17 June, 2016

गोदागौरव

गोदागौरव- कवी चंद्रशेखर (चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे)

जन्म : नाशिक, २९ जाने.१८७१ — मृत्यू : बडोदे, १७ मार्च १९३७

तुज हृदयंगम रवे विहंगम-भाट सकाळी आळविती,
तरू तीरींचे तुजवर वल्ली पल्लवचामार चाळविती;
तुझ्या प्रवाही कुंकुम वाही बालरवी जणू अरुणकरी,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी, ..१..

अवयव थिजले शरीर भिजले उठले रोम तृणांकुरसे,
सद्गद कंठी बुद्बुद करिते वचन घटोन्मुख नीर जसे;
अधर थरारे अश्रुमलिनमुख हो मतीसंकर मदन्तरी,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी ..२..

मधुमासामधि मधुर हवा ति, स्पर्श मधुर तव मधुर चवी,
सायंप्रात: सेवियली ती साखर वानिल केवि कवी?
किती कितिदा तरि तरंग तुझिये अवलोकीयले म्या नवले!
अभिनव तनुला जलकुंभ्यासम ताववगाहन मानवले..३..

अस्तोन्मुख रवि कुंकुम, केशर, चंदन वाहुनिया तुजला,
वसंतपूजा करिता तूझी तासावरुनी दिसे मजला;
करिती झुळझुळ विंझणवारे या समयी तुज त्या झुळकी,
संध्या करिता रमवि तुझे हे दर्शन देवि ! सुमंजुळ की ! ..४..

गंगे ! येत ग्रीष्म दिनान्ती पवनहि तव जलकेलि करी,
जे रवितेजो-ग्रहणे करपति, ते कर चंद्र तुझ्यात धरी;
मासे तळपति, तरंग झळकति, तुषार चमकति, जेवि हिरे !
या समयाला रूप तुझे ते दिसते रम्य किती गहिरे..५..

लंघुनि तट जे प्रावट्काली सैरावैरा धावतसे,
तवौदार्यते असीम होऊनि सलील वाहे सलिल नसे;
तल्लीलेमधि तल्लीन न हो कल्लोलिनि ! कवि कवण तरी?
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी ..६..

वरि घन बरसतिधो धो, इकडे महापुराच्या घनगजरी
“कृष्ण कृष्ण” जण, “झन चक झन चक,” टाळ मृदंगहि दंग करी
अभंग- गंगा जणु शतधा ही वाहुनि मिसळे त्वदंतरी,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी ..७..

परिसर जलमय, वनकुसुमानी झाकुनि जाती कुंप, वया,
उभय तटीची हिरवी, चित्रित, शेते डोलती ज्या समया
तव तृण धान्ये, सुमने, सुफले, सुचविति चंगळ ही अगदी !
गंगथडीचे रंगुनि राहे मंगलरूपचि भाद्रपदी ..८..

सायंकाली स्फटिकविमल तव गंगे ! जल नहि वानवते
या समयाला सुधाकराचे वैभव त्यातून कालवते
नयनमनोरम तरंगतांडव रसरुपी शिव करूनि हंसे
स्वर्गंगेचे प्रतिबिंबचि जणु गंगा होऊन हे विलसे..९..

हिमऋतूमाजी प्रभातकाली बाष्प तवौघावर तरते,
सकरुण वरुणे शाल धवल ते भासे घातलि तुजवरते;
जणु म्हणुनिच जे सुखोष्ण लागे गे ! मज घे घे त्या उदरी            
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी..१०..

शिशिरामाजी गांगहि शिशिरचि, करी हिमाची बरोबरी,
ताप दुजे हिम हरिते परि ते भवतापाते काय करी?
तया गदावरि गदा बसे ह्या- ह्या अगदाची निरंतरी,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी..११..

******************************

जीवनदायीनी गोदावरी नदी, वेगवेगळ्या ऋतूमध्ये तसेच दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी दिसणारी तिची वेगवेगळी रूपं, तिच्यावर अवलंबून असलेलं लोकजीवन आणि लोकांच भावविश्व, ह्या सगळ्याच वर्णन करून शेवटी हि नदी आमची आई, हि नदी देवता, काठावरच्या लोकांच्या जगण्याची संजीवनी, आणि तिच सगळ्या व्यापातापातून आम्हाला तारून नेईल अश्या वर्णनाची हि कविता माझी खूप आवडती आहे.

शब्दांना एक मस्त लय आहे, आणि उपमा दिलेल्या पण एकदम भारी.
सकाळी सकाळी पक्षी आवाज करतायत ते तुझी स्तुती करतायत, काठावरची झाडं चौऱ्या ढाळतायत, लाल लाल छोटासा सूर्य तुझ्या प्रवाहात कुंकू वाहतोय, अशी सुरुवात वाचूनच अगदी प्रसन्न वाटत.

