एक जुनीपुराणी वयस्कर एक्टिवा, काळ्या रंगाची की जेणेकरून मळलेली पटकन कळायची नाही.. घर वापराचे सामान, भाजी अश्या बऱ्याच पिशव्या अड़कवलेली.गॉगल डायरी वॉलेट पेन मोबाईल फायली कागदपत्रे ह्या आणि अश्या असंख्य प्रकारच्या उपयुक्त आणि कामाच्या वस्तुनी ठासुन भरलेली एक सॅक अंगावर वागवणारी.
एक ब्रॅन्डन्यू करकरीत शाइन. कसकसले असंख्य भडक रंगीत स्टिकर चिकटवुन अजुनच लक्षवेधी करायचा प्रयत्न केलेली. नंबर प्लेटीवर नंबरातुन काहीतरी दादागिरी टाइप अक्षरे चितारलेली. फॅन्सी सिटकव्हर, फॅशनेबल आरसे, असा सगळा थाट केलेली.
दोन्ही गाड्या एकाच रस्त्याने एकाच दिशेला निघालेल्या.. काम संपवून आपापल्या घरी जायची संध्याकाळची वेळ. करकरीत तिन्हीसांजा.. कामाच्या शहरापासून राहायच्या गावाकडे जाणारा रस्ता,,अक्टिवाच्या डोक्यात घाई लवकर घरी पोचायची. शाइनच्या डोक्यात गती धूम सारखी शायनिंग मारायची.
शाइन एक्टिवाच्या खुप पुढे जाते. आणि शाइनच्या लक्ष्यात येतं एक्टिवा मागे राहिल्याचं. एक्टिवाच्या मात्र वशिवर्गी सुद्धा नाही त्या शाइनचं अस्तित्व. मग शाइनचा वेग कमी होतो. तिला एक्टिवा गाठते. शाइन एक्टिवाला पुढे जाऊन देते. काही वेळाने सुसाट वेगाने येऊन शाइन एक्टिवाला ओव्हरटेक करुन पुढे जाते. पुन्हा एक्टिवा मागे पड़ते. पुन्हा शाइनचा वेग कमी होतो. पुन्हा एक्टिवा शाइनला ओव्हरटेक करते.
आता शाइनचं अस्तित्व एक्टिवाने मनात नोंद केलं आहे. पण एक्टिवा आपल्या ठरलेल्या वेगाने पुढे जात राहिली आहे. आणि शाइनचा हाच उद्योग सुरु -पुढे जाण्याचा.. मागे पडण्याचा..
एका वळणावर शाइन सुसाट पुढे जाते. आणि मग एक्टिवा मागून येईल म्हणून स्लो होते. कितीतरी वेळ झाला तरी एक्टिवा मागून येत नाही म्हणून शाइन यू टर्न घेऊन वळून मागे येते. थोड्याच् अंतरावर समोरून ती एक्टिवा येते. तिच्या मागच्या सिटवर आता दोन दप्तरे आणि त्या दप्तरांचे दोन मालक बसलेत. शाइन पुन्हा यू टर्न घेते आणि पुन्हा पकडापकडीचा मुर्खपणाचा खेळ सुरु होतो.
आता एक्टिवा पुढे आहे. चिंचोळया रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घनदाट वस्तीत वहानं खोळंबलेली. वस्तीतले लोक उत्साहाने कसलीतरी मिरवणूक नाचवतायत. मागून आलेली शाइन नेमकी अक्टिवाच्या शेजारी उभी रहाते. एक्टिवाची चिड़चिड उशीर होतोय म्हणून.. शाइनचं शायनिंग मारणं त्या वहातुक कोंडीत पण सुरूच. इंच इंच लढवत एकेक वाहन रस्ता मिळवत मार्गस्थ होताय.
तेवढ्यात एक्टिवाने कुणालातरी फोनवरून "प्लीज कुकर लावायची" सूचना केली आहे. शाइनची कुणालातरी फोन लावून रात्री अमुकअमुक बिच रिसॉर्टला "बसुया का?" म्हणून चौकशी चालल्ये.
तेवढ्यात गर्दी मोकळी होते. एक्टिवा पुढे जाते. शाइन भूम भूम आवाज करत अक्टिवाला गाठते. दोन्ही गाड्या पेट्रोल पंपात येतात.
एक्टिवाला पंपावरचा माणूस विचारतो "किती टाकू?" उत्तर मिळतं-"फुल्ल करा दादा."
पेट्रोल भरून, पैसे देऊन, होइस्तो शाइनच्या टाकीचं झाकण उघडून झालय. पंपवाला विचारतोय "किती टाकू?"
उत्तर मिळताय-"50 चं टाक रे!"
No comments:
Post a Comment