 30 लोकांना लाईट, पाणी मिळालंय हवं तेव्हा हवं तितकं त्याचं काय रे? आणि गप्पपणी राहा ना, तमाशे कशाला? मदतीला ये सांगतोय तर ते नाही,, वर वाटेवर थुंकतायस्, दारू पिऊन बड्बडतायस्, लाज नाही वाटत आमच्या इथे अशी इथे दारू प्यायला??"- आदित
पक्या धडपडत उठायला लागला, तेव्हा त्याच्याच धक्क्याने एक कापडी पिशवी जमिनीवर पडली. त्यात प्लास्टिकच्या पिशवीत दारू भरून त्या पिशवीला गाठ मारलेली, अश्या अनेक पुड्या होत्या, त्या फुटल्या, सगळी दारू जमिनीवर सांडली.. भसकन वास सुटला सगळीकडे, आणि पक्या भयंकर पिसाळला..
शब्दाने शब्द वाढत गेला. दोघे एकाच वयाचे. बाबांनी आदितला समजावून गप्प केला, त्यांच्या नादाला लागू नको अस समजावलं.
पक्या पण उठून आत गेला, आणि बायकोशी भांडण, शिवीगाळ, मारामारी सुरु केलंन.
हि सगळी लोकं खूपच डोईजड झाली होती. घराचा परिसर तर इतका गलिच्छ आणि गचाळ करून ठेवलेला कि लाज वाटायची अक्षरशः . त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करणं पण सोपं नव्हतं. मामाला म्हटलं कि तू मुलीला आणि जावयाला इथून जायला सांग, तर त्याच्यावर असलेल्या कर्जाचा पाढा वाचायचा तो.
वरवर भांडले तरी आदित हा मामाचा विशेष लाडका. त्याला कधीतरी मामा अगदी मनातल्या गोष्टी सांगायचा.
"पक्या भिकार$# आहे महित्येय रे मला बारीकशेट! पण काय करू माझ्या पोरीचा नवरा आहे तो. तुला तो अमुक महित्येय? तमुक गावच्या मराठी शाळेवर मास्तर आहे? आमच्या जातीचा आहे तो!! त्याच्याशी मी माझ्या बायाचा लग्न करून देणार होतो.. आज माझी बाया गाडीतून फिरली असती. तो पण कबूल होता, पण त्याची आई माझ्या बायाला नको बोलली.!"
मामा अगदी रडवेला व्हायचा हे सगळं सांगताना. मग आईबाबांना वाटायचं कि आता आपण इथून निघून जा म्हटलं तर ती बाया दोन लहान बाळं घेऊन जाईल कुठे?
असं करत ती फटावळ राहिली आमच्या इथेच.
एकदा पक्याचा मूड बघून बाबा त्याला म्हणाले, "सोड रे पिणं पक्या. श्रीराम जयराम जयजयराम अस म्हणत रहा, म्हणजे तुला नाही प्याविशी वाटणार." पण तो प्रयोग सपशेल फेल गेला. कारण पक्याचा जप तो काय चाललेला तर, "श्रीराम जयराम जयजयराम-- दारू दे दारू दे--"
******************************
एकदिवस अश्याच मे महिन्यातल्या एका संध्याकाळी मामा उसने पैसे मागायला आला, कशासाठी विचारले तर कारण नंतर सांगीन म्हणाला. दोन दिवस गायब होता मामा.. आला तर काही वेगळंच चित्र होतं. स्वच्छ आंघोळ करून नीटनेटके कपडे केलेला मामा कुणी वेगळाच वाटत होता.
"चहा नको मला- 21 दिवस परान्न घ्यायचं नाही सांगितलंय"
हे ऐकून आम्ही एवढे तिनताड उडालो कि "कुणी सांगितलंय?" तेही विचारायचं सुचेना..
पण धक्के बसण्याची हि सुरुवात होती.
एका बरणीत 20 रुपयात येईल तितकं लोणचं मागितलंन, आईने घरातलं लोणचं दिल आणि पैसे नको म्हणाली तर 20 रुपये ठेवलनच टेबलावर.. पैसे दिले कि आता माझं झालं ते, परान्न नाही! - हे लॉजिक...
लोणचं कसं काय अचानक? तर 21 दिवस वषाट खायला नको सांगितलंय(वषाट म्हणजे नॉनव्हेज)
तर जरा तरी काहीतरी तिखट हवंच ना म्हणून लोणचं.
हि सगळी भानगड काय तेच कळेना. दिवसातून दोनदा आंघोळ, कोणतातरी जप, 'तिकडून' आणलेल्या एका नारळाची रोज पूजा...
धक्क्यावर धक्के बसत होते. घर आवरून(त्यातल्या त्यात) समोर अंगणासारखं सारवण पडलं तेव्हा तर कहरच वाटला तो!
मामाची दारू संपूर्ण सुटली!!