पाण्यात मडकं बुडवताना येणाऱ्या बुडबुड आवाजाचा एवढा सुंदर वापर करायला कसा सुचला असेल.. गोदावरी दर्शनाने सदग्दित झालेल्या कवीचे शब्द अडकलेत जसे काही बुडबुड आवाज करत भांड्यात शिरणारे पाणी!

साखरेइतकीच  गोडी असलेल पाणी, अस्ताला जाणारा सूर्य, संध्या करताना कवीला दिसणार नदीपात्राच दृश्य, जेव्हा सूर्य अस्ताला जायला निघतो तेव्हा पुन्हा सकाळसारखाच लाल रंग धारण करतं, जसे काही केशर आणि चंदन मिसळले पाण्यात..

सूर्याच्या प्रखरतेनी करपलेले हात चक्क चंद्राने ह्या गोदावरीच्या पाण्यात बुडवलेत. काय कल्पना आहे मस्त! पाण्यातले मासे, उठणारे तरंग उडणारे तुषार म्हणजे जणू हिरे..

भर पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर पाणी सर्वदूर पसरलं तेव्हा जणू हि नदी उदार होऊन सर्वत्र निघाली अश्या ह्या दृश्यात तल्लीन होणार नाही असा कवी कुणी तरी असेल का?
नुसतं म्हणून बघताना सुद्धा एखाद्याची बोबडी वळणारा अनुप्रास अगदीच गोड वाटतोय ह्या ओळीत..
"तल्लीलेमधि तल्लीन न हो कल्लोलिनि ! कवि कवण तरी?"

ह्या महापुराच्याच काळात- आषाढ श्रावणात- सुरु असणारे भजन किर्तनातल्या टाळ मृदूंगांचे निनाद पाण्याच्या धोधोकाराशी एकरूप झालेत. 
काठावरची हिरवीगार शेतं, फळाफुलांची, धान्याची चंगळ, ह्या जीवनदायिनीने काठावरच जगणं समृद्ध केलंय. अश्या वेळी तिचं रूपही मंगलमय दिसतंय.
संध्याकाळी दिसणारी नदी, चांदण्यात दिसणारी नदी, आणि त्या चांदण्यात शंकराची गंगाच ह्या गोदावरीत मिसळायला आलेली, थंडीच्या पहाटे नदीपात्रावर पांघरलेली धुक्याची पांढरी शुभ्र शाल, त्या शालीमुळे थंडीत पण उबदार झालेलं नदीच पाणी, अगदी कुडकुडणार्या पहाटे आई कुशीत घेते तसच!

शेवटी सगळी ऐहिक सुखं नदीवर अवलंबून आहेत आणि ती देत आहे. पण आपल्याकडे लोक मुक्ती मिळवणे हे अंतिम ध्येय समजतात. शेवटी कवीला वाटतंय कि, थंडीच्या दिवसात पाणी बर्फाची बरोबरी करतं आणि तुझा तप्तपणा संपून जातो, तसाच तू भवतापातून सुद्धा आम्हाला पार करशील ना?

अचूक आणि तेचतेच शब्द येऊन न देता प्रत्येक ठिकाणी साधलेलं यमक, ओळीओळीतून दिसणाऱ्या यथार्थ उपमा, आणि जबरदस्त अनुप्रास ह्याच्यात दिसतात. हल्ली काही वाक्य आपण वारंवार वापरून गुळगुळीत करून टाकली आहेत त्यातीलच एक वाक्य- "डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं"
पण ते वाक्य ह्या कवितेसाठी खरोखर चपखल आहे. आजवर कधीही न बघितलेल्या गोदावरी ला मी ह्या कवितेतून बघून येते.

15 June, 2016

अश्या म्हणी..असे भाऊ...😂😂

म्हणी, वाक्प्रचार, शब्दप्रयोग म्हणजे "थोडक्या शब्दात भरपूर आशय" हे तर झालंच.. पण ते कोण वापरताय ह्याच्यावर पण त्यांची परिणीती ठरते कधीकधी.. 

पारंपरिक म्हणी आजी-आजोबांच्याच तोंडी जास्त शोभून दिसतात. आजीच्या सावलीत वाढलेल्या नाती, आजीचे डायलॉग मारतात ते अगदीच विनोदी किंवा वयाला न शोभणारं, वैगेरे वाटतं..
उदा. एकदा माझी आई कुठून तरी कुठे तरी एसटीचा प्रवास करत असताना, एक ओळखीची मुलगी-कॉलेजमध्ये जाणारी- गाडीत होती, तर आईने तिचं तिकीट काढलं. ती तिकिटाचे पैसे द्यायला लागली तर आई म्हणाली कि नको गं पैसे द्यायला.. राहुदेत.
ती ऐकेच ना, म्हणून आई तिला म्हणाली कि, "परतच्या वेळी कधी आपण एकत्र प्रवास करू ना, तेव्हा तू माझं तिकीट काढ, मग तर झालं?"
ह्यावर ती मुलगी-"अग्गोबाई, परत आपण एकत्र प्रवास केव्हा करणार..  म्हणजे कपिलाषष्ठीचा योगच यायला हवा.."
एरवी अजिबात वापरात नसलेला कपिलाषष्ठीचा योग हा शब्द अगदी आमच्या कायमचा लक्षात ठेऊन दिलन तिने😃
नाहीतर विस्मयचकित घटनेवर प्रतिक्रिया देताना आजीने, "अग्गोssबाई माझे!!" म्हणायचं.. आणि आपण त्याच घटनेवर, "आवराss" अशी प्रतिक्रिया द्यायची हा कायदाच आहे जणू काय! तरीही जसे लोणची,मसाले,भाजण्या हे वयाच्या चाळीशीनंतर करण्याचे उद्योग आहेत, त्याचप्रमाणे विशिष्ठ वयानंतर बायका आणि मुली म्हणी वापरू लागल्या तर खपून जातं. 
पोरांच्या दंगामस्तीने हैराण होऊन एक ताई वैतागून, करवादून पोराला ओरडत होती,"आर्य!! गप्प बस, आता लिमिटच्या बाहेर जातायस. अति सर्वत्र वर्ज्ययेत!" हे अगदी सहज स्वाभाविक वाटतं. पण मुलगे अश्या जडजंबाळ म्हणी वापरू लागले तर लईच दचकायला होतं.
असेच दोन लेटेष्ट किस्से-- म्हणींच्या विचित्र वापराचे--
****१****
संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान कॅनिंग संपलं, झाकपाक, आवराआवर झाली. सगळे मदतनीस घरी गेले, एकदोघांचं हातपाय धुणं चालू होतं, ते झालं कि कुलूप लावून निघायचंच..
संध्याकाळचा गारगार वारा खात मी कारखान्याच्या दरवाज्यात फतकल मारून निवांत बसलेले. तर आदित म्हणाला,"अगं ए दीदी! सssरssबरीत.. घरी जा आता, आई एकटी आहे घरी. बाबा आणि मी येतो सगळं आवरून"
हे ऐकून मी ताडकन उठले आणि गाडी काढता काढता म्हटलं, "हो ना, तिची सकाळी साडेपाचपासून जी धावाधाव सुरु होते, ती अजून कामं संपलेली नसणार.. आपण तर घरी जाऊन "घरात आलो" ह्या जाणिवेने रिलॅक्स होतो, तसपण तिचं होत नाही... आणि आपल्या चहा जेवणाच्या वेळा सांभाळून अजून धावपळ करून घेते वर आपल्याला म्हणते कि तुम्ही दमलात!"
त्याच्यावर आदितचं उत्तर-- "ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!!"

*****२*****
दोघे मावसभाऊ राहायला आले होते. गप्पाटप्पा करत आम्ही भावंड एकत्र जेवत होतो. कणादने चिपळूणच्या क्वालिटी बेकरीचा केक, आणि गौरवने मुंबईच्या पणशीकर दुकानातला खाऊ आणलेला, त्याचा दोन्हीचा एकेक तुकडा प्रत्येकाच्या ताटात वाढला होता. कोणीतरी म्हणालं, "हे सगळं भयंकर हेवी होताय.. ह्या दोन्हीत जबरदस्त कॅलऱ्या असणार नक्की!"
मी म्हणाले- "मरुंदेत त्या कॅलऱ्या.. सध्या आपण(आपण म्हणजे अस्मादिक) भरपूर कष्ट करून जळवतोय त्या सगळ्या कॅलऱ्या.. काही विचार नको करायला एवढा."
कणाद महर्षी उवाच-- "हम्म!! बरोबर आहे... ज्याचं जळतं, त्यालाच कळतं!"

30 May, 2016

गुलमोहोर

आमच्याकडे असंख्य प्रकारची फुलझाडं/शोभेची झाडं आहेत ती फक्त आईच्या हौसेमुळे!! फक्त 'डोळ्यांना सुख' इतकाच ज्यांचा उपयोग आहे त्या झाडांच्यात मला जास्त काही इंटरेस्ट नसतो, हे मी "निगरगट्ट प्रांजळपणाने" कबुल केलंच पाहिजे..

पण कित्येक वर्षं आमच्याकडे गुलमोहोर नव्हता. आजूबाजूला पण जास्त कुठे आढळत नसावा बहुतेक..