त्यांच्याच समाजातल्या एका शिकलेल्या माणसाने पुण्याच्या कुठल्यातरी आश्रमाचा कि मठाचा शोध घेऊन ह्या सगळ्यांची दारू सोडवण्याचा सपाटा लावलाय! तो स्वतः जिकडे तिकडे फिरून लोकांना पटवतो, स्वतः स्पेशल गाडी ठरवून पुण्याला नेतो. गाडीभाड्याच कॉंट्रिब्युशन सगळे देतात. कातकरी दारू सोडून परत येतात. तिथे जाऊन आल्यावर जर चुकून जरी दारूला शिवलं जरी, तरी भयंकर संकट येत, सत्यानाश होतो.. अशी मेख मारलेली असते...
आपण ह्याला अंधश्रद्धा म्हणू, प्रुव्ह करा म्हणू.. पण अशिक्षितपणाचा फायदा हा कि ते लोक ह्याला भितात, विषाची परीक्षा घेत नाहीत..
*********************************
पुढच्याच मे महिन्यात मामाने पक्याला तिकडे नेला.. आणि जगातलं आठवं आश्चर्य घडलं- पक्याची दारू सुटली! जो सकाळी चूळ भरण्यापासून सुरु व्हायचा.. जो सलग अर्धा तास सुद्धा दारुशिवाय राहत नव्हता.. त्या पक्याची दारू सुटली!
गंमत म्हणजे तिकडे पुण्याला जायला निघायच्या महिनाभर आधी पक्या अक्षरशः तुडुंब दारू प्यायचा. आता सोडायची आहे, शेवटची पिऊन घेतो म्हणायचा!!
अगदी जादूची कांडी फिरवावी तसा चमत्कार झाला हा.. दारू सुटली! पक्याची दारू सुटली.
पक्या आता सभ्यपणे सकाळी उठून इमानदारीत एकठिकाणी कामाला जातो. "तुमच्याकडेच आलो असतो, पण अमुक कडून कर्ज घेतलंय ना म्हणून त्याच्याकडे जातो" हे स्पष्टीकरण मिळालंय!
हळूहळू कर्ज कमी होतंय अस ऐकलंय,
सरकारी योजनेतून भटक्या विमुक्त जमातींना घर मिळतं ते मिळालं, आणि आता बाया-पक्या तिकडे राहतात. माहेरी म्हणून मामाच्या बिऱ्हाडात येतात. मुलं नीटनेटकी शाळेत जातात. एक सेकंडहँड मोटरसायकल घेतल्येय पक्याने, मामाच्या मनात होतं तस गाडीतून नाही पण गाडीवरून तरी फिरते त्याची बाया!!
आता बाया रस्त्याने चालत जाताना भेटली तर तिला गाडीवर लिफ्ट द्यायला मला काहीच वावगं वाटत नाही. पक्या भेटला तरी, "काय रे, बरं चाललंय ना?" अशी चौकशी सगळेजण करतात. सभ्य वागलं कि आदर मिळतो तो असा!!
यंदा मे महिन्यातल्या एका संध्याकाळी बाया-पक्या कामावरून सुटल्यावर आंजरल्यातून शॉपिंग करून- त्यांच्या घरी जायच्या आधी,, मामाच्या बिऱ्हाडात असलेल्या मुलांना घ्यायला आले. घरगुती जिन्नस, आणि पोरांसाठी खाऊ. "पप्पास पप्पास" करून गलका करत पोरं जाऊन चिकटली.. (हल्ली इकडे आईला आईस, बापाला बापुस, त्याच इंग्लिश व्हर्जन म्हणून पप्पास आणि मम्मीस असं बोललं जातं)
ह्या गोष्टीला - मामाची दारू सुटल्याला आता अडीच वर्षं झाली आणि पक्याला दीड वर्षं झालं.
त्यांना कधी विड्रॉल सिंड्रोम कि काय ते झालं नाही, कि आपल्या सुशिक्षित, हाय प्रोफाइल, रॅशनल कि काय त्यांच्यासारखी ओकेजनली, सोशली, प्यावी लागली नाही. "पार्टीत प्यावीच लागते" हे भंपक वाक्य त्यांनी कधी काढलं नाही..(खरं तर संरक्षण दले सोडली तर बाकी कोणत्याही पेशामध्ये 'दारू प्यावीच लागते' हे समर्थनीय होऊ नये)
इथे तर ह्या लोकांचं "गटारी आहे आज तरी प्यायचीच" असं सुद्धा झालं नाही... त्यांच्या आयुष्याचीच वाटचाल गटाराकडून स्वच्छ तेवणाऱ्या दिव्याकडे झाली.
ह्यात काडीचीही अतिशयोक्ती नाही- आम्ही त्यांना रोज भेटतो, रोज बघतो. शिक्षणाने शहाणे झालेल्या, उच्च पदावर नोकरी व्यवसाय करून हायफाय झालेल्या, कोणत्याही कारणाने... थेंबभर किंवा बाटलीभर... एकट्याने, दुकट्याने किंवा घोळक्याने.. कशाही स्वरूपात दारू पिणाऱ्या समस्त उच्चभ्रू बंधुभगिनींना हि पोस्ट दीप अमावस्येनिमित्त सप्रेम भेट!!
No comments:
Post a Comment