माझ्या 11वी च्या ऍडमिशनसाठी आम्ही पुण्याला गेलो तिथून हा गुलमोहोर आमच्याबरोबर आला.. कॉलेजच्या आवारात पहिलं पाऊल टाकलं तेव्हाच समोर गुलमोहोराचं झाड दिसलं होत.. समोरच्या रस्त्याचं नाव पण गुलमोहोर पथ!!

ऍडमिशनचे सोपस्कार पूर्ण करून बाहेर पडलो तेव्हा माझ्या डोक्यात विचार चाललेले कि इथली पुढची 5, कदाचित 7 वर्षं कशी काय जातील...
आणि आईच्या डोक्यात विचार चाललेले कि ह्या गुलमोहोराच्या बिया मिळतील तर किती बरं होईल...
जूनचा शेवट किंवा जुलैची सुरुवात होती, फुलांचा लालभडक बहर संपून, गुलमोहोराच्या तलवारीसारख्या दिसणाऱ्या काळ्या शेंगा जमिनीवर पडल्या होत्या, त्या उचलून आम्ही घरच्या वाटेला लागलो..
त्या शेंगांच्या आत खुळखुळणाऱ्या बिया रुजवून आईने त्यांची रोपं तयार केली, ती कारखान्याच्या आवारात लावली...

कॉलेज आणि पुणे सोडून बाहेर पडल्यानंतरही- डिग्री/शिक्षण, अनेक अनुभव, कडू-गोड आठवणी, जगायला आवश्यक अशी कौशल्ये, मित्रपरिवार हे सगळं जसं कायमसाठी बरोबर आहे, तसंच हे झाड आणि त्याच शेंगांमधल्या बाकीच्या बियांची झालेली झाडं सुद्धा!! माझ्या कॉलेजची आठवण..आता इतकी मोठी झाली आहे.. डोळ्यांना सुख आणि सावली सुद्धा देत आहे!!!

#memories
#sndt_pune
#Gulmohor

28 May, 2016

आगोट आणि पाऊस

कालचीच गोष्ट-- दिवसभर 12-14 तास ड्युटी करून, कॅनिंग संपवून संध्याकाळी घरी आल्यावर अक्षरशः तंगड्या गळ्यात आलेल्या.. तहान, भूक 'लागते' तशी- त्याहून जास्त - आंघोळ 'लागलेली', तरीही तश्याच आमरसात बरबटलेल्या कपड्यानीच एक चहा मारून मग आंघोळया आवरून आम्ही जरासे माणसात येतो.. टीव्ही,पेपर वगैरे कशातही जीव रमत नाही, अर्धमेला मोबाईल चार्जिंगला लावून मग, दिवसभराचे धावते अहवाल-आढावे, गमती जमती एकमेकांच्या कानावर घालत घालत दोन घास आमटीभात ओरपुन वर आंबे हाणून झाले कि जरासा मोबाईल घेऊन नेटवर एक फेरफटका मारावा म्हणून निघावं, तर केव्हाच मोबाईल हातातून गळून पडतो तेही समजत नाही...
पुन्हा जाग येते, तेव्हा असं वाटत असतं कि काही मिनिटचं झोप झाली फक्त, पण प्रत्यक्षात दुसरा दिवस सुरु झालेला असतो..

आजचा दिवसपण असाच सुरु झाला, पण उठून बाहेर बघितलं तेव्हा, कधीतरी पहाटे पाऊस पडून गेल्याचा शोध लागला..
"ऑ!! पाऊस??"
असं म्हटल्यावर "आत्ता का कळलं??" अशी आईची प्रतिक्रिया मिळाली..

पहिल्या पावसाचं स्वागत आम्हाला कधीच, "ऑसम,कूल,वॉव" वगैरे म्हणून करता येतच नाही.. लगेच भजी,ट्रिप,ट्रेक हा तर विचार पण नाही..
"आगोटची कामे" संपल्याशिवाय पावसाने येऊ नये असंच वाटत राहत.. परीक्षेत जस शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास पूर्ण झालाय असं कधीच वाटत नाही, तस हि आगोटची कामं पण कधीच संपत नाहीत.. तरीही परीक्षा जशी ठरल्या वेळी येतेच तसाच पाऊस पण एखाद्या कर्तव्यकठोर तरीही विद्यार्थीप्रिय शिक्षकासारखा हजर होतोच...
उनाड विद्यार्थी परीक्षेच्या वेळी "देवा मला पास कर" म्हणतात, तसे लवकर आलेल्या पावसाला दहीभाताचा नैवैद्य दाखवून सांगतात,"थांब रे बावा जरा, एवढी आमची आगोटची कामं होऊंदेत, मग लावणीच्या वेळी भरपूर पड हो!!"

पावसाच्या आधी आंबे उतरवून झाले पाहिजेत, हा परीक्षेतील सर्वात जास्त imp.. गवत-पेंढा-फाटी-गोवरी भरणे, छपराच्या कौलांची डागडुजी, पावसाचे पाणी घराच्या भिंतींवर येऊ नये म्हणून बाहेरच्या बाजूनी झड्या काढणे(छपराला एक्स्टेंशन) अजूनही रखडलेल्या असल्यास शेताच्या भाजावणी एक ना अनेक..

स्कॉलर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासारखे काही लोकांचे हे उद्योग वेळच्यावेळी पूर्ण होतातही, पण ऐन वेळेची धावपळ हि होणारच!!

आमच्याकडे तर परीक्षा तोंडावर आली तरी खेळात रंगलेल्या उनाड पोरासारखं, आम्ही कॅनिंगमध्ये रमलेलो असतानाच कधीतरी अकस्मात हा पाहूणा हजर होतो.. रात्रीचा आला तर मुक्कामाला थांबतो, आणि मग "अरे जनरेटरवर प्लॅस्टिक पांघरलंय का रे?" "मोटारी (यंत्रं फिरवणाऱ्या विजेच्या मोटारी)कोणत्या उघड्या नाहीत ना रे?" अश्या चौकश्या आणि धावपळी सुरु होतात..

यंदा ह्या सगळ्या खबरदाऱ्या आधीच घेऊन झालेल्या असल्यामुळे, पावसाच्या येण्याने काहीच हलचल माजली नाही.. गाढ झोपेत मातीचा सुगंध पण जाणवला नाही आणि पत्र्यावर ताडताड वाजलेला ताशा सुद्धा ऐकायला आला नाही..
पहाटे आलेला पाहुणा मुक्कामाला राहिला नाही, सकाळ होताच निघून गेला, आणि आज सकाळी ओल्या चिप्प रस्त्यावरून, ओलसर-हिरवट वास नाकात भरून घेत, धुतल्या गेलेल्या स्वच्छ झाडांकडे बघतबघत आम्ही रोजच्याप्रमाणे ड्युटीवर पोचलो..
दिवसभर पुन्हा कॅनिंगच्या धुमधडाक्यात ह्या पावसाबिवसाचा पूर्ण विसर पडला.. टरर्र, खर्रर्र, फस्सस, चर्रर्र, ए- गप्पा नंतर मारा आत्ता काम चालूंदे, 5 नंबर मध्ये साखर, 48 किलोची पावती, 26 तारखेची आढी, नळ बारीक करा, पटपट आटपा, क्रेट धुवून झाले का? चला चपला घालून साली-बाठी टाकायला---  हे असे असंख्य काय काय काय काय आवाज करत दिवस संपला....

संध्याकाळी कित्येक दिवसांनी 7 च्या आत घरात येणं झालं, येताना वाटेवर पुन्हा तो अदृश्य पाऊस दिसला.. आणि तारखेचं, ऋतूचं, वेळ-काळाचं भान आलं!!
सूर्य तर स्पष्ट होता--अजून काम संपायला अवकाश आहे.. बरंच काम शिल्लक आहे..

पण काळे ढग त्यांचं अस्तित्व ठळक करून दाखवत होते-- आता पटपट आटपा, आम्ही आलोय!!

कुणाच्या शेतातून उठलेले भाजवणीच्या धुराचे लोट,, एखादीच अलगद गिरकी घेऊन निश्चल तरंगत होते--- शेतीचे दिवस जवळ येतायत, लक्षात आहे ना??

समुद्र धीरगंभीर आणि शांत-- हालचालीपूर्वीची स्तब्धता...आता पाऊस येईल, शेतीची कामं, कॉलेजं सुरु होतील, कामगार तिकडे मोर्चे वळवतील, एकूण मुडच बदलेल,  आत्ता रुटीन बनलंय ते बदलेल, आता समुद्र खवळेल, माणसांनी शांत व्हा, काम आवरा भरभर!!!

सगळ्या आसमंतात पिवळं,सोनेरी,हिरवं,काळं,धुरकट,चमकदार असं संमिश्र वातावरण भरलेलं...
तुरुतुरु धावत पाणकोंबड्या दिसायला लागल्यायत, आणि हि पोस्ट लिहिताना कोल्हे जोरात आरडाओरडा करतायत!! पाऊस जवळ जवळ येतोय!!!

दरवर्षीचचं चक्र,पण पुन्हापुन्हा तेच अप्रूप, पुन्हा पुन्हा तेच कौतुक!

विनाशकाले विपरीत बुद्धी

सकाळी रोजच्याप्रमाणे कलमांच्या बागेत गेले. आंब्यांवर आपल्या आधीचा हक्क वांदरांचा हे तर नक्कीच, पण ह्यावर्षी वांदरांचा मूड काही वेगळाच आहे. एकतर मनुष्यजातीला घाबरणे त्यांनी सोडून दिलंय. कशालाही न भिता इतके बेरकी नजरेने बघत राहतात, आणि आरडाओरडा केला तरी बिनदिक्कत आपल्याच रोखाने पुढे पुढे येत राहतात कि सर्ऱर्ऱकन काटा येतो अंगावर.

भूक हि जित्या जीवाला कुठल्याही थराला घेऊन जाऊ शकते. आजूबाजूच्या तुटत चाललेल्या जंगलांमुळे वांदरांवर उपासमारीची वेळ आली आहे, जिथे थोडीफार झाडी दिसेल तिथे ते प्रचंड संख्येने एकवटत आहेत.. त्यामुळे आमच्या झाडांवर आंबे दिसत असताना ते आम्ही त्यांना खाऊ देत नाही हे त्यांना का म्हणून आवडेल?

बरं, एकेक वांदर म्हणजे एवढं मोठं धूड कि बकोट धरून अख्खा माणूस उचलून नेऊ शकतील सहज.. आपल्याच कलमात आपल्याला कधी कुणाची भीती वाटेल हे मला बापजन्मात शक्य वाटत नव्हतं ते आता घडत आहे..

त्यातच मामी- आमची राखणदार म्हणाली, "ताई पाणी आटला, आता रोज येताना आमच्यासाठी घरून पाणी घेऊन येत जा"
"पूर्वी रानातील पाणी आटलं" म्हणजे पाऊस 2 दिवसांवर आला अशी खूण पटायची. आता अजून महिना आहे पाऊस यायला आणि पाणी आटलं. जमीन तर एवढी शुष्क झाली आहे कि नवीन लागवड करून ती जगवणं म्हणजे कर्मकठीण झालंय.
डोळ्यादेखत जिवंत झाडं मरू कशी देणार?? म्हणून पेट्रोल जाळून, गाडीवरून पाणी घेऊन जातोय, रक्त आटवून- वाटेवर शब्दशः घाम सांडवत झाडांपर्यंत पाणी पोचवतोय रोज...

मला महित्येय दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील दुःखापुढे माझ्या ह्या रडगाण्याला "सुख दुखतंय" असं म्हणतील वाचणारे, कारण आम्हाला प्यायला पोटभर विहिरीचं पाणी आहे, पेट्रोल जाळून झाडांची कौतुकं करायची चैन आहे,.. पण हे सगळं अशासाठी चाललंय कि,आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेला ठेवा जपणं हि आमची जबाबदारी आहे. हे नाही केलं, तर आम्ही पण मराठवाड्यासारखे रखरखीत होऊन बसू.

मुळात हि वेळ का आली? इथे पोटभर पाऊस पडूनसुद्धा जमीन का शुष्क झाली? 20 वर्षांपूर्वी आमचे आईवडील आम्हाला, "तो बघितलास का हुप्प्या?" असं म्हणून ज्या वांदरांकडे कौतुकाने बोटं दाखवत होते ते निवांत वांदरं एवढे हिंस्त्र का झालेत?

जमिनी खरेदी करून, त्याच्यावरच हिरवेपण नष्ट करण्याची हौस घेऊन शहरातली विकृत माणसं इथे आली, ह्या टोळधाडीने हे वाटोळं केलय. आईइतकी आदरणीय अशी जमीन विकायचं पाप जे करत आहेत त्यांनी हि दुर्दशा केली आहे.
शहरातले लँडडेव्हलपर इथे जमिनी घेतायत, हिरव्यागर्द रानांची बेताल कत्तल करतायत-शेकडो वर्षांपूर्वीचे अजस्त्र वृक्ष क्षणात भुईसपाट करतायत, डोंगराचे उतार सपाट करून टाकतायत. त्याचावर आलिशान रिसॉर्ट किंवा सेकण्ड होम बांधतायत,सिमेंटच्या जंगलाची गर्दी उभी करतायत, इथलं पाणी नासून स्वामींग पूल बनवतायत.. तिथे पर्यटक येतायत, रान उजाड केल्यामुळे हॉटेलांतून थेट समुद्र दिसतोय त्याच्याकडे बघत बघत दारू पितायत..कचरा फेकतायत..
आमचं जगणं दिवसेंदिवस कठीण करून टाकतायत.

आत्ता ह्या सगळ्यांना मजा वाटत असेल, पण इथल्या पूर्वजांचे, त्यांनी लावलेल्या आणि आता तुटून गेलेल्या झाडांचे, त्यातल्या घरटी मोडून गेलेल्या पशुपक्षांचे, इथल्या जमिनीचे, रानावनात वसलेल्या ग्रामदेवतांचे, सृष्टीच्या चक्राशी चाळे केल्यामुळे बिथरलेल्या पंचमहाभूतांचे-- सगळ्यांचे शाप ह्या लोकांना भोवतील.. ह्या सगळ्या विनाशामुळे त्रस्त झालेल्या आमच्यासारख्या इथल्या भूमीपुत्रांचे तळतळाट लागतील ह्या लँड डेव्हलपर आणि तत्सम लोकांना.. वाटोळं होईल त्यांच्या भव्य-दिव्य प्रोजेक्ट्सचं.. असे पैसे खरोखर लाभणार नाहीत कधीच (अश्या गोष्टी घडल्याची उदाहरणं आहेत सुद्धा!! हे कारभार करणाऱ्या पूर्ण कुटुंबीयांवर अनाकलनीय संकटं आल्याचं लोकांनी बघितलं आहे..)
नंतर परत निसर्ग आपले रंग दाखवील, आणि त्यांच्या भुईसपाट झालेल्या इस्टेटींवर घनदाट रान माजेल.. पशुपक्षी सुखी होतील, पाणी आटायचं थांबेल.पण...तोपर्यंत आमची पिढी जिवंत असली तर हे सगळं पुन्हा बघायचं भाग्य मिळेल!
पटत असेल तर शेयर करा.. ह्या विनाशाला कारणीभूत होणाऱ्यांना वाचूदेत, जमीन विकणारे, विकत घेणारे, एजंटगिरी करणाऱ्यांना वाचूदेत, इथल्या निसर्गाच्या प्रेतावर स्वतःच्या हौशीचे चोचले पुरविणाऱ्याना वाचूदेत.. कोणाच्या तरी टाळक्यात उजेड पडला तरी पुरे!

30 March, 2016

रंगून काजू भरले त्यांनी गिरीडोंगर दुर्गम!

"आता कसले हे कातकरी जागेवर भेटतायत, आता बिया झाल्या ना?? आता ते एका जागी भेटणं अशक्य"
हा संवाद पांढरपेशा घरात कानावर पडला कि समजावं, काजूंचा सीझन आला.

शहरी लोकांना काजू म्हटल्यावर जे डोळ्यासमोर येतं, त्या म्हणजे काजूच्या बियाच असतात, आणि बहुतेक कोणत्याच फळाच्या बी ला इतका रुबाब मिळत नसल्यामुळे ह्या काजूच्या बियांचा उल्लेख आम्ही फक्त "बिया" असाच करतो, बस 'बिया' इतनाच नाम काफी है! कसल्या ते बोलायचं कामच नाही!

ह्या बियांवर आधारलेलं प्रचंड अर्थशास्त्र ह्या दिवसात सर्वत्र गाजत असतं.
ज्यांची स्वतःच्या मालकीची काजूची झाडं आहेत, ती कातकऱ्यांना कराराने देणे - त्यात पण अमुक रोख रक्कम ह्याच्या बरोबर "मुंबईचे दादा येतील तेव्हा, ताई माहेरपणाला येईल तेव्हा, वहिनींच्या माहेरी पाठवायला...... असे इतक्या वेळा अमुक अमुक बियांचे वाटे द्यायचेस" असं एक कलम त्या करारात असतंच! मग तेवढ्या बिया आणि ठरलेली रोख रक्कम झाडांच्या मालकाला देऊन उरलेल्या बियांचं त्यांनी काय वाटेल ते करावं..

करार बिरार न करता स्वतः बिया काढायचा पराक्रम करणारे काही थोडेजण असतात. कडेकपारीत, काट्याकुट्यात हिंडून बारीकबारीक बिया पातेऱ्यात शोधून जमवणं, झाडांवरून काढणं म्हणजे काय खायचं काम नाही. चोरांची कटकट सुद्धा भरपूर..  काही काही गुणविशेष निसर्ग जीन्समधूनच माणसाना देतो, त्यामुळे चोरीची टीप जरी गुप्तहेरांनी दिली, तरी मध्यरात्री मिट्ट काळोखातून रानात चोरांचा पाठलाग करणं हे सगळ्या लोकांना जमण्यासारखं नाही.. अर्थात अश्या बिकट वाटेवर चोरी करणं सुद्धा येऱ्यागबाळ्याचं काम नाही. त्यामुळे बिया चोरीची एकतरी चटपटीत ष्टोरी दरवर्षी चवीने चर्चिली जाते, त्या ष्टोरीत जर चोर रंगेहाथ पकडला गेला असेल तर मग ती ष्टोरी अजूनच रोमहर्षक!!

ज्यांची स्वतःची झाडं नसतील ते कातकऱ्यांकडून बिया विकत घेणार, त्यात पण 10 रुपयाला 4 बिया असल्या तरी हजारो रुपयांच्या ओल्या बिया विकत घेणारे हौशी कलाकार कमी नाहीत. कातकऱ्यांची लगबग अगदीच प्रेक्षणीय!

खास पाहुण्यांचं अगत्य करायला बियांची उसळ, बियांची आमटी, तंद्री लाऊन- एकाग्रचित्ताने सोलून खायला मीठ घालून उकडलेल्या बिया, धुरीच्या शेगडीत भाजून- हात काळे करून- फोडून खायला बिया, कसकसल्या भाजीत व्यंजन म्हणून बिया असले लाड यथेच्छ होतात. प्रोफेशनल काजुवाले तर त्यांच्याकडच्या शेरंडावलेल्या(शेरंडावणे=फाजील लाड) बियांना मसाला, चॉकलेट, मँगो, स्ट्रॉबेरी असले फ्लेवर लावतात.. शिवाय मग ऑफ सीझनसाठी सुख्या बिया, हे सगळे जास्तीचे सोपस्कार!
******************************

हे सगळे कौतुकसोहोळे वाट्याला येतात ते बियांच्या.. काय करणार ना, फिरते रुपयाभोवती दुनिया....

पण हि बी ज्या फळातून निघते -म्हणजे त्याला आम्ही बोंडं म्हणतो - त्यांच्याकडे मात्र लाल गुलाबी शेंदरी पिवळे असं विविधरंगी मोहक रूप आणि रसदार अंतरंग असूनसुद्धा सर्रास दुर्लक्ष झालेलं असतं.

नाही म्हणायला कोकणवर्णन ह्या जुन्या कवितेत मात्र बियांनी नाही तर बोंडांनीच जागा पटकावली आहे,
"लज्जारंजित नवयुवतींच्या कोमल गालांसम..
रंगुनी काजू भरले त्यांनी गिरीडोंगर दुर्गम!"
ह्याच्या व्यतिरिक्त कुठे त्या बोंडांची कुणी दखल तरी घेतल्येय का शंकाच आहे...

अगदी तुरळक कुणीतरी त्याचा स्क्वॅश/सिरप वगैरे करून विकतात, आणि 'म्हणे' कुणीकुणी त्याची दारू बनवितात वाटतं!

फारच झालं, तर "ह्या झाडाखाली बोंडांचा खच पडलाय, आणि वर बिया दिसत नाहीत त्याअर्थी चोरी झालेली आहे" इतपत सीआयडी गिरी करायपुरताच बोंडांचा उपयोग.. नाहीतर मातीत मिसळून जाणे हेच त्यांचे प्रारब्ध!

आपल्याला तर बोंडं खायला जाम म्हणजे जामच आवडतात. ह्या दिवसात कामानिमित्त रानात भरपूर फिरणं होतं, आमच्या आणि आमच्या आजूबाजूच्यांच्या बागेतल्या कातकऱ्यांच्या लहान पोरांशी माझी खास दोस्ती.. आमच्याच झाडांपैकी कुठल्या झाडांची बोंडं जास्त खास लागतात, कुठल्या झाडांची बोंडं खाजरी आहेत, हे ती पोरंच मला शिकवतात! सरसर झाडाच्या शेंड्यात जाऊन, अलगद यथेच्छ बोंडं काढून मोकळे! चालताचालता त्यातला चविष्ट रस हातांवर, तोंडावर पाघळत पाघळत ती कचाकच फस्त करायचं माझं प्रशिक्षण तिथलंच. वर "ताई, घरी जातेवेलीं काकींना खायाला न्हे बोंडां" हा हुकूम.

पण खरोखरच वर खाली फेऱ्या घालून, उन्हात तळपुन, काट्याकुट्यात फिरून स्वतःला ओरबाडून घेऊन, घाम गाळून झाल्यानंतर ह्या पोरांशी गप्पा मारतमारत, रानातला गार गार वारा खात, काजूची बोंडं खाणं म्हणजे ह्या जगातली एक नंबरची रिफ्रेशमेंट आहे.

त्याच्यात आयर्न आणि व्हिटॅमिन सी असतं म्हणून उद्या ती कोणी दुकानात विकायला ठेवील(कदाचित कुठे महानगरात सुरुवात झाली पण असेल) तर त्यात हि अशी  वातावरण निर्मिती नसेल. सफरचंद-बीफरचंद असल्या ऐदी कॅटेग्रीत बोंडं नाहीतच. ती कापून, बशीत घेऊन, टुथपिकला टोचून खायचा कुणी विचारच मनात आणू नये. ती वाईल्ड आहेत, त्याच पद्धतीने ती खायला पाहिजेत, कचाकचा